September 8, 2024
The anxiety of the memory of the father
Home » बापाच्या आठवणीची व्याकुळता !
मुक्त संवाद

बापाच्या आठवणीची व्याकुळता !

वेश्यावस्तीतील प्रियकराला बाप मानणारी तनिषा मुलगी आपल्या रूममध्ये रडत बसली होती. तिचा तो प्रियकर निराश होऊन तिच्या रूममधून तडकाफडकी निघून गेला. तसा जॉन यांनी आतमधून तनिषा हिला बोलवून घेतलं. तनिषाची प्रियकराबरोबर वादावादी झाल्यानंतर तिची काय अवस्था झाली असेल ? तिची मनस्थिती कशी असेल?ती मोकळेपणाने आपल्याशी बोलू शकेल, की नाही ? हाच विचार करत जॉन भाई तिच्याकडे पाहत राहिले होते.

जॉन भाई म्हणजे देहविक्री करणाऱ्या या महिलांना त्यांच्या वडिलांप्रमाणेच होते. आजवर देहविक्री करणाऱ्या महिलांची एवढी त्यांनी काळजी घेतली, की जॉन भाईंबद्दल या सगळ्या महिलांच्या मनात अपूर्व असा आदरच होता. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला या महिला किंमत देत होत्या. आपलं सुख – दुःख, घरचं पूर्व आयुष्य त्यांच्यासमोर मोकळं करत होत्या. त्यामुळे जॉन भाईंना तनिषाची मनस्थिती लक्षात येत होती. तिचं मन मोकळं व्हावं आणि तिच्या मनातील तगमग शांत व्हावी, असं त्यांनाही वाटत होतं. म्हणून ते तिला बोलतं करण्याचा, तिच्या भावना मोकळ्या करण्याचा प्रयत्न करत होते.

जॉन भाईंनी तनिषाची आस्थेने चौकशी केली आणि घडलेला सारा प्रकार समजून घेण्यासाठी तिला विचारलं, तर तनिषा म्हणाली, “माझे बाबा आणि माझ्याकडे येणारा तो यांच्या चेहऱ्यात बरंच साम्य आहे. त्यामुळे मला तो भेटायला आला, की सतत बाबांची आठवण यायची. त्याच्या भेटीने बाबा भेटल्याचा आनंद व्हायचा म्हणून मी त्याची वाट बघत थांबायची”. पण मी माझ्या बाबांच्या ठिकाणी त्याला मानत असल्याचे त्याला जेव्हा कळले तेव्हा त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने मला मारहान केली.

असं सांगताना तनिषा आपल्या पूर्व आयुष्यात पोहोचली. ती म्हणाली,” केरळमध्ये समुद्रकिनारी आमची वस्ती आहे. आम्ही सात बहिणी. मुलगा हवा या आईच्या हट्टामुळे आम्हा सात बहिणींचा जन्म झाला. शेवटी आईला हवा असणारा आमचा भाऊ काही तिच्यापोटी जन्माला आला नाही. घरात मुलगी झाली, की पुढे काही दिवस सुतकी वातावरण असायचं. त्यामुळे आई-बाबांची चिडचिड सतत व्हायची. या सगळ्यातून आम्हां सातही बहिणीकडे आईचं नीट लक्ष नसायचं. बाबा मात्र आमच्यावर प्रचंड प्रेम करायचे. ते आईवर चिडायचे. मुलींकडे व्यवस्थित लक्ष दे म्हणायचे;पण आईची माया मात्र आम्हाला कधीच मिळाली नाही. ती नेहमी आम्हा सगळ्या सातही बहिणीना घालून पाडून बोलायची. बाबा मच्छी पकडून आणणाऱ्या बोटीवर टोपलीतून डोकीवरून मच्छी किनाऱ्याला घेऊन यायचे काम करायचे. या मजुरीतून आमच्या सातही भावंडांचा आणि एकूणच घरचा खर्च भागायचा नाही. आई सतत वैतागलेली. ती कुठेच कामाला जायची नाही. त्यामुळे कधी कधी आमची खाण्यापिण्याची आभाळ व्हायची. पण अशाही परिस्थितीत बाबांनी त्यांना जमेल तसं आम्हाला खाऊ पिऊ घातलं. आम्ही सातही भावंड मुली असलो तरी खूप शिकाव्यात, खूप मोठ्या व्हाव्यात असं त्यांना वाटे. मात्र आई म्हणायची या कार्टींचा काय उपयोग आहे जगून! पाठीवरून भाऊ आणला नाही. कशाला यांना शिक्षण द्यायला पाहिजे? गावभर हिंडून पोट भरून दे. आईच्या या बोलण्याचा बाबांना खूप राग यायचा;पण आईचा त्रागा एवढा असायचा,की बाबांचं तिच्यासमोर काही चालायचं नाही. मात्र बाबांच्या या प्रेमाचं सुख आम्हाला कमीच मिळालं. एकदा सायंकाळी समुद्रकिनाऱ्यावर मी माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला गेले असता समुद्रात आंघोळीसाठी आम्ही उतरलो. बाबाही तिथेच जवळ होते. आम्ही मैत्रिणी समुद्राच्या पाण्यात गेलो आणि आम्हाला पाण्याचा अंदाज आला नाही. आमच्यातली एक मैत्रीण समुद्रात पुढे गेली. तिच्याबरोबर मीही गेले आणि आम्हाला शेवटी मागे येता येत नव्हतं; समुद्राची अशी लाट आली, की आम्ही समुद्रात बुडू लागलो हे तिथल्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. आरडाओरड सुरू झाली. आम्ही समुद्राच्या पाण्यात बुडत आहोत हे तिथे असणाऱ्या बाबांच्याही मग लक्षात आले. त्यानी लगेच समुद्राच्या दिशेने धाव घेतली आणि आमचा जीव वाचवण्यासाठी समुद्रात उतरले. ते आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला दोघींनाही धरलं आणि किनाऱ्याच्या दिशेने ढकलून दिलं. तोपर्यंत मागून येणाऱ्या बाबांच्या काही मित्रांनी आम्हाला पाण्यात धरून सावरत किनाऱ्यापाशी आणलं. मात्र मोठ्या लाटेबरोबर बाबांचा समुद्रातील पाय निसटला आणि त्या लाटेत आत मध्ये कुठे ते कसे गडप झाले, हे कोणालाच कळलं नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह समुद्रकिनारी मिळाला.

हे सगळं माझ्यामुळे झालं होतं. हे सांगताना तनिषा आपल्या वडिलांच्या आठवणीने ओक्सीबोक्सी रडत होती. त्यावेळी तिच्यासोबत असणाऱ्या देहविक्री करणाऱ्या सगळ्या महिलांना गहिवरून आले. मग थोड्या जास्त वयाने असणाऱ्या एका महिलेने तिला आपल्या छातीशी धरलं. तिच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवला आणि आपल्या मांडीवर तिचं डोकं ठेवून तिला मायेने कुरवाळू लागली.

हा प्रसंग पाहताना जॉन भाईसह आमच्या डोळ्यात पाणी भरून आलं. अस समजलं जातं, की देहविक्री व्यवसायातील सगळ्यांच्याच भावना गोठून गेलेल्या असतात; पण हे जग दिसत तसं नाहीय; इथे नात्यांचेही अनेक पदर आहेत. ओथंबलेल्या भावना आहेत. खरंतर या व्यवसायातील महिलांना समजून न घेणारं आपलं पांढरपेशी जगच त्यांच्यापेक्षा भावनांनी निष्ठूर आहे.असेच म्हणावे लागेल !

जॉन भाई तात्काळ सावरले त्यांनी विषय बदलायचा म्हणून त्या सर्व महिलांसमोर तनिषाला सांगितलं, कोरोना काळ असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तुम्हा मुलींच्या आरोग्याची तपासणी करता येणार नाही आणि प्रत्येक खुंटणखान्यात डॉक्टर येऊन प्रत्येकीची तपासणी करणे शक्यही होणार नाही. कारण कोरोनामुळे डॉक्टरच इथे यायला टाळाटाळ करतायत. तेव्हा थोडे दिवस आरोग्याची तपासणी होणार नाही. सर्वजणींनी स्वतःची काळजी घ्यावी. जॉन यांनी एवढे सांगून आपण निघूया, असं मला सांगितलं.

आम्ही दोघेही देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीमधून बाहेर पडून रस्त्यावर आलो. कामाठीपुरासारख्या मुंबईच्या गजबजलेल्या वस्तीतील रस्त्यावरील शांतता अंगावर येत होती. दुपारी दोन वाजले असतील. यावेळी इतर कोण सर्वसामान्य माणूस रस्त्यावर नसला तरी पोलिसांचा ससेमिरा चुकवत देहविक्री करणाऱ्या महिला ग्राहकांची वाट बघत रस्त्याच्या कडेला बरोबर सावलीचा आधार घेत उभ्या असलेल्या दिसत होत्या. हे सगळं पाहून देहविक्री करणाऱ्या वस्तीमधील अंधाऱ्या खोली – खोलीत कोंडून राहिलेल्या दुःखाच्या वेदनेची छाया सोबत घेऊन आम्ही निघालो होतो; पण एका प्रश्नाने डोकं छळायला प्रारंभ केला होता. कोरोना काळात जगभरातील सर्व गरीब- श्रीमंत माणसांना घर सोडून बाहेर फिरण्यावर बंदी आली.

मोठमोठ्या शहरातील सामान्य माणसांना शहरात राहणं मुश्किल झाल्यामुळे अन्न पाण्याविना पैसा- अडका खिशात नसतानाही त्यांनी शेकडो मैल अनवाणी चालून सुरक्षित राहण्यासाठी आपलं घर गाठण्याचा प्रयत्न केला.त्यात अनेकांचा मृत्यूही झाला. प्रसंगी पोलिसांचाही मार त्यांना खावा लागला. कोरोनाचे संकट आपल्या घरात येऊ नये, आपण त्याचे बळी जावू नये म्हणून कोणीही घर सोडून कुठेही फिरत नव्हते.मात्र याच काळात पुरेशी सरकारी मदत मिळत नव्हती, इतर कोणी मदत करण्यासाठी पुढे येत नव्हतं म्हणून देहविक्री करणाऱ्या महिला मात्र आपला जीव धोक्यात घालून ग्राहकांची वाट बघत भर उन्हात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दिसत होत्या.कधीतरी जगावर एकाच वेळी सारखच संकट कोसळत; पण त्या संकटातील दुःखाला प्रत्येक स्तरातील माणसाला कशा वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जावे लागते आणि त्यात दुःखाची वेदना किती भयानक असते. त्याचं उदाहरण म्हणून मला या प्रसंगाकडे पाहता आलं.

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत.- ९४०४३९५१५५


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

संत चोखामेळा यांच्या जीवनचरित्राची नव्याने मांडणी करणारा ग्रंथ

साठी पार योगा…

संघटीत शक्तीनेच मिळवा असुरी शक्तीवर विजय

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading