June 19, 2024
Ajay Kandar article on Red light area
Home » देहविक्रीचं जग
मुक्त संवाद

देहविक्रीचं जग

कुंटण खाण्याचं जग पुस्तकातून वाचणे, सिनेमातून पाहणे आणि कोणीतरी त्याचे वर्णन करून सांगणे हे वेगळं असतं आणि प्रत्यक्ष तिथे जाऊन ते जग समजून घेणे ही घटना वेगळी असते. कोरोना काळात देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जॉन डिसोजा यांनी जेव्हा आग्रह केला तेव्हा तिथे जाण्याची कल्पनाच सहन होत नव्हती. मात्र कोरोना काळात जेव्हा प्रत्यक्ष मुंबईतील त्या भागात मी गेलो आणि देहविक्री करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांविषयी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद केला तेव्हा मन फार उद्विग्न झालं. आयुष्यात प्रथमच एका नव्या जगाची ओळख झाली आणि आपण या सगळ्या जगापेक्षा अधिक सुखी जीवन जगत असल्याबद्दल आपलीच आपल्याला लाज वाटली.

खरं तर बरेच दिवस गेले.जॉन आणि माझी काही भेट झाली नाही किंवा फोनवर साधं बोलणंही होऊ शकलं नाही. आणि अचानक जॉन यांचा कोरोना काळात फोन आला. कोरोना काळात काळजी घेण्याविषयी त्यांनी आग्रहाने सांगितले.बोलता बोलता म्हणाले, तुम्ही मुंबईला येऊ शकता का ? मी म्हटलं का ? मी जिथे काम करतो त्या देहविक्री व्यवसायातील महिलांची या कोरोना काळात अतिशय बिकट परिस्थिती आहे. त्यांनी माझे त्यादरम्यान दिव्य मराठी मध्ये चालू असलेले पाक्षिक सदर लेखन वाचले होते. कोरोना काळातील महिलांचे प्रश्न याविषयीचे ते लेखन असल्याने त्या सदर मध्ये मुंबई येथील देहविक्री करणाऱ्या महिलांचे कोरोना काळातील प्रश्न मांडावेत, असं त्यांनी सांगितले.

कोरोना काळात बाहेर कुठेही फिरायला बंदी होतीच; परंतु भीतीही मोठ्या प्रमाणात वाटत होती. आधीच आपण आजारी आणि नवीन काही कोरोनाचा आजार झाला तर आपलं काही खरं नाही असं वाटू लागलं म्हणून मी जॉन यांना सध्या येणं शक्य होणार नाही असं सांगितलं. तर ते म्हणाले मी तुम्हाला देहविक्री करणाऱ्या महिलांचा संपर्क नंबर देतो. तुम्ही त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या लिहा. ही त्यांची कल्पना मला पटली. मी देहविक्री करणाऱ्या एक दोन महिलांबरोबर फोनवर बोललो आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या दिव्य मराठीच्या सदर लेखनातून सार्वत्रिक केल्या. महाराष्ट्रभरातून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. जॉन यांनाही ते लेखन आवडले. काही दिवसांनी त्यांचा पुन्हा फोन आला. मी मुंबईला येण्याचा ते पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. थोडा कोरोनाचा प्रभाव कमी झाला असं लक्षात आल्यावर मी त्यांच्या आग्रहाखातर मुंबईला गेलो. मला त्यांनी दादरला भेटूया असं सांगितल्याने आमची तिथे भेट झाली. मी म्हटलं त्यांना मला हे कव्हर करायला आवडेल. लेखनाचा एक वेगळाच अनुभव. या सगळ्यातून जगाकडे बघण्याचीही दृष्टी विस्तारेल;पण खूप काळजी घ्यावी लागेल. तर त्यावर हसून ते म्हणाले, “अरे यार, काही चांगल काम करता करता मरण आले तर सुंदरच ना?” मी त्यांच्या या बोलण्याकडे बघतच राहिलो. इतक्यात ‘चलो भाई चलो, हम कमाठीपूरा मे जायेंगे’ असे म्हणत त्यांनी माझा हात हातात घेतला आणि टॅक्सीच्या दिशेने निघाले. टॅक्सीत बसलो.

टॅक्सीवाल्याला त्यांनी सांगितले कामाठीपुराला घेऊन चल. माझ्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले. देहविक्री व्यवसाय करणारा परिसरात मी प्रथमच एवढ्या जवळून म्हणजे अगदी कुटणखाण्याच्या आत जाऊन पाहणार होतो. हे जग पुस्तकातून वाचणं वेगळं आणि असं जवळून बघणं वेगळं असतं. याची जाणीव प्रथम मला त्यावेळी झाली. लेखिका, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या अशा आमच्या ज्येष्ठ भगिनी प्रतिमा जोशी यांनी अशा एरियामध्ये काम केलं. येथील महिलांचे प्रश्न समजून घेतले. त्यावर लेखनही केलं.

टॅक्सीतून कामाठीपुरापर्यंत प्रवास करताना देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी असं प्रत्यक्ष काम करणाऱ्या अनेक लोकांची आठवण झाली. त्यांना मी मनातून सलामच केला. अशाच विचारात मी असताना जॉन यांनी टॅक्सी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. कोरोना काळ असल्याने कामाठीपुरा भागात खूप दूरवर चेहऱ्याची रंगरंगोटी करून शेकडो महिला रस्त्याच्या दुतर्फा उभ्या होत्या;पण रस्त्यावर त्यांच्या शिवाय फारसं कोणीच दिसत नव्हतं. हे चित्र मला भयान वाटले. आणि मनातल्या मनात स्वतःची चीड आली. आपण किती खोट्या जगात वावरतो असं वाटू लागलं. एका विशिष्ट वर्गाचं दिवस-रात्र 24 तास खरंखुरं जगणारं आयुष्य खरं, की स्वतःला बहुजन म्हणता म्हणता पांढरपेशी आयुष्य जगायला लागलेलं आमचं जगणं खरं. कामाठीपुरा येथील चेहऱ्याला रंगरंगोटी करून रस्त्यावर देहविक्रीसाठी उभ्या राहिलेल्या या महिलांनी पोटासाठी हे सगळं जगणं स्वतःहून स्वीकारलं का? असा प्रश्न मनात आला. यातील अपवाद वगळता बहुसंख्य महिला या त्यांच्याविषयी षडयंत्र रचलं गेलं आणि त्या या व्यवसायात खेचल्या गेल्या असतील असं वाटू लागलं. आम्ही मात्र चेहऱ्याला रंगरंगोटी न करताच दिवसातून किती मुखवटे पांघरून पोटापाण्याचा प्रश्न सोडवत असतो. त्यामुळे आमच्यापेक्षा या महिला अधिकच प्रामाणिकपणे जगणं जगत आहेत असही वाटून गेलं.

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत – 9404395155

Related posts

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन येथे होणार १२ मार्चला

29 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा पडदा उघडण्यापूर्वी…

अंधश्रद्धा विरोधी चळवळीची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406