March 16, 2025
prevent use of plastic
Home » प्लास्टिकचे भूत !
संशोधन आणि तंत्रज्ञान

प्लास्टिकचे भूत !

प्लास्टिक हा शब्द प्लायेबल म्हणजे ज्याला सहज आकार देता येतो, या शब्दावरून आला आहे. सर्व प्लास्टिक्स ही पॉलिमर असतात. पॉलिमरमध्ये कार्बनजन्य पदार्थांचे मोठमोठे रेणू असतात. सेल्युलोज हे निसर्गत: आढळणारे महत्त्वाचे पॉलिमर आहे. मात्र मागील दीड-पावणेदोन शतकांपासून मानवाने कृत्रिमरित्या पॉलिमर बनवण्यास सुरुवात केली.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

विज्ञान-तंत्रज्ञानाची खऱ्या अर्थाने घोडदौड सुरू झाली, ती चौदाव्या शतकापासून. त्यापूर्वीही अनेक क्रांतीकारी शोध लागले. त्यांनी जग बदलून टाकले. मात्र शोधांचे जनसामान्यांच्या जगण्यामध्ये दृष्य परिणाम दिसायला अनेक वर्षांचा कालावधी लागला. चौदाव्या शतकानंतर मात्र शोधांचे तंत्रज्ञानात रूपांतर करण्यासाठी भांडवलदारांचा एक मोठा वर्ग तयार झाला. जास्त नफ्यासाठी स्वस्त, आकर्षक तंत्रज्ञान ही त्यांची गरज असते. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ही मंडळी संशोधनावर खर्च करत असतात. असाच उद्योगाच्या गरजेतून लागलेला एक शोध म्हणजे प्लास्टिक. आज प्लास्टिकला सोडायचे म्हटले तरी ते आपल्याला सोडत नाही. आज ‘प्लास्टिकवर बंदी घाला’, अशी मागणी होतेय. अनेक देशांचे प्रशासन कायदे करत आहे. मात्र आज प्लास्टिकचा पूर्ण वापर थांबवणे हे आवाक्याबाहेर आहे. प्लास्टिकचा शोध जग बदलणारा. या शोधाने पॅकिंग उद्योगाचे स्वरूप बदलले. मात्र त्याचा अविवेकी वापर आता मानवासाठी धोक्याचा ठरत आहे.

प्लास्टिक हा शब्द प्लायेबल म्हणजे ज्याला सहज आकार देता येतो, या शब्दावरून आला आहे. सर्व प्लास्टिक्स ही पॉलिमर असतात. पॉलिमरमध्ये कार्बनजन्य पदार्थांचे मोठमोठे रेणू असतात. सेल्युलोज हे निसर्गत: आढळणारे महत्त्वाचे पॉलिमर आहे. मात्र मागील दीड-पावणेदोन शतकांपासून मानवाने कृत्रिमरित्या पॉलिमर बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला सेल्युलोजचा वापर करूनच पॉलिमर बनवले. मात्र पुढे खनिज तेल आणि इतर खनिज पदार्थांपासून पॉलिमर बनवण्यास सुरुवात झाली आणि जग बदलले. कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेले पॉलिमर हे नैसर्गिक पॉलिमरच्या तुलनेत खूपच लांब धाग्यांचे बनू लागले. त्यामुळे टिकाऊपणा वाढला. स्वस्त, वजनाने हलके, हाताळण्यास सोपे असल्याने ते लोकप्रिय झाले आणि मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले.

पूर्वी हत्तीचे दात, कासवांचे कवच आपल्याकडे बाळगणे प्रतिष्ठेचे मानले जात असे. मात्र हत्तीचे दात मिळणे दिवसेंदिवस कठीण बनले. म्हणून हस्तीदंताचा व्यवसाय करणाऱ्या एका दुकानदाराने कृत्रीम हस्तीदंत तयार करून देणाऱ्यास दहा हजार डॉलरचे बक्षीस ठेवले. हे आवाहन जॉन वेस्ले ह्याट यांनी स्वीकारले. त्यांनी १८६९ मध्ये सेल्युलोज आणि कापूर वापरून शिंगाचा, हस्तीदंताचा, कासवाच्या कवचाचा सहज आकार देता येईल, असा पदार्थ बनवला. हेच पहिले प्लास्टिक.

हा शोध क्रांतीकारी बनला. यातील उत्पादनासाठी आवश्यक सेल्युलाज निसर्गात मुबलक उपलब्ध होते. या शोधानंतर त्याचे विविध गुणधर्म तपासण्यात आले. पुढे पातळ शीट तयार करणे, त्यापासून धागे बनवणे अशा विविध तंत्राची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पॅकिंग उद्योगामध्ये लागणारी लाकडाची गरज कमी झाली आणि हा शोध पर्यावरणपूरक असल्याचे संशोधकच सांगू लागले. आता हत्ती आणि कासवांची हत्या कमी होईल कारण या प्लास्टिकपासून कृत्रिम हस्तीदंत आणि कासवांचे कवच बनवले जाईल, अशीही जाहीरात करण्यात आली. निसर्गात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सेल्युलोजमुळे प्लास्टिकचे उत्पादन आधिक स्वस्त आणि किफायतशीर बनले.

तोपर्यंत विद्युत ऊर्जेचा शोध लागला होता. या ऊर्जेचा वापर करताना शॉक बसण्याचा मोठा धोका होता. तो कमी करण्यासाठी चांगला विद्युत रोधक शोधण्यासाठी लिओ बेकलँड संशोधन करत होते. त्यातून १९०७ साली त्यांना बॅकेलाईटचा शोध लागला. बॅकेलाईट पूर्णत: कृत्रीम पदार्थांपासून बनले होते. बॅकेलाईट हे उत्कृष्ट विद्युत रोधक, उष्णता रोधक तर होतेच, पण त्याखेरीज ते टिकाऊ होते. याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य होते. बॅकेलाईट हजारो कारणासाठी वापरता येईल, अशी जाहिरात करण्यात आली. परिणामी बॅकेलाईटचे उत्पादन वाढणे आणि त्याचा विविध कारणासाठी कसा वापर होऊ शकतो हे शोधण्याची स्पर्धा सुरू झाली. जगातील रसायन उद्योगातील सर्व प्रमुख कंपन्यांनी यावर लक्ष केंद्रीत केले. त्यांनी संशोधन आणि विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. यातून बॅकेलाईटच्या जोडीला नायलॉन, पीव्हीसी, पॉलिस्टर अशा अनेक नव्या पदार्थांचा शोध लागला.

१९३५ मध्ये वॅलेस कॅरोथर यांनी नायलॉनचा शोध लावला. त्याचा दुसऱ्या महायुद्धात टिकाऊ दोर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला होता. इतर दोरापेक्षा नायलॉन कितीतरी पट टिकाऊ होते. हेल्मेटच्या आतमध्ये प्लास्टिक वापरल्याने ते आधिक सुरक्षीत झाले. विमानाच्या खिडक्यासाठीही प्लास्टिक वापरण्यात आले होते. या सर्व कारणांनी प्लास्टिकची लोकप्रियता वाढली. दुसऱ्या महायुद्धात एकट्या अमेरिकेतील प्लास्टिक उत्पादनात तिप्पट वाढ झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत प्लास्टिकचा वापर मर्यादित होता. मात्र दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर नंतरच्या शांतीकाळात अनेक रसायन संशोधक प्लास्टिककडे वळले.

वजनाने हलके असल्याने कारमध्ये काचा आणि धातूऐवजी प्लास्टिक वापरण्यासंदर्भात संशोधन झाले. तसा वापरही सुरू झाला. परिणामी कारचे वजन कमी झाले आणि वजनाने हलक्या असलेल्या कारचा वेग वाढला. प्लास्टिक पिशव्या, दोर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या केस, मोबाईल केस, मोबाईल कव्हर, पाईप, पिशव्या, पोती, भांडी, बाटल्या, कपडे, विद्युत केबलसाठी रोधक आवरणे, इत्यादी बनू लागली. मानवी जीवनात प्लास्टिकचा वापर वाढला. कोणतीही गोष्ट प्लास्टिकविना बनत नाही. त्यातूनच काही दशकापूर्वीपासून रोज घरोघरी प्लास्टिक जाऊ लागले.

घरी गेलेले प्लास्टिक वापरल्यानंतर मात्र कचऱ्यात टाकले जाऊ लागले. मात्र प्लास्टिक अन्य नैसर्गिक घटकांप्रमाणे लवकर कुजत नाही. त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचे ढीग तयार होऊ लागले. ते वाढत चालले. ते कुजतानाही हळूहळू विघटीत होऊ लागले. त्याचे अंश पावसाच्या पाण्यात मिसळून समुद्रातही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक मिसळत आहेत. मासे आणि मीठामध्ये ते काही प्रमाणात येते आणि मानवी शरीरात पोहोचत आहे. कचऱ्याच्या ढिगातील प्लास्टिक जनावरांच्या पोटात आणि दुधातून मानवी शरीरात पोहोचत आहे. लोणार सरोवरातही ते आढळले आहे. प्लास्टिकच्या शोधानंतर शंभर वर्षांनी त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यातून विविध शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत. ते रस्ते बांधताना वापरण्याचे प्रयोग केले जात आहेत, मात्र त्यातून प्लास्टिकचा धोका संपत नाही. म्हणून वापरलेले प्लास्टिक पुनर्वापरासाठी पाठवायला हवे आपण निदान त्याचा वापर तरी कमी करायला हवा!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading