March 30, 2023
Shashikant Hingonekar Book Review of Yudharat
Home » विद्रोही जाणिवांतील युद्धरतता
मुक्त संवाद

विद्रोही जाणिवांतील युद्धरतता

कवितेच्या माध्यमातून ज्ञात झालेला इतिहास आपणास व वंचित सभोवतालास जागण्याची, जगण्यासाठीची प्रेरणा देतो. त्यासाठीच आपण पॅंथर काळातील कवितेचे, तिच्या मोठ्या प्रमाणातील निर्मितीचे प्रयोजन बेदखल करू शकत नाही.

दा. गो. काळे

कवी शशिकांत हिंगोणेकर आजच्या आंबेडकरी कवितेतील अग्रगण्य कवी आहेत. चळवळीत असणारे आपले अस्तित्व व कवितेतील सातत्य त्यांनी अगत्याने सांभाळले आहे. त्यांचा ‘युद्ध सुरू आहे’ ते आताच्या ‘युद्धरत’ पर्यंतच्या कवितेचा प्रवास हा व्यवस्थेने अवरुद्ध केलेल्या रस्त्यावरून अव्याहतपणे सुरूच आहे. त्यात मनाला अस्वस्थ करणारी तडफड असली तरीही कवितेचे बोट धरून, अंत नसलेल्या सार्वत्रिक युद्धाला भिडण्यासाठी घराचे व मनाचे मैदान करून त्यांच्या कवितेचा नायक सजगपणे उभा आहे. त्यांच्यात पेरलेल्या स्वप्रांच्या बीजांचा आणि आकाशातील विजांचा अवकाश सामावलेला आहे. तो त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ‘अजूनही दिवस कालचे सरलेले नाहीत उपेक्षेचे वाळवंट चौफेर घेरूनच आहे उंचच्या उंच वाढतच आहे अपमानाचं जंगल ।|

गंजलेली शस्त्रे परजून घेतलीयत तत्परतेनं तरच हा सारा काळोख कापून काढता येईल । स्वप्नांचे आकाश मला मिठीत घेता येईल ।

हा विद्रोही जाणिवांमधून ही सततची युद्धरतता समजून घेण्यासारखी आहे. सततचे जगणे कठीण करणाऱ्या परिस्थितीने व त्यातून आलेल्या दहशतीने त्यांना त्यांच्या स्वप्नांची दारे रोजच उघडावी लागतात. कारण ती त्यांच्यासाठी सदैव बंदच असतात. म्हणून ही कविता वर्तमान ओलांडून भविष्यातील स्वयं सहजासहजी पाहू शकत नाही. आणि तिला आपला भूतकाळही विसरता येत नाही. म्हणजे तिचे असणे तिन्हीकाळ तिष्ठत आणि कार्यरत असते. तिचे असणे सदासर्वकाळच समष्टीशी जोडलेले असते. म्हणून त्यांच्यासाठी कविता म्हणजे सत्याचे उपयोजन करण्याची प्रक्रिया होय. कवितेच्या माध्यमातून ज्ञात झालेला इतिहास आपणास व वंचित सभोवतालास जागण्याची, जगण्यासाठीची प्रेरणा देतो. त्यासाठीच आपण पॅंथर काळातील कवितेचे, तिच्या मोठ्या प्रमाणातील निर्मितीचे प्रयोजन बेदखल करू शकत नाही. त्या संबंध निर्मितीच्या मागे महामानवाचा संविधानात्मक स्पर्श होता ही गोष्ट विसरता येत नाही.

पूर्वजांनी भोगलेल्या काळाचा गाळ कवितेने इतिहास म्हणून पुढे आणला. आजची व्यवस्था, त्यात गुदमरलेले आजच्या कवितेचे वास्तव आणि वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर होणारी ससेहोलपट हा या कवितेचा विषय आहे. हा कवी अगदी ताज्या घटनेवरही आपले भाष्य, आपला एक आवाज कवितेतून नोंदवण्याचा प्रयत्न करतो. कारण उद्या कदाचित आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा येईल अशी भीतीही त्याला वाटत असावी. तो म्हणतोही, ‘कवितेशिवाय बोलण्याची भीती वाटत असते मला ह्या गोष्टीत कोणत्यातरी वाईट घटितांची सूचकता दडलेली आहे.

म्हणून आंबेडकरी जाणिवांच्या व्यक्ततेत कवितेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गोष्ट कदापिही विसरता येत नाही. कारण शब्द मनाला विचार करायला पंख देतात. आपल्या डोळ्यांना ज्ञानाची दृष्टी आणि पाहण्यासाठी स्वप्नंही देतात. म्हणून या कवीला प्रश्न पडतो. ‘ज्यांच्या डोळ्यात कधीच स्वप्र उगवत नाही ते लोक कसे असतील’ हा सुरू झालेला शोध ही कविता सामान्याला माणूस असण्याच्या जाणिवेपर्यंत घेऊन जातो. कारण या कवितेतून आलेला प्रत्येक शब्द त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला दिलेला सर्वात्मक असा आवाज होतो. या आवाजात युद्धरतता असली तरी, त्यातील बुद्ध अजूनही जागा आहे. आणि त्यांच्या विचारातील करुणाही त्या दृष्टीने ही कविता आजच्या अस्वस्थ शतकात अत्यंत महत्त्वाची आहे. नाहीतर ही छळगाथा कोण वाचणार? कवितेशिवाय कदाचित पर्यायही राहणार नाही. असा हा काळ आहे.

पुस्तकाचे नाव – युद्धरत
कवी – शशिकांत हिंगोणेकर
प्रकाशक – वर्णमुद्रा
किंमत ₹400/-

Related posts

स्त्री शक्तीची कथा…मनस्विनी

उपेक्षित, वंचित, गरजू मुलांना मुख्य प्रवाहात आणणारी विनया

Saloni Art : ग्लास बाॅलचे थ्रीडी चित्र असे रेखाटा…

Leave a Comment