साहित्यिक आनंदहरी यांना सांगली जिल्हा नगर वाचनालयाचा पानवलकर पुरस्कार
सांगली : इस्लामपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक आनंदहरी यांना सांगली येथील कै. श्री. दा. पानवलकर स्मृती कथा पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगली (जिल्हा) नगरवाचनालय यांच्यावतीने २० ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता त्यांना रोख रक्कम, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
आनंदहरी हे ज्येष्ठ साहित्यिक असून गेली अनेक वर्षे ते पेठ व इस्लामपूर परिसरात प्रतिभा, तिळगंगा साहित्यरंग परिवाराच्या माध्यमातून सक्रिय आहेत. ती’ची गोष्ट, राकाण आणि कातळकोंभ या कथासंग्रह सोबत त्यांच्या पाऊलखुणा, वादळ, बुमरॅंग या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तू, कोरडा भवताल, काळीज झुला हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत.
यापूर्वी त्यांना साहित्य लेखनासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचा कै. वि. वा. हडप कादंबरी पुरस्कार, आरती’ परिवाराचा कै. चिं. त्र्यं.खानोलकर स्मृती कादंबरी पुरस्कार, कै. जयवंत दळवी स्मृती कादंबरी संहिता पुरस्कार, संगमनेर इतिहास संशोधन मंडळ ,संगमनेर चा कवी अनंत फंदी कादंबरी पुरस्कार, राधानगरी ग्रामीण साहित्य संमेलन उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार, रोटरी क्लब पुणे यांचा दिवाळी अंकातील उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार, अग्रणी साहित्य प्रतिष्ठान, देशिंग-हरोली,चा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी समिती, नांदेड यांच्याकडून कविभूषण सन्मानही देण्यात आला आहे. सन १९९६-९७ पासून प्रतिवर्षी कथालेखकाची निवड करून पानवलकर स्मृती पुरस्कार दिला जात असून आजपर्यंत मेघना पेठे, कृष्णात खोत, वसंत केशव पाटील, रंगराव बापू पाटील आदी मान्यवर कथा लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.