माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कृत्रिम प्रज्ञा किंवा बुद्धिमत्तेने (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)’ एआय’ने गेल्या काही वर्षात मानवाच्या सर्व क्षेत्रांमध्ये क्रांतीचे पर्व निर्माण केले आहे. हीच बुद्धिमत्ता आज मानवाच्या बुद्धिमत्तेशी स्पर्धा करत आहे. व्यापार – उद्योगाच्या सर्व क्षेत्रात ‘एआय’ चा सर्वाधिक वापर सुरू झाला आहे. बँकिंग सेवा क्षेत्र त्याला अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर या कृत्रिम बुद्धिमत्तेचा बँकिंग क्षेत्रातील वापर व त्याची सुरक्षितता यावर टाकलेला दृष्टिक्षेप…
प्रा. नंदकुमार काकिर्डे
भारतीय बँकिंग व्यवसाय देशातील सर्वात मोठे सेवाक्षेत्र आहे. या सेवा क्षेत्राने अलीकडच्या काही वर्षात तंत्रज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण बदल अनुभवले आहेत. गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता व “अल्गोरिदमिक इंटेलिजन्स ” ( या दोघांनाही एआय संबोधले जाते) यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला असून त्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्येही नवीन क्रांती होऊ घातली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही व्यापक संकल्पना असून “अल्गोरिदमिक इंटेलिजन्स” ही निर्णय घेण्यावर केंद्रित असलेली अधिक विशिष्ट संकल्पना आहे. “अल्गोरिदमिक इंटेलिजन्स” कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक उपसंच आहे.
कोणत्याही माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेण्यासाठी “अल्गोरिदमचा” वापर केला जातो. या दोन्हीमध्ये स्वयंचलित निर्णय प्रक्रियेचा समावेश असून मानवी हस्तक्षेपाची गरज कमी असते. अर्थात या दोन्ही गोष्टींचा उद्देश एकूण कार्यपद्धती कार्यक्षम करणे किंवा सुधारणे हा असतो. त्यामुळे ग्राहकांना आणखी चांगल्या सेवेचा अनुभव मिळावा, बँकेची कार्यक्षमता वाढावी आणि त्यांचा खर्चातही कपात व्हावी अशा अपेक्षा “एआय” कडून व्यक्त केल्या जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चॅट बॉटस् किंवा निर्माण करण्यात आलेले आभासी सहाय्यक (व्हर्च्युअल असिस्टंट ) ग्राहकांना अहोरात्र, विना विलंब व तत्पर सेवा देऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांच्याकडे योग्य उत्तर असते एवढेच नाही तर प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी या यंत्रणा त्यांना मदत करतात.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ग्राहक व्यवहार प्रणाली निर्माण करण्यात आलेल्या आहेत. तसेच ग्राहकांच्या प्राधान्यांचे विश्लेषण करून त्याद्वारे सर्व बँका व्यक्तिगत सेवा आणि त्यांच्यासाठी विकसित केलेली उत्पादने देण्यास प्रारंभ झाला आहे. एका बाजूला ‘एआय’ चा वापर करून ग्राहक सेवेमध्ये आमुलाग्र बदल घडत असतानाच या कृत्रिम बुद्धिमत्तेला पुरवण्यात येणाऱ्या अफाट माहितीचा म्हणजे डेटाचे संरक्षण, सुरक्षितता किंवा गोपनीयता याबाबत बँकिंग क्षेत्रात वाढती चिंता आहे. किंबहुना एआयच्या संदर्भात बँकिंग क्षेत्रापुढे हे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे यात शंका नाही. यासाठी बँकांनी सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्याकडे असलेली ग्राहकांची माहिती -डेटा- एन्क्रिप्ट म्हणजे सांकेतिक भाषेत रुपांतरित केलेली असून अनधिकृत प्रवेशांपासून ती संरक्षित केलेली आहे. त्याचप्रमाणे निर्माण केलेली “ए आय ” प्रणाली अंगभूत सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाईन करणे आवश्यक असून त्यात काही विसंगती निर्माण झाली तर ती शोधण्याची आणि अशी एखादी घटना घडली तर त्याला सत्वर प्रतिसाद देण्याची यंत्रणा त्यात अंतर्भूत असणे महत्वाचे आहे.
बँकिंग क्षेत्रामध्ये “एआय”च्या सुरक्षित वापराचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे या सर्व प्रणालीमध्ये अत्यंत पारदर्शकता आवश्यक असून ग्राहकांना वेळ पडेल तेव्हा योग्य स्पष्टीकरण दिले गेले पाहिजे. काही सेवांचा उल्लेख करायचा झाला तर ग्राहकांचे क्रेडिट स्कोअरिंग व त्यावर आधारित कर्ज मंजुरी याबाबत घेतला गेलेला निर्णय आणि कृती याचे स्पष्टीकरण वेळप्रसंगी ग्राहकांना द्यावे लागेल. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून घेतलेले निर्णय हे ग्राहकांवर महत्वपूर्ण प्रतिकूल परिणाम करू शकतात. अनेक वेळा कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये संकलित केलेली माहिती निर्णय घेताना पक्षपाती स्वरूपाची असू शकते. “आर्टिफिशियल अल्गोरिदम”मुळे ग्राहकाबाबत भेदभाव किंवा पूर्वग्रह निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारचा कोणताही भेदभाव किंवा पक्षपात या यंत्रणेकडून केला जाऊ नये याची बँकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून योग्य दक्षता घेतली पाहिजे.
भारतीय बँकिंग उद्योगाने ‘एआय’ चा वापर म्हणजे गव्हर्नन्स तसेच जोखीम व्यवस्थापनाची पोलादी चौकट निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची गरज आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारख्या बँकिंग क्षेत्राच्या नियमाकांनीही याबाबत अद्ययावत राहून “एआय” प्रणालीच्या विकासासाठी, त्यावर देखरेख करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आखण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे या प्रणाली द्वारे घेतले जाणारे निर्णय व प्रत्येक कृतींची स्पष्ट जबाबदारी निश्चित करण्याची नितांत गरज आहे. बँकिंग उद्योगानेही एआय प्रणालींच्या सुरक्षित वापरासाठी समान मानके (Standards) व मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी रिझर्व बँक व संबंधित उद्योग व्यापार संघटनांना सहकार्य केले पाहिजे. आज जागतिक पातळीवर सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर बँकिंग क्षेत्रासह अनेक सेवा उत्पादन क्षेत्रात केला जातो. त्यांचा अभ्यास करून भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये संपूर्ण विश्वासार्ह यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे.
आज सर्व देशांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर घडत असून त्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसल्याची उदाहरणे आहेत. अशा फसव्या व्यवहारांचा सामना करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेला पाहिजे. ग्राहकांची व्यक्तिगत माहिती मोठ्या प्रमाणावर संकलित केल्यामुळे त्याची सुरक्षितता यंत्रणा निर्माण केली पाहिजे आणि वेळप्रसंगी उल्लंघन झालेच तर त्यासाठी मजबूत प्रतिबंधक सुरक्षा प्रणाली निर्माण केली पाहिजे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बँकिंग क्षेत्राला ग्राहक सेवा अधिक परिणामकारक व कार्यक्षम करता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही ग्राहकाची संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर परिणामकारक रित्या करता येऊ शकतो. तसेच प्रत्येक ग्राहकाची सर्वांगिण माहिती संकलित केल्यामुळे त्याला व्यक्तिगत पातळीवरील योग्य आर्थिक सल्ला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून देणे शक्य आहे. त्याचप्रमाणे बँकिंग मधील सर्व व्यवहार , कार्यप्रणाली अचूक आणि योग्य प्रकारे सुरू राहून तेथे मानवी चुका होण्याची अजिबात शक्यता राहणार नाही.
प्रत्येक ग्राहकाच्या पत दर्जाचे योग्य – मुल्यांकन केले जाऊन त्यामुळे कर्ज वाटप करताना निर्माण होणाऱ्या जोखमीचेही वास्तववादी मूल्यांकन केले जाऊ शकते. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना अहोरात्र सेवा देणे शक्य राहणार असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना त्याचा लाभ निश्चित होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तयार केल्या जाणाऱ्या माहितीची सुरक्षितता व गोपनीयता यांच्यावर योग्य ती उपाययोजना विकसित करता येऊ शकेल.
त्यामुळे केंद्र सरकारचा माहिती तंत्रज्ञान विभाग,माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व बँकिंग क्षेत्र यांच्या समन्वयातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जागतिक दर्जाची बँकिंग सेवा निर्माण करणे कठीण राहणार नाही. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना केवळ बोलण्यापुरती न राहता बँकिंग क्षेत्राचे परिवर्तन करणारी शक्ती होऊ शकेल यात शंका नाही. मात्र त्यासाठी आदर्श नियमांची भक्कम चौकट निर्माण केली पाहिजे. जेव्हा बँकेचा प्रत्येक ग्राहक कोणताही व्यवहार करेल त्याच्यामागे या कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड राहून सुलभ कार्यक्षम सेवेचा अनुभव ग्राहकांना मिळत रहावा असे वाटते.
(लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.