सर्वच गोष्टी आजकाल पैशामध्ये विकत घेतल्या जातात. पण प्रेम कधी पैशाने विकत मिळत नाही. प्रेम विकत मिळत नाही, मग भक्ती कशी पैशाने विकत घेता येईल. जीवनात माणसाला लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा विकत मिळू शकतात किंवा तशी व्यवस्था आजकाल उभारली जात आहे. पण प्रेम, भक्ती हे काही पैशाने विकत मिळू शकत नाही. म्हणजेच ही सेवा वेगळी आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
तैसे स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा ।
येर ते गा पांडवा । वाणिज्य करणे ।। ९१३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्यांची श्रेष्ठ सेवा होय. त्यावाचून दुसरे कांही करणे म्हणजे अर्जुना तो केवळ व्यापार होय.
स्वामींना, सद्गुरुंना काय अपेक्षित आहे त्यानुसार तशी सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे. अपेक्षित आचरण ठेवणे. हीच सद्गुरुंची खरी सेवा होय. नाहीतर तो व्यापार होतो. सेवा आणि व्यापार यामधील फरक लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. सेवा कशाला म्हणायचे ? अन् व्यापार कशाला म्हणायचे ? हे समजून घ्यायला हवे. आजकाल मंदिरास अनेक सेवा विकत मिळतात. अभिषेक सुद्धा पैसे देऊन करवून घेतला जातो. याला सेवा म्हणायचे की व्यापार ? काही देवळामध्ये चोविस तास अभिषेक सुरु असतो. देव सुद्धा अशा अभिषेकाने झिजत असेल, पण हे सर्व सुरुच असते. अशा छोट्या छोट्या घटना समजून घ्यायला हव्यात. अध्यात्मात सेवा आणि व्यापार कशाला म्हणायचे हे समजून स्वामींना अपेक्षित असलेली सेवा देणे ही खरी परमसेवा आहे.
सर्वच गोष्टी आजकाल पैशामध्ये विकत घेतल्या जातात. पण प्रेम कधी पैशाने विकत मिळत नाही. प्रेम विकत मिळत, नाही मग भक्ती कशी पैशाने विकत घेता येईल. जीवनात माणसाला लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा विकत मिळू शकतात किंवा तशी व्यवस्था आजकाल उभारली जात आहे. पण प्रेम, भक्ती हे काही पैशाने विकत मिळू शकत नाही. म्हणजेच ही सेवा वेगळी आहे. हे समजून घ्यायला हवे. सद्गुरुंना, भगवंतांना सेवा भाव अपेक्षित आहे. त्याचा व्यापार होता कामा नये हे लक्षात घ्यायला हवे. खरे अध्यात्म समजून घ्यायला हवे. तरच तुम्ही योग्य सेवा देऊ शकाल. मठामध्ये, देवळामध्ये सेवेच्या नावावर आजकाल काहीही सुरू असते. पण याला सेवा म्हणायचे का ? ती सेवा नाही तर तो व्यापार आहे का ? याचा अभ्यास हा करायला हवा अन् तशी सेवा देण्याचा प्रयत्न करायला हवा.
आपण नोकरी जेथे करतो तेथेही आपण सेवाच देत असतो. त्या सेवेचा आपणास पगार मिळतो. कामानुसार आपला पगार वेगळा असतो. पण तेथे आपण एवढ्या पगारात येवढेच काम होईल असे म्हणत नाही ? त्यासाठी वेगळा पगार द्यायला हवा ? अशी मागणी आपली असू शकते, पण एवढ्या पगारात ऐवढेच काम म्हणून आपण काम करणे थांबवले, तर ती सेवा होत नाही. नोकरी ही सेवा आहे. तो व्यापार नाही. त्यामुळे सेवेसारखा व्यवहार करायला हवा. काही कंपन्या याच उद्देशाने संस्था हा एक परिवार आहे, कुटुंब आहे असे समजून सेवा देत राहातात. खऱ्या अर्थाने अशा संस्था प्रगती करू शकतात. कारण तेथे व्यवहार होत नसतो, तर ती सेवा असते. इतक्या पगारात एवढेच काम होईल, असा पवित्रा कामगारांनी घेतला तर ते काम ठप्प होऊ शकते. याचा अर्थ कंपनीमध्ये, संस्थेमध्ये कामगारांना नोकरासारखी वागणूक न देता त्यांच्याशी व्यवहार एका परिवारासारखा ठेवायला हवा. म्हणजे कामगारांतील सेवाभाव हा जागृत राहील. पण आजकाल बदलत्या संस्कृतीमध्ये हे होताना दिसत नाही. अशाने संस्थांच्या, कंपन्यांच्या प्रगतीत बाधा येताना पाहायला मिळत आहे. सेवा अन् व्यापार यातील अर्थ यासाठीच समजून घेऊन सेवा करायला हवी. अध्यात्म ही सेवा आहे. व्यापार नाही हे समजून घ्यायला हवे.
लाईक अन् कमेंट्स…