किल्ल्यांमध्ये काय काय बघण्यासारखे आहे, याबद्दलच्या सर्व बारीकसारीक गोष्टींचे उल्लेख लेखकाने या पुस्तकात केले आहेत. त्याचप्रमाणे किल्ल्यांचा इतिहास व तिथे घडलेल्या घटनांचा तपशीलवार आढावा ऐतिहासिक साधनांच्या आधारे घेतला आहे व त्या-त्या साधनांचा आधार त्याच ठिकाणी लगेच दिला आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांची सोय झाली आहे.
प्रा. डॉ. आर. एच. कांबळे,
इतिहास विभागप्रमुख,
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
‘किल्ला’ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाची गुरुकिल्ली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्हणजेच मराठी स्वराज्याच्या यशाची अवघी कथाच सिंहगड, रायगड, पन्हाळा आणि प्रतापगड अशा गडांभोवतीच फिरत राहते. मध्ययुगात लष्करी दृष्टीने किल्ल्याला असाधारण महत्त्व होते. डोंगरावरील किल्ल्याला गड असे म्हणत. सपाट मैदानी प्रदेशातील किल्ला भुईकोट, तर पाण्यातील किल्ल्याला जंजिरा म्हणून ओळखले जाई. हे सर्वच किल्ले संकटकाळी आसरे म्हणून आसपासच्या पाच-पन्नास मैलांच्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी आवश्यक, तर आक्रमणासाठी मोक्याची, माऱ्याची ठिकाणे म्हणून उपयोगी येत. अन्नधान्य आणि दारूगोळा साठविण्याची कोठारे आणि सोने, रुपे, जडजवाहिर ठेवण्याच्या तिजोऱ्या म्हणजेही हे किल्लेच ! किल्ल्यांचे अनेकविध महत्त्व महाराजांना चांगलेच उमगले होते. ‘किल्ले म्हणजे राज्याची बळकटी आणि राज्याचे रक्षण असून, आपले 360 किल्ले म्हणजे प्रत्येक किल्ला वर्ष-वर्ष लढवला, तरीही 360 वर्षांच्या स्वराज्याची हमीच आहे,’ असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असत.
अशा या प्राचीन आणि मध्ययुगीन किल्ल्यांवर इंग्रजीतून पुष्कळच लेखन झाले आहे. 20व्या शतकाच्या अगदी पहिल्या दशकापासून मराठीतूनही लेखन झालेले आढळते. चिं. गं. गोगटे यांनी ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ हे दोन भागातील पुस्तक अनुक्रमे इ. स. 1905 आणि इ. स. 1907 मध्येच पुण्यातून प्रकाशित केले होते. अगदी अलीकडेच या दोन्ही भागांचे संपादन करून संदीप तापकीर यांनीच ते प्रकाशित केले आहे. रियासतकार गो. स. सरदेसाई, प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर, वा. सी. बेंद्रे, शं. रा. देवळे, गो. नी. दांडेकर अशा विद्वानांनी त्यांच्या-त्यांच्या लेखनात महाराष्ट्रातील किल्ल्यांचा परामर्ष घेतलेला दिसतो. प्रभाकर गद्रे, प्र. के. घाणेकर, रवींद्र रामदास या मंडळींनीही महाराष्ट्रातील आणि कोकणातील किल्ल्यांवर लेखन- संशोधन केलेले आहे.
सध्याही अनेक तरुण किल्ल्यांवर लिहीत आहेतच. भगवान चिले हे अशाचपैकी एक नाव ! पुणेस्थित महेश तेंडुलकर यांनी तर किल्ला या विषयावरील संशोधन-लेखनाला जणू वाहूनच घेतले आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक किल्ल्यांवर भ्रमंती करून वेगवेगळ्या अंगाने किल्ल्यांचा विचार करून या विषयावरील लेखनाची चाळिशी पार केली आहे. हा कदाचित निदान मराठीपुरता तरी विक्रमच असावा !
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे हे चारही जिल्हे ऐतिहासिक किल्ल्यांनी संपन्न असे जिल्हे असून, त्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किल्ल्यावर मराठीमधून थोडेफार लेखन झालेले आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात गिरीदुर्ग, जलदुर्ग आणि गढीकिल्ले अशा तीन प्रकारचे किल्ले असून, यापूर्वी या जिल्ह्यातील किल्ल्यांवर रघुनाथ बोरकर यांनी इ. स. 1992 मध्येच एक पुस्तक लिहून ठेवले आहे. अर्थात, एखाद्याने एखाद्या विषयावर काही लिहिले म्हणजे दुसऱ्याने त्यावर काही लिहू नये, असा काही नियम नाही. उलट, ज्ञानाच्या क्षेत्रात त्याच विषयावरच्या नवनव्या पुस्तकांची नेहमीच गरज असते.
या पुस्तकांखेरीज इतरही काही ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ल्यांवर काही फुटकळ वृत्तपत्रीय आणि पुस्तकरूपी लेखन झालेले आहे. त्यामध्ये साधारणत: 20-25 किल्ल्यांची माहिती दिलेली आढळते. मात्र, प्रस्तुत पुस्तकाचे लेखक संदीप तापकीर यांनी आपल्या ‘अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले’ या पुस्तकात तब्बल 28 किल्ल्यांची माहिती करून दिली आहे. जुन्या प्रस्थापित किल्ल्यांबरोबरच त्यांनी अलीकडेच डॉ. सचिन जोशी यांनी उजेडात आणलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कासारदुर्ग, गुढ्याचा किल्ला आणि माणिकदुर्ग यांचीही ओळख पुस्तकात करून दिली आहे, हे मला विशेष वाटते. पुस्तकातील हा भाग नावीन्यपूर्ण आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना तर पर्वणी आहेच; पण त्याचबरोबर इतिहासप्रेमी, गिर्यारोहक, पर्यटक आणि ट्रेकर्स यांच्या दृष्टीनेही एक मार्गदर्शक आणि अत्यंत उपयुक्त असे आहे.
किल्ल्यांमध्ये काय काय बघण्यासारखे आहे, याबद्दलच्या सर्व बारीकसारीक गोष्टींचे उल्लेख लेखकाने या पुस्तकात केले आहेत. त्याचप्रमाणे किल्ल्यांचा इतिहास व तिथे घडलेल्या घटनांचा तपशीलवार आढावा ऐतिहासिक साधनांच्या आधारे घेतला आहे व त्या-त्या साधनांचा आधार त्याच ठिकाणी लगेच दिला आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांची सोय झाली आहे. सोबत छायाचित्रे आहेतच. त्यामुळे किल्ल्यांवर संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा हे पुस्तक उपयुक्त ठरेल. म्हणून हे पुस्तक प्रत्येक शाळा-महाविद्यालयात, तसेच शासकीय कार्यालयाच्या संग्रही असणे आवश्यक वाटते. या पुस्तकातून ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत.
काही प्राचीन किल्ले आजही चांगल्या स्थितीत आहेत. काहींची पडझड झालेली आहे. काही काळानंतर आज शिल्लक असलेले अवशेष कदाचित राहणार नाहीत; परंतु या पुस्तकाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ल्यांची माहिती एकत्र राहणार आहे. हे पुस्तक लिहिण्याचा लेखकाचा आणि प्रकाशित करण्याचा प्रकाशकाचा उपक्रम स्तुत्य आहे.
किल्ला या विषयावर लेखक संदीप तापकीर यांचे हे काही पहिलेच पुस्तक नाही. या अगोदर त्यांनी ‘महाराजांच्या जहागिरीतून… पुणे जिल्ह्यातील 29 किल्ले’ आणि ‘वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्ह्यातील किल्ले’ अशी पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.
प्रा. डॉ. आर. एच. कांबळे
पुस्तकाचे नाव – ‘अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले’
लेखक : संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे मोबाईल – 9168682204
पृष्ठे : १३१
किंमत : १८० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.