गुलाब आणि मोगरा ही दोन्ही फुले भारतीयच. मात्र गुलाबाने पाश्चात्य संस्कार घेऊन तो विदेशी वाटायला लागला आहे. मोगरा मात्र जगाच्या सर्व कोपऱ्यात पोहोचूनही अजून आपले खानदानीपण जपून आहे. गुलाब दिसतो सुंदर, मात्र मोगऱ्याच्या सुगंधापुढे तो फिका पडतो. या पुस्तकाने गुलाबाचे देखणेपण घेताना, मोगऱ्याचा सुगंध जपला आहे, असे म्हणायला हवे.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
माझ्या अंतरंगाचा शोध’ असे सुंदर नाव देता आले असतानाही ‘Finding My Core’ अशा इंग्रजी नावाचे, इंग्रजी लिपीतच छापलेले विनया गोरे यांचे पुस्तक वर्षा नाडगोंडे यांनी भेट दिले. पुस्तक पाहिल्यानंतर ते मी वाचेन का? असा माझाच मला प्रश्न पडला होता. मोठ्या आकारात, सर्वत्र रंगीत छपाई असलेले पुस्तक, मोठा खर्च करून छापलेले आहे, हे पाहताक्षणी लक्षात येत होते. अशा प्रकारे खूप खर्च करून छापलेल्या अनेक पुस्तकात आत्मप्रौढीचाच भाग जास्त असतो. मुद्रण कला सोपी आणि स्वस्त झाल्यापासून असे अनेक ग्रंथ प्रसिद्ध होतात. ते आत्मप्रौढीपर आणि खास करून लोकांना भेट देण्यासाठी असतात, अशी आता धारणा होत चालली आहे. त्याच परंपरेतील हेही पुस्तक असावे, असे समजून मी ते पुस्तक बाजूला ठेवणार होतो.
ते पाहिल्या-पाहिल्या हीच भावना झाली होती, हे प्रामाणिकपणे मान्य करायलाच हवे. तरीही कोणतेही पुस्तक बाजूला ठेवताना, ते थोडेसे चाळायची, आणि त्यात काही सापडते का पहायची सवय आहे. हे पुस्तकही तसेच चाळताना पुस्तकाची प्रस्तावना तारा भवाळकर यांनी लिहिल्याचे दिसले. आता त्या प्रसन्न झाल्या आणि त्यांची प्रस्तावना या पुस्तकाला मिळाली म्हणजे निश्चित काहीतरी वेगळे असणार, म्हणून वाचायला सुरुवात केली… आणि कधी पन्नास पाने संपली, ते समजलेही नाही. पुढे पुस्तक वाचून संपवावे, असा निर्धार केला. तर पुस्तक कोठे ठेवले, तेच सापडत नव्हते. बाकीच्या कामात थोडेसे दुर्लक्षही झाले, पण पुस्तक वाचून पूर्ण करायचे आहे, हे मनात निश्चित होते. शेवटी पुस्तक सापडले आणि अधाशासारखे वाचून संपवले.
पुस्तक वाचताना या पुस्तकावर आपण लिहायला हवे, असे वाटू लागले. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे विनया यांच्या नावात विनय असला तरी सर्व प्रसंग त्या विनयाने घेत नाहीत. त्या आपल्या अंतर्मनाचा कौल घेऊन पुढे जात राहतात. जीवनात जे काही बरेवाईट घडते, घडले – त्यात गुंतून न राहता कायम नवे काय करता येईल, आपण काय चांगले करू शकतो, याचा शोध घेण्याची त्यांची सवय. कोणतेही नवे तंत्रज्ञान, नव्या ज्ञानाचे दार दिसले आणि आपण ते शिकू शकतो, हे लक्षात आले की ते शिकण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती… संसार मोडण्याची वेळ आल्यावरही तो प्रसंग इतक्या संयमाने घेऊन आकाशाला गवसणी घालण्याची ठेवलेली तयारी आणि मिळवलेले यश हे प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीने वाचायला हवे, असा विचार मनात आला आणि त्यासाठीच या पुस्तकाबद्दल लिहायलाच हवे, असे वाटले.
पुस्तकाच्या नावाखाली दिलेले लेखिकेचे नाव विनया गोरे ते विनया गोर हे पुस्तकाचा विषयप्रवेश करून देते. पहिली पन्नास पाने वाचून होईपर्यंत हे वैशिष्ट्य लक्षात आले होते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. तारा भवाळकर यांनी, ‘सामान्यत: स्त्रियांना सासरचा किंवा माहेरचा आधार असल्याशिवाय तरणोपाय नाही, असा समज आहे. या दोन बिन्दुपलीकडे तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणाऱ्या ज्या अपवादात्मक स्त्रिया आहेत त्यापैकी विनया एक! या तिसऱ्या बिंदूचा शोध मलाही तिच्या विनया गोरे ते विनया गोर च्या वाचनातून लागला’, असे लिहिले आहे. ‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’ हे पुस्तक लिहिणाऱ्या ताईंचे हे म्हणने हा त्यांचा मोठेपणा असला तरी पुस्तक वाचताना, ते अगदी खरे असल्याचे जागोजागी जाणवत राहते. लेखिका बालपणी भवाळकर मॅडमच्या शेजारी राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे बालपण त्यांनी पाहिले आहे आणि त्यामुळेच प्रस्तावना आणखी सुंदर झाली आहे. ती निव्वळ पुस्तक वाचनातून आलेली नाही, तर अंतर्मनातून उतरली आहे. पुस्तकाचे मराठी बारसे त्या ‘माझ्या अंत:सत्वाचा शोध’ असे करतात.
लेखिकेच्या जीवनपटाची साधारण तीन भागात विभागणी होते. पहिला भाग बालपणापासून लग्नापर्यंतचा येतो. पुढचा भाग जर्मनीत सुरू होतो तो अमेरिकेतून पतीने परतण्याचा निर्णय घेणे आणि विभक्त होण्याचा निर्णय होईपर्यंतचा भाग आहे. तिसरा भाग हा विभक्त झाल्यानंतर विनया गोरे यांच्या विनया गोरमध्ये रूपांतरित होण्याचा आहे. लेखिकेने हे पुस्तक नातेवाईकांच्या आग्रहास्तव लिहिले आहे. लिहिले आहे, हे महत्त्वाचे कारण साधारण सत्तर पंचाहत्तर वर्षांपूर्वी एका शिक्षक दांपत्याच्या घरी जन्मलेली मुलगी. मुलीवर अनंत बंधने आजही घातली जात असताना, ज्या पद्धतीने स्वत:ला पैलू पाडत जाते, ते वाचनीय आणि प्रेरणादायी आहे. त्याकाळात काळाच्या पुढे जाऊन मुलींना स्वतंत्र विचार करण्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणारे मातापिता लाभले, हे त्यांचे भाग्य. याची जाणिव ठेवत लेखिकेने पुस्तक आई-वडिलांना अर्पण केले आहे.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत मातापित्यांच्या संस्कारातून वाचनाची बालपणीच सवय लागली. वाचनातून वक्तृत्व आणि व्यक्तीमत्त्व खुलत गेले. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात एक लक्षात राहावे, अशी शैक्षणिक कारकिर्द लाभलेली ही विद्यार्थीनी. अनेक स्पर्धात यश मिळवणारी. ज्या काळात मुलीने सायकल चालवलेले दिसणे, अवघड त्या काळात सांगलीमध्ये स्कूटर चालवते. विज्ञान शाखेला प्रवेश घेते. पुढे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेते. अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असतानाच विवाहाचा प्रस्ताव येतो. सुरुवातीला तिलाही शिक्षण पूर्ण करायचे असते. मनात विरोध असूनही सर्वांच्या इच्छेला मान देवून ही स्वतंत्र विचाराची मुलगी लग्नाला होकार देते. मुलगा जर्मनीत नोकरी करणारा असूनही अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून संसार करण्याच्या प्रयत्न करते. १९७२ मध्ये झालेले लग्न. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या विसाव्या वर्षी ही मुलगी जर्मनीला जाते. तेथे गेल्यानंतर काही दिवसातच पतीदेव स्वत:चे निर्णय स्वत: घेत नाहीत हे तिच्या लक्षात येते. त्यानंतर नवऱ्याने अमेरिकेत जाऊन एम.एस. पूर्ण करावे, असा निर्णय दोघे घेतात. नवरा अमेरिकेला गेल्यानंतर ही वीस-एकविस वर्षांची मुलगी जर्मनीत एकटी राहते. नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण घेत स्वत:च्या तिकीटाचे पैसे जमा झाल्यावर भारतात परत येते. स्वत:चे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करते. तरीही नवऱ्याचे एम.एस. पूर्ण होत नाही. त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती मुंबईतच नोकरी करत सासरी राहते. स्वतंत्र विचार करण्याचे संस्कार देणाऱ्या मातापित्यासोबत वाढलेल्या या मुलीला ज्येष्ठांचे निर्णय गुपचूप पाळायचे संस्कार असणाऱ्या घरात गुदमरायला लागते. मात्र एक तडजोड म्हणून ती सहन करते. पुढे नवऱ्याचे एम.एस. पूर्ण व्हायच्या वेळेस ती अमेरिकेला जाते. अमेरिकेला जाण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे उसणे आणि व्याजाने घ्यावे लागतात.
ती अमेरिकेला जाते. स्वत:ही एम.एस.चे शिक्षण घेण्याचा निर्णय घेते. तिला फेलोशिप मिळवून देण्याचे अभिवचन तेथील शिक्षक रोमर देतात. त्याचवेळी नवरा कोणतीही चर्चा न करता भारतात परतण्याचा निर्णय घेतो. डॉ. रोमर यांनी लेखिकेला फेलोशिप मिळवून देण्याचे ठरवले असताना एम.एस. पूर्ण न करणे तिच्या मनाला पटत नाही. नवराही त्याला होकार भरतो आणि ती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेऊन एकटीच अमेरिकेत राहते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांनी निर्णय घेणे अपेक्षित असताना नवऱ्याचा त्याबाबतचा अनुत्साह पाहून ही मुलगी एटी अँड टी बेलमध्ये नोकरी स्वीकारते. अखेर दोघे लग्नापासून केवळ आठ वर्षांत विभक्त होतात. जर्मनीतील दीड-दोन वर्षांचा कालखंडच ते एकत्र राहतात. तोच काय तो संसाराचा कालखंड.
तेथून पुढे विनया गोरे यांचा विनया गोर होण्यासाठीचा प्रवास सुरू होतो. व्यावसायिक विश्वात पन्नास वर्षांपूर्वी भारतातून अमेरिकेत गेलेल्या एका मुलीने आपले स्वत:चे स्थान निर्माण करणे, हे असाध्य, ही मुलगी साध्य करते. व्यावसायिक चढउताराचा फटका बसून मध्येच नोकरी जाणे, त्यानंतर नव्या कंपनीमध्ये नोकरी मिळवणे, खालच्या पदावरून पुन्हा पुर्ववैभव प्राप्त करणे या सर्व बाबी या पुस्तकात ओघवत्या शैलीत येतात. त्यामुळे वाचकाला कोठेही कंटाळा येत नाही.
पुस्तकामध्ये भरपूर छायाचित्रे आलेली आहेत. पुस्तकाची मांडणी, छपाई आणि एकूणच निर्मिती अतिशय सुंदर झाली आहे. पुस्तकातील भाषा मात्र पन्नास वर्षे अमेरिकेत घालवलेल्या व्यक्तीची वाटत नाही. चार-सहा वर्षे परदेशात घालवलेली मंडळी, कशी मराठी भाषेत इंग्रजी शब्दांची भेसळ करून, आपण आता परदेशी संस्कारात वाढलो आहोत, हे सार्वजनिक जीवनात दाखवण्याचा प्रयत्न करतात, तसे विनया गोरे यांचे झाले नाही, हे मनाला खूपच भावते. गुलाब आणि मोगरा ही दोन्ही फुले भारतीयच. मात्र गुलाबाने पाश्चात्य संस्कार घेऊन तो विदेशी वाटायला लागला आहे. मोगरा मात्र जगाच्या सर्व कोपऱ्यात पोहोचूनही अजून आपले खानदानीपण जपून आहे. गुलाब दिसतो सुंदर, मात्र मोगऱ्याच्या सुगंधापुढे तो फिका पडतो. या पुस्तकाने गुलाबाचे देखणेपण घेताना, मोगऱ्याचा सुगंध जपला आहे, असे म्हणायला हवे.
या पुस्तकातील अनेक प्रसंग बरेच काही शिकवून जातात. त्यातील काही प्रसंगाचा उल्लेख करायलाच हवा. लेखिकेने एका ठिकाणी आज भारतात परवलीचा शब्द बनलेल्या सॉफ्ट स्कील्सबद्दल लिहिले आहे. हा उतारा वाचताना पु. शि. रेगेंची सावित्री कादंबरी, त्यातील लच्छी, तिची आजी आणि मोर आठवला. या ठिकाणी त्या लिहितात, ‘मला लोकांशी वागायचं कौशल्य, सॉफ्ट स्कील्स विकसीत करायची होती. अर्थातच विस्तारीत विचारांचा आणि त्याच्या कम्फर्ट घोनमधून बाहेर पडलेला मेंटोर हवा होता. आजूबाजूचे लोक मी ‘वाचत होते. कोणाची लोकांशी वागायची कौशल्ये मला आवडतात ? ‘मला मोर आवडतो’, तर ‘मी मोर कशी होणार’ याचं निरीक्षण करत होते. तेव्हा ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असा जॉर्ज, प्रोफेशनल मेंटोरच्या रूपात भेटला…..’ पुढे हा जॉर्ज त्यांना खूप छान सहकार्य करतो याचे वर्णन येते. मात्र याठिकाणी आपण ‘मोर व्हायचं आहे’ हे अगोदर ठरवायला हवं. त्यानंतर तुमचा निर्णय पक्का असेल तर पुढे मार्ग सापडतोच. मोर आवडतो आणि तो भेटत नसेल तर आपणच मोर व्हायचं, हा संदेश लेखिकेच्या रक्तात भिनलेला आहे. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सवय असते. हा भागही खूपच छान शब्दांकित झालेला आहे.
हे पुस्तक म्हटले तर आत्मचरित्र आहे. मात्र लेखिका जसे जगली, तसे सनावळीनुसार नाही. तिचा जीवनपट जसा चढउतारातून जात राहिला, कधी फुलांचे ताटवे; तर, कधी रखरखते उन पहात पुढे जात राहिला, तसाच मांडला आहे. तो तसा लिहिला असला तरी त्यामुळे वाचनात खंड येत नाही. त्याला साच्यात बांधण्याचा प्रयत्न केलेला नसल्याने हा फुलांचा गुच्छ सुंदर बनला आहे. हे पुस्तक वाचताना धुंद आणि स्वच्छंद जगतानाही जीवनमूल्यांना जपत यशस्वी होण्याचा एक पट उलगडत जातो. वाचक त्यात हरवून जातो. हे पुस्तक केवळ वाचून बाजूला ठेवावे, असे निश्चितच नाही. यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. ते प्रत्येकांने वाचावे आणि शिकावे असे आहे. खास करून महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थीनीने हे पुस्तक वाचायलाच हवे.
पुस्तकाचे नाव – Finding My Core विनया गोरे ते विनया गोर
लेखिका – विनया गोरे
प्रकाशक – विभव प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे – २६२
मूल्ये – रू.५००/-
पुस्तकासाठी संपर्क – 9503388099
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.