वेश्यावस्तीमधील मुलीत तो पत्नी आणि ती मुलगी त्याच्यात बाप शोधणारी अनोखी प्रेम कहाणी…
अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. -९४०४३९५१५५
आतून जोरजोरात एकमेकांशी वादावादी झाल्याचा आवाज ऐकू आला. आमच्यासमोर बसलेल्या दहा-बारा मुलींपैकी अधिक प्रौढ असणारी एक मुलगी ताडकन उठली आणि आतून येत असलेल्या आवाजाच्या दिशेने निघून गेली. तिही त्यांच्यासोबत वादावादी करू लागली. थोड्याच वेळात वीस – पंचवीस वर्षांची मुलगी रडवेल्या चेहऱ्याने बाहेर आली. तिच्यासोबत आमच्याबरोबर बसलेल्या मुलींमधून उठून गेलेली मुलगीही बाहेर आली. त्यानंतर त्यांच्यापाठोपाठ एक धिप्पाड पुरुष आला. त्याचा सूर टिपेला पोहचला होता. तो जे काही बोलत होता. त्याचा संदर्भ लागत नव्हता. मात्र तो म्हणत होता माझे पैसे वाया गेले…माझे पैसे वाया गेले. त्याचं हे बोलणं ऐकून त्या सगळ्याच्या सगळ्या मुली त्याला ओरडायला लागल्या. त्यांनी त्याच्या विरोधात एकच गलका केला. त्याला पोलिसात नेऊ अशी त्यांनी धमकी दिली.
एवढा वेळ त्या सगळ्या जॉन आणि माझ्याशी अतिशय शांतपणे बोलून आपल्याविषयी माहिती देत होत्या त्याच मुली या का? असं वाटलं. एवढा त्यांच्या आवाजाचा पारा त्या पुरुषाच्या विरोधात चढला होता. त्यातील एक म्हणाली, ओ बच्ची है ना? तुमे समजता नही? हे ऐकून तो पुरुष अजूनच खवळला.
त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असं लक्षात आल्यावर जॉन यांनी मध्यस्थी करत त्या सगळ्या महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या महिला शांत झाल्या.
त्यातील एक मुलगी म्हणाली, “जॉन चाच्या तुम्हाला माहीत नाही. इथे येणारे सगळे ग्राहक असेच असतात. या आदमी सारखे”. हे ऐकून इथे येणाऱ्या इतर वाईट पुरुषांशी आपलीही तुलना होते आहे, हे पाहून अजून तो भडकला.
जॉन मला म्हणाले, “इथे हे नेहमीच अस असतं.” पुरुष गिऱ्हाईक आणि ह्या देहविक्री करणाऱ्या महिला यांच्यात खटके उडतच असतात. प्रसंगी दोघांमध्ये झटापट होते. पण या चार भिंतीतील हे एकमेकांना अपरिचित असणाऱ्या दोघांचे भांडण पोलीस स्टेशनपर्यंत कधीच जात नाही. फक्त पोलिसांकडे घेऊन जाऊ अशी धमकी दिली जाते. त्याची कारणे वेगवेगळी आहेत.
पहिलं कारण म्हणजे हा व्यवसाय कायद्याने अधिकृत नाही. त्यामुळे तक्रारदार महिला आणि ज्या पुरुषाविरोधात तक्रार होते त्याच्याकडूनही पोलीस पैसे खाण्यासाठी टपलेले असतात. तर दुसऱ्या बाजूला आलेल्या ग्राहकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली, तर आपल्या व्यवसायावर परिणाम होतो ही भीती त्यांच्या मनात असते.
मी गप्पपणे हे सगळं ऐकत होतो. तितक्यात तो पुरुष म्हणाला,” साला आपण बाहेर आणि घरातूनही वैतागून आलेलो असतो. इथे मन शांत करण्यासाठी यावं तर हे असं.”
त्यांना शांत करत, जॉन यांनी त्यांना विचारलं तुम्ही कुठून आला? तुम्ही काय करता? एवढा अर्धा तास आपल्या विरोधात सगळं वातावरण इथे असताना आपली आस्थेने कोणीतरी चौकशी करतो आहे या विचारानेच त्या पुरुषाचं मन सुखावलेलं दिसलं. चेहऱ्यावरचे भडकलेले भाव शांत झालेले दिसत होते. तो आमच्याशी बोलता बोलताच समोरच्या खुर्चीवर आमच्यासमोर बसला आणि आम्हाला सांगू लागला.
साली ही जिंदगी ना खराब आहे. कोणाला जीव लावू नये आणि कुणाशी संगत करू नये.
जॉन म्हणाले,” काय झाल?”
तेव्हा तो पुरुष पुढे म्हणाला,” मी मूळचा तामिनाडूमधील. मला तिथेच नोकरी करताना एका महाराष्ट्रामधील मुलीची ओळख झाली. ती माझी कलिग असल्याने आमचं सातत्याने बोलण होत राहिले. एकमेकांचे विचार जुळले आणि आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलो; पण जातीच्या उतरंडीवर बोलायचे झाल्यास मी वरच्या वर्गातील आणि ती तळातल्या वर्गातील. त्यामुळे माझ्या घरातून आमच्या लग्नाला विरोध झाला. मी घरी खूप समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा आईचा थोडा विरोध मावळला; पण वडील पहिल्या पासून हट्टी. त्यांनी आमच्या लग्नाला विरोध कायम ठेवला. तुला लग्न त्याच मुलीशी करायचे असेल तर तू हे घर सोडून जा.असे वडिलांनी मला धमकावले. वडील आणि माझ्यात नेहमीच या विषयावर भांडण व्हायचे. यातच आईची तब्बेत बिघडत गेली. काही दिवसांनी आईचं निधन झालं. या घटनेने घर पूर्ण कोसळलं. तरी वडिलांचा आमच्या लग्नाचा विरोध मावळला नाही. शेवटी आम्ही तामिळनाडूमधील नोकरी सोडून दोघंही मुंबईत आलो. इथे येऊन लग्न केलं. तिच्या माहेरच्या लोकांनी आम्हाला स्वीकारले. तिच्या आई वडिलांनी मला मुलाप्रमाणे प्रेम दिले. त्यांना मुलगा नव्हता. त्यांनी मला मुलगाच मानला. माझ्या वडिलांनी माझे घराशी संबंध तोडून टाकले. आमच्यासाठी तू मेलास. घरी तू कधीच फिरकायचे नाही, असे फोनवर बजावले. पण तिच्या आईवडिलांनी भावनिक खूप आधार दिला. त्यामुळे सगळं सुरळीत चालू होते.
पण एकेदिवशी आमच्या सुखी संसारात एक वाईट बातमी आली. मिसेसला ब्रेन कॅन्सर झाल्याचे कळले आणि थोड्याच दिवसात त्यातच तिचे निधन झाले. या घटनेने आभाळच कोसळल्यासारखे वाटू लागले. पदरात एक मुलगा होता आणि सोबत मिसेसचे आई वडील. त्यांना इतर जवळचे त्यांचा सांभाळ करतील असे कोण नातलग नव्हते. जर मी दुसरे लग्न केले ,तर दुसरी पत्नी पहिल्या पत्नीच्या आई वडिलांचा संभाळ करेल का ? या प्रश्नाने सतत डोकं भणंभणून जायला लागले. शेवटी मी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला; पण पत्नीच्या आठवणीने जीव व्याकूळ होऊ लागला. कुठेच लक्ष लागायचे नाही.थोडे दिवस नोकरीवरही जाणे बंद झाले. माझी ही अवस्था बघून मित्रांनी या बाजाराची मला वाट दाखवली. मग इथेच आताची ही मुलगी भेटली. या मुलीच्या आणि माझ्या पत्नीच्या वयातील अंतर हे आई मुलीएवढं होत. पण तिचा चेहरा मात्र अगदी माझ्या अगदी पत्नीसारखा होता. त्यामुळे या बाजारात अन्य कुठेही न जाता मी आठवड्यातून एक वेळा हिच्याकडेच येऊ लागलो.
आमची चांगली दोस्ती झाली.आम्ही एकमेकांना हक्काने बोलू लागलो. माझा अर्धा पगार हिच्यासाठीच खर्च होऊ लागला; पण आज या मुलीसोबत असताना एक वाईट घटना घडली.ती घटना मला जराही सहन झाली नाही. मी तिच्या रूममध्ये तिला भेटायला गेलो तर ती उदास दिसली. मी तिला विचारले, काय झालं? तर ती म्हणाली,” तुमचीच आठवण येत होती.”या तिच्या बोलण्याने मी आतून खुश झालो होतो; पण पुढील तिच्या वाक्याने माझा मुडच गेला आणि माझाच मला संताप आला व माझ्या इथे येण्याची मलाच लाज वाटली. ती म्हणाली,”जब भी मैं तुम्हें देखती हूं, तो मुझे अपने पापा की याद आती है।”.
या तिच्या वाक्याने जॉन आणि मी दोघंही एकमेकांकडे बघतच राहिलो. आम्हाला भानावर आणत तो पुढे म्हणाला, “ही मला माझ्यात तिचे वडील शोधते आहे आणि मी तिच्यात माझी पत्नी शोधत बसलो”. या विचाराने माझं डोकच सणकलं आणि रागात मी तिच्या कानाखालीच एक सणकवली! एवढं सांगून तो म्हणाला,” मी आता या मोहल्यात पुन्हा कधीच येणार नाही.”त्याच्या या सगळ्या बोलण्याने आम्ही सुन्न झालो. तो मात्र ताडकन उठून निघून गेला !
अजय कांडर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.