रेशीम उद्योगासारख्या महिन्याला उत्पन्न देणाऱ्या शेती उद्योगाचा विचार करणे आवश्यक
आर.जी.कांबळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी
कोल्हापूर : शेतकऱ्यांकडे ज्या वेळेला शेतात माल तयार होतो, त्यावेळेला नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेली पीके मोठा फटका देवून जातात किंवा बाजारात त्यावेळी त्या मालाला नेमका भाव नसतो. बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो, बाकीचे शेतकरी नशीबाला दोष देत पुन्हा पुढच्या वर्षी नव्या आशेने तीच पीके घेतात. त्यामुळे पारंपरिक शेती व्यवसाय शेतकऱ्यांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी अपयशी ठरत आहे. त्यामुळे शेतकरी शेती पेक्षा नोकरी बरी म्हणून आपल्या मुलांना मिळेल त्या रोजंदारीवर, पगारावर शहरात पाठवीत आहे. वास्तविक काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांव्यतरीक्त एकात्मिक शेतीचा विचार करणे गरजेचे झाले आहे. यामध्ये इतर पिकांबरोबरच रेशीम उद्योगासारख्या महिन्याला उत्पन्न देणाऱ्या शेती उद्योगाचा विचार करणे आवश्यक आहे.
रेशीम उद्योग का ? –
रेशीम उद्योगापासून दरमहा शाश्वत उत्पन्न मिळू शकते. एकदा लागवड केल्यावर 12 ते 15 वर्ष लागवडीचा खर्च नाही तसेच एकदा संगोपन गृह तयार केले व साहित्य खरेदी केल्यावर पुन्हा खर्च करावा लागत नाही. इतर बागायती पीकांच्या तुलनेत तुतीला पाणी कमी लागते. रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी पाला वापरला जात असल्याने तुती बागेस किटकनाशक, बुरशीनाशके इ.फवारणीचा खर्च नाही. तुतीची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करता येते. अळ्यांनी खाऊन राहिलेला पाला जनावरांना दिल्यास त्यांच्या दुधाच्या प्रमाणात व फॅटसच्या प्रमाणात वाढ होते. काही वेळेला काही कारणास्तव एखादे पीक घेणे शेतकऱ्यांना शक्य नसल्यास किंवा एखाद्या पिकात अंदाज न आल्याने पाला उरल्यास त्यापासून मुरघास बनवता येतो. हा मुरघास शेळ्यांसाठी किंवा दुभत्या जनावरांसाठी वापरल्यास रेशीम उद्योग शेळीपालन किंवा रेशीम उद्योग दुध व्यवसायामध्ये शेतकरी चांगला जम बसवू शकतात. संगोपनातील कचरा, काड्या, अळ्यांची विष्ठा खाऊन राहिलेला पाला कुजवून चांगले खत तयार होते व या खतात गांडूळ सोडल्यास या पासून अतिशय चांगल्या प्रकारचे गांडूळ खत मिळते. तुती काड्याचा उपयोग जळणासाठी देखील केला जातो. घरातील महिला, लहान मुले, वृध्द माणसे आपली कामे सांभाळून हा रेशीम शेती उद्योग करु शकतात. चॉकी पुरवठ्यामुळे पीकांचा कालावधी 18 ते 20 दिवस झाला आहे.
रेशीम उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक बाबी –
शेतकऱ्यांकडे किमान एक एकर पाण्याची निचरा होणारी व बारमाही पाण्याची सोय असलेली जमीन व तुती लागवड, किटक संगोपन साहित्य व पक्के आदर्श किटक संगोपन गृह बांधण्याची क्षमता हवी. शेतकरी प्रकल्प/समुहातील असावा. पात्र शेतकऱ्याला एक एकर तुती लागवडीसाठी रु. 500 नोंदणी फी आहे.
रेशीम उद्योगाकरिता मिळणा-या शासनाच्या सोईसवलती –
शासनामार्फत रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण व वेळोवेळी प्रत्यक्ष बागेस भेट देऊन तसेच मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करुन शेतक-यांना मार्गदर्शन देण्यात येते. मोफत अभ्यास दौरे आयोजित करुन शेतकऱ्यांना रेशीम शेती उद्योगाविषयी माहिती करुन दिली जाते. शासनामार्फत 75 टक्के सवलतीच्या दरात अंडीपुंजाचा पुरवठा केला जातो.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अनुदान देण्यात येते. हे अनुदान 3 वर्षात विभागून दिले जाते व किटक संगोपन गृहासाठी अनुदान देण्यात येते. एकूण 3 लाख 97 हजार 335 रुपये इतके अनुदान दिले जाते.
लाभार्थीचे निवडीचे निकष-
लाभार्थी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती (NT), भटक्या विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, महिला प्रधान, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसुचित जमातीचे परंपरागत वन्य निवासी (वन अधिकार मान्यता 2006) नुसार पात्र व्यक्ती या प्रवर्गातून निवडण्यात येईल. लाभार्थी हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारक असावा. तसेच त्याला स्वतःच्या लागवडीवर व किटक संगोपन गृह बांधकाम करिता अकुशल मजूर म्हणून काम करणे आवश्यक आहे. तुती लागवड व संगोपनाच्या कामाची क्षेत्र मर्यादा 1 एकर ते 2 एकर आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर यांचेशी संपर्क साधावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.