November 30, 2023
Translation Conference in Shivaji University
Home » बहुसांस्कृतिक समाजात एकजिनसीपणासाठी अनुवाद महत्त्वाचा: डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

बहुसांस्कृतिक समाजात एकजिनसीपणासाठी अनुवाद महत्त्वाचा: डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये

शिवाजी विद्यापीठात अनुवादकांच्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

कोल्हापूर: विविध संस्कृतींमध्ये सुसंवाद प्रस्थापित करण्याचे कार्य अनुवादाच्या माध्यमातून होते. बहुसांस्कृतिक समाजामध्ये एकजिनसीपणा कायम राखण्याच्या दृष्टीने अनुवाद आणि अनुवादकांचे स्थान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आजपासून भारतीय अनुवाद साहित्य, भुवनेश्वर (ओडिशा) यांच्या सहकार्याने अनुवादकांच्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेस वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटक म्हणून डॉ. मुळ्ये बोलत होते. कार्यक्रमास बीजभाषक म्हणून हैद्राबादच्या इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरू डॉ. माया पंडित, तर अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते.

डॉ. मुळ्ये म्हणाले, भारतासारख्या बहुसांस्कृतिक व बहुभाषिक देशामध्ये जिथे संविधानातच २२ भाषांची नोंद आहे आणि जिथे इतक्या भाषांमधील साहित्य प्रकाशित करणारी प्रचंड व्याप असणारी साहित्य अकादमी आहे, तिथे भाषा ही दोन माणसांत केवळ संवादाचे नव्हे, तर या सर्व संस्कृतींना जोडणाऱ्या पुलाचे काम करते. त्याद्वारे माणसे एकमेकांशी जोडली जातात आणि देशाची एकता, अखंडता कायम राहण्यास मदत होते.

भावनांच्या अभिव्यक्तीसाठी मातृभाषा, राष्ट्रभाषा महत्त्वाच्या असल्याचे सांगून डॉ. मुळ्ये म्हणाले, जागतिक स्तरावरील शब्द हे फार महत्त्वाचे प्रवासी आहेत. माणसांच्याही आधी भाषा जगाच्या पाठीवर सर्वदूर पसरलेली असते. मराठीमध्ये आपल्या भोवतालातील भाषांबरोबरच अरबी, फारसी अशा अनेकविध भाषांमधून शब्द आलेले आहे आणि आपल्याला ही बाब माहितीही नाही, इतके रुळलेले आहेत. त्याचप्रमाणे मराठी, संस्कृतमधील अनेक शब्द जगाच्या पाठीवरील अन्य भाषांमध्ये जाऊन प्रस्थापित झालेले आहेत. टॅमरिंड (चिंच) हा शब्द आपल्या तमरहिंद किंवा जिंजर (आले) हा शब्दही आपल्या शृंगवेरम शब्दापासून घेतला गेलेला आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपण आपल्या भाषा, त्यांच्याशी निगडित अस्मिता सोडणे जितके गैर तितकाच अन्य भाषांचा दुस्वास करणेही चुकीचे आहे. भाषेच्या संवर्धनासाठी संवाद-अनुवाद यात्रा ही खूप महत्त्वाची आहे. भाषेच्या माध्यमातूनच आपल्याला प्रगतीपथावर मोठी मजल मारणे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या बीजभाषणामध्ये डॉ. माया पंडित यांनी अनुवाद या साहित्य प्रकाराला आणि अनुवादकांना साहित्यविश्वात मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, साहित्यविश्वाने अनुवाद आणि अनुवादक यांची कायम उपेक्षा केली आहे. अनुवादांची समीक्षाही केली जात नाही, इतके दुय्यमत्व त्याला दिले जाते. अनुवादाचे सांस्कृतिक व्यवहारात स्थान काय, असा प्रश्न उप्सथित केला जातो. अनुवादक फक्त भाषांतर करतो, असे म्हणत त्यांना लेखकाचा दर्जाही नाकारला जातो, हे क्लेशकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

Maya Pandit Speech in Translation conference in Shivaji University

अनुवाद ही सृजनात्मक प्रक्रिया असल्याचे सांगून डॉ. माया पंडित म्हणाल्या, अनुवादाचे काम हे वाटते तितके सहजसोपे नसते. ते केवळ शाब्दिक भाषांतर नाही, तर मूळ साहित्यकृतीची साहित्यिक-सांस्कृतिक प्रतिकृती निर्माण करण्याचे कार्य आहे. शब्दांना नवे अर्थ, नवे आयाम प्रदान केले जातात. आपल्या भावविश्वाच्या आणि अनुभवविश्वाच्या कक्षा ओलांडून मूळ साहित्यात अनुस्यूत संस्कृतीची पुनर्उभारणी, पुनर्निर्मिती करावी लागते. कित्येकदा त्यासाठी अनुवादकाला संपूर्णपणे नवा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. मूळ संहितेचा केवळ वाचकच नव्हे, तर त्याचा अभ्यासक व्हावे लागते. मूळ लेखकाच्या पर्यावरणाचा अभ्यास करून त्याचा परिचय करून घ्यावा लागतो. अनुवादाचे म्हणून एक राजकारण असते, तेही अनुवादकाला लक्षात घ्यावे लागते. ज्वलंत विषयाच्या झळाही सोसण्याची तयारी कित्येकदा ठेवावी लागते. मूळ लेखनाइतकीच ही गुंतागुंतीची आणि सृजनाचा कस पाहणारी ही प्रक्रिया आहे.

अनुवादामुळे साहित्यव्यवहार प्रवाही राहात असल्याचे सांगून डॉ. पंडित म्हणाल्या, नवसाहित्य, नवसंस्कृती आणि नवप्रवाहांचा परिचय करवून घेण्यासाठी अनुवाद प्रक्रिया मोलाची भूमिका बजावते. त्यामुळे जागतिक स्तरावर भाषाव्यवहार वाढला पाहिजेच, पण भारतीय भाषांमध्ये परस्पर अनुवाद-व्यवहार होत राहणे अत्यंत गरजेचे आहे. हे स्पर्धात्मकता म्हणून नव्हे, तर भाषासमृद्धीसाठी आवश्यक आहे. विविध भाषांमध्ये तुलनात्मक अभ्यास व्हावेत, अनुवाद संशोधन प्रकल्प हाती घेतले जावेत, जेणेकरून संस्कृतीवर्धनाला बळ मिळेल. प्रस्थापित साहित्याच्या पलिकडे दलित, परीघावरील आणि परीघाबाहेरीलही साहित्य व्यापक प्रमाणात आहे. त्या साहित्याकडे अनुवादकांनी लक्ष पुरवावे. त्यातून समाजजागृतीबरोबरच समता प्रस्थापनेसाठी आवश्यक विश्वबंधुत्वभाव निर्माण होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी अनुवादाच्या प्रक्रियेकडे उद्योग-व्यवसाय संधीच्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, उद्योग-व्यवसायांसाठी अनुवाद आणि अनुवादाचा उद्योग-व्यवसाय या दोन्ही अंगांनी युवकांनी अनुवादाकडे संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. अनुवादकाचे काम लेखकापेक्षा जबाबदारीचे आणि जोखमीचे असते. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये स्थानिक, प्रादेशिक भाषांमधून अभ्यासक्रम शिकविण्याचे धोरण अंगिकारले आहे. हा अनुवाद करणे किचकट आणि आव्हानात्मक आहे. सामाजिक विज्ञान, कला विद्याशाखांच्या बाबतीत ते थोडे सुलभ असले तरी गणित, विज्ञान व तंत्रज्ञान यांचा अनुवाद करण्यासाठी कुशल आणि त्या विषयांतील तज्ज्ञ अनुवादकच लागतील. त्या दृष्टीनेही या क्षेत्रातील संधींचा वेध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात विविध भाषांतील आठ अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सुरवातीला विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर भारतीय अनुवाद साहित्यचे सचिव शरदचंद्र आचार्य यांनी आभार मानले. या परिषदेस शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक, संशोधक विद्यार्थ्यांसह उर्वरित महाराष्ट्र, आसाम, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, छत्तीसगढ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांतूनही अनुवादक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Related posts

मूल येथे तीन डिसेंबरला महिला झाडीबोली साहित्य संमेलन

विचार सूत्र देणारे बालसाहित्य : ‘माझे गाणे आनंदाचे’ आणि ‘जाणिवांची फुले.’

आषाढीचा पेरा…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More