December 3, 2024
Sukrut khandekar article on badlapur encounter
Home » चुकीला माफी नाही…
सत्ता संघर्ष

चुकीला माफी नाही…

हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले होते. त्यावेळीही लोकांनी जल्लोष केला होता. पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले होते, तेव्हा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव होते, पण नंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

डॉ सुकृत खांडेकर

ठाणे जिल्ह्यातील पण मुंबईच्या विस्तारीत पूर्व उपनगरातील बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे नामक नराधमाचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आणि महायुती विरुद्ध महाआघाडी अशा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. पोलिसांच्या गोळीबारात नराधम ठार झाला, याचे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. त्याला झटपट फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, अशी मागणी सर्वसामान्य लोकांकडून विशेषत: बदलापूरच्या जनतेकडून झाली होती.

अत्याचाराची घटना उघडकीस येताच हजारो लोक बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर जमले, तब्बल अकरा तास रेल रोको आंदोलन केले, हातात फाशीचे दोर उंचावत, फाशी फाशी, अशा घोषणा देत संताप व्यक्त केला होता. बदलापूर येथील पोलिसांच्या हलगर्जीपणाच्या कहाण्या जेव्हा उजेडात येऊ लागल्या तेव्हा लोकक्षोभ अधिकच वाढला. एक तर गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिसांनी कमालीचा वेळकाढूपणा केला, त्या पीडित मुलींचे आई-वडील पोलीस स्टेशनवर गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना तासनतास बसवून ठेवले. विशेष म्हणजे त्या शाळेचे संस्थाचालक व मुख्याध्यापक फरारी तर झालेच पण त्यांना पकडण्यात पोलिसांनी कमालीची चालढकल केली.

अगोदरच जनाक्रोश पोलिसांच्या विरोधात होता. सरकारने आरती सिंग या आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केली, पण त्यानेही लोकांचे समाधान झाले नाही. त्यातच नराधम अक्षयचा एन्काऊंटर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. शिंदे व फडणवीस यांनी जनतेला न्याय मिळवून दिला असे फलक संपूर्ण महामुंबईत एका रात्रीत झळकले. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, राज्याचे ते सिंघम आहेत, अशा थाटात रिव्हॉल्व्हर व रायफल घेऊन हात उंचावलेले फडणवीस जिकडे तिकडे फलकांवर दिसू लागले. झटपट न्याय हवा ना, घ्या…,  बदला पुरा… अत्याचार केले तर असंच घडणार… अशा रंगवलेल्या घोषणा फडणवीसांची सिंघम प्रतिमा दाखवताना लक्ष वेधून घेत होत्या. 

११ व १२ ऑगस्टला त्या चार वर्षांच्या बालिकांवर शाळेत वॉशरूममध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली. ही घटना उशिरा उघडकीस आली, त्यानंतर मात्र कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा हाती नसलेले हजारो लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर व रेल्वे रुळावर उतरले व जनाक्रोश प्रकट झाला. आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. बेछूट लाठीमार झाला. शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले. त्या नराधमाचे एन्काऊंटर झाले, तो आयुष्यातून कायमच संपला पण आंदोलकांवरील खटले आज ना उद्या सुरू होतील व वर्षानुवर्षे त्यांना पोलीस ठाण्यात व न्यायालयात चकरा माराव्या लागतील. त्यात वेळ तर जाईल, पैसे खर्च होतील, वकिलांच्या मागे धावावे लागेल, पोलीस केस असल्याने भविष्यात करिअर करताना व पासपोर्ट मिळवताना अडचणी येतील. ज्यांनी त्या नराधमाच्या विरोधात आक्रोश केला त्यांना यापुढील काही वर्षे न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील. पोलीस नामानिराळे राहतील आणि आंदोलकांच्या मदतीला कोणताही राजकीय पक्ष येणार नाही. नराधमाचे एन्काऊंटर झाले मग आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचे काय याविषयी सरकारने आजवर एक शब्दही उच्चारलेला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा गृह जिल्हा आहे. त्यांचे चिरंजीव याच जिल्ह्यातून लोकसभेवर खासदार आहेत. त्या नराधमाचे एन्काऊंटरही याच जिल्ह्यात झालेले आहे. ज्याचे एन्काऊंटर झाले तो अक्षय शिंदे आणि ज्या पोलीस अधिकाऱ्याने ते केले तो संजय शिंदे. हा योगायोग असला तरी एन्काऊंटर विषयी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर जे कठोर ताशेरे मारलेत त्याकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही. न्यायालयात केस उभी राहण्यापूर्वीच नराधमाला कायमचे संपवले हा काही मोठा पराक्रम नव्हे, याचे भान ठेवावे लागेल.

बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिली आहे. त्या घटनेतील आरोपीच्या पहिल्या पत्नीच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी अक्षयला तळोजा जेलमधून ताब्यात घेतले व त्याला ठाण्याच्या क्राइम ब्रँचमध्ये नेणार होते. खरं तर ही तक्रार वर्षभरापूर्वीची आहे, त्यावेळी त्याची कोणी गंभीर दखलही घेतली नव्हती. अक्षयने अनैसर्गिक संबंध ठेवायला भाग पाडले अशी तिची तक्रार होती. या जुन्या तक्रारीची कारागृहातच चौकशी करता आली असती. त्यासाठी त्याला क्राइम ब्रँचमध्ये नेण्याची गरजच काय होती? कारागृहातून आरोपीला चौकशीसाठी नेत असताना आरोपीबरोबर सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर  कधीच नसतो, मग यावेळी सीनिअर पीआय संजय शिंदेला ड्युटी का व कोणी लावली? 

अक्षयला गोळी मारणारा सीनिअर पीआय संजय शिंदे याचीही कारकिर्द वादग्रस्त आहे. तो महाराष्ट्र पोलीस सेवेत १९९२ मध्ये दाखल झाला. त्याने पोलीस दलातील बहुतेक काळ हा मुंबई किंवा ठाण्यातच काढलेला आहे. दिल्लीतील व्यावसायिक अरुण टिक्कू याच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला विजय पालांडे हा आरोपी संजयच्या मदतीने मुंबई क्राइम ब्रँचच्या कोठडीतून पळाला होता. पालांडे हा संजयचा मेव्हुणा होता. या प्रकरणात संजय शिंदे दोन वर्षे निलंबित होता. त्याला सेवेतून बडतर्फ करावे अशी शिफारस तेव्हाचे मुंबई पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांकडे केली होती पण ती फेटाळण्यात आली व संजयला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. २०१७ मध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या खंडणी विरोधी पथकात (संवेदनशील पथकात) त्याची नेमणूक झाली. सध्या त्याचे ठाणे क्राइम ब्रँचमध्ये पोस्टिंग आहे. एवढेच नव्हे तर आरती सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीमध्येही त्याची नेमणूक केली आहे. सरकार दरबारी तो किती महत्त्वाचा आहे हे त्यावरून लक्षात येते.

नराधम अक्षय शिंदे याला पोलिसांनी त्यांच्या वाहनातच ठार मारला, तर एवढे हळवे कशासाठी होता, तो तर अत्याचारी व बलात्कारी होता. फाशी हाच त्याचा अंत होता, मग एन्काऊंटरचा बाऊ कशासाठी असा युक्तिवाद सत्ताधारी महायुतीकडून करण्यात येत आहे. आरोपींनी गोळ्या झाडल्यावर पोलीस काय टाळ्या वाजवणार का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पत्रकारांपुढे उपस्थित केला. मनसे व शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी अक्षयने झाडलेल्या गोळीत जखमी झालेल्या पोलिसांची इस्पितळात भेट घेतली व त्यांनी केलेल्या एन्काऊंटरबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्या पोलिसांना लाखाचा धनादेशही दिला…    

पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर होती की पिस्तूल, नेमके काय? आरोपीच्या तोंडावर काळा बुरखा होता, हातात बेड्या होत्या, मग त्याला पोलिसांच्या खिशात पिस्तूल की रिव्हॉल्व्हर आहे हे कसे दिसले? हातात बेड्या असताना ते कसे त्याने खेचले? पोलिसांकडे खिशात असलेले पिस्तूल हे लॉक असते, ते आरोपीला मिळताच अन् लॉक कसे झाले? पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हरचा चाप ओढताना ताकद लागते, ती आरोपीकडे होती का? त्याने तीन गोळ्या झाडल्या, पैकी पोलिसाला एक लागली, अन्य दोन गो‌ळ्या कुठे गेल्या? वाहनात चार पोलीस होते, मग एका आरोपीला ते आवरू शकले नाहीत का? त्याने गोळ्या झाडण्यापूर्वी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही का? एका आरोपीपुढे चार पोलीस हतबल ठरले का? पोलीस वर्दीत होते का, त्याला कारागृहातून घेऊन जाणारे वाहन ही पोलीस व्हॅन होती की खासगी मोटार होती? अक्षय हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता मग पोलिसांनी पुरेशी दक्षता का नाही घेतली? या सर्व प्रश्नांनी नंतर काहूर माजले आणि पोलिसांनी केलेला एन्काऊंटर वादाच्या भोवऱ्यात सापडला. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर तर झालाच मग एसआयटी यापुढे काय करणार, फास्ट कोर्टात केस चालविण्यासाठी नेमण्यात आलेले अॅड. उज्ज्वल निकम काय करणार? चार पोलिसांच्या गराड्यात एक आरोपी असताना स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळी घालावी लागते, हे कसले लक्षण आहे? हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले होते. त्यावेळीही लोकांनी जल्लोष केला होता. पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले होते, तेव्हा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव होते, पण नंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

बदलापूर अत्याचार प्रकरणात अक्षयला १७ ऑगस्टला अटक झाली व २३ सप्टेंबरला त्याचे पोलिसांकडून एन्काऊंटर झाले. गेल्या पाच वर्षांत राज्यात पोलीस कोठडीत असताना ८१ आरोपींचा मृत्यू झाला आहे. नराधम अक्षयच्या एन्काऊंटरनंतर एकनाथ – एक न्याय, बलात्काराला थारा नाय… असे फलक बदलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या हाती दिसले… शिंदे सरकारच्या योगी पॅटर्नचे लोकांनी स्वागत केले, देवेंद्र फडणवीसांच्या सिंघम अवताराचेही कौतुक झाले, अक्षयचा तर गेम ओव्हर… आता एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांचे भविष्य काय? सरकार आज त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading