शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात बुधवारी ( ता. २ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्यावतीने अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय पुनर्शोधाच्या दिशा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने…
डॉ.सोमनाथ कदम
इतिहास विभाग प्रमुख, कणकवली कॉलेज, कणकवली
मो.9423731382
विसाव्या शतकाच्या मध्यावर झालेला अण्णाभाऊ साठे यांचा उदय ही एक ऐतिहासिक घटना मानली पाहिजे. मराठीतील प्रतिभावंत लेखक, सामाजिक जाणिवेचे कार्यकर्ते, वंचित समुदायाच्या वेदनांना आवाज देणारे मूकनायक, सामाजिक, राजकीय भान असलेले वास्तवदर्शी शाहीर आणि बदलत्या राजकारणावर मार्मिक बोट ठेवून वास्तव सत्याचा उलगडा आपल्या लेखणीच्या माध्यमातून करून देणारे साहित्यीक अण्णाभाऊ साठे यांचे लेखन म्हणजे समाजबदलाचे एक हत्यारच ठरले.
अण्णाभाऊ साठे यांचे मराठीसह जगभरातील सत्तावीस भाषेत विपुल असे लेखन प्रसिध्द आहेच परंतु लोकशाहीर ही त्यांची खास ओळख. कारण पोवाडा, लावणी, छक्कड, लोकनाट्य हा अण्णाभाऊंचा आवडता लेखनप्रांत होता. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांनी लिहीलेली माझी मैना गावावर राहिली ही छक्कड विशेषत्वाने महत्त्वाची ठरली. यातील शब्दबोध व अर्थबोध पहिल्यांदाच साध्या – सोप्या भाषेत ज्येष्ठ लेखक, विचारवंत व समिक्षक उत्तम कांबळे यांनी पहिल्यांदा ‘माझी मैना गावावर राहिली’ या पुस्तिकेतून केलेला आहे.
‘माझी मैना गावावर राहिली’ ही अण्णाभाऊंची छक्कड लोकप्रिय ठरली. राघू, मैना किंवा प्रियकर – प्रेयसी यांच्यातील हा संवाद लोकप्रिय झाला, मात्र त्याच्या खोलात जावून चिकित्सक चिंतन फारसे झाले नव्हते किंबहुना ते होवू दिले नाही असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण ऐंशीच्या दशकानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने संभ्रमाची मांडणी करणारे लोक पुढे आले, म्हणूनच कोणत्याही महापुरूषांचा इतिहास जर नीटपणे मांडला नाही तर समाजातील विघातक शक्ती तो आपणास सोयीस्कर अशारीतीने वळवून दुही-दुफळीच्या प्रयत्नात यशस्वी होवू शकतात हा प्रा.डॉ. सदानंद मोरे यांनी दिलेला इशारा या निमित्ताने महत्त्वाचा वाटतो.
अण्णाभाऊ साठे यांचा पिंड लेखकाचा असला तरी त्यांचा वारसा कलेचा होता.
आमच्या घरात
गाण्याची शेती !
शेती ती सदा बहराला येती
डफ तुणतुण्याचे आम्ही धनी !
सदा मैदानी !
ही अण्णाभाऊंची लेखन प्रयोजनाची व्यापकता होती म्हणूनच ‘ माझी मैना गावावर राहिली’ या वरकरनी लावण्यांनी नटलेल्या छक्कडीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी तत्कालीन संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षाचा रोमहर्षक इतिहास कथन केलेला आहे. त्यातील सौंदर्यस्थळाबरोबरच अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असलेले चिंतन आणि चिंता उत्तम कांबळे यांनी मोठ्या ताकदीने व सूक्ष्म अभ्यासातून या पुस्तिकेत मांडली आहे. ‘माझी मैना गावावर राहिली’ या रचनेत अण्णाभाऊ साठे यांनी बहुविध अनुभवविश्व रेखाटले आहे.
अण्णाभाऊंच्या लेखणीतील निसर्गसौंदर्य, महाराष्ट्र-कर्नाटक परिसरातील स्थानिक कृषी संस्कृती, स्थानिक स्त्रीजीवन व दागदागिने, लोकांची स्थलांतरे व त्यातून मुंबईसारख्या ठिकाणी कामधंद्यासाठी गेल्यावर होणारी जगण्याची दुर्दशा आणि कुटुंबापासून दूर गेल्याने अर्थात मैनेपासून विरह आल्याने झालेली जीवाची घुसमट या सगळ्या पार्श्वभूमीवर नकळतपणे खंडीत महाराष्ट्राची व्यथा अण्णाभाऊ कसे मांडतात याचे चिकित्सक विश्लेषण उत्तम कांबळे यांनी केलेले आहे.
अण्णाभाऊ साठे हे रंजनवादी लेखक नव्हते तर लोकप्रबोधन हा त्यांच्या लेखणीचा ध्यास होता. दिनांक 2 मार्च 1958 रोजी भरलेला महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून अण्णाभाऊंनी आपली भूमिका त्याच शब्दात मांडलेली होती. “वाड:मय हा जगाचा तिसरा डोळा असून तो डोळा सदैव पुढे आणि जनतेबरोबर असणे जरूर आहे,” असे ते म्हणतात म्हणूनच ज्या पध्दतीने अण्णाभाऊंनी पारंपारिक गणात देवदेवता ऐवजी माणूस पुढे आणला त्याचप्रमाणे माझी मैना गावावर राहिली या रचनेतून न दिसणारे खंडीत महाराष्ट्राचे दु:ख समोर आणले.
म्हणूनच अण्णाभाऊंनी त्यांच्या छक्कडमध्ये मांडलेली मैना ही दुसरी तिसरी कुणी नसून बेळगाव आणि त्या परिसरातील जनताच आहे. याचा उलगडा मोठ्या ताकदीने करण्यात ‘ माझी मैना गावावर राहिली’ या पुस्तिकेच्या माध्यमातून समिक्षक उत्तम कांबळे यशस्वी झालेले दिसतात.
‘ माझी मैना गावावर राहिली’ या छक्कडची सुरूवात आणि शेवट विलक्षण आहे. पहिल्या ओळीपासून वाचकांचे मन रिझविणारी ही छक्कड जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा तिचा शेवट वाचताना आपल्याला वास्तव सत्याचे भान तर येतेच परंतु आपल्या सुध्दा जीवाची काहिली झाल्याशिवाय राहत नाही.
‘ माझी मैना गावावर राहिली’ समजून घेताना सुरूवातीला मैनेचे रूपवर्णन, मुंबईचं चित्रण दरम्यान उठलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राची झालेली निर्मिती या सगळ्या घडामोडी आपल्यासमोर तरळतात पुढे मात्र त्या घडामोडीतून तत्कालीन विस्थापित झालेल्या सीमा भागाची अवस्था अण्णाभाऊ मांडतात.
त्याच दरम्यान उठली, चळवळ संयुक्त महाराष्ट्राची
बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एक भाषिक राज्याची!
इथे आपणास अण्णाभाऊंचा मूळ हेतू लक्षात येतो हा निर्देश करताना उत्तम कांबळे म्हणतात. “अण्णाभाऊंच्या प्रतिभेला इथं दाद द्यावी तेवढी थोडीच बेळगाव आणि मुंबई या अतूट नात्याची ताटातूट करणाऱ्याविषयी स्वाभिकच सामाना वाचकाच्या मनात राग येतो. तो मूठ आवळून संघर्षाला तयार होतो आणि इथं अण्णाभाऊंचा चळवळीचा हेतूही सफल होतो.”
अण्णाभाऊंची ही छक्कड खऱ्या अर्थाने लोकमानस ओळखणारी आहे. महाराष्ट्रापासून तुटलेल्या भागाचा विचार करून अण्णाभाऊंनी जाणीवपूर्वक खंडित महाराष्ट्राची असा शब्दप्रयोग केलेला आहे हे सामान्य वाचकांना पटवून देताना उत्तम कांबळे यांनी त्या छकडीची बारकाईने समिक्षा केलेली आहे. तसेच ही दुरावलेली मैना महाराष्ट्रात येऊन तिनं विणकाम केल्याशिवाय महाराष्ट्र अखंडित होणार नाही हे उत्तम कांबळे यांनी मांडलेले विधान म्हणजे लोकभावनेचे शब्दबध्द रूपच ठरते.
आज संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होवून सहा दशक झाली तरी बेळगावसह अन्य मराठी भाषिकांचा हा सीमा प्रश्न तसाच राहिला याचे मोठे शल्य जसे अण्णाभाऊंनी मांडले होते व तीच बोचणी घेऊन आजही या भागातील सीमाबांधव जगत आहेत. बेळगावरूपी ही मैना महाराष्ट्रात आल्याशिवाय या लढाईला अंत नाही.
या छक्कडीच्या शेवटच्या चरणात अण्णाभाऊंनी शिवशक्तीला आवाहन केले आहे ते आवाहन आजही आव्हान बनून आपल्यासमोर उभे आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात,
आता वळू नका, रणि पळू नका कुणी चळू नका !
बिनी माया रायची अजून राहिली !
माझ्या जीवाची होतीया काहिली !!
अर्थात बेळगाव, कारवार, डांग, निपाणीसह अखंडीत महाराष्ट्रासाठी संयुक्तपणे कधी बिनी मारणार आणि ही जीवाची काहिली कधी संपणार हा एक मोठा प्रश्न आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची “ माझी मैना गावावर राहिली” ही छक्कड आजपर्यंत केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून गायिली, वाचली जात होती. त्या छक्कडीतील ओळी – ओळीतील मतितार्थ वाचकांच्या समोर आणण्याचे व एका अर्थाने थंड पडलेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची धार वाढविण्याचे मोठे काम अण्णाभाऊ साठे यांच्या या लावणीने साधले आहे सुजान समुहाला आणि सीमाबांधवासाठी ऊर्जा देणारे आहे.
संदर्भ सूची
१) कुंभार नागोराव (संपादक) शाहीर अण्णा भाऊ साठे, प्रबोधंत प्रकाशन, लातूर १९९३
२) सदा कऱ्हाडे – अण्णा भाऊ साठे : व्यक्तीत्व व कतित्व, लोकसाहित्य प्रकाशन, औरंगाबाद, २००९
३) चंद्रकांत वानखेडे (संपादक) अण्णा भाऊ साठे : साहित्य दर्शन, संकेत प्रकाशन, नागपूर, २०१६
४) रणधिर शिंदे (संपादक) – अण्णा भाऊ साठे साहित्य समिक्षा, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, २०१०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.