विषयांचे ज्ञान ते विज्ञान. आत्माचे ज्ञान ते आत्मज्ञान. विषयांचे ज्ञान आणि आत्मज्ञान यातील फरक आपण जाणायला हवा. आपल्या दैनंदिन गरजेच्या हव्यासापोटी आपण विविध विषयांच्या मागे धावत आहोत. जगात वावरायचे तर याची गरज झाली आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहला वावो।
मग लागला जंव पाहो। तंव ज्ञान तें तोचि।। ८८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा
ओवाचा अर्थ – अनुभवाला येणारे जे हें दृश्य जगत्, त्याचा विचार करतां, तें त्याच्यादृष्टीने मिथ्या ठरलें, व मग आपण कोण आहो, असे जेव्हा तो पाहायला लागला तेव्हां ज्ञान तेंच आपण आहोत, असे त्यास कळले.
विज्ञानाच्या प्रगतीने अनेक अंधश्रद्धा दूर झाल्या. खरे तर विज्ञानात्मक भावानेच अध्यात्माची प्रगती होते. हा पंचमहाभूताचा देह आहे. हा देह विविध रासायनिक मूलद्वव्याने तयार झालेला आहे. दात, हाडामध्ये कॅल्शियम आहे. कार्बन आणि त्यांच्या संयुगामुळे शरीराची कातडी तर झाली आहे. देहातील प्रत्येक घटकांत ही मूलद्रव्ये आहेत. विविध रसायनांनी युक्त असा या देहात जेव्हा आत्मा येतो. तेव्हा त्याला जिवंत स्वरूप प्राप्त होते. आत्मा देहातून गेल्यानंतर हा केवळ रासायनिक घटकांचा सांगाडा आहे. आत्मा देहात येतो आणि जातो. पण प्रत्यक्षात तो जन्मतही नाही साहजिकच तो मृतही होत नाही. विज्ञानामुळे हे सर्व स्पष्ट होते. यासाठी या गोष्टी समजण्यासाठी विज्ञानात्मक दृष्टी असण्याची गरज आहे.
कोणतेही ज्ञान झाल्यानंतर त्याचा उपयोग हा योग्य गोष्टींसाठी व्हायला हवा. विज्ञानाने अणु-रेणुंचा शोध लागला. पण त्यापासून बाँब तयार करून जनतेमध्ये अशांती निर्माण केली जात असेल तर ते ज्ञान योग्य आहे का ? कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. चांगली आणि वाईट. त्यातील कोणती निवडायची हे आपण ठरवायचे असते. विज्ञानाचा उपयोग चांगल्यासाठी करायला हवा. अध्यात्मातील प्रत्येक गोष्ट ही विज्ञानावर आधारलेली आहे.
विविध विषयांची शास्त्रे आहेत. भौतिक, रसायन, जैविक असे विविध विषयांची ही शास्त्रे आहेत. या शास्त्राचा उपयोग आपण जीवनात करतो. शास्त्राला मर्यादा आहेत. ती मर्यादा ओलांडली तर ते शास्त्र फायदेशीर न ठरता नुकसानकारक ठरते. याचा विचार करून त्या शास्त्राचा उपयोग करायला हवा. इंधनासाठी लाकडाचा उपयोग होतो. म्हणून सरसकट वृक्षतोड केली तर चालणार आहे का ? नाही ना ? त्याचेच दुष्परिणाम आपण सध्या भोगतो आहोत. प्रदूषणाची पातळी आपण ओलांडली आहे. जागतिक तापमानवाढीचे चटके आपण सोसत आहोत. विज्ञानाच्या मर्यादा ओलांडल्याचाच हा परिणाम आहे.
विषयांचे ज्ञान ते विज्ञान. आत्माचे ज्ञान ते आत्मज्ञान. विषयांचे ज्ञान आणि आत्मज्ञान यातील फरक आपण जाणायला हवा. आपल्या दैनंदिन गरजेच्या हव्यासापोटी आपण विविध विषयांच्या मागे धावत आहोत. जगात वावरायचे तर याची गरज झाली आहे. पण ही गरज वाईट परिणाम घडवत असेल तर त्याच्या मर्यादा ओलांडता कामा नये. विषयांच्या ज्ञानाने आत्मज्ञान जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञान हे स्वतःचे ज्ञान आहे. ते म्हणजेच आपण आहोत. हे जाणून घ्यायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
खूप छान माहिती आहे.
सर्व वाचन केल्यानंतर मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मदत होते.