वेळेला आणि पैशाला महत्त्व आल्याने अध्यात्माचा विचार आता कमी होऊ लागला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत भावी पिढी कोणता आदर्श घेणार हे त्या काळाची परिस्थिती ठरवेल, पण गुरू-शिष्यांची ही परंपरा कायम राहील, हे विसरता कामा नये.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
येथ म्हणें श्री विश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो ।
येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ।। १८०१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – तेंव्हा विश्वाचे प्रभुराय श्रीनिवृत्तीनाथ म्हणाले की, हा दानप्रसाद होईल. या वराने ज्ञानदेव अंतःकरणांत सुखी झाले.
सद्गुरू फक्त तुचे लक्ष मागतात. तुचे ध्यान मागतात. अवधान मागतात. तुचे स्थिर मन मागतात. दृढ निष्ठा मागतात. भक्ती मागतात. हे दान सद्गुरू मागतात. भक्ताच्या याच दानाचे ते भुकेलेले असतात. यातूनच त्यांना तृप्ती प्राप्त होते. हे दान जो भक्त देतो त्याला सद्गुरूंचा आशीर्वाद निश्चित लाभतो. याच दानाचा स्वीकार सद्गुरू करतात. हे दान देण्यासाठी स्पर्धा करावी.
लाखो, कोटी रुपयांचे दान देणारे भक्त आज गल्लोगल्ली भेटतात, पण असे दान देणारा भक्त भेटत नाही. संपत्ती देऊन सद्गुरूंचा आशीर्वाद भेटत नाही. तो एक क्षण सद्गुरू स्मरणानेही भक्ताला सहज भेटू शकतो. तशी भक्ती, श्रद्धा मात्र सद्गुरूंच्यावर असावी लागते. सद्गुरूंना आवश्यक असणारे दानच भक्ताने द्यावे. सद्गुरू हे प्रसाद वाटायला बसले आहेत. हा प्रसाद घेण्यासाठी भक्ताने धडपड करायला हवी. सद्गुरूंच्या प्रेमातून सुख, आनंद ओसंडून वाहत आहे. याचा आस्वाद घेता यायला हवा.
सद्गुरूंचा हा प्रसाद मिळविणारा भक्त नेहमी तृप्त राहातो. यासाठी ही तृप्ती टिकविण्यासाठी प्रयत्न भक्ताने करायला हवा. देवधर्माचा विचार आता कमी होत चालला आहे. लोकांचा यावर आता विश्वास राहिलेला नाही. मानवाला देवस्थानाचा मान देणेही अनेकांना पटत नाही. सद्गुरूंना देव म्हणणे हा विचारही आता मागे पडत आहे. पाद्यपूजा या गोष्टीतर आता लांबच राहिल्या आहेत. ही बदलती संस्कृती गुरूंना पैशाच्या हिशेबात मोजत आहे.
वेळेला आणि पैशाला महत्त्व आल्याने अध्यात्माचा विचार आता कमी होऊ लागला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत भावी पिढी कोणता आदर्श घेणार हे त्या काळाची परिस्थिती ठरवेल, पण गुरू-शिष्यांची ही परंपरा कायम राहील, हे विसरता कामा नये. कारण हे नाते पैशाने तोलता येत नाही. ते प्रेमानेच टिकते. ही परंपरा ज्ञानदानाने पुढे जाते. ज्ञानदान हे पैशाने होत नाही तर योग्य परिस्थितीची मानसिकता यासाठी आवश्यक असते. मनाच्या शेतात सद्गुरु बीजमंत्र पेरतात. तो मंत्रच पुढे वाढून अनेक बीजे तयार करतो अन् तृप्त करतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.