माजी कुलगुरू प्रा. माणिकराव साळुंखे यांना इंडियन केमिकल सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांना इंडियन केमिकल सोसायटी या अग्रगण्य राष्ट्रीय संस्थेकडून सन २०२४ साठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
इंडियन केमिकल सोसायटी ही भारतातील रसायनशास्त्रज्ञांची मातृसंस्था असून यंदा शतकमहोत्सव साजरा करीत आहे. संस्थेच्या या शतकमहोत्सवी वर्षातील जीवनगौरव पुरस्कार डॉ. साळुंखे यांना जाहीर झाला आहे. येत्या १९ ते २१ डिसेंबर २०२४ रोजी जयपूर येथे संस्थेचे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्या अधिवेशनात डॉ. साळुंखे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासह संस्थेची मानद आजीव फेलोशीपही त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. साळुंखे यांनी जयपूर येथील राजस्थान केंद्रीय विद्यापीठासह देशातील पाच विविध विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविले आहे.
डॉ. साळुंखे यांनी रसायनशास्त्र, रसायन अभियांत्रिकीसह संबंधित उद्योगांमध्ये आपल्या संशोधनाच्या माध्यमातून मौलिक योगदान देऊन आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. त्यांच्या या कार्याचा संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करताना संस्थेला अभिमान वाटत आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष प्रा. जी.डी. यादव यांनी डॉ. साळुंखे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याविषयी थोडक्यात…
सांगली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. साळुंखे यांनी बी.एस्सी., एम.एस्सी. आणि पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण शिवाजी विद्यापीठातून घेतले. त्यानंतर त्यांनी विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागात अध्यापनाचे कार्य केले. सेंद्रिय रसायनशास्त्राच्या क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाकडून त्यांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले. त्यानंतर इस्रायल येथील जागतिक प्रतिष्ठेच्या वेझमन इन्स्टिटियूट ऑफ सायन्स, जर्मनीतील व्हिएन्ना युनिव्हर्सिटी, अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी आदी ठिकाणच्या संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केले. मुंबईच्या नॅशनल केमिकल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून निवड झाली. तेथे रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख आणि संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जून २००४मध्ये ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानंतर जयपूर येथील राजस्थान केंद्रीय विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याखेरीज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, इंदूर आणि भारती विद्यापीठ, पुणे या विद्यापीठांचे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.