ज्ञानेश्वरांनी राजस तपाचे गुणधर्म समजावून सांगताना ही ओवी लिहीली आहे. अनेकलोक दांभिकपणे तप करतात. त्यामुळे ते निष्फळ, अस्थिर किंवा मध्येच सुटणारे ठरते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
परी पहुरणी जें दुहिले । तैं तें गरूं न दुभेचि व्यालें ।
कां उभे शेत चारिलें । पिकावया नुरे ।।२४८।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा
ओवीचा अर्थ – परंतु पहुरणी नावाच्या किड्याने गाभण गुराचे थान चोंदले असता ते गरूं व्याल्यावर दूध देत नाही. अथवा शेतात पिक उभे असता तें जनावराकडून चारले गेले तर तें शेत पीक देण्यास राहात नाही.
बाराव्या शतकात भारत देश पूर्णतः शेतीवरच अवलंबून होता. शेती हाच मुख्य व्यवसाय होता. यावरच जनतेची उपजीविका होत होती. यामुळे शेती, जनावरे यांचे ज्ञान लोकांना अधिक होते. यामुळे ज्ञानेश्वरांनी अध्यात्माचे तत्त्वज्ञान समजावून सांगण्यासाठी शेतीशी निगडित अनेक उदाहरणे ज्ञानेश्वरीत दिली आहेत. यातीलच हे एक उदाहरण आहे. पहुरणी या किड्याने गाभण गायीच्या थानाचा चावा घेतल्यास ते जनावर दुध देणे बंद करते.
या संदर्भात पशुतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब नरळदकर म्हणाले, किटक चावल्यानंतर दुध कमी होण्याच्या संदर्भात बरेच संशोधन झाले आहे. रक्त शोषून घेणारे किटक चावल्यानंतर १८.९७ टक्के दूध देण्याचे प्रमाण कमी होते असे संशोधनात आढळले आहे. असे होण्यामागे तीन प्रकारची कारणे आहेत. पहिले कारण मानसिक परिणाम, दुसरे कारण विषारी द्रव्याचा परिणाम, तिसरे कारण तीव्र वेदनादायी अन् रक्त शोषण. किटक चावल्यानंतर जनावरांची मानसिक स्थिती बिघडते. खाण्या-पिण्यावरील त्याचे लक्ष कमी होते. झोपेवरही परिणाम होतो. साहजिकच याचा परिणाम जनावराच्या आरोग्यावर होतो. वजन कमी सुद्धा होऊ शकते. हे किटक चावल्यानंतर विषारी द्रव्य शरीरात सोडतात. त्यामुळे जनावरांच्या अंगावर गाठी उठतात. तसेच त्या ठिकाणी खाजही सुटते. यामुळे जनावराची अवस्था बिकट होते. चावलेल्या ठिकाणी तीव्र वेदना उत्पन्न होतात. तसेच रक्ताचे शोषणही होते. अशा या सर्व कारणांनी गायीच्या दुधावर परिणाम होतो.
ज्ञानेश्वरांनी राजस तपाचे गुणधर्म समजावून सांगताना ही ओवी लिहीली आहे. अनेकलोक दांभिकपणे तप करतात. त्यामुळे ते निष्फळ, अस्थिर किंवा मध्येच सुटणारे ठरते. जनावरे आपण दुधासाठी पाळतो. त्याची योग्य काळजी घेतली नाही तर त्यापासून आपणाला योग्य फायदा मिळणार नाही. जनावरांच्या आरोग्याचाही योग्य काळजी यासाठी घेणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या तरच ते जनावर आपणाला भरपूर प्रमाणात दुध देईल. अन्यथा त्याच्यासाठी केलेले कष्ट हे वाया जातील. म्हणजेच जनावरे पाळण्याचे आपले तप हे व्यर्थ जाईल. निष्फळ ठरेल.
साधना आपण ज्ञानी होण्यासाठी करत आहोत. यासाठी साधनेसाठी आवश्यक मानसिकता आपण राखायला हवी. मनाची तयारी करायला हवी. आपल्या शरीराला कष्ट होणार नाहीत, त्रास होणार नाही असे आसन आपण मांडायला हवे. जेणेकरून आपले मन विचलित होणार नाही. याची काळजी घ्यायला हवी. साधनेमध्ये आपल्या शरीरात अनेक द्रव्ये प्रसारित होत असतात. याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. साधनेत मन योग्य प्रकारे ठेवले तर आपल्या शरीराला आवश्यक असणारी द्रव्ये उत्पन्न होता. याचा आपणाला फायदा होतो. साधनेत मन रमले नाही तर ही द्रव्ये उत्पन्न न होता उलट आपल्या शरीराला बाधक ठरणारी द्रव्ये उत्पन्न होतात. साधनेत आपल्या शरीरात तीव्र वेदना उत्पन्न होतात. पण या वेदनांनी आपले मन विचलित होऊ द्यायचे नसते. या वेदनांचा अनुभव घेऊन मन साधनेवर केंद्रित करायचे असते. असे केल्यासच या वेदनांचा त्रास न होता त्याकडे दुर्लक्ष होऊन मन साधनेत रमते. अशी साधना लाभदायक ठरते.