December 28, 2025
विडंबन काव्यातून समाजाच्या जाणिवा जागृत करण्याचे कार्य कवी करतो, असे मत ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले. बंडा जोशी यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सत्कार.
Home » विडंबन काव्यातून समाजाच्या जाणिवा जागृत करण्याचा प्रयत्न : डॉ. विठ्ठल वाघ
काय चाललयं अवतीभवती

विडंबन काव्यातून समाजाच्या जाणिवा जागृत करण्याचा प्रयत्न : डॉ. विठ्ठल वाघ

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे बंडा जोशी यांचा सत्कार

पुणे : कविता जीवनाकडे गांभीर्याने बघत असते. कवी जीवनातील विविध रस काव्यातून मांडत परस्पर विरोधी मनोवृत्ती दर्शवितो. विडंबन काव्य करणारा कवी हे विविध रस विनोदाच्या मुशीतून समाजापुढे आणतो हे अत्यंत अवघड काम आहे. विडंबनकार आपल्या काव्यातून समाजाला केवळ हसवत नाही, गुदगुल्या करत नाही तर मार्गदर्शन, उद्बोधन करत समाजाला दिशा देण्याचे कार्य करतो, असे मत ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले.

आचार्य अत्रे लिखित ‌‘झेंडूची फुले‌’ या विडंबन कविता संग्रहास 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त ज्येष्ठ रंगकर्मी, एकपात्री कलावंत बंडा जोशी यांच्या धम्माल विनोदी विडंबन गीतांचा ‌‘झेंडूची नवी फुले‌’ या एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांचा आज (दि. 9) डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी डॉ. वाघ बोलत होते. ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कारूण्य, प्रेम, आनंद, विरह असे विविध रस कवितेतून सहजतेने उलगडले जातात, असे सांगून डॉ. विठ्ठल वाघ पुढे म्हणाले, विडंबनकार त्याची प्रतिभा व कौशल्य वापरून काव्यातून अनेक रस विडंबनात्मक शब्दातून व्यक्त करत समाजाच्या जाणिवा जागृत करण्याचे कार्य करतो. हे विडंबनात्मक काव्य आजच्या ताण-तणावाच्या काळात क्षणभर विरंगुळा देत जगायला प्राणवायू ठरते. विनोदाचा झेंडा घेऊन निघालेल्या बंडा जोशी यांनी तो अटकेपार न्यावा अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

सत्काराला उत्तर देताना बंडा जोशी म्हणाले, थोर साहित्यकार प्र. के. अत्रे यांच्या ‌‘झेंडूची फुले‌’ या साहित्यकृतीला शंभर पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि शब्दप्रभू पु, ल. देशपांडे यांच्या जयंतीच्या उत्तर संध्येला होणारा सन्मान माझ्यासाठी मौल्यवान आहे.

श्रीराम रानडे म्हणाले, विनोद निर्मितीत उत्स्फूर्ततेला महत्त्व आहे. काव्याचे रसग्रहण करत विडंबन करणे ही सोपी गोष्ट नाही. ज्या साहित्यकृतीचे विडंबन करायचे तेही उत्तम गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. बंडा जोशी यांनी अस्सल कविता लिहित, अस्सल कवितांचे विडंबन करीत या वाटेवरून मार्गक्रमण करीत रहावे.

मान्यवरांचा सत्कार ॲड. प्रमोद आडकर यांनी केला. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अरे बापरे ! हा किडा कोणता ? जाणून घ्या…

अण्णा भाऊ साठे आणि माझी मैना

मातृभाषेतील शिक्षण ही चौथी मूलभूत गरज

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading