June 18, 2024
marriage-one-again-article-by-dr-sunetra-joshi
Home » पुन्हा एकदा…
मुक्त संवाद

पुन्हा एकदा…

खरेच आजही आपल्याकडे विधवाविवाह फारच कमी होतांना दिसतात. अगदी नगण्य. माझ्या ओळखीपाळखीत तरी मी कुणाचा पाहिला नाही. इकडे तर आपण स्त्रीला अबला मानतो. पण ती एकटी समर्थपणे घरातले आणि बाहेरचे सांभाळते. मग पुरुषांना का जमू नये.

– सौ सुनेत्रा विजय जोशी


रत्नागिरी. मोबाईल – 9860049826

फोन वाजला तशी अनु उठली. आईचाच होता. काय ग? आज अचानक फोन या वेळी. एरवी रात्री करतेस ना? अनु म्हणाली. अग महेशभाऊजींचे लग्न ठरलेय. काय? मी तिच्या बोलण्यावर उडालेच. कारण महेशकाकांची बायको म्हणजे माझी मनुकाकू जाऊन जेमतेम सात आठ महिने झाले होते. आईच पुढे बोलली.. अग दोन मुलांचे करणार कोण? त्याची नोकरी घरात दुसरे कुणी नाही. आणि पुन्हा वर्षाच्या आत नाही केले तर तीन वर्षे करता येणार नाही. शिवाय अर्धवट वय. अजून पन्नास पण नाही. तेव्हा लग्न झालेलेच बरे. मुलगी पण घटस्फोटित आहे. घरच्या घरी फार गाजावाजा न करता उरकणार आहोत. तुला जमले तर ये. पुढच्या महिन्यात दोन तारखेलाच आहे… मग इकडचे  तिकडचे बोलून फोन संपला..

पण अनुला सावरायला वेळ लागला. महेशकाका आणि मनुकाकू किती छान आदर्श जोडपे होते. जुन्या काळच्या मानाने खूप उत्साही आणि प्रेमात. दोन मुले राजू आणि सोनु. आता सातवी आठवीत असतील. आणि अशा बायकोला काका आठ महिन्यात विसरून दुसरे लग्न करतोय. छे. ती खूप नर्व्हस झाली. मग ते त्यांचे प्रेम खरे नव्हतेच का? मुले तर स्वतःचे स्वतः करू शकणारी आहेत. कामाला बाई ठेवून जमले असते की… पण मग आईचे वाक्य आठवले. अग पण त्यालाही कुणीतरी हवेच ना त्याचे. शेवटी बायको ती बायकोच… त्या बोलण्यातला अर्थ उलगडला.

मग आठवले पाच वर्षापुर्वी माझ्या एका मावसबहिणीचे. मिस्टर गेले. तेव्हा तिची मुले अवघी पाच आणि तीन वर्षे वयाची होती. पण ती मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरीवर जात होती. नवर्‍याच्या जागेवर तिला कामाला घेतले होते. ती पण एकट्याने सगळे करतेच आहे ना? तिला नसेल वाटत का आपले कुणीतरी हवेच. तिलाही भावभावना असतीलच ना? पण तेव्हा का कुणाला असे वाटले नाही की तिचे पुन्हा लग्न करून द्यावे. तिला मुलांसहीत सांभाळणारा कुणी मिळाला असता की नाही हा प्रश्न वेगळा. पण तशी गरज बाकीचे नातेवाईकांना नसली तरी तिच्या आई वडीलांना तरी तसे वाटायला हवेच होते ना? आपली मुलगी एकट्याने एवढे आयुष्य कसे काढेल? पण कुणीच तसा विचार केला नाही. पण आज महेशकाकांच्या लग्नामुळे हा विचार माझ्या मनात आला.

खरेच आजही आपल्याकडे विधवाविवाह फारच कमी होतांना दिसतात. अगदी नगण्य. माझ्या ओळखीपाळखीत तरी मी कुणाचा पाहिला नाही. इकडे तर आपण स्त्रीला अबला मानतो. पण ती एकटी समर्थपणे घरातले आणि बाहेरचे सांभाळते. मग पुरुषांना का जमू नये. बर ज्या काही भावभावना असतात त्या दोघांनाही सारख्याच असणार ना? मग अशी परिस्थिती का? उलट सुलट विचारांनी डोळे भणभणले. अनुने मग मावशीला फोन लावला. बोलता बोलता सहजच अनुने मनातली शंका तिला विचारली. मावशी म्हणाली अग दोन मुलांसह हिच्याशी लग्न करायला कोण तयार होणार? पण मग तुम्ही प्रयत्न तरी करुन बघायचा… तर यावर तिच्याकडे उत्तर नव्हते किंवा ती देऊ इच्छित नव्हती. म्हणजे अजुनही तिची मानसिकता बदलली नव्हती. अनुच्या मनात आले  स्त्री जर त्या मुलांना आपले समजून वागवत असते तर पुरूषांनी त्या बाईच्या मुलाला आपले का समजू नये.

पण मुळात हा प्रश्न कुणाला पडतच नाही हे दुर्दैव. जर वडीलांना हे सुचत नसेल तर आईने का सुचवू नये. पुरूषांच्या पुन्हा लग्न करण्यासाठी जर का काही गरजा असतील तर स्त्रियांच्या पण नसतील का? कारण मुले सांभाळण्यासाठी हे फक्त सांगण्याचे कारण आहे. मुले तर पाळणाघरात पण वाढवता येतात. पण नाही मुळात हे समजून घ्यायचे नाहीच आहे. झोपी गेलेल्याला जागे  करता येते पण सोंग घेतले असेल तर… तिलाही पुन्हा एकदा संधी मिळायला हवीच ना. सुख मिळविण्याचा हक्क तिलाही हवा. सतत त्यागमूर्ती म्हणूनच कशाला? गृहीत धरायचे.

बायकांनीच  बायकांचे असे प्रश्न सोडवायला हवेत. पण त्याच स्वतः असे न बोलता राहतात. आणि मग हे प्रश्न समाजाला कधी कळतच नाही आणि पडत तर नाहीच  नाही. आता त्या मावसबहिणीची म्हणजे नेहाची पण बाजू जाणून घ्यायला हवी. आणि आपण आपल्या परीने काय करता येईल का ते बघायला हवे. तिची पुन्हा लग्न करण्याची तयारी आहे का नाही हे बघायला हवे. असली तर काही करता येईल ते बघू. पण तिच्या पाठीशी ठामपणे उभे तरी राहू. असे मनाशी ठरवून तिने नेहाचा फोन नंबर फिरवला.

इये मराठीचे नगरी वरील अपडेटसाठी जॉईन व्हा टेलिग्रामवर त्यासाठी क्लिक करा लिंकवर  https://t.me/MarathiliteratureAgriResearch

Related posts

मानो या न मानो…

भूत म्हणजे काय ?

परकाया प्रवेश…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406