December 11, 2024
Vittal Khilari Mandeshi Story Savala
Home » ऊसतोडणी कामगार अन् म्हंकाळीच्या संघर्षाची माणदेशी कथा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऊसतोडणी कामगार अन् म्हंकाळीच्या संघर्षाची माणदेशी कथा

गेली अनेक वर्ष माणदेशी मातीत राहताना या माणदेशी मातीतील माणसं वाचली, माणसांचे स्वभाव वाचले, माणसांच्या रितीभाती, नाती वाचली आणि त्यासोबतच माणसांची मनंसुद्धा वाचली. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘माणदेशी माणसं’ पासून ते अलीकडच्या नागु विरकर यांच्या ‘हेडाम’ पर्यंत माणदेशी मातीचा सुगंध अगदी जवळून अनुभवला. या माणदेशी मातीबद्दल असलेलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माया, ममता या सर्वांचा मी अगदी जवळून अनुभव घेतलाय. मला आजही माणदेशी माती आणि माणदेशी नाती.. त्या नात्यातली माणसं मला आकर्षित करतात. माणदेशी माणसांची लोकसंस्कृती, लोककला यांचा मला अजूनही खूप हेवा वाटतो.

जगण्यासाठी माणदेशी माणसाची धडपड, त्यांचे प्रयत्न, भविष्याची चिंता आणि त्या भविष्याच्या चिंतेतून निघणारा त्यांचा खडतर प्रवासातील मार्ग हे माणदेशी मातीच्या माणसांचं रोजचं जगणं. ते जगणं अनुभवलं. अनेक माणसांच्या संपर्कात राहून माणदेशी माणसं अनुभवत असतानाच माझ्या हातात ‘सवळा’ नावाचं आणखी एक माणदेशी पुस्तक पडलं. नागू विरकर यांच्या हेडाममध्ये शिक्षणासाठीची धडपड मी वाचली होती. तशीच धडपड या ‘सवळा’ मध्येसुद्धा अंतर्भूत आहे. माणदेशी माणसांचा बहुदा मेंढपाळ हा त्यांचा मुख्य व्यवसाय परंतु याचबरोबर ऊसतोडी कामगारसुद्धा या माणदेशी मातीमध्ये आहेत याची जाणीव ‘सवळा’ पुस्तक वाचून झाली. या पुस्तकामध्ये वापरलेली भाषा ही अस्सल माणदेशी असून यामध्ये कुठलाही कृत्रिम भाषेचा वापर केला गेलेला नाही हे या पुस्तकाची खास जमेची बाजू.

लेखक विठ्ठल आप्पा खिल्लारी हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शेणवडी या गावचे. आजूबाजूचा परिसर, आजूबाजूची माणसं, त्यांची होणारी धावपळ, धडपड, जगण्यासाठीचा आटापिटा आणि यामध्ये त्यांचे वारंवार ऊसतोडीसाठी होणारे स्थलांतर.. शिक्षणाची होणारी दयनीय अवस्था ते लहानपणापासून पाहत आलेले. नेमका तोच धागा धरून त्यांनी ‘सवळा’ ही कादंबरी लिहिली.

‘सवळा’ या शब्दाचा अर्थ उसाचे पाचट काढणे. अर्थात ऊसतोडी कामगार ऊस तोडून त्याचे पाचट काढून ते ट्रॅक्टरमध्ये किंवा बैलगाडी मध्ये भरून कारखान्याकडे पाठवण्याचे काम करत असतात त्यावर आधारित ही ‘सवळा’ कादंबरी.. ऊसतोडीवर अनेक पुस्तकं प्रकाशित झाले असतीलही परंतु ‘सवळा या पुस्तकांने आपले खास वेगळेपण जपले आहे. अस्सल माणदेशी भाषा, जिवंत प्रसंग, ऊसतोडी कामगारांच्या समस्या, त्यांचे ऊनवाऱ्या पावसातील जगणे, त्यांचे राहणे, परिस्थितीशी त्यांची होणारी झुंबड, निसर्गाशी त्यांनी केलेले चार हात, कटी.. पोटी.. पाठी असणाऱ्या बाळांची होणारी जीवघेणी तारांबळ अशा अनेक प्रसंगाची आणि संघर्षाची जीवघेणी कहाणी म्हणजे ‘सवळा’.

कथेची सुरुवात होते ती म्हंकाळीच्या जन्मापासून. म्हंकाळीचा जन्मच मुळात दिव्यत्वाची प्रचिती देणारा. इथून म्हंकाळीच्या आयुष्याची जी फरपट सुरू झाली ती पुस्तक संपेपर्यंत ती चालूच असते. अगोदर एकत्रित कुटुंब, त्यानंतर वेगळे राहिल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी म्हंकाळीच्या आई-वडिलांना लहान लहान पोटच्या गोळ्यांना घरीच आजीआजोबांकडेकडे ठेवून ऊस तोडीसाठी जावं लागले. एकदा ऊसतोडीला गेलं की पाच पाच.. सहा महिने तर कधी कधी आठ ते नऊ महिने घराकडे परत येणे शक्य व्हायचे नाही. त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांमधील मुलांप्रती असणारे प्रेम किती कठोर मनाने ते मनातच दाबून ठेवतात याचे प्रसंग वर्णन वाचताना अक्षरशः काळीज तुटते.

ऊसतोड करत असताना विविध भागांमध्ये ऊसतोडणी कामगारांना फिरावे लागते. त्यांच्या राहण्यापासून ते त्यांच्या उदरनिर्वाहापर्यंत अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. शिवाय गावागावातील परिसर आणि त्या गावातील माणसे यांच्याशी त्यांचा जो संघर्ष होतो तो एक माणूस म्हणून खूप जीव घेणारा ठरलेला दिसतो. त्याचे आई-वडील घरी आहेत तोपर्यंत म्हंकाळीचे शिक्षण चालू असायचे परंतु एकदा आई-वडील ऊसतोडीकडे निघाले की सर्व मुलांबाळांसहीत त्याच्या आई-वडिलांना ऊसतोडीसाठी जावे लागे. त्यामुळे म्हंकाळीचे शिक्षण हे अर्धवटच राहून जात असे.

आपण कुठल्या वर्गामध्ये आहोत हे सुद्धा म्हंकाळीला माहित नसे त्यामुळे त्याचे शिक्षण मागे मागे पडू लागले. म्हंकाळीलाही वाटत असे की आपणही इतरांसारखं शिकावं, मोठ व्हावं आणि आपल्यालाही छानशी नोकरी लागावी यासाठी त्याची धडपड असे; परंतु आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती, घरातील दारिद्र्य, खाण्यापिण्याचे वांदे त्यालाही आई-वडिलांबरोबर रानावनात भटकत जावं लागे. शेवटी मन कठोर करून म्हंकाळीने शिक्षण घ्यायचेच ठरवले तेव्हा म्हंकाळीला आई-वडिलांनी त्याच्या मामाकडे शिक्षणासाठी ठेवले.

म्हंकाळी आपल्या मामाकडे घरकाम करत करत शिक्षण घेण्याचा प्रयत्न करू लागला परंतु शाळा कमी आणि घरचे कामच जास्त यामुळे त्याचे शिक्षण होत नसे. त्याच्या मनाची खूप घालमेल होत असे. तरीही मनावर दगड ठेवून फक्त आई-वडिलांसाठी आणि शिक्षणासाठी तो तेथे राहत असे. आपल्या मुलाला होत असलेला त्रास आणि शिक्षणाची होत असलेली आबाळ म्हंकाळीच्या आई-वडिलांना माहीत नव्हते असे नाही; परंतु त्यांचाही नाईलाज होता.

‘मुलगा शिकला पाहिजे’ ह्या एकाच भावनेपोटी त्याने मुलाला त्याच्या मामाकडे ठेवले होते. इथे काही वर्ष शिक्षण घेतले. नंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचा त्याला खंबीर आधार मिळाला. ‘ कमवा आणि शिका’ या योजनेतून म्हंकाळीने पुढील शिक्षण पूर्ण करू लागला. आई-वडिलांपासून दूर असलेला म्हंकाळी हळूहळू शिक्षणामध्ये रमू लागला. शिक्षणाचे महत्त्व त्याला समजू लागले. शिक्षण घेण्यासाठी अतोनात कष्ट उपसून त्याने शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने डीएड पूर्ण केले.

दरम्यान मानवी आयुष्यातील एक नाजूक किशोरवयीन वळण म्हंकाळीच्याही आयुष्यात आले. ते पुष्प त्याला का लाभले नाही ही अधुरी कहाणी आपली उत्कंठा जागी करते. म्हंकाळीच्या आईच्या मृत्यूचा प्रसंग मात्र वाचकाला खूप भावूक करून जातो. एकंदरीत म्हंकाळीच्या जन्मापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंतची जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी म्हणजेच ‘सवळा’. ऊसतोडी कामगारांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनन्वित समस्या आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी आबाळ या पुस्तकांमध्ये दर्शवण्यात आलेली आहे. अशी ही ऊसतोडणी कामगार आणि म्हंकाळीच्या संघर्षाची माणदेशी कहाणी अस्सल मूळ माणदेशी भाषेत एकदा वाचायलाच हवी.

पुस्तकाचे नाव : सवळा
लेखक : विठ्ठल आप्पा खिलारी
प्रकाशकः दर्या प्रकाशन, पुणे
किंमतः २५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 99753 56048


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading