September 24, 2023
Rajendra Ghorpade article on Dnyneshwari in Vishwache aart
Home » भेटीलागी जीवा…चा आनंद
विश्वाचे आर्त

भेटीलागी जीवा…चा आनंद

विशेष म्हणजे गुरु आपल्याजवळच असतात. ते आपल्यातच वास करत असतात. फक्त आपणाला त्यांची जाणिव, अनुभुती होणे गरजेचे आहे. ही अनुभुती, ही जाणिव झाली तर किती आनंद.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

नातरी रंक निधान देखिले । आंधळिया डोळे उघडले ।
भणंगाचिया आंगा आले । इंद्रपद ।। 381 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी अथवा दरिद्री व्यक्तीला जसे इंद्रपद मिळावे.

कित्येक वर्षे काही अडचणींनी गुरुंचे दर्शन झाले नाही. तर आपणास दर्शनाची ओढ निश्चितच लागते. काही चुकल्या चुकल्यासारखे वाटते. सध्या कोरोनामुळे देवदर्शनही बंद आहे. मठ, मंदिरे, वारी बंद आहेत. त्यामुळे गुरुंचे, भगवंताचे, विठ्ठलाचे दर्शनच घडत नाही. दर्शनाची आस प्रत्येक भक्ताला, वारकऱ्यांना लागली आहे. अशावेळी जर त्याला सद्गुरुंनीच भेटायला येतो असा निरोप धाडला. किंवा विठ्ठलानेच भक्ताला त्याच्या घरी भेटायला येणार असल्याचे सांगितले. तर किती आनंद होईल.

समाधीस्थ गुरु, भगवंत भेटीसाठी आतुर असतात. ही आतुरता आणि भेटीची ओढ यातील आनंद शब्दात व्यक्त करणे तितके सोपे नाही. कारण या भेटीच्या ओढीने झालेला आनंद मनातील शब्द भांडाराच रिकामे करतो. आनंदाने मनात शब्द सुद्धा सुचत नाहीत, अशी ही निशब्द स्थिती निर्माण होते. फक्त एका निरोपाने सर्व काही विसरते. सद्गुरु म्हणाले तु माझ्या दर्शनासाठी येऊ शकत नाहीस. काही अडचणी आहेत. तर काहीच हरकत नाही. पण मी तुला भेटायला येऊ शकतो ना..मी तुला येऊन भेटण्यात काहीच अडचण नाही. असे घडले तर किती आनंद. अध्यात्मात असे प्रसंग घडत असतात. फक्त आपली भक्ती, श्रद्धा मात्र असायला हवी. भक्ताला भेटायला साक्षात भगवंत आल्याचे अनेक प्रसंग संत चरित्रात पाहायलाही मिळतात. भेटीच्या प्रसंगाचे सुंदर वर्णनेही, भजनेही लिहीली गेली आहेत.

विशेष म्हणजे गुरु आपल्याजवळच असतात. ते आपल्यातच वास करत असतात. फक्त आपणाला त्यांची जाणिव, अनुभुती होणे गरजेचे आहे. ही अनुभुती, ही जाणिव झाली तर किती आनंद. दरिद्री भक्ताला आनंद देणाऱ्या धनाचे गाठोडेच मिळाले असे होईल ना. सद्गुरुंच्या अनुभुतीने आपण आंधळे, अज्ञानात चाचपडणारे भक्त आत्मज्ञानी होऊ. आपणास दिव्यदृष्टी प्राप्त होईल. इतके सामर्थ सद गुरुंच्या दर्शनात आहे. सद्गुरुंच्या अनुभुतीत आहे. दरिद्री व्यक्तीला कोणी राजगादीवर नेऊन बसवले, तर तो का आनंदी होणार नाही. तो आनंद सद्गुरु भेटीतील आनंदासारखाच आहे.

सद्गुरु हे भक्ताला बोलवत असतात. भक्ताची वाट पाहात भेटीसाठी आतुर झालेले असतात. भक्ताच्या भक्तीपोटी ते स्वतः भेटायलाही जातात. या जीव-शिवाच्या भेटीत तो जीवही शिवमय होतो.

प्रत्येक मुलीला तिच्या आईपेक्षा बाप अधिक प्रिय असतो. बापापासून दुर राहील्यास सतत तिच्या मनात त्यांना भेटण्याची इच्छा असते. पण ती व्यक्त करू शकत नसते. पण तिला जर कोणी तिच्या बापाला भेटवले, तर ती त्याचे उपकार कधीच विसरू शकत नाही. बाप आणि मुलगी हे भक्त आणि भगवंतासारखेच नाते आहे. या अशा भेटीतील आनंदाने एक वेगळीच उर्जा उत्पन्न होते. शेवटच्या घटका मोजणाऱ्या व्यक्तीला भेटण्यासाठी का जातात ? कारण या भेटीतून त्या व्यक्तीला होणारा आनंद त्याच्यात जीवंतपणा भरत असतो. म्हणून भेटीचा आनंद अनुभुतीतून घेता आल्यास आत्मज्ञानाचा अंकूर फुटु शकेल. यासाठी भेटीलागी जीवा लागलीसी आस.

Related posts

ज्ञानप्रधान संन्यासाची ओळख

चांगले विचार हे पेरावे लागतात

साधनेसाठी असे हवे आसन…

Leave a Comment