स्टेटलाइन
आदिवासी समाजाला शोषण, अन्याय, लूटमार आणि फसवणूक अशा अंधारातून प्रकाशात आणले त्या झारखंडमधील शिबू सोरेन नावाच्या सूर्याचा ५ ऑगस्ट रोजी अस्त झाला. झारखंडमधील आदिवासी समाजात दिशोम गुरूजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिबू सोरेन यांनी आदिवासी समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवले. झारखंडचे पथदर्शक म्हणून आदिवासी समाज त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहात असे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या सर गंगाराम इस्पितळात शेवटच्या श्वास घेतला.
डॉ. सुकृत खांडेकर
आदिवासींचे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे म्हणून जंगलापासून ते संसदेपर्यंत त्यांनी अविरत लढा दिला. त्यांच्यावर अगणित गुन्हे दाखल झाले. राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री झाले, अनेकदा केंद्रीयमंत्री झाले, आमदार, खासदार म्हणून निवडून आले पण सत्तेच्या पदावर त्यांना कधिच स्थैर्य लाभले नाही. एकीकडे आदिवासींच्या हक्कासाठी संघर्ष आणि दुसरीकडे राजकीय संघर्ष, एकीकडे रस्त्यावर आंदोलने आणि दुसरीकडे संसदेत व विधिमंडळात लढाई. कधी पोलिसांच्या मोटारीत तर कधी मंत्री म्हणून सरकारी मोटारीत, कधी जेलमध्ये तर कधी सरकारी निवासस्थानात. असा त्यांचा सार्वजनिक जीवनाचा विलक्षण प्रवास होता. त्यांच्या जीवनात असंख्य चढउतार आले. अनेक वेळा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. ते केंद्रात काही काळ मंत्री राहिले. आदिवासींच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारा नेता अशी त्यांची देशात प्रतिमा होती. आदिवासींची फसवणूक करणारे व जमिनी बळकावणारे सावकार व जमिनदार यांच्याविरोधात शिबू सोरेन यांनी आवाज उठवून आदिवासी समाजात जागृती निर्माण केली आणि त्यांच्या विरोधात लढण्याची उर्मी दिली.
शिबू सोरेन यांचा जन्म रामगढ जिल्ह्यातील नेमरा गावी ११ जानेवारी १९४४ रोजी एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडिल सोबरन हे गांधीवादी विचाराचे होते. ते पेशाने शिक्षक होते. सावकारी पाशातून आदिवासींना मुक्त करण्यासाठी ते आवाज उठवत असत. झारखंड मधील आदिवासींना कर्ज देऊन त्यांची फसवणूक करून सावकार त्यांच्या जमिनी लुबाडत असत. सोबरन सोरेन यांची २७ नोव्हेंबर १९५७ रोजी हत्या झाली आणि शिबू सोरेन यांनी आदिवासींच्या शोषणाविरोधात लढा चालू ठेवण्याची प्रतिज्ञा केली. युवा आदिवासींना संघटीत करायला त्यांनी सुरूवात केली तेव्हापासूनच दिशोम गुरूजींची सार्वजनिक जीवनाची वाटचाल सुरू झाली. १९७० च्या दशकात आदिवासी लढ्याला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. धनुष्य बाण हाती घेऊन आदिवासीचे जथेच्या जथे आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरू लागले. आपल्या शेतीचे व जमिनीचे रक्षण आदिवासी युवा हाती शस्त्र घेऊन करू लागले. आपली लढाई आपल्या जमिनीपुरती मर्यादीत आहे असे शिबू यांनी आदिवासी समाजाला बजावले होते.
आंदोलनाचा सावकारांच्या परिवारातील महिलांना त्रास होता कामा नये तसेच त्यांच्या संपत्तीचे नुकसान होता कामा नये असे शिबू सांगत असत. शिबू सोरेन यांनी आदिवासींमधे आत्मविश्वास व एकता निर्माण केली. सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी आदिवासींचे झारखंड हे स्वतंत्र राज्य निर्माण झाले पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. आणिबाणीच्या काळात शिबू सोरेन धनाबादच्या जेलमध्ये होते. जेलमधील महिलांची छट गाणी ऐकून त्यांनी जेलमधे छट पूजेचे आयोजन केले. त्यासाठी कैद्यांनी उपवास करून वाचलेले पैसे पुजेच्या खर्चासाठी जमवले.
शिबू सोरेन हे १९८० मध्ये दुमका मतदारसंघातून प्रथमच लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. १९८९, १९९१ व १९९६ अशा तिनही निवडणुकातून ते खासदार म्हणून विजयी झाले. ते मंत्री, केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी आदिवासींशी असलेली निष्ठा किंवा बांधिलकी किंचितही सोडली नाही. केंद्रात वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार असताना सन २००० मध्ये बिहारमधून एक प्रदेश वेगळा काढून झारखंड राज्याची निर्मिती झाली. त्याच वेळी मध्य प्रदेशचे विभाजन करून छत्तीसगड व उत्तर प्रदेशचे विभाजन करून उत्तराखंड ही राज्ये निर्माण झाली.
सन २००४ मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्ष केंद्रातील काँग्रेसप्रणित युपीए सरकारचा घटक होता. डॉ. मनमोहन सिंग सरकारमधे ते कोळसा व खाणमंत्री होते. पण दोन महिन्यातच त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. १९७५ मध्ये चिरूदिह येथे आदिवासी व मुस्लिम यांच्यात संघर्ष झाला होता. त्यात १० जण ठार झाले होते. त्या प्रकरणात सोरेन यांच्यावर ते मंत्री असताना अटक वॉरंट निघाले होते. मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर ते महिनाभर जेलमधे राहिले पण त्यांची जामिनावर सुटका झाल्यावर सन २००४ च्या अखेरीस त्यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. २ मार्च २००५ रोजी ते झारखंडचे तिसरे मुख्यमंत्री झाले. झारखंडची निर्मिती झाल्यावर बाबूलाल मरांडी व नंतर अर्जुन मुंडा हे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या शिबू सोरेन यांचे सरकार केवळ नऊ दिवसच टिकले कारण त्यांना बहुमत सिध्द करता आले नाही.
जानेवारी २००६ मध्ये युपीए सरकारमधे शिबू यांचा केंद्रात मंत्री म्हणून समावेश झाला. पण नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर पुन्हा राजीनामा देण्याची पाळी आली. १९९४ मधे माजी खाजगी सचिव शशिनाथ झा यांची हत्या झाली होती. दिल्लीतील धोलाकुंवा येथून त्यांचे अपहरण करून रांची येथे हत्या झाली व नंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांचे सरकार अल्पमतात होते, तेव्हा काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यात झालेल्या सौदेबाजीची माहिती शशिनाथ झा यांना होती म्हणून त्यांची हत्या झाल्याचा संशय होता. नंतर या हत्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने व नंतर सर्वोच्च न्यायालयाने सोरेन हे निर्दोष असल्याचा निवाडा दिला.
सन २००८ मधे सोरेन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले पण २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्यांना सत्ता गमवावी लागली. त्याच वर्षी नोव्हेंबरमधे झारखंडमधे भाजप – झारखंड मुक्ती मोर्चा असे युतीचे सरकार सत्तेवर आले व सोरेन तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. सोरेन हे पुन्हा कमनशिबी ठरले, सहा महिन्यांतच भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने त्यांचे सरकार कोसळले. सोरेन २०१४ मधे लोकसभेवर व २०२० मधे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिबू यांचे राजकीय वारस व पुत्र हेमंत हे जेलमधे असताना भाजपने झारखंडमधे सत्ता मिळविणयाचा अटोकाट प्रयत्न केला पण २०२४ मधे हेमंतच मुख्यमंत्री झाले. शिबू सोरेन यांना राज्यात मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री म्हणून अनेकदा सत्ता मिळाली पण एकदाही ते कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत. जल, जंगल व जमीन अशी घोषणा देऊन त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली, हा पक्ष आता राज्यात शक्तिशाली बनला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे की- आदरणीय दिशोम गुरूजी आपल्या सर्वाना सोडून गेले आहेत, आज मी शून्य झालो आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.