कीटकनाशकांचा परिणाम पक्ष्यांवरही होत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. पक्ष्यांचे वजन झपाट्याने घटते तसेच त्यांच्या स्थलांतरावर याचा प्रतिकूल परिणाम होतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. मधमाश्यांचीही संख्या कमी होण्यास निओनिकोटिनॉइड कीटकनाशक कारणीभूत असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. आता पक्ष्यांबाबतच्या या संशोधनाने कीटकनाशकांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. काय आहे हे संशोधन याबाबतचा हा लेख…
राजेंद्र घोरपडे
अनेक पक्षी शेतातील किटक खाऊन शेतकऱ्यांचे मित्र ठरतात. पण किटकांसाठी वापरण्यात येणारे किडनाशक आता पक्ष्यांनाच घातक ठरत आहे. गेल्या चार दशकांत शेतामध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याची पाहायला मिळते. बरेच पक्षी स्थलांतर करतात. काही ठराविक कालावधीत त्यांचे हे स्थलांतर असते. विशेषतः कटिबंधीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. या पक्ष्यांवर पर्यावरणीय बदलाचाही परिणाम होत आहे. तसेच या पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर आणि स्थलांतरावर कीडनाशकांचा परिणाम होत असल्याचे संशोधकांना आढळले आहे. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कीडनाशकांचा पक्ष्यांच्या ८७ टक्के प्रजातीला धोका असल्याचे एका संशोधनात आढळले आहे.
जगभरात शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे सत्तर प्रकारच्या कीडनाशकांमुळे पक्ष्यांची संख्या घटली आहे. साहजिकच याचा परिणाम कृषी आणि कृषीशी संबंधित पर्यावरणावर झाला आहे. या संदर्भात हरिद्वार येथील कृषी आणि पर्यावरण विज्ञान अॅकॅडमीच्या आशिष कुमार आर्या, अमर सिंग, दिनेश भट्ट या संशोधकांचा एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.
शेतीमध्ये कीडनाशकांचा वापर
भारतात १४५ नोंदणीकृत कीटकनाशके वापरण्यात येतात. १९५२ मध्ये पश्चिम बंगालमध्ये कीडनाशकांचे उत्पादन बीएचसी प्रकल्पात सुरू करण्यात आले; पण सध्या आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा कीडनाशक उत्पादन करणारा देश आहे, तर जगभरात कीडनाशक उत्पादनात भारताचा बारावा क्रमांक लागतो. देशात आंध्र प्रदेशात सर्वाधिक सुमारे ३३ टक्के रासायनिक कीडनाशकांचा वापर होता. त्याखालोखाल पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, हरियाना, गुजरात, उत्तरप्रदेशात होतो, तर अन्य राज्यात एकूण उत्पादनाच्या ९.५ टक्क्यांपेक्षा कमी कीडनाशकांचा वापर होतो. भारतात मुख्यतः कापूस (४५ टक्के), भात (२२ टक्के) या पिकासाठी कीडनाशकांचा वापर होतो.
ऑरगॅनोक्लोरिन्स किंवा क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्सचा पक्ष्यांवर परिणाम
ऑरगॅनोक्लोरिन्सचे तीन प्रकार आहेत. डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन, साक्लोडिन पेस्टिसाईड्स (अल्ड्रिन, डायअल्ड्रिन, एन्ड्रिन, इन्डोसल्फान) आणि हेग्झाक्लोरोसायक्लोहेग्झेन (एचसीएच) आयसोमर्स.
– डीडीटी हे थेट मज्जासंस्थेवर आघात करते. सोडियमभारित करंट मज्जातंतूमध्ये निर्माण होऊन परिणाम करते.
– दक्षिण भारतातील स्थलांतरित पक्ष्यांमध्ये एचसीएच आणि डीडीटीचे अंश संशोधकांना आढळले आहेत.
– जवळपास दहा पीपीएम इतके डीडीईचे अंश पक्ष्यांच्या अंड्यांमध्ये आढळले आहेत.
– डीडीटीमुळे स्थानिक पक्ष्यांचे मृत्यू
कीटकनाशकाचा पक्ष्यांवर होणारा परिणाम
- पक्ष्यांमधील मिलनाची मानसिकता घटते. त्यांच्या वागण्यात बदल होतो.
- पक्ष्यांच्या अंड्यांच्या कवचावर व वाढीवर परिणाम
- दाणे खाणाऱ्या पक्ष्यांमध्ये वचन घटण्याचे प्रकार पाहायला मिळाले.
- जठर आणि आतड्यावर परिणाम झाल्याने पक्ष्यांच्या खाण्याच्या क्षमतेवर परिणाम
जंगली मधमाश्यांवर जमिनीतील कीडनाशकाचाही परिणाम
जगभरात निओनिकोटिनाईड्स हे कीटकनाशक वापरले जाते. निकोटिनप्रमाणे त्याची रासायनिक संरचना असल्याने किटकांच्या मज्जासंस्थेवर ते परिणाम करून किटकांना मारते. या कीटकनाशकाचा परिणाम मधमाश्यांच्या संख्येवर, क्षमतेवर होत असल्याचे निदर्शनास येताच २०१९ मध्ये युरोपियन देशांच्या संघटनेने यावर बंदी घातली; पण इंग्लंडने शुगरबीटसाठी या कीटकनाशकाला सूट दिली. कारण जमिनीमध्ये मधमाश्या फारशा जात नाहीत, असे कारण यावर देण्यात आले; पण संशोधकांनी निओनिकोटिनाईड्स हे परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. काही जंगली मधमाश्या जमिनीत घरटे बांधतात. यामुळे याचा परिणाम मधमाश्यांच्या प्रजनन क्षमतेवर होतो, असा दावा नेचर या संशोधन पत्रिकेत संशोधकांनी केला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.