March 29, 2024
Sandeep Tapkir Book on Forts in Ahamadnagar Distirct
Home » गडकिल्ल्यांची अनोखी सफर
मुक्त संवाद

गडकिल्ल्यांची अनोखी सफर

अहमदनगर जिल्ह्याला जसे भौगोलिकदृष्ट्या खूप वैविध्य लाभलेले आहे, तसे गडकिल्ल्यांच्या बाबतीतही इथे वैविध्य बघायला मिळते. या गडकिल्ल्यांचा आणि तिथे घडलेल्या घटनांचा, घडामोडींचा सांगोपांग वेध घेण्याचे काम ‘निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने : अहमदनगरचे गडकोट’ या पुस्तकाने केले आहे.

डॉ. संतोष खेडलेकर

सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,
संगमनेर, जिल्हा अहमदनगर
भ्रमणध्वनी : ९८२२०९७८०९

इतिहास ही अशी गोष्ट आहे की, ज्याबद्दल सर्वाधिक मतमतांतरे आहेत. कुणी इतिहासाच्या अभ्यासाला ‘इतिहासात रमणे’ असे म्हणून त्याची हेटाळणी करतात, तर कुणी ‘वर्तमानात जगताना इतिहासापासून प्रेरणा घेऊन भविष्याचा वेध घ्यावा’, असेही म्हणतात. इतिहासाच्या माझ्यासारख्या छोट्या अभ्यासकाला यातला दुसरा मुद्दा अधिक पटतो. मुळात इतिहास हा कधीच हेटाळणीचा विषय असू नये, असे माझे मत आहे. जगात कुठेही गेले तरी एक गोष्ट नक्की असते की, जेते इतिहास लिहितात. मात्र, जे जेते ठरले नाहीत, पण त्यांची बाजू सत्याची होती, अशा मंडळींचा इतिहास  कुणीतरी लिहिला पाहिजे. हा इतिहास भलेही विजयाचा इतिहास नसेल, परंतु प्रामाणिक प्रयत्नांचा इतिहास म्हणून तर याला नक्कीच महत्त्व दिले पाहिजे. सत्याची कास धरून पुढे जाणारा लौकिकदृष्ट्या पराभूत झाला, तरी नैतिकदृष्ट्या तो जेता असतो हे कळण्यासाठी तरी इतिहास लिहिला पाहिजे, वाचला पाहिजे.

अहमदनगर जिल्हा म्हणजे, इतिहासातील असंख्य घटनांनी-घडामोडींनी भरलेली ‘अलिबाबाची जादुई गुहा’ आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. सातवाहन राजवटीपासून ते यादवकाळ, बहमनी राजवट, निजामशाही, छत्रपती शिवरायांचा कालखंड, मुघल कालखंड, पेशवाई, ब्रिटिश राजवट या सगळ्या कालखंडांत अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल कमी-अधिक प्रमाणात अनेकदा बदलत गेला. मात्र, हे सगळे घडत असताना दुसरीकडे इथली संतपरंपरा, संस्कृती, लोकजीवन सातत्याने बहरत होते. अहमदनगर जिल्हा सातत्याने तत्कालीन हिंदुस्थानच्या दख्खन प्रांताच्या राजकारण आणि समाजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला. तत्कालीन परिस्थितीत या सगळ्या राजकीय स्थित्यंतराचे केंद्रबिंदू होते, इथले सगळे गडकिल्ले.

अहमदनगर जिल्ह्याला जसे भौगोलिकदृष्ट्या खूप वैविध्य लाभलेले आहे, तसे गडकिल्ल्यांच्या बाबतीतही इथे वैविध्य बघायला मिळते. या गडकिल्ल्यांचा आणि तिथे घडलेल्या घटनांचा, घडामोडींचा सांगोपांग वेध घेण्याचे काम ‘निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने : अहमदनगरचे गडकोट’ या पुस्तकाने केले आहे. इतिहासावर वरवर भाष्य करणे हे अतिशय सोपे काम असते; मात्र इतिहासाचा सांगोपांग अभ्यास करून त्यावर भाष्य करणे हे प्रचंड व्यासंग, तसेच चिकाटीचे काम असते. इतिहासातल्या रम्य गोष्टींत रममाण होणे वेगळे आणि इतिहासातल्या काही गोष्टींचा ध्यास घेऊन त्यांच्या शोधासाठी वेडे होणे वेगळे. या पुस्तकाचे लेखक संदीप भानुदास तापकीर हे दुसऱ्या प्रकारातले इतिहासप्रेमी आहेत. त्यांच्याठायी असलेली इतिहासाची आवड, तो शोधण्याची चिकाटी आणि आपल्याला जे गवसले, ते स्वतःपुरते न ठेवता इतरांना सांगण्याची वृत्ती या गोष्टी त्यांच्यातल्या सच्च्या इतिहासअभ्यासकाच्या द्योतक आहेत.

त्यांच्या या पुस्तकाच्या सुरुवातीला अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याचा इतिहास, इथे घडलेल्या घटना, घडामोडी, किल्ल्याच्या बांधकामाची वैशिष्ट्ये, निजामशाही राजवटीत अहमदनगर शहर परिसरात उभारण्यात आलेल्या वास्तू यांची माहिती मिळते.अहमदनगरचा भुईकोट किल्ला अनेकांना माहीत आहे; मात्र हा किल्ला दोन वेगवेगळ्या कालखंडांत बांधून पूर्ण झाला आहे. अहमदशाहानंतर जवळपास अर्धशतकानंतर हुसेन निजामशाहाने पोर्तुगीज अभियंत्यांच्या देखरेखीखाली किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. या किल्ल्याबद्दलची अतिशय तपशीलवार माहिती देताना लेखक संदीप तापकीर यांनी अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. यावरून पुस्तकाचे वेगळेपण लक्षात येऊ शकते. या भुईकोट किल्ल्याबरोबरच अहमदनगरमधील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, रणगाडा संग्रहालय, फराहबाग, सलाबतखानाची कबर, दमडी मशीद, बागरोझा, सर्जेखानी घुमट, बारा इमाम कोठला अशा इतरही वास्तूंबद्दल माहिती दिली आहे. हे सर्व वाचताना आपण नकळत इतिहासाचा चश्मा लावून मागच्या पाचशे-साडेपाचशे वर्षांच्या कालखंडाची सफरही करून येतो.

अहमदनगर जिल्ह्यात इथल्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक-भौगोलिक रचनेमुळे त्या त्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले बांधण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची अभेद्य पर्वतरांग असल्याने त्या भागात अनेक बेलाग किल्ले बांधले गेले आहेत, तर जिल्ह्याचा दक्षिण-पूर्व भाग बऱ्यापैकी सपाटीवर असल्याने या भागात भुईकोट किल्ले बांधण्यात आलेले आहेत. अहमदनगरचा भुईकोट किल्ला, पेडगावचा बहादूरगड, खर्ड्याचा भुईकोट, जामगावचा भुईकोट, पळशीचा भुईकोट ही याची उदाहरणे आहेत. या सर्व भुईकोट किल्ल्यांची माहिती आणि तिथला देदीप्यमान इतिहास संदीप तापकीर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत पुस्तकात नेमकेपणाने मांडला आहे. बहादूरगड किल्ल्याचे तपशील देताना छत्रपती शिवाजीमहाराजांनी गनिमी काव्याबरोबरच चतुराईने मोगलांना कसे चकवले आणि बहादूरखानाची छावणी लुटली, हे प्रकरण वाचताना लेखकाच्या उत्तम कथनशैलीचा परिचय होतो.

अहमदनगर जिल्ह्यात ‘रांगडे’ म्हणावे असेही किल्ले आहेत. यात हरिश्चंद्रगड, रतनगड, पाबरगड, भैरवगड या अतिशय प्राचीन काळात बांधलेल्या किल्ल्यांची माहिती वाचताना आपण नकळत या गडांच्या प्रेमात पडतो. भुईकोट किल्ल्याखालोखाल बघायला जाण्यास सर्वाधिक सोपा गड म्हणजे पेमगिरीचा शाहगड किंवा भीमगड. याला ‘पेमगड’ असेही म्हणतात. याचबरोबर अहमदनगरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेला मांजरसुभा किल्ला. हे दोन्ही किल्ले चढण्यासाठी अतिशय सोपे आहेत. पेमगिरीच्या किल्ल्यावर तर थेट वरपर्यंत मोटारीने जाता येते. छत्रपती शिवरायांचे वडील शाहजीराजांनी निजामशाहीतील एक वारस मुर्तजा या लहान मुलाला मांडीवर घेऊन या किल्ल्यावर त्याचा राज्याभिषेक केला आणि त्याच्या नावाने स्वतः राज्यकारभार बघितला. त्यामुळे पेमगिरीला ‘स्वराज्य संकल्पभूमी’ असेही म्हटले जाते.

अहमदनगर जिल्ह्यातल्या किल्ल्यांचा इतिहास, भूगोल सांगताना लेखकाने ‘आज तिथे गेल्यावर काय काय बघावे’ हेही सांगितले आहे. या प्रत्येक किल्ल्यावर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्हाला जर गडकिल्ल्यांवर फिरण्याची आवड असेल, तर या मार्गांची माहिती वाचताना मनातल्या मनात आपण कुठल्या मार्गाने किल्ल्यावर जायचे याचा विचार करायला लागतो. हे लेखकाच्या लेखणीचे यश आहे. महाराष्ट्रात ट्रेकर्सचे अनेक समूह आहेत, त्यांना आणि नव्याने गडकिल्ले बघू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक सर्वांगीणदृष्ट्या उत्तम वाटाड्या ठरेल, यात शंका नाही.

महाराष्ट्राला लाभलेले दुर्गवैभव काही अपवाद वगळता काळाच्या ओघात हळूहळू नष्ट होत चालले आहे. अशा काळात लिहिलेल्या या पुस्तकाला साहित्यिक मूल्य तर आहेच; पण हे पुस्तक म्हणजे ‘भावी पिढीसाठी एक ऐतिहासिक संचित’ आहे. हे अनमोल संचित येणाऱ्या पिढीकडे सुपुर्द करण्याचे ऐतिहासिक कार्य संदीप तापकीर यांनी केले आहे. वाचक या पुस्तकाचे मनापासून स्वागत करतील, अशी आशा आहे.   

पुस्तकाचे नाव – निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने अहमदनगरचे गडकोट
लेखक – संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशन पुणे
किंमत – 195
पुस्तकासाठी संपर्क – 9168682202, 9168682201

Related posts

अलमट्टी अन् पुरावर हवा ठोस उपाय

गाव गिळणाऱ्या दरडींची कहाणी…

उत्कंठा, कुतुहल, उत्साह आणि सुक्ष्म निरीक्षणांनी भारलेले प्रवासवर्णन

Leave a Comment