May 30, 2024
Home » संत ज्ञानेश्वरांनी प्रभू श्रीराम यांचा ज्ञानेश्वरीत असा केला आहे उल्लेख…(एक तरी ओवी अनुभवावी)
विश्वाचे आर्त

संत ज्ञानेश्वरांनी प्रभू श्रीराम यांचा ज्ञानेश्वरीत असा केला आहे उल्लेख…(एक तरी ओवी अनुभवावी)

देव, देव म्हणजे काय ? देव देवळातच असतो असे नाही तर देहाच्या या मंदिरातही देवाचे अस्तित्व आहे. हे विसरता कामा नये. सर्वांच्या ठायी देव आहे. सर्व जीवमात्रांत देव आहे. हे देवाचे अस्तित्व जाणणे हा खरा स्वधर्म आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

जेणे देवांचा मानु गिवसिला । धर्मासि जीर्णोद्वार केला ।सूर्यवंशी उदेला । सूर्य जो का ।। 254 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा

ओवीचा अर्थ – ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला. सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला.

श्री रामचंद्र हे सूर्यवंशात प्रतिसूर्यच म्हणून उदयास आले. यावर चिंतन, मनन केले तर असे लक्षात येते की देवांचा सुद्धा उद्धार राजाला करावा लागतो. यासाठी राजाला जन्म घ्यावा लागतो. देवांचे म्हणजेच धर्माचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. हा त्याचा राजधर्म आहे. पण देव म्हणजे कोण ? सर्व सामान्य जनता सुद्धा देवासमान आहे बरं का ! देव म्हणजे देवळात असणारा देव. देव म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात पुजला जाणारा दगड. मानला तर देव नाहीतर दगड असे म्हटले जाते. दगडाची प्रतिष्ठापणा केल्यानंतर त्याला देवत्व प्राप्त होते. नाहीतर तो दगडच असतो. म्हणजे देवत्व प्रतिष्ठापणेनंतर येते. म्हणजेच त्यात शक्ती निर्माण होते. ती संकल्पना रुजवावी लागते. हे सर्व कशासाठी केले जाते. आपल्या मनाची तयारी करण्यासाठी केले जाते. मनात तो विचार भरावा लागतो. म्हणजेच मनाच्या शांती, सुख समाधानासाठी, मनाच्या स्थिरतेसाठी हे सर्व आहे. मनाची स्थिरता प्राप्त झाली तरच अध्यात्मिक प्रगती होते.दगडात देव आणणे. मंदिरात देव आणणे. म्हणजेच मनाच्या मंदिरात देवाचे स्थान निर्माण करणे.

मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे करावे लागते. हे प्रथम विचारात घ्यायला हवे. मगच कृती करायला हवी. म्हणजेच दगडाची पुजा करायला हवी. त्यामुळे त्या दगडाला देवत्व प्राप्त होईल. या देवावर कोणी शिंतोडे उडवले तर मनाच्या भावना निश्तिचत दुखावल्या जातात. मनाच्या भावना भडकतात. इतके सामर्थ या कृतीत आहे.दगडात देवत्व निर्माण करण्यासाठी, धर्माच्या जीर्णोद्धारासाठी प्रभुरामचंद्रांना जन्म घ्यावा लागतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीसाठी खांबातून नृसिंहाला प्रकट व्हावे लागते. धर्म रक्षणासाठी भगवान कृष्णाला जन्म घ्यावा लागतो. दुष्टांचा नाश करण्यासाठी देवीला अवतार घ्यावा लागतो. ही सर्व या देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरांचा उद्देश काय आहे हे समजून घ्यायला हवे. तरच त्या मंदिरात देव नांदेल. देवाचे अस्तित्व राहील.

त्यानुसार या मंदिरांचे पावित्र्य जपायला हवे.या मंदिरातील देवांना काय लागते ? ते कशाचा स्विकार करतात ? हे प्रथम भक्तांनी विचारात घ्यायला हवे. देव फक्त पान, फुल अन् फळ यांचाच स्वीकार करतो. म्हणून देवाला नारळ फुले वाहीली जातात. धनाचा लोभ त्या देवाला नाही. याचा विचार प्रथम भक्तांनी करून कृती करायला हवी. लाच घेणारा व लाच देणारे हे जसे दोघे दोषी असतात. हाच नियम मंदिरातील पुजाऱ्यांना सुद्धा आहे. मुळाच देणाऱ्याने लाचच दिली नाही तर घेणाऱ्याचे अस्तित्वच राहणार नाही. म्हणून भक्तांनी प्रथम आपल्या मनाची तयारी करायला हवी. मी देवाला काय देणार हे त्यानेच प्रथम विचारात घ्यायला हवे. देव जे स्वीकारतो त्या व्यतिरिक्त अन्य देणे व्यर्थ आहे. ते देवापर्यंत पोहोचतच नाही. हा विचार समजून घ्यायला हवा.देव, देव म्हणजे काय ? देव देवळातच असतो असे नाही तर देहाच्या या मंदिरातही देवाचे अस्तित्व आहे. हे विसरता कामा नये. सर्वांच्या ठायी देव आहे.

सर्व जीवमात्रांत देव आहे. हे देवाचे अस्तित्व जाणणे हा खरा स्वधर्म आहे. त्याचे पालन प्रथम करायला हवे. या स्वधर्माचा उद्धार करण्यासाठीच सदगुरुंच्या रुपाने ते प्रकटले आहेत. अशा या धर्माचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. तो त्याचा राजधर्म आहे. जनतेला त्यांचा हक्क मिळवून देणे हा त्याचा राजधर्म आहे. यासाठी युगे युगे धर्म रक्षणासाठी राजाला जन्म घ्यावा लागतो. मग तो कृष्णाच्या रुपात असेल किंवा प्रभुरामचंद्रांच्या रुपात असेल. स्वधर्माच्या पालनासाठी, रक्षणासाठी, अध्यात्मिक परंपरा, गुरु-शिष्य परंपरा जीवंत ठेवण्यासाठी तसेच ती पुन्हा जागृत करण्यासाठी तीचा उद्धार करण्यासाठी राजाला जन्म घ्यावा लागतो. म्हणून तो संन्यासी असतो. श्रीमान योगी असतो. जाणता राजा असतो. स्वयंभू असतो. सूर्यवंशाचा तो प्रतिसूर्यच होऊन प्रकट होत असतो.

कोल्हापुरातील संस्कृती, ताज्या घडामोडी आदी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा कोल्हापूर प्रतिबिंब फेसबुक पेजवर

https://www.facebook.com/groups/KolhapurCulture/

Related posts

विठ्ठल..विठ्ठल..विठ्ठल… (व्हिडिओ)

आत्मज्ञानानेच होतो संसारवृक्ष नष्ट

आचरणात अहिंसा, विचारात अनेकान्तवाद हेच आर्जव

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406