September 27, 2023
Rajendra Ghorpade Dnyneshwari Article on Suicide
Home » आत्महत्येपेक्षा कधीही वीरमरण श्रेष्ठ
विश्वाचे आर्त

आत्महत्येपेक्षा कधीही वीरमरण श्रेष्ठ

नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्‍चितच थांबेल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावें घेऊनि ।
आत्महत्येसि निमोनि । जायिजे जेणें ।। 947 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ – जें प्याले असतां आत्महत्या करून मरून जावें लागते, असें ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे !

धकाधकीच्या जीवनात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जीवनात नैराश्‍य आल्याने, कर्जबाजारीपणाला कंटाळून, अपयश आल्याने आत्महत्या केल्या जात आहेत. त्रासाला कंटाळूनही काही जण आत्महत्या करतात. नव्या पिढीत माणुसकी कमी होत आहे. यातूनच आत्महत्येच्या घटना घडत आहेत. माणसाला आधार देणारा माणूसच राहिलेला नाही. कौटुंबिक जीवनातही वादाचे प्रसंग वाढत आहेत. चंगळवादी संस्कृतीमुळे तर मैत्रीची व्याख्याच बदलली आहे. अशा या युगात मानवता याच धर्माची गरज आहे. त्याचा प्रसार होण्याची गरज आहे.

अशी परिस्थिती पूर्वीच्या काळीही होती, पण त्या काळात संतांच्या महान कार्यामुळे यावर प्रतिबंध बसला. सध्याही अशा मानवतेच्या संतांची गरज आहे. सध्या भगवी वस्त्रे घालून धर्माचा प्रसार करणारे अनेक जण दिसतात, पण मानवतेचा गंधही त्यात नसतो. नुसती प्रवचने, सल्ले देऊन हे कार्य होत नाही. यासाठी स्वतः आत्मज्ञानी होण्याची गरज आहे. आत्मज्ञानी संतच हा मानवतेचा धर्म टिकवू शकतात. असा संत प्रत्येक जण होऊ शकतो. जगातील सर्व धर्म हे मानवतेचीच शिकवण देतात. तरीही जगात अशांतता आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण केली जाते. स्पर्धा लावली जाते.

सत्तेच्या हव्यासापायी तंटे लावले जातात. अशा या स्वार्थानेच धर्म बदनाम होत आहे. हुकूमशाहीच्या हव्यासाने अनेकांचे बळी घेतले जातात, पण या हुकूमशहांचा शेवट खूपच वाईट असतो तरीही याची चर्चा होत नाही. हे हुकूमशहा मरताना दयेची याचना करतात, पण त्यांना कोणीही दया दाखवत नाही. काही हुकूमशहांनी तर आत्महत्याच केल्या आहेत. मग त्यांनी अत्याचार तरी केले कशासाठी ? दीनदुबळ्यांना दया दाखविली नाही त्यांना कोण दया दाखविणार. हत्या करणारेच आत्महत्या करतात. हाच इतिहास आहे. यातून बोध घ्यायला हवा. यासाठीच तर मानवता धर्माची गरज आहे.

देशात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गंभीर रूप धारण केले आहे. नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्‍चितच थांबेल. आत्महत्या हा प्रकार वाईटच आहे. विष विकत घेण्यासाठीही पैसे लागतात. विष घेऊन मरण्यापेक्षा धाडसाने युद्ध करून, ओढवलेल्या परिस्थितीचा सामना करून वीरासारखे मरावे. अशाने समाजातही मानाचे स्थान मिळू शकेल. आत्महत्या हा काही जीवन संपवण्याचा मार्ग नव्हे. मिळालेले सुंदर जीवन आणखी कसे सुंदर करता येईल यासाठी प्रयत्न हवा. अशा या सुंदर जीवनाचा अर्थ समजून घेऊन जगायला शिकले पाहीजे. तरच हे जीवन अधिक सुंदर होईल.

Related posts

बाह्यरंगातील आनंदाला भुलल्यानेच पदरी दुःख

स्व:च्या ओळखीतूनच विश्वाचे ज्ञान

… म्हणूनी ते स्वराज्य सुराज्य

Leave a Comment