December 3, 2024
Srujangandha Bahinabai Book Review by Ramesh Salunkhe
Home » सृजनगंधी कवडसे…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सृजनगंधी कवडसे…

बहिणाबाई चाैधरी या अखिल मानवजातीला समृद्ध शहाणपण शिकविणारा मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा आनंदकंद आहे. या झगमगत्या ताऱ्याच्या प्रकाशाने केव्हाच शंभरीही पार केलेली आहे. तरीही नित्य नवा रंग, नवे रूप घेऊन हा तारा वाचकांना, अभ्याकांना आणि आस्वादकांना साद घालताेच आहे.

रमेश साळुंखे

कोल्हापूर
माेबाईल 9403572527
avanirs53@yaho.com

बहिणाबाईंच्या कवितेने आजपर्यंत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नित्य नव्या आशयाची आणि अर्थांची उदबत्तीच्या गंधासारखी ती अनंत वलये आसमंतात साेडत एका फकीराच्या बाण्याने ती ठाम आणि सशक्ततपणे उभी आहे. म्हणून डाॅ. चंद्रकांत पाेतदार यांच्यासारख्या संवेदनशील कवीलाही बहिणाबाईंची कविता आवतन देतेय; यात नवे असे काहीच नाही. नवजात बालक जसे कुणी काही न सांगता सवरता आईच्या आचळांना सहज बिलगते तसेच हा कवीही अलगतपणे बहिणाबाईंच्या कवितेच्या कुशीत शिरून स्वत:ला धन्य समजताे आहे.

बहिणाबाईंच्या कवितेतील काव्यरस आपल्या कंठात मुरवून त्यावर बाळसे धरण्याचा प्रयत्न करताे आहे. हे सारे काही लख्खपणे दिसते, ते चंद्रकांत पाेतदार यांनी लिहिलेल्या ‘सृजनगंध’ या पुस्तकात. बहिणाबाईंच्या कवितेला, या खानदानी दुधाला प्रेमाची आच देऊन जे काही मऊशार सायीसारखे अर्थनिर्णयन त्यांनी केले आहे; ते खचितच महत्त्वाचे आहे. हे छाेटेखानीच पुस्तक पण हंडाभर दुधाचा मुठभर खवा असल्यासारखे.

कविता म्हणजे न फिटणारे अनंत उपकारच

श्रावण झडीसारख्या अखंड काेसळत असलेल्या बहिणाबाईंच्या कवितेत तसे पाहिले तर मानवी जीवनातील विश्वाचे आर्त, ज्ञानाेबा तुकाेबांशी साधलेले अद्वैती एकरूपता, आतल्या आवाजाशी एकरूप पावलेली आणि तसे वागायला, बाेलायला शिकवणारी तत्त्वज्ञानाची थाेरवी, निसर्गांच्या नानापरी, बाेली भाषेतले प्रसन्न पाझर, स्त्री जीवनाच्या वाट्याला पुरून उरलेले त्यागाचे आणि भाेगांचे दशावतार, अवीट आणि अभिन्न अशा कर्मयाेगाशी लग्न लागलेली प्रापंचिकता, पूर्वापार मातीतच मळून गेलेले कृषीजीवन, लाेकसंस्कृतीचा अमूल्य असा ठेवा, प्रतिमा, प्रतिके आणि म्हणींशी झालेली उराउरी भेट, काय काय दिले बहिणाबाईंनी म्हणून सांगावे? त्यांनी थकल्या भागल्या, जीवनाच्या तापाने पाेळलेल्या लाेकांच्या झाेळीत किती म्हणून हारीने ओतले आहे. त्यांची कविता म्हणजे न फिटणारे अनंत उपकारच.

सवंगड्याचे संवेदनस्वभाव उलगडून दाखवण्याचा प्रयत्न

बहिणाईंच्या समग्र कवितेचा माठ तसा खूप साधा, साेपा म्हणूनच ताे कसदार आणि कलदार बंदा रूपायांसारखा आहे. स्थळ काळाच्या सीमारेषा भेदून रसिकांच्या तनामनात ताे सतत खणखण वाजताेच आहे. अनेकांना भुरळ घालताे आहे. ही भूल अर्थात चंद्रकांत पाेतदार यांनाही पडलेली आहे. या भुलीतूनच झपाटल्यासारखे हाेऊन, मंत्रमुग्ध हाेऊन त्यांनी हे पुस्तक लिहिल्याचे सतत जाणवत राहते. बहिणाबाईंचे समग्र आयुष्य आणि त्यांची सहज सुंदर प्रासादिक कविता कवेत घेणे हे तसे दुष्कर कर्म. पण हा भार वाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कवीने केला असल्याचे या पुस्तकाच्या पानापानातून जाणवत राहते. बहिणाबाईंच्या कवितेशी दाेस्ती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या जिवलगाने दिलेला आधार, प्रेम आणि करुणा मूल्यांची शिदाेरी गाठीशी बांधून चंद्रकांत पाेतदार यांनी त्यांना जाणवलेले, पटलेले आणि रुचलेले या सवंगड्याचे संवेदनस्वभाव उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या कवितेचा भावनेची तलम शाल पांघरून आस्वादाच्या अंगाने घेतलेला धांडाेळा आहे, हे पुस्तक म्हणजे.

बहिणाबाई लाखातील एक

बहिणाबाईंचं दु:ख तसं अपार बंद गुहेतल्या तळघरासारखं हाेतं. ना कशाचा आधार नि कुणाची सावली. मिट्ट काळाेखात आशेचा एखादा कवडसा वाट्याला यावा, यासाठीची अविरत झुंज म्हणजे हा तिचा शब्दप्रपंच. बहिणाबाईंचे हे अपार दु:ख तिच्या एकटीचेच हाेते असे नव्हे. त्यासाठी या बाईची कीव करावी, तिच्यासाठी आतड्यातून व्याकूळ व्हावे; असेही काही नाहीच. कारण ज्या कालखंडात बहिणाबाई जगत हाेत्या, आयुष्याची अरिष्ठं साेसत हाेत्या; तशा अनेक बापड्या लेकी-सुना झुरत हाेत्या, डाेळ्या डाेळ्यांमधून पाझरत हाेत्याच की ! मग यात एकट्या बहिणाबाईंचे काैतुक करण्यात काय हशील ? पण अशा प्रश्नांची साेडवणूक केवळ इतक्या साेप्या उत्तराने हाेण शक्यच नाही. या सनातन दु:खाला भिडायचे तर बहिणाबाईंच्या आयुष्याच्या तळघरात काही काळ वस्ती केली पाहिजे. अशा वस्तीतून मग जीवघेण्या सत्याचे काही कवडसे आपल्या हाती लागू शकतात. मग या लाैकिकात राहून अलाैकिक कामगिरी केलेल्या बाईच्या आयुष्याचा आणि त्या आयुष्यातून तेजाळून निघालेल्या शब्दब्रह्माचा काहीसा शाेध आपणास लागू शकताे. माणसाचा तसा काेणताच दाेष नसताना त्याला चार चाैघांमधून उपटून अंधाऱ्या तळघरात फेकून द्यावे; तसेच काहीसे जीवनभाेग बहिणाबाईंच्या निष्पाप जगण्याच्या वाट्याला आले हाेते. पण अशा तळघरातून दु:खाला जाळून, वेदनेनं हाेरपळून जाऊन अंतरी उजळून जाणारा लाखात एखादा असताेच ना. बहिणाबाई या तशा लाखातील एक हाेत्या.

बहिणाबाईंच्या शब्दांना हिरवीजर्द पालवी

‘अगं आयाबायांनाे ! माझी ही अशी कीव का करता आहात गं ? आल्या प्रसंगाला आता माझं मलाच सामाेरं जायला हवं, मला कुणाच्या दयेची आणि सहानुभूतीचीही गरज नाही. कुणाकडेही पदर न पसरता माझ्या पदरात जे काही परमेश्वरानं ओतलं आहे, ते मी मनातून स्वीकारलं आहे. आता या स्वर्गीय दु:खाचे काय करायचे त्याची साेय मी माझ्यापुरती लावून घेतलेली आहे. माझी कीव करू नका; माझे दु:ख माझे मलाच लखलाभ आहे.’ केवढा हा श्रीमंत विचार ! केवढी ही दैवदुर्लभ स्वीकाराची भाषा ! हे सारे काही या मनस्विनीने मानसिक आणि आत्मिक पातळीवर स्वीकारले हाेते. बहिणाबाईंनी त्यांच्या आयुष्यातल्या अपार दु:खाला संज्ञा संकल्पनांच्या चाैकटीत बसविण्याची घाई केली नाही. दु:ख वैभवाला त्या कमालीच्या साेशिकपणानं सामाेरं गेल्या. म्हणूनच या अशा समंजस स्वीकारातूनच बहिणाबाईंच्या शब्दांना हेवा वाटावा अशी हिरवीजर्द पालवी फुटली. त्यातून जीवनाचे निखळ सत्य घनघाेर काळ्या करड्या ढगांमधून आकाशात वीज चमकून जावी, तसे बाहेर पडले. आणि जीवनसत्य सांगणारा हा शब्दप्रभू महावृक्ष अनेक वाटसरूंना शीतल छाया देता झाला.

तहानलेल्यांना मार्गदर्शक

बहिणाबाई यांनी कीव करणाऱ्या माणसांबद्दल वापरलेली ही धाडसाची भाषा आहे, आणि ही अशी भाषा ज्या जमान्यात त्या करतात म्हणूनही त्या माेठ्या आहेत. बहिणाबाईंचे महत्त्व केवळ यासाठीच तर आहे. त्या भाेवतालच्या अंधारात आपले दु:ख गिळत कधी मुकाट्याने बसल्या नाहीत; की जगाला शिवाशाप देत बाेटं माेडत त्यांनी आपले आयुष्याला वैराण वाळवंटासारखेही केले नाही. त्यांनी आपल्या प्राचीन दु:खालाच चूड लावून त्यातून बावन्नकशी साेनं बाहेर काढलं. या साेन्याची प्रभा सर्वदूर फाकू दिली. याच प्रभेतून मग साेलीव शाश्वत सत्य बाहेर पडलं आणि ते आजही भाैतिकतेच्या वणव्यात जळत असलेल्या, सत्य-शिव-सुंदरासाठी तहानलेल्यांना चांगलंच मार्गदर्शक ठरतं आहे.

मनगटातले करतूत नम्रतेनं रेखाटलंय

काेसळलेल्या नियतीच्या निष्ठूर दु:खामुळे ही आतून आतून अत्यंत शहाणी झालेली बाई घरात आणि दारातही कशी पदर खाेचून उभी राहते, अशा या जगावेगळया बाईला भिऊन दु:खही कसे मायाळू हाेते. हात जाेडून तिच्यासमाेर ते कसे लाजून उभे राहते, माहेरच्या आठवणी आणि सासरचे वास्तव यातले द्वंद्व काहूर मांडून याेग्यालाही लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते; हे जीवनसत्य कसे सांगते, फुटलेल्या बांगड्यांना दूर सारून मनगटातले करतूत कसे ठामपणे दाखवते, हे या पुस्तकात पुरेशा तपशीलाने चंद्रकांत पाेतदार यांनी लहानपण अंगी बाणवून माेठ्या नम्रतेनं रेखाटलेलं आहे.

अवघं जीवनाचं सार सर्वस्वच भक्तीमय

बहिणाबाईंच्या कवितेला संत साहित्याचा भरभक्कम दिलासा मिळाला आहे, ही तर काळ्या दगडावरची काेरून काढलेली रेघच आहे. या प्राचीन अक्षर काव्याच्या छत्र छायेने त्यांना जाेजवले, वाढविले जीवनाला धाडसाने सामाेरे जाण्याचे बळ दिले. त्या कवितेचे संस्कार त्यांच्या मनीमानसी केवळ रूजलेले असेच नाही; तेच त्यांचे जीवनसर्वस्व ठरले. संतत्वाकडे जाण्याची पायवाट याच शब्दांनी त्यांना माेकळी करून दिली. मग त्याही तुकाेबांच्या बाण्याने ‘देव पहावया गेलाे देवची हाेऊन ठेलाे’; असं म्हणत त्यांनीही कर्मनिष्ठ हाेऊन आपलं अवघं जीवनाचं सार सर्वस्वच भक्तीमय करून टाकलं आहे.

माणसाच्या आयुष्याची इतिकर्तव्यता

चंद्रकात पाेतदार म्हणतात त्याप्रमाणे, ‘अवघी सृष्टीच माझी गीता भागवत झाली असून त्या निसर्गाला वाचविण्याची कला जर साध्य झाली तर देवाला पाहणं काहीच कठीण नाही, ही परमेश्वराच्या अस्तित्वाची खात्रीच बहिणाबाई देतात.’ हे खरे आहे. कारण केवळ ही अशी खात्रीच बहिणाबाई यांनी दिलेली नसून ‘जगाच्या कल्याणासाठी चंदनापरी जाे घसला, अरे साेतामध्ये त्याले देव दिसला दिसला !’ असे देवाचे सहजसाध्य दर्शन अशाच माणसाला हाेते, असे साक्षात्कारी विधानही त्यांनी करून ठेवले आहे. त्यामुळे माणसाने त्याच्यासमाेर अमाप अशा पडलेल्या कामातच देवाजीचं रूप पाहिलं पाहिजे. असं सांगणाऱ्या या आईला संतांच्या मांदियाळीत स्थान मिळावं, यात काेणतीही अतिशयाेक्ती नाही. म्हणून ऐहिकतेशी कर्माचं नातं जाेडत पंचमहाभूतांशी पंचेंद्रियांच्या माध्यमातून माणसानं एकरूप हाेऊन जावं आणि अशा संतांनी पूर्वापार सांगितलेल्या शरणमंत्रांना सामाेरं जावं हीच माणसाच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे; हे भान या कर्मनिष्ठ कवयित्री पासून जरूर शिकण्यासारखं आहे.

‘जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे’

बहिणाबाई यांचे मातीशी, मातीत राबणाऱ्या माणसांशी, माणूसकीचा मंत्र जपण्याचा कसाेसीने प्रयत्न करणाऱ्या एकूणच कृषिजीवनाशी माय लेकीचं नातं आहे. वरवर हे जीवन साधे साेपे वाटत असले, तरी या जगण्यातले खाचखळगे उमजायचे असले तर ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे’ ही उक्ती सहज आठवण्यासारखी आहे. अनंत कष्ट उपसावेत तेव्हा साेन्यासारखं पीक नजरेच्या टप्प्यात येतं. तथापि काळ्या मातीतल्या या साेन्याच्या दिप्तीनं भल्या भल्यांचे डाेळे चमकू लागतात. त्यांना राबणारे हात दिसत नाहीत, तळहातांवरील वेदनेच्या रेषा दिसत नाहीत, दिसल्या तरी त्या साेयिस्करपणे नजरअंदाज केल्या जातात. फसवाफसवीचा नित्याचा क्रूर खेळ मग रंगत राहताे. म्हणूनच आजकालच्या सवंग जगरहाटीच्या या मर्मावर नेमके बाेट ठेवून चंद्रकांत पाेतदार यांनी एक महत्त्वाचे निरीक्षण या पुस्तकात नाेंदविले आहे.

बहिणाबाईंकडून कृषिसंस्कृतीच्या मूल्यांचं संवर्धन

ते म्हणतात, ‘‘शेतीमातीतला आनंद अधाेरेखित करताना मातीच्या संस्कृतीची श्रेष्ठत्वाची बाजू खूप महत्त्वाची ठरते. जीवनव्यवहार कितीही व्यावहारिक असला तरीही संसकृतीपुढे व्यवहार शून्य ठरताे, ही शिकवण बहिणाबाईच्या कवितेत भेटते. या अर्थानं बहिणाबाई चाैधरी कृषिसंस्कृतीच्या मूल्यांचं संवर्धन करतात.’’ व्यवहारी व्यवस्थेतला बाजारबसवा न्याय बहिणाबाईंना त्याकाळीही अर्थातच दिसत हाेता. आपली आणि आपल्यासारख्या गाेरगरीब जिवांची ही अशी परवड का झाली आहे; काेणाच्या राबण्यावर काेण कसं गब्बर हाेतं आहे; हे सारं बहिणाबाईंच्या पुरतं लक्षात येत असावं. कारण ही कवयित्री स्वत:च्या दु:खाबराेबरच समष्टीचं दु:ख कवेत घेण्याचा प्रयत्न करीत हाेती. त्यामुळे समाजव्यवहारात अडथळा आणणारे, समाजाचे आर्थिक, मानसिक शाेषण करणारे काेण आहेत; याचा नेमका शाेघ त्यांनी घेतलेला हाेता. आणि ताे त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडलाही आहे. अशा साळसुदांनाही याेग्य ताे बाेध शिकवण्याचा, प्रसंगी अशांचे कान उपटण्याचाही प्रयत्न या कवयित्रीने निश्चितच केला आहे.

शेतकऱ्यांच्या घामाच्या सुगंधाची भाषा

शेतीभातीशी निगडित असलेले पैसा हे मूल्य महत्त्वाचे आहेच; पण त्या पल्याडही कृषीनिष्ठ माणूस आणि त्याचं राबणं, पहिल्या पावसाशी त्याचं असलेलं जिवाभावाचं नातं, धरित्रीतून उचंबळून आलेला पहिल्या पावसाचा परिमळ, माराेतीच्या बापाशी म्हणजे वाऱ्याशी असलेलं नातं, घाम गाळताना शेतकऱ्याचं तरसणं आणि ते पाहून मेघांचं बरसणं, उभ्या पिकातल्या मन नावाच्या ढाेराचं पुन्हा पिकांवर झेपावणं, शेतावर बांध घालून भाऊबंदकीला पारखं हाेणं… अशा अनंत प्रकारचे दाखले देत ही कृषीकन्या शेतावर राबणाऱ्या, शेतावरच पाेट भरणाऱ्या माणसांना मूल्ययुक्त भान जागे करत करत सुखासमाधानानं जगण्याची शिकवण देते. त्याच बराेबर पीकपाण्यावर, शेतीवाडीवर आणि जंगल झुडपांवर वाकडी नजर ठेवून खिसे भरणाऱ्या सवंग संधीसाधू लाेकांच्या, माणसांबराेबर आणि माणूसकी बराेबर जीवघेणा खेळ खेळणाऱ्या, आणि अशा खेळातच हिस्त्र आनंद शाेधणाऱ्या लाेकांच्या डाेळ्यात झणझणीत अंजन घालण्याचाही ती प्रयत्न करते. आणि विशेष म्हणजे हे सारे करताना बहिणाबाई समग्र शेतकऱ्यांच्या घामाच्या सुगंधाची भाषा करते. ही भाषा करताना स्वत:ला समृद्ध करता करता मराठी भाषेलाही समृद्ध करते.

निसर्ग कवयित्री

बहिणाबाई या केवळ कृषी जीवनाशी एकनिष्ठ झालेल्या कवयित्री नाहीत, तर त्या सुपीक संपन्न मातीतून रूजून फुलून आलेला हा अख्खा शेतमळाच हाेत्या. पानं, फुलं, फळं, पाखरं आपल्या अंगाखाद्यांवर खेळवणारा हा हलता डुलता नितांत सुंदर शेतमळाच हाेता. अन्यथा निसर्गाशी, निसर्गातल्या चराचरांशी एवढं एकजीव झाल्याशिवाय ही अनाेखी शब्दकळा आशयाशी हातात हात गुंफून चालणारी त्यांची सखीसाेबती झालीच नसती. हेच सख्यत्व बहिणाबाईंचे निसर्गाशी, निसर्गातल्या सगळ्या घटकांशी हाेते, याचाही प्रत्यय त्यांची अवीट कविता वाचताना सतत हाेत असताे.

निसर्गाची अनेकविध रूपं बहिणाबाईंच्या कवितेत

चंदकांत पाेतदार यांनीही बहिणाबाईच्या या वैशिष्टपूर्णतेची चांगली दखल घेतली आहे. निसर्गाच्या नानाविध तऱ्हा भावनेचा साजशृंगार लेवून बहिणाबाईंच्या कवितेतून आपणास इथे तिथे सदैव भेटत राहतात. इथेही बहिणाबाई यांनी मतलबापाठी लागून निसर्गाला पारख्या हाेत असलेल्या माणसांविषयीची करुणा भाकलेली केली आहे. पानाफुलांची हिरवी सळसळ, विजांचे चाळ घुमत येणारे आकाशातले ढग, टाळ्या पिटून आनंद व्यक्त करणारी झाडं-झुडपं, चिंब भिजून पाना फांद्यांवर पंखांची फडफड करणारी पाखरं, कष्टाळू माणसांच्या अंगाखाद्यांवर खेळणारा रानवारा अशी निसर्गाची अनेकविध रूपं बहिणाबाईंच्या कवितेत ठायी ठायी भेटत राहतात. चैतन्याची ऊर्जा प्यायलेला सारा आसमंतच प्रचंड संवेदनशीलतेनं बहिणाबाईंच्या कवितांमध्ये सगुण साकार झालेला आहे. हे सारं काही वाचताना या ज्ञानी बाईची निरीक्षणाअंती किती सूक्ष्म हाेती, पाराअपाराच्या पल्याड गेलेली हाेेती, हे पाहून अचंबित व्हायला हाेते. बहिणाबाईचे निसर्गाशी असलेल्या भावरम्य नात्याची तितकीच मनभावन दखल चंद्रकांत पाेतदार यांनी या पुस्तकात घेतल्याचे तपशील आपणास आढळतात.

खाेटेपणाचा बाेरीबाभळींनाही त्रास !

‘‘निसर्गरूपं सूक्ष्मतेने न्याहाळताना त्यातही देवत्वाचा अंश त्या पकडतात. अध्यात्माची जाणीव आणि निसर्गाची किमया यांची सांगड घालतात.’’ असे नेमके निरीक्षण पाेतदार नाेंदवतात. शिवाय निसर्गाच्या रूपांचा आधार घेत घेतच त्या लबाड माणसांना चार खडे बाेलही सुनवायला कमी करत नाहीत. अशा लाेकांचे खाेटारडे व्यवहार पाहून बाेरी बाभळीच्या अंगावरही काटे यावेत, अशी बहिणाबाईंनी त्यांच्या कवितेत केलेली नाेंद पाहून, पाेतदार यांनी ‘‘निसर्ग आणि देव यांच्याशी नैसर्गिक जवळीकता यातून साधली आहे. तर सामान्य माणसांच्या व्यावहारिक खाेटेपणाचा बाेरीबाभळींनाही त्रास जाणवताे.’’ असे नेमके आकलनही मांडले आहे.

तुकाेबांच्या अक्षर गाथेसारखेच कवितेला अमरत्व

बहिणाबाईंनी रेखाटलेला निसर्ग आणि मानवी जीवनाची त्यांनी घातलेली सांगड पाहिली; की ही कवयित्री भाबडेपणाने निसर्गाचे पृष्ठस्तरीय चित्रण करणारी, प्रसिद्धिलाेलूप आणि सभा-संमेलने-पुरस्कार यांच्या मागे धावणारी हाेती. अशी कल्पनाही करवत नाही. या अशा भाेवतीच्या तकलादू पसाऱ्यातले वैयर्थ या बाईंने काळजीपूर्वक जाणले हाेते, ते मनीमानसी जाेजवले हाेते. या अशा मृगजळाच्या मागे ती धावली असती तर मृगेळासारखेच क्षणभंगुरत्त्व अनेकांच्या नशीबी आपसूकच येते. ते तिच्याही वाट्याला आले असते. ती पिढीच कमालीची आत्मनिष्ठ हाेती आणि त्यांनी आपल्या अनुवांच्या आत्मनिष्ठेशी प्रतारणा केली नाही. म्हणूनच इतिहासाने त्यांची सार्थ दखल घेतल्याचे दिसते. तेव्हा आपल्या कवितेची, ज्या कवितेच्या सावलीतच परमेश्वराच्या सन्मुखतेची तिची आस बहिणाबाईंनी पुरती ओळखली हाेती. त्यामुळेच निसर्गाचा असलेला वा मानवी जीवनव्यवहाराच्या भूलभुलैयाचा नटवा संसार या कवितेत किंचितही आढळत नाही. निसर्गातला साधेपणा आणि सच्चेपणा या कवितेलल्या शब्दा शब्दांना बिलगून आलेला आहे. आपले शब्द शास्त्र काट्याची कसाेटी पार करून समाजमानसाचा वेध घेत घेत माणसाच्या मनातला वाकुडेपणा त्याचा त्यालाच दाखवत निसर्गाच्या सानिध्यातही ताे कसा सुधारता येईल, अशी शहाणीव देणारी ही कविता आहे. यामुळेच ही कविता तुकाेबांच्या अक्षर गाथेसारखीच आजही तगून राहिली आहे.

बहिणाबाई चालता बाेलता निसर्गच

तसे पाहिले तर या कवितेत भेटणारी सर्व रूपं सामान्यांच्या अवती भवतीच्या निसर्गाचीच आहेत. बहिणाबाई या काही कुठल्या बेटावर जाऊन राहत नव्हत्या, की काचेच्या खिडकीत बसून निसर्ग रेखाटत नव्हत्या. इथे बालकवींची अगदी हटकून आठवण येते. बालकवी ठाेंबरे म्हणतात तसे, ‘कवीच झाला सृष्टी सारी सृष्टीच झाली कवी’, याच बाण्याने या निसर्गकन्येनेही निसर्ग केवळ पाहिलेलाच नव्हता; तर ती स्वत:च निसर्गाचं हिरवंगार लेणं ल्यायलेली हाेती. चालता बाेलता निसर्गच झाली हाेती ती. बहिणाबाईंच्या एकूणच कवितेेचे हे महत्त्वाचे वैशिष्टय असावे. ती जे काही लिहायची ते ते ती स्वत:च हाेऊन जायची. हे असले एकूणच आयुष्याचे जिवाशीवाचे तिचे नाते हाेते; म्हणून तर ती अशा अस्सल कविता लिहू शकली. पण बहिणाबाईंचे प्रतिभासंपन्न निरीक्षण असे काही आहे; की ही निसर्गदृश्ये पाहताना आपलेही भान हरपून जाते. क्षणभर का हाेईना ध्यान लागून राहिल्याची, सायंकालीन प्रार्थनेला सुरुवात झाल्याची भावना मनात जागी झाल्याशिवाय राहत नाही.

वेदनेला अर्थ प्राप्त करून देणारी माऊली

मानवी नातेसंबंधाची, मानवी जीवनव्यवहाराची व्यापक जाणही बहिणाबाईंना असल्याचे त्यांच्या कवितेतून सतत जाणवत राहते. बहिणाबाईंच्या कवितेतील स्त्री चित्रणाला कारुण्याची विलक्षण किनार लाभलेली आहे. साेशिकतेची पुतळी असलेली, दास्याला आणि त्यातून जन्मलेल्या वेदनेचा मूलगाभा असलेली स्त्री आजही तशी जगभरच आढळते आहे. भाैतिकतेच्या फसव्या बाजारात या स्त्रीला मु्नत स्वातंत्र्याच्या नावाखाली नटवून सजवून उभे केलेले असले, तरीही आदीम काळापासून तिच्या पायी असलेल्या बंधनाच्या श्रृंखला आहेत तशाच आहेत. त्या दिसणार नाहीत, ताेडता येणार नाहीत याची दक्षता देश विदेशातील समाजाने या ना त्या प्रकारे माेठ्या चाणाक्षपणे घेतली आहे. वेदनेला अर्थ प्राप्त करून देणारी बहिणाबाईंच्या सारखी एखादी माऊली साेडली तर मुक्यानेच मरून जाणाऱ्या अभागी स्त्रियांच्या थडग्यावर ‘नाही चिरा नाही पणती’ अशीच अवस्था आहे.

साहित्यशारदा बहिणाबाई

बहिणाबाईंनी त्यांच्या विलक्षण अशा आत्मपर कवितांच्या माध्यमातून आपल्या दु:खाशी संवाद साधला आहे. ‘बघा रे, आम्हा बायकांचे हे दु:ख किती माेठं आहे ते.’ अशी टिमकी त्यांनी त्यांच्या कवितांमधून वाजविल्याचा आवाज क्षणभरही येत नाही. आपलं वैभवी दु:ख त्यांनी कमालीच्या संयतपणे शब्दांना सांगितलं. ते इतकं त्यांच्या जीवनाशी समांतर जाणारं आहे; की ते केवळ त्यांचं एकटीचं राहत नाही; तर अखिल स्त्री जातीचं हाेऊन जातं; हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माहेरची माणसं माणसांचे संस्कार माेठ्या खाटल्याचं घर, माहेरची वाट, माहेरचं रान-शेतीवाडी, माहेरचे पशू, पक्षी, जनावरं, देवळं, श्रद्धा हे सारं एका बाजूला. ही अशी दृष्ट लागण्यासारखी संपन्न श्रीमंती आणि सासरकडचा दुष्काळ, वैधव्य, परकेपणाची भावना, प्रापंचिक जबाबदाऱ्या पेलताना हाेणारी तगमग, आर्थिक चणचण, पाेटात पेटलेली भुकेची आग, मनाची धुसमट, साथीचे राेग, कुटुंबाचे विभ्नतपण, दुष्काळी कामावर जाण्याची अघाेरी वेळ ह्या अशा न संपणाऱ्या घातवेळा दुसऱ्या बाजूस अशा दुदैवाच्या चक्रात अडकलेली काेणतीही बाई खचून, पिचून जाऊन उद्ध्वस्तच हाेईल. आत्महत्येसारखा अघाेरी मार्गही पत्करतील कदाचित. या अशा घातक शक्यताच अधिक. पण बहिणाबाई यांनी हे सर्व मनातले गूज हळूवारपणे सांगितले ते माय सरसाेतीला, आणि त्या शारदेच्या वीणेच्या तारांचा झणत्कार बहिणाबाईंच्या शब्दांना लाभला, हे केवढे माेठे तिचे भाग्य. हा झणत्कारच मग मूकपणे साेसणाऱ्या सर्वच आयाबायांचा हाेऊन गेला. बहिणाबाईंच्या शब्दांच्या दर्पणात या बाया बापड्यांनी स्वत:ला खबीरपणानं पाहून घेतलं आणि आपल्या पूरातन दु:खाला वाट माेकळी करून दिली. हे बहिणाबाईचे स्त्रीजातीवरचे न फिटणारे उपकार आहेत. दु:खातून तावून सुलाखून उजळून निघालेली ही अशी आगळीवेगळी साहित्यशारदा हाेती बहिणाबाई. तिनं दु:खाचे घाव साेसणाऱ्या स्त्रियांना मानसिक आणि आत्मिक बळ दिलं. ‘संसार म्हणजे नुसतं रडणं-कुढणं नसतं बाई, चुल्हावरच्या तव्या सारखा संसार असताे ग बायांनाे! संसार तापाचे चटके बसल्याशिवाय भाकर नाहीच मिळणार.’ हे अजरामर साेलीव सत्य हळूवारपणे पण माेठ्या वात्सल्याने तिने सांगितले. त्यामुळेच ‘‘स्त्रियांच्या सुखदु:खांना मांडणारी भाषा संपूर्ण स्त्रीविश्वालाच ठळकपणे मांडते.’’ हे या पुस्तकाच्या लेखकाने केलेले विधान सहज पटून जाते.

सामाजिक संदर्भांचे विशाल काेंदण

जगण्या-भाेगण्याच्या रीती, साऱ्या तऱ्हा जगभरच्या स्त्रियांच्या वेगवेगळ्या असल्या तरी दु:खाची जातकुळी इथून तिथे सर्वत्र सारखीच आहे. त्यामुळे बहिणाईच्या अनुभवाला, तिच्या दु:खाला सार्वत्रिकता लाभली ती ही अशी.
बहिणाबाईंच्या कविता खानदेशी संस्कृतीतला सगळा रागरंग घेऊन आपल्या समाेर माेठ्या नम्रपणे उभी राहते. लाेकरूढी, लाेकपरंपरा आणि लाेकसंस्कृतीचं सारं लेणं लेवून ही कविता आपल्यासमाेर येते. म्हणी, उखाणे, कूटरचना, सुभाषिते यांचे संपन्न विश्व तसे पाहिले तर माेजक्याच कवितांमध्ये त्यांनी माेठ्या काैशल्याने उभे केले आहे. शिवाय सणवार, पूजा-अर्चा, यात्रा-जत्रा, शेतातल्या मातीची आणि अंगणातल्या मातीची पूजा, हे सारं काही त्यांच्या कवितांमध्ये दुधात खडीसाखर विरघळून जावी, इतक्या सहजतेने विरघळून गेलं आहे. केवळ कृषीवल संस्कृतीतून आलेल्या संपन्न भाषेची कितीतरी रूपं, कितीतरी शब्द या बाईने हारीने वेचलेले आहेत, हे त्यांच्या प्रासादिक कवितांमधून मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. विदर्भातल्या बाेली भाषेचे पाझर बहिणाबाईंच्या या शारदीय माठातून किती निर्ममतेने स्त्रवत असतात, हे पाहून मन हरखून गेल्याशिवाय राहत नाही. बहिणाबाईंच्या कवितेतून उजागर हाेणारे हे सारे संदर्भ अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्यांना सामाजिक संदर्भांचे विशाल काेंदण लाभलेले आहे.

माणसा कधी व्हशील माणूस

बहिणाबाई यांनी तत्कालीन समाजातल्या बनवेगिरीची, भाेंदूगिरीची, फसवेगिरीची, संधीसाधूपणाची परखड भाषेत संभावना केली आहे. आजच्या वर्तमान भवतालातही ती समर्पक ठरते आहे. बहिणाबाई ज्याेतिष पहायला आलेल्या माणसाला दारातही उभी करून घेत नाही. बेकार नियत असलेल्या माणसाला ती गाेठ्यातल्या जनावरापेक्षाही हीन लेखते. लाेभासाठी लाळघाेटेपणा करणाऱ्याला, ‘अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस?’ असा राेकडा सवालही ती करते. या सगळ्या सामाजिक संदर्भांशी त्यांचे जिवाभावाचे नाते असल्याचे दिसते. हे सर्व काही चंद्रकांत पाेतदार यांनी या पुस्तकात तपशीलवारपणे नाेंदविले आहे. हे संदर्भ नजरेखालून घातले, की त्यांनी या कवितांचा किती जिव्हाळ्याने अभ्यास केला आहे; हे जाणवल्याशिवाय राहत नाही.

रंजल्या गांजलेल्यासाठी करुणेचे पसायदान

‘‘ऋषिमुनींच्या काळापासून जीवनाच्या अर्थासाठी असणारी धडपड अनेकांनी उलगडण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात बहिणाईंनीही आपल्यापरीने जीवनाचा अर्थ शाेधला. माणसाच्या जगण्या-मरण्यातला फरक ताे फ्नत एका श्वासाचा. जगावे तर उंच गगनासारखे आणि एक नवा जीवनादर्श उभा करावा ही त्यांची भूमिका सर्वश्रेष्ठ अशीच आहे.’’ चंद्रकांत पाेतदार यांनी बहिणाईच्या मनीचे हे जे काही गूज सांगितले आहे; तेही महत्त्वाचे वाटते. कारण बहिणाबाईंच्या समग्र जगण्याचे स्फटीकासारखे पारदर्शक तत्त्वज्ञान, कापरासारखे जळून अत्तरासारखे दरवळणारे अध्यात्म हे तिच्या जगण्या-भाेगण्यातून आले हाेते. ते तिने कमालीचे लहानपण अंगी बाणवून माेठ्या ताेऱ्यात सांगितले हाेते. हा असला जगावेगळा ताेरा मराठी काव्यपरंपरेत अगदीच विरळा आहे. म्हणून ताे मिरवण्याचा मान खचितच बहिणाबाई यांना दिला गेला पाहिजे. कारण या ताेऱ्याची सारी सामग्री तिने ज्ञानाेबा तुकारांमांपासून आणि मुक्ताई जनाई पर्यंतच्या बलदंड कवींकडून घेऊन ती शिरसावंद्य मानली हाेती. केवळ मानलीच नव्हती, तर त्याची तिने यथासांग मांडामांड केली हाेती. ही मांडामांड कल्पनेतल्या गावातली नव्हती, तर ती स्व:ताला भेदून, लाैकिकाला भेदून पारलाैकिकाच्या जगात ती मिरवणारी हाेती; म्हणूनच ती आजही अभंग ठरते आहे. माणूस, निसर्ग इतकेच नव्हे तर ती सगळ्या चराचराला कवेत घेण्याचा प्रयत्न ती करते आहे. भवतालाच्या अंधारयात्रेत दिवली हाेऊन तेजाळते आहे. भाैतिकाच्या हावऱ्या हव्यासात मूल्यात्मक भान जागविते आहे; आणि तीही विश्वात्मक देवाकडे थकल्या भागल्यांसाठी, रंजल्या गांजलेल्यासाठी करुणेचे पसायदान मागते आहे.

पसाभर सृजनगंधी कवडसे

बहिणाबाईचं हे सारं अक्षरधन, काळाच्या तळघरात बरीच वर्षे काेंडले हाेते. बहिणाईच्याच साेपानाने हे नित्य झळझळणारे साेनेे बाहेर काढले आणि आधुनिक मराठी काव्यशारेदच्या मंदिरावर कळस म्हणून ठेवले. या मातृभक्तीचेही किती माेठे उपकार आपल्यावर! तर दशदिशांना दिमाख मिरवत आरूढ झालेल्या या कळसावर पडलेल्या साेनेरी उन्हाचे काही कवडसे चंद्रकांत पाेतदार यांच्या पाेतडीत पडले हाेते; आणि त्यांतले पसाभर सृजनगंधी कवडसे ओंजळीत घेऊन हे असे आपल्या समाेर त्यांनी धरलेले आहेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading