February 5, 2023
Aata Atal aahe Poetrey collection review
Home » अनुभुतीचा विस्तार करणारी आजची कविता
कविता

अनुभुतीचा विस्तार करणारी आजची कविता

आजच्या काळावर भाष्य करणारा महत्त्वाचा कवितासंग्रह आहे. यात कोणताही अभिनिवेश नाही. वास्तवाच्या विरोधात केलेले कृतक शाब्दिक बंड नाही…..आहे फक्त भयाण वास्तव, सामाजिक अवनतीचे चित्रण….’ यातून रामदास खरे यांचे कवी म्हणून महत्त्व अधोरेखित होते.

कवी,समीक्षक श्री पांडुरंग सुतार, जळगाव,
मोबाईल- ७९७२९२४५४९

कवी आणि चित्रकार रामदास खरे यांचा ” आता अटळ आहे ” हा चौथा कविता संग्रह आहे…त्यांचे आधीचे कवितासंग्रह माझ्या वाचनात नसले तरी त्यांच्या या संग्रहातील कविता वाचून त्यांची कविता परिपक्व असल्याचे ध्यानात येते.त्यांच्या काही कविता कविता-रतीत मी वाचल्या होत्या. आणि आता एकत्रित वाचण्याचा आनंद घेतो आहे. कवी तर ते आहेतच मात्र चित्रकार म्हणून ते मला अधिक परिचित आहेत. दुसरे, त्यांनी अनेक मान्यवर मराठी साहित्यिकांची ओळख वृत्तपत्रांच्या माध्यमातून करून दिली आहे. त्यांच्या कवितांचा कल सामान्यतः सामाजिक कविता लिहीण्याचा आहे….वर्तमानाचे भान असणे जशी काळाची गरज आहे तसेच कवितेतील काव्य देखील हरवता कामा नये ही बाबही कवीने ध्यानी धरायला हवी असते. ते स्वतः चित्रकार आहेत. मात्र त्यांच्या बहुतांशी चित्रांचा विषय आणि आशय निसर्ग आणि निसर्गातील सौंदर्यभाव हा आहे. त्यात सामाजिकता जवळजवळ नसल्यात जमा आहे. या निसर्ग जाणीवेची आणि निसर्गातील सौदंर्यभावाची जोड त्यांच्या सामाजिक जाणीव असलेल्या कवितांना लाभली आहे आणि त्यामुळे त्यांची कविता अधिक उंची घेवून आली आहे. त्यांच्या कवितेसंबंधात सखोल भाष्य कवीलेखक मित्र किरण येले यांनी संग्रहाच्या प्रस्तावनेत केलेले आहे. त्यांनी रामदास खरे यांच्या कवितेबद्दल लिहीले आहे –

आजच्या काळावर भाष्य करणारा महत्त्वाचा कवितासंग्रह आहे. यात कोणताही अभिनिवेश नाही. वास्तवाच्या विरोधात केलेले कृतक शाब्दिक बंड नाही…..आहे फक्त भयाण वास्तव, सामाजिक अवनतीचे चित्रण….’ यातून रामदास खरे यांचे कवी म्हणून महत्त्व अधोरेखित होते. आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून त्यांनी कविता लिहीली आहेच वर आणखी त्याला कलात्मकतेची जोड दिली आहे. या संग्रहातील बऱ्याच कवितांना महानगरीय जाणीवांचा स्पर्श आहे. आणि ते ओघाने येतेच, आपण जगत असलेल्या व आपल्या आजुबाजुला असलेल्या जीवनाचा स्पर्श आपल्या कवितेला होणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे त्यांच्या कवितात निसर्ग प्रतिमांसोबतच महानगरीय जाणीवेच्या प्रतिमांचा वावर दिसून येतो. एखाद्या कवितेत ते ज्या बँकिग क्षेत्रात काम करत होते त्या कामाची अनुभुती डोकावतांना दिसते. या कवितात तीन दिर्घ म्हणता येतील अशा कविता आहेत…पुस्तकं बोलतात तेव्हा, मौनरंग आणि करप्ट फाईल्सची निरीक्षणे….पैकी पहिल्या दिर्घकवितेत पुस्तकांविषयी असलेल्या कवीच्या आंतरिक जाणीवेचा स्वर आहे…ते लिहीतात-

पुस्तकं सीमारेषा ओलांडतात
भुगोलाच्या, इतिहासाच्या ….
भला माणूस घडवण्यासाठी
रात्रंदिवस आटापीटा करतात
शेवटी थकून झोपी जातात….

मौनरंग ही अजिंठ्यावर लिहीलेली एक सुंदर कविता आहे. त्या कवितेला त्यांनी अजिंठ्याच्या रेखाटलेल्या रेखाटनांची संगत आहे. त्यामुळे कविता अधिकच परिणामकारक झाली आहे. त्या कवितेत त्यांनी त्याचे चित्रकार व कवी म्हणून असलेले अंतःकरण शब्दात आणि रेखाटनात ओतून ठेवले आहे. बुद्ध त्याची करूणा आणि आज विश्वाला हवी असलेली शांतता या कवितेत प्रकर्षाने प्रकट झाली आहे. ते लिहीतात-

‘ त्या स्थितप्रज्ञ मुर्तीपाशी
एक पणती तेवतीय व्रतस्थपणे,
उजळवून टाकेल आता ती
लेण्यांचे अवकाश व निबिड शांतता
आणि कवेत घेईल अगदी सहजपणे
युगायुगांमध्ये साचलेला काळोखाचा भार-

करप्ट फाईल्सची निरीक्षणे ही कविता मुंबईच्या जीवनाची कवीला झालेली साक्षात्कारी मुर्त अमुर्त रूपांना कवितेत वावरतांना दिसतात. महानगरीय जाणीव असलेल्या या कवितेत कवीची वैश्विकतेची ओढ सुस्पष्ट निदर्शनास येते….ही कविता मुंबईबद्दल लिहिल्या गेलेल्या अनेक कवितांत महत्वपुर्ण ठरावी. ते लिहीतात-

दिवसभराच्या ब्रेकींग न्युजच्या वणव्यात
होरपळलेलं माझं शहर
तिन्ही सांजेला अगदी थकून जातं
सावल्यांच्या वळचणीला शोधू लागतं एक निवारा
निस्तेज निर्मनुष्य रस्ते
पांढऱ्याफडूक पडलेल्या इमारती
विधवेसारख्या एकाकी, निराधार….

या संग्रहात मला एक कविता खूपच आवडली आहे, तशा अनेक अप्रतिम कविता संग्रहात आहेतच, मात्र ” सायरन ” ही एका लहान मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी ती कशी तिचे बालपण हरवून बसते आणि ” शांत-शहाण्या मुलीसारखी ” होवून जाते ते. खरे तर साऱ्या कवितांसारखी ही देखील समूहातील भावभावनांचे दृश्य रूप आहे. मात्र-

रासायनिक चेहऱ्याचा उग्र राक्षस
हळूहळू कवेत घेतो तिला गोंजारू लागतो
तिच्या परिकथेलाही
गुलाबी, देखण्या, नाजूक केकच्या धमन्यांमध्ये
घुसतात टोकदार काचांचे तुकडे
एकच कल्लोळ, पांगापांग-
नात्यागोत्यांची, शरीरांची, श्वासांची….
आपल्याला भेदरवून सोडते ही कविता.

अशा अनेक कविता आपल्याला वर्तमानाच्या भेसूर रूपाचे प्रत्यय आणून देतात. आता अटळ आहे या संग्रहात एकूण एक कविता सध्याच्या जगण्यातील, विसंगती, तुटलेपणा आणि प्रत्येकाच्या वाट्याला आलेले एकाकीपणा अधोरेखित तर करतातच सोबत माणसाच्या वाट्याला आलेली असहाय परात्म जाणीवही या कवितातून स्पष्ट होते…

माझा टाहो विरून जातो चिमण्यांच्या सूरात
चिमण्या पुन्हा नजर चुकवतात
काहीतरी ठरवतात…अस्पष्ट पुटपुटतात…
मी बोलतो चिमण्यांशी,
माहिती करून घेतो त्यांच्या विश्वाची !

रूपक आणि प्रतिमांचा सोस नसणारी ही कविता सरळ आणि सहज प्रवाहत राहते…अनुभुतीचा विस्तार करत राहते…मराठी कवितेत एका चांगल्या कवितासंग्रहाचे योगदान दिल्याबद्दल मी रामदास खरे या कवी मित्राचे
अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो…

पुस्तकाचे नाव- आता अटळ आहे (कविता संग्रह)
कवी- रामदास खरे, ठाणे.
प्रकाशक : संवेदना प्रकाशन, पुणे.
पृष्ठ : ९६, मूल्य : रु. १५०/-

Related posts

कधीच कवितेचा शेवट होत नाही…

कोणता हंगाम हा…

पापणी

Leave a Comment