September 8, 2024
The boyfriend gave the girlfriend to the sex brokers
Home » प्रियकरानेच प्रेयसीला दिले देहविक्री दलालांच्या ताब्यात !
मुक्त संवाद

प्रियकरानेच प्रेयसीला दिले देहविक्री दलालांच्या ताब्यात !

तनिषाने मच्छिमार खलाशावर मनापासून प्रेम केले. तिच्या या प्रेमाला घरातून विरोध झाल्याने प्रसंगी स्वतःला आईकडून, बहिणींकडून बदडून घेतले. आपल्या श्वासापेक्षा तो अधिक प्रिय वाटायचा. त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट करण्याची तयारी ठेवली. एकदा छोट्या बोटीतून समुद्रात त्याच्यासोबत फिरायला गेली, तेव्हा तो म्हणाला,”माझ्यासाठी तू काय काय करू शकतेस ?”

तेव्हा ती सहज म्हणाली,” अगदी समुद्रात जीवही देऊ शकते.” मग तो म्हणाला,” आता देशील?” तर ती म्हणाली,” हो”…मग पुन्हा तो म्हणाला,” दे मग.” त्याचा तो शब्द खाली पडू न देता तिने त्या छोट्या बोटीवरून समुद्रात उडी घेतली. त्या खलाशाच्या सोबतच्या लोकांनी धावपळ केली, काहींनी समुद्रात उड्या घेतल्या आणि तिचा जीव वाचवला.

अशा प्रकारे स्वतःच्या जीवापेक्षा प्रियकराचा शब्द महत्त्वाचा मानणाऱ्या तनिषासारख्या सरळ मुलीला शेवटी आपल्या मोहमायात अडकवत, त्या क्रूर खलाशाने अखेर मुंबईतील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या शोधात असणाऱ्या दलालांच्या ताब्यात सोपविले. तेव्हा तनिषाला तिथून आपली सुटका करून घेण्यासाठी नरकयातना सहन कराव्या लागल्या;पण अखेर त्यातून काही तिची सुटकाच होऊ शकली नाही.

आपल्या वडिलांची कहाणी सांगायला व्याकुळ झालेल्या तनिषाला आपण पुन्हा भेटू, असं मला जॉन भाई यांनी सांगितलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं,” कशाला?” तेव्हा ते म्हणाले, “मुलगी लहान आहे. तिला इथे फसवून आणलेले असणार. जोपर्यंत या व्यवसायात अशा छोट्या मुली निर्ढावलेल्या होत नाहीत, तोपर्यंत त्यांना अधिक मायेचा आधार हवा असतो. मग तो आमच्या सारख्या परक्या माणसाने दिला तरी त्यांची जगण्याची निष्ठा वाढते आणि अशा रोज देह संपून जाणाऱ्या देहविक्री व्यवसायातही माणुसकीवर थोडाफार विश्वास त्यांचा राहतो. नाहीतर स्वतःही कोरडी होत जातात आणि जगालाही कोरडं समजतात व आयुष्यभर सतत संतापलेल्या वृत्तीने जगत राहतात”.

जॉन भाई यांचे हे विचार ऐकून मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. आपण स्वतःला लेखक, कवी, पत्रकार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता असे समजत असतो किंवा समजा आपण स्वतःला तसं समजत नसलो तरी लोक तुम्हाला तशी बिरूदावली लावून तुमचं व्यक्तिमत्व तसं उभं करतात; पण जॉन भाई यांच्यासारख्याच्या सहवासात अशा विचाराच्या प्रसंगातून आपली माणूस समजून घेण्याची वैचारिक बैठक अजून किती कमी आहे,याचीही प्रचीती येत जाते. मग जॉन भाईंच्या आग्रहावरून आम्ही अजून दोन दिवसांनी जॉन भाईंबरोबर तनिषा जिथे खुंटणखाण्यात देहविक्रीचा व्यवसाय करत होती तिथे गेलो.

जॉन भाई यांनी कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेशी पुन्हा संपर्क केला आणि तनिषाची भेटण्याची वेळ ठरविली. यावेळी जॉन भाईंना मी म्हणालो,” तुम्ही तर कधीही गेलात तरी तनिषा तुम्हाला सहज भेटू शकते. मग तिची भेटण्याची वेळ का घ्यायला हवी?”

यावर जॉन भाई निर्विकार स्वरात म्हणाले,” तसं नसतं. या महिलांची व्यवसायाची काही गणित असतात. ती गणित बिघडली तर या महिला कोणालाही सहकार्य करत नाहीत .शेवटी आयुष्य पूर्ण उध्वस्त झाल्याने यातील बहुतेक महिला फक्त पैशासाठीच जगत असतात. त्यामुळे ज्या वेळेत ग्राहक जास्त मोठ्या प्रमाणात येण्याची संधी असते ती वेळ त्यांच्यादृष्टीने या फालतू असलेल्या कामाला त्या वेळ देऊ शकत नाहीत.

जॉन भाईंचही बरोबर होतं. आम्ही त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी तिथे जात असलो तरी आमच्यामुळे त्यांना काय फायदा होणार होता? असा प्रश्न मला पडला आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली तरी आमच्या या प्रयत्नांचे पुढे न्यायिकदृष्ट्या काय होणार होते? हा विचार माझ्या मनात घोळत असताना आमचा नाटककार कवी मित्र प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे यांची एक कविता आठवली.

आम्ही लोकांच्या दुःखावर
कविता लिहितो,
पुढे त्या दुःखाचं काय होतं?
सिद्धार्थच्या या कवितेसारखंच तनिषाचे दुःख ऐकून घेणे आणि तिला सांत्वनपर चार शब्द सांगणे यापलिकडे आम्ही काही करू शकत नव्हतो. याची जाणीव माझ्या मनात झाली होती; परंतु जॉन भाईंना तनिषा या व्यवसायापर्यंत कशी आली हे जाणून घ्यायचे होते आणि मलाही त्याबद्दलची उत्सुकता लागून राहिली होती. जेणेकरून हे महिलांच्या देहविक्रीचे विश्व अधिक तपशीलवार कळेल असं वाटत होतं.

दुसऱ्या वेळी त्या भागात जात असल्यामुळे तिथे जाण्याचा थोडा धीटपणा निर्माण झाला होता; पण देहविक्री गल्लीतील दुतर्फा थांबलेल्या बाया रस्त्यावरून चालणाऱ्या पुरुषांच्या नजरेला नजर थेट देत.त्या ज्या धीटपणे साऱ्या पुरुष जातीला आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या,तो थेटपणा मात्र अंगावर येत होता. मात्र जॉन भाई यांच्यासोबत असल्यामुळे त्या महिलांच्या नजरेत आपण असलो तरी त्यांची ती नजर आमच्याकडे पाहण्याची त्यांच्यातील माणूसपणाला बळकटी देणारी होती. एवढ्यात तिशीच्या आसपासची रस्त्याच्याकडे बरोबर ग्राहकाच्या शोधात थांबलेली एक महिला लगबगीने धावत धावत आमच्या समोर आली. मला क्षणभर काही कळेना… धावत येत जॉन भाईंना थांबवत तिने वाकून त्यांच्या पायाला हात लावत नमस्कार केला.

जॉन भाई थांबवत तिला म्हणाले,” आता मुलाची तब्येत बरी आहे ना?” तेवढ्यात ती म्हणाली,
“हा सर,
आपकी वजह से
उसका इलाज हो सका।
आप न होते तो मेरा बेटा
न मिलता। सर,
मैं आपका एहसान
कभी नहीं भूलूंगी।”…जॉन भाईंनी “काळजी करू नको, होईल सगळं ठीक”, असं म्हणत तिला नमस्कार केला आणि ते पुढे चालू लागले. मी जॉन भाईंना विचारलं,” काय झालं? ” तर ते म्हणाले, तिचा लहान मुलगा खूप आजारी होता. पण कोरोना काळात त्याच्यावर उपचारासाठी इथल्या जवळच्या डॉक्टरांनी असमर्थता दर्शवली. त्यानंतर मी डॉक्टरांशी संपर्क करून त्याच्यावर उपचार करायला सांगितले. जॉन भाईंची ही सेवाभावी वृत्ती देहविक्री वस्तीत फिरताना पावलोपावली जाणवत होती. याच परोपकारी वृत्तीतून त्यांनी तनिषाचा देहविक्रीपर्यंतचा प्रवास जाणून घेण्यासाठी मला ते कुंटणखाण्यापर्यंत घेऊन आले होते.

तनिषाने दिलेल्या वेळेत कुंटणखाण्यात पोहचलो. आम्हाला वाटलं, तिथे शांतपणे तनिषाशी गप्पा मारता येतील आणि तिचा देहविक्रीपर्यंतचा प्रवास समजून घेता येईल;पण तिथे पोहोचल्या पोहोचल्या एक भयानक चित्र आम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे तिथे तिला मारझोड होत असतानाच आम्ही तिथे पोहचलो होतो !

अजय कांडर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी पदवीधर रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबईत उद्यापासून तर महाराष्ट्रात २३ जून पासून जोरदार पाऊस

जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न हवा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading