September 24, 2023
Mazhi Sangharshayatra Dr N D Patil Book
Home » सामाजिक चळवळीचा महाग्रंथ
काय चाललयं अवतीभवती

सामाजिक चळवळीचा महाग्रंथ

संघर्ष या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजे प्रा. एन. डी. पाटील. सुमारे साडेसात दशकांच्या संघर्षशील आयुष्यात एन. डी. पाटील यांनी अनेक लढे केले. तळागाळातल्या माणसांसाठी संघर्ष केला. त्यांच्या या संघर्षाचा प्रवास माझी संघर्षयात्रा मधून उलगडला आहे.

विजय चोरमारे

प्रा. एन. डी. पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक चळवळीचा महाग्रंथ आहे. पण पायाला भिंगरी लावलेल्या आयुष्यात त्यांना विसाव्याचे क्षण फारच कमी मिळाले. त्यामुळे या आयुष्याची गाथा कागदावर उतरणं कठीण बनलं होतं. पण काहीही झालं तरी ते कागदावर उतरायला पाहीजे, असे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना मनोमन वाटत होतं. मध्यंतरी त्यादृष्टीने किशोर बेडकिहाळ यांनी प्रयत्न केले. मात्र एनडीसर त्यांच्याही तावडीतून निसटले. परंतु, विजय चोरमारे यांनी एनडी सरांचा पिच्छा सोडला नाही.

याविषयी ते सांगतात, सुमारे अकरा वर्षांपूर्वी मुंबईत मी त्यांच्याजवळ हा विषय काढला आणि त्यांचं एन. डी. पाटील यांची संघर्षयात्रा पत्रकार व कवी विजय चोरमारे यांनी शब्दबध्द केली आहे. स्वकथन (आत्मचरित्र) येणं सामाजिकदृष्ट्या किती महत्त्वाचं आहे, ते त्यांना सांगितलं. त्यांनी ते गंभीरपणे ऐकून सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु पुढे काहीच घडलं नाही. त्यानंतर मी जमेल तेव्हा त्यांना फोन करून आठवण करून द्यायचो आणि सर काहीतरी सांगून वेळ मारून न्यायचे.





इये मराठीचे नगरी वरील अपडेटसाठी जॉईन व्हा टेलिग्रामवर त्यासाठी क्लिक करा लिंकवर
 https://t.me/MarathiliteratureAgriResearch

दरम्यान, मी २०१२ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूरच्या आवृत्तीचा संपादक म्हणून मुंबईतून कोल्हापूरला परत गेलो. आता आमचा थेट संपर्क वाढला आणि मी अधूनमधून त्यांना आठवण करून देऊ लागलो. एके दिवशी ते मला म्हणाले, गड्या, आजवर अनेकांनी मला हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण मला त्यात स्वारस्य वाटलं नाही. पण तुझी चिकाटी दांडगी आहे. त्यामुळे आता मला मनावर घ्यावं लागेल. तू काही मदत करणार असलास तर आपण हे करूया.

तेथून एनडी सरांची संघर्षयात्रा कागदावर उतरू लागली. यात एनडी सरांचे दौरे, त्यांची मोठी आजारपणं यामुळे मधल्या काळात अनेक अडचणी आल्या. पण त्यावर मात करून लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी बऱ्यापैकी काम मार्गी लागलं.

विजय चोरमारे सांगतात, एनडी सर आता ९२ वर्षांचे आहेत. अलीकडच्या काळात वाढत्या वयाबरोबर सरांचं आजारपणही वाढत गेलं आणि त्यांच्याकडचे प्रयत्न संपले. दरम्यानच्या काळात जे कागदावर उतरलं होतं, तेही खूप मौलिक होतं. त्यांच्या जगण्याचा समग्र पट नसला तरी एका संघर्षशील जीवनाचा प्रवास त्यातून अधोरेखित झाला होता.

संघर्ष या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजे प्रा. एन. डी. पाटील. सुमारे साडेसात दशकांच्या संघर्षशील आयुष्यात एन. डी. पाटील यांनी अनेक लढे केले. तळागाळातल्या माणसांसाठी संघर्ष केला. त्यांच्या या संघर्षाचा प्रवास माझी संघर्षयात्रा मधून उलगडला आहे. हे केवळ एन. डी. पाटील यांचे एकट्याचे आत्मचरित्र नव्हे, तर महाराष्ट्राच्या सात दशकांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक प्रवासाचा पट आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संघर्ष, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, १९७२ च्या दुष्काळाचा लढा, काँग्रेसचं स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातलं राजकारण, रयत शिक्षण संस्थेची वाटचाल, शेतकरी कामकरी पक्षाचं राजकारण, कापूस एकाधिकाराची लढाई अशा अनेक घटना घडामोडींसोबत एनडींचं आयुष्य उलगडत जातं.

पवार कुटुंबीयांशी असलेले ऋणानुबंध हे तर एन. डी. पाटील यांच्या आयुष्यातील महत्त्वाचं पान. त्यातलेही अनेक नाजूक धागे त्यांनी जिव्हाळ्याने उलगडून दाखवले आहेत. विशेषतः आपल्या सासूबाई शारदाबाई गोविंदराव पवार (शरद पवार यांच्या मातोश्री) यांनी जे पुत्रवत प्रेम केलं त्यासंदर्भात त्यांनी आत्मीयतेने लिहिलं आहे.

एन डी पाटील यांची ही संघर्षयात्रा मराठी मनांवर संस्कार करणारी आणि मराठी साहित्यातलं आत्मचरित्राचं दालन समृद्ध करणारी आहे. एनडीसरांनी आपलं सारं आयुष्य तळागाळातल्या माणसांच्यासाठी लढण्यात खर्ची घातलं.

माझी संघर्षयात्रा – प्रा. एन. डी. पाटील

प्रकाशक – विजिगीषा प्रकाशन प्रकाशन. पृष्ठे २४५, मूल्य रुपये ३६०

फ्लॅट नं. ४, राजमती अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन: ९६२३२७७१११

Related posts

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या तरतुदी

खेड चिपळूणात नवरंगाचे दर्शन…

मध काढा पोळं तेथेच ठेवून…

Leave a Comment