October 4, 2023
Home » लक्ष्मी – स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या कथा
काय चाललयं अवतीभवती

लक्ष्मी – स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या कथा

लक्ष्मी या नीला नातू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. २४) होत आहे. दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा नीला नातू यांनी प्रस्तावनेत दिलेला हा परिचय….

‘फिरुनी नवी जन्मेन मी’ असं म्हणत आयुष्याला सामोऱ्या गेलेल्या स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या या कथा. यातल्या नायिका कोणी सुपर वूमन वगैरे नाहीत. तुमच्या आमच्या घरात असतात तशाच साध्या सरळ अशा या स्त्रिया .. पण यांच्या वाटेला आलेला जीवनप्रवास मात्र साधा सरळ नाही.

‘कुणाच्या खांद्यावर’ 

‘कुणाच्या खांद्यावर’  कथेतली सरला चहुबाजूनी अंधारून आलेलं असताना स्वताच्या आयुष्याबरोबर अजून तीन जणांचे आयुष्य उजळते . विधवा स्त्रीकडे बघण्याचा प्रत्यक्ष आईवडिलांचा दृष्टीकोन काही क्षण तिला हादरावतो पण त्यातून ती धडा शिकते आणि शहाणी होते.

‘लक्ष्मी’ कथा घडते तो काळ बराच जुना आहे. मात्र समाजमन आज जसे आहे तसेच तेव्हाही आहे.अंगात धमक असलेली नीतू माहेरचे घर सावरते. ज्या गोष्टीचा तिला सर्वात तिटकारा असतो तीच गोष्ट तिच्या आयुष्यात घडते आणि काही काळ ती सैरभैर होते. स्त्री ही घडवणारी आहे बिघडवणारी नाही हाच अनुभव हि कथा वाचताना येतो.

निरागस अनिताचा जीवनप्रवास

‘खजिना’..निरागस अनिताचा जीवनप्रवास अशा वळणावर येतो कि सगळे संपले असे वाटावे. मामाचा आणि आत्याचा आधार घेत उंच भरारी घेतलेली हि भावंडे सामाजिक जाणीव जपतात आणि आभाळा एवढी मोठी होतात.

‘उंच माझा झोका

‘उंच माझा झोका मधली शांभवी अगदी सामान्य घरातली ..हिरा जसा तासला जातो तसा अधिक उजळतो तसाच हिचा जीवनप्रवास.. ‘यशोदा’ मधली माई अशीच सामान्यातली असामान्य.. समाजाने कितीही बंधने घातली तरी स्त्रीने ठरवले तर ती उंची गाठू शकते हे तिचा जीवनप्रवास सांगतो. हा दोघी मला वास्तवात भेटल्या आणि त्यांनी मला समृद्ध केले.

‘त्या चौघी ‘..एका सामाजिक व्यवस्थेचा भाग..

‘त्या चौघी ‘..एका सामाजिक व्यवस्थेचा भाग..प्रत्येकीचा जीवनप्रवास वेगळा पण एका धाग्यात नशिबाने अडकलेला ..वाट्याला आलेल्या आयुष्याला कधी शिंगावर घेत तर कधी गनिमी काव्याने त्या भिडल्या.

‘भिकारी’

‘भिकारी’ मधली साधी भाबडी शिवानी आणि तिच्या वाटेला आलेली फसवणूक.. ‘मॅडम ‘ मधली उच्चशिक्षित प्रीती ..स्त्रीने महत्त्वाकांक्षी असणे हा तिचा दुर्गुण ठरवला जातो आणि मग सुरु होते फरफट ..स्त्री करियर मध्ये पुढे जाते तेव्ह्या तिच्या पतीची साथ नसली कि होणारी शोकांतिका…

‘वारस’ ..

‘वारस’ ..धनदांडगे लोक आणि त्यांची मानसिकता  याचा अचूक फायदा घेणारे भोंदू ..या सगळ्यात मुल न होणे हा जसा त्या स्त्रीचाच गुन्हा …’डोरल मधली तारी अशीच मुल न होण्याच्या गुन्ह्यात होरपळून निघणारी…जो नवरा ती जिवंत आहे कि हे सुद्धा बघत नाही त्याच्या नावाचं डोरलं घालणे हेच शहाणपणाचे आहे हे ती समजून चुकते आणि स्वताच्या साठवलेल्या  पैशातून ते डोरलं घडवते.

‘गुंता’

‘गुंता’ हा मध्यमवर्गातल्या शरयूच्या संसाराचा पट आहे. एक स्त्री सासू बनून सून नावाच्या दुसऱ्या स्त्रीचा पाय ओढायला लागते आणि सुरु होतो एक खेळ .. ज्यावेळी करियर पणाला लागते तेव्हा स्त्रीची करियर घरापेक्षा महत्वाची मानली जात नाही आणि सुरु होतो गुंता…

सत्य काही काही वेळा कल्पनेपेक्षा अशक्य असते. देखणी रागिणी स्वतःच्या पायावर दगड मारून घेते आणि संसार गमावून बसते…स्वप्न सत्यात उतरते आणि हुशार मंजू ते मुठीत घट्ट पकडून ठेवते…असे हे ‘दैव जाणिले कुणी’..

भोळी भाबडी सरिता आणि तिची परीकथा असावी अशी प्रेमकहाणी ..वास्तवातले चटके सहन न होऊन तिचा ‘प्रिन्स चार्मिंग’ वैफल्य ग्रस्त होतो आणि सरिता संसाराचा गाडा एका चाकावर ओढायला लागते.‘मार्ग’ मधली सुरेखा आयुष्यातला मोठा निर्णय घाईघाईत घेते आणि चुकते..मग सुरु होते फरफट ..त्यातून ती तिच्या परीने मार्ग काढते आणि जगत राहते…एक दुय्यम आयुष्य..

जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा करायची आंतरिक इच्छा जिवंतपणी नाही तर मृत्युनंतर पुरी करणाऱ्या लीना ..स्वाती..आणि शलाका..सामाजिक उतरंडीत वेगवेगळ्या स्थानावर असलेल्या तिघी स्त्रीत्वाच्या बळी ठरतात आणि सुरु  होतो एक विलक्षण प्रवास… ज्याला अंत नाही. माणसाचे आयुष्य हा रंगीबेरंगी कॅलीडोस्कॉप आहे. असाच अनेक रंगांचा पट आपल्यापुढे उलगडत जातो आणि वाचकावर गारुड करतो.

Related posts

शिव बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील

साहित्यकणा संमेलनाच्या अध्यक्षपदी ऐश्वर्य पाटेकर

आता सोशल मिडीयावर वक्रनजर…

Leave a Comment