February 29, 2024
The breed of love article by Rajendra Ghorpade
Home » प्रेमाची जात असते तरी कशी ?
विश्वाचे आर्त

प्रेमाची जात असते तरी कशी ?

पैं तुझी आण वाहणें । हें आत्म लिंगाते शिवणें ।
प्रीतीची जाति लाजणे । आठवो नेदी ।। १३६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – तुझी शपथ वाहणे म्हणजे आम्ही आपली शपथ वाहण्यासारखे आहे. मी स्वभावतः सत्यवचनी असल्यामुळे मी शपथ वाहणें ही लज्जेची गोष्ट आहे. परंतु प्रेमाची जातच अशी आहे की ती लज्जेची आठवण होऊ देत नाही.

प्रेमाची भाषा जीवनात सुख, आनंद आणणारी अशी आहे. दुःख दुर करून मनात नवी उमेद निर्माण करणारी, प्रोत्साहन देणारी अशी आहे. प्रेमाचे चार शब्द मनातील सर्व अहंकार घालवतात. नम्र वागण्यास शिकवतात. समोरच्याचे असे प्रेमाचे, नम्रतेचे वागणे पाहून आपणामध्येही तसा मोठा बदल होतो. अडचणीच्यावेळी, दुःखाच्यावेळी प्रेमळ व्यक्तीने व्यक्त केलेले प्रेमाचे चार शब्द मोठा आधार देतात. स्वतःला मिळालेले हे मानवी जीवन हे खूप लहान आहे. याचा विचार करून ते सुंदर कसे जगता येईल याचा विचार करायला हवा. यासाठीच प्रेमाने जीवन जगायला हवे. हा मोठा, हा लहान असा भेदभाव विसरून जायला हवे. मी पणाचा अहंकार विसरून जीवन आनंदी करायला हवे.

देवळात, मठामध्ये सेवेकरी म्हणून आपण काम करतो. तेंव्हा आपल्या वाट्याला येणारे काम हे सद्गुरुंचा, भगवंताचा प्रसाद समजून आपण ती सेवा देतो. ते काम करताना आपण लाज बाळगत नाही. भगवंताच्या, सद्गुरुंच्या प्रेमापोटी हे काम आपण करतो. साफसफाई असो किंवा जेवणाची सेवा असो हे काम आपण मनमोकळेपणाने करतो. उच्चपदस्त व्यक्तीही हे काम अगदी प्रेमाने, आनंदाने करतात. त्यात ते कोणतीही लाज बाळगत नाहीत. देवाच्या देवळात सर्वचजण सारखे असतात. हा समभाव उत्पन्न व्हावा, अशी त्या मागची भावना असते. या सेवेतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. यातून अनेक व्याधीतून मुक्तीही मिळते. इतके या प्रेमाचे, भक्तीचे सामर्थ्य आहे. यासाठीच जीवनात प्रेमाने वागायला शिकावे. बोलण्यातील मृदुता अनेक औषधांपेक्षाही अधिक प्रभावी ठरते.

आई वडीलांचे प्रेम, पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, आजी-आजोबांचे प्रेम असे हे कौटुंबिक जिव्हाळाचे नाते जपणारे प्रेम आपले जीवन सुखी करत असते. जीवनात आपण कितीही मोठ्या पदावर काम करत असलो किंवा श्रीमंतीने संपन्न असलो तरी हे प्रेम नसेल तर जीवन कधीच सुखी होणार नाही. या पैशाला, त्या मोठ्या अधिकाराला काहीही किंमत नसते. यासाठी हा मोठेपणा, ही श्रीमंती विसरून प्रेमाचा मोठेपणा अन् श्रीमंती जपायला हवी तरच जीवन खरे सुखी होईल. पण हे प्रेम फक्त नात्यापुरते मर्यादित नसते. मित्र-मैत्रिणीमध्येही प्रेमाचे नाते असते. जीवनात प्रेम करणारे मित्र-मैत्रिणी मिळायला भाग्य लागते. प्रेम म्हणजे वासना नव्हे हे मात्र येथे लक्षात घ्यायला हवे. अर्जुन अन् कृष्णाची मैत्री होती. मित्राच्या प्रेमापोटी भगवान कृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले. यावेळी त्यांनी आपले मोठेपण मैत्रीपुढे क्षुल्लक ठरवले. अशी ही प्रेमाची मैत्री हवी.

भगवान कृष्णाचा जन्म देवकीच्या पोटी झाला. पण कृष्णाला यशोदा मातेने वाढविले अन् घडविले. ही यशोदा राजघराण्यातील होती का ? पण जन्माने जरी तो तिचा पुत्र नसला तरी तिने प्रेमाने कृष्ण घडविला. या अशा प्रेमात जात-पात, उच्चनिचता हा भेदभाव नसतो. प्रेमच माणसाला घडवत असते. यासाठी लज्जा न बाळगणाऱ्या या प्रेमाची जात आपण अभ्यासायला हवी.

साधना सुद्धा प्रेमाने करायला हवी. मनातील वासना, क्रोध प्रेमाने दुर करता येऊ शकतात. साधना करताना होणाऱ्या यातनाही प्रेमाने सहन करता येतात. प्रेमाने या यातनावर फुंकर मारावी म्हणजे होणारे सर्व त्रास दूर होतात. साधनेत मन रमू शकते. या प्रेमाची जातच अशी आहे. यात सर्व दुःखे दुर करण्याचे सामर्थ्य आहे.

Related posts

शेतकऱ्यांचे नवे रुप – अॅग्रीप्रिन्युअर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समग्र साहित्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे

शिवरायांच्या स्वराज्याची गौरवगाधा !

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More