क्ष-किरण आणि एआय !
आज रॉन्टजेन आणि क्ष-किरणांची आठवण येण्याचे कारण म्हणजे आता अस्थिरोगावरील उपचारामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू करण्यात येणार आहे. मानवाच्या शरीराच्या रचनेची संपूर्ण माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेला पुरवण्यात आल्यानंतर रूग्णाचे क्ष-किरण प्रतिमा यंत्राकडे सोपवण्यात येईल. एआय तंत्रज्ञान मानवाच्या त्या भागाच्या रचनेमध्ये कोणता बिघाड झाला आहे, हे शोधून काढेल.डॉ. व्ही. एन. शिंदे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एक संशोधक आपल्या प्रयोगशाळेत रात्री उशिरापर्यंत काम करत होता. नुकत्याच शोधल्या गेलेल्या कॅथोड किरणावर त्यांचे संशोधन सुरू होते. त्यांनी सर्वोत्तम उपकरणे जमवली होती. काही उपकरणे त्यांनी स्वत: विकसित केली होती. उशिरापर्यंत प्रयोग करायचे, नंतर रात्रीचे जेवण करून पुन्हा प्रयोगशाळेत प्रयोग करत बसायचे, ते अगदी प्रयोग संपेपर्यंत. ८ नोव्हेंबर १८९५ चा तो दिवस होता. कॅथोड किरणांवरील प्रयोगासाठी सर्व प्रयोगशाळा तयार होती. कॅथोड किरण सुस्पष्ट दिसावेत, यासाठी पुढे स्फुरदीप्त (फ्लुरोसंट) पदार्थाचा थर असणारा पडदा ठेवला होता. कॅथोड किरण नलिकेत तयार होणारे किरण त्या पडद्यावर सुस्पष्ट दिसत होते.
कॅथोड किरणांच्या मार्गात कागदी पुठ्ठा, लाकडाची फळी, धातुचे पत्रे, शिशाच्या चकतीचा अडथळा धरून हे प्रयोग सुरू होते. त्यांना जास्त क्षमतेचे कॅथोड किरण तयार करायचे होते. त्यासाठी त्यांचा हा प्राथमिक अभ्यास मनोभावे सुरू होता. सर्व तयारीनिशी प्रयोग सुरू केला. त्यांना अपेक्षित असणारे परिणाम मिळाले. ते आता यशाच्या अगदी जवळ पोहोचले, असे त्यांना वाटत होते.
जेवल्यानंतर पुढील प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी उपकरणे बंद करू लागले. त्यावेळी त्यांना कॅथोड किरण तयार करणाऱ्या नलिकेपासून मीटरभर दूर असणाऱ्या पडद्यावर अंधुकसा प्रकाश दिसला. कॅथोड किरण इतक्या दूर जाऊ शकत नव्हते. मग हे काय ? असा प्रश्न त्यांच्या मनात आला. त्यामुळे त्यांनी पुन्हा उपकरणे सुरू केली. मात्र त्यांना तो प्रकाश कोठून येतो ? हे समजत नव्हते. काडीपेटी पेटवून ते प्रकाश कोठून येतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले. प्रकाश कोठून येतो, याचा शोध घ्यायला दुसरे प्रकाशाचे साधन वापरणे, ही गोष्ट तशी वेडेपणाची. मात्र संशोधक असे अनेक वेडेपणाचे प्रयोग करत असतात.
अखेर त्यांना प्रकाश कोठून येतो हे सापडले. परत सर्व उपकरणे बंद करून जेवणासाठी गेले. दररोज पत्नीशी मनमुराद गप्पा मारणारा हा संशोधक त्यादिवशी गप्प होते. ते कसेबसे जेवले. तसेच पुन्हा प्रयोगशाळेत गेले आणि प्रयोग सुरू केला. प्रकाशाचा उगम आणि पडदा यामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचे अडथळे निर्माण करताना त्यांना पडद्यावर त्यांच्या हाताच्या बोटांची प्रतिमा अचानक दिसली. त्यांच्या तोंडून केवळ ‘अशक्य’ हा शब्द बाहेर पडला. हाडाची प्रतिमा कशी असू शकेल. काही भास असेल, असा ते विचार करत होते. त्यांनी पुन्हा प्रयोग केला आणि त्यांच्या हाताच्या हाडांची सुस्पष्ट प्रतिमा दिसली. कॅथोड किरणांचा हा गुणधर्म नव्हता. म्हणजे कोणते तरी अज्ञात किरण बाहेर पडत होते. कोणते किरण हे माहीत नव्हते. त्या घटकेपर्यंत ते कोणाला ओळखताही आले नव्हते. ते अज्ञात होते. म्हणून त्यांनी त्या किरणांना एक्स-रे म्हणजेच क्ष-किरण हे नाव दिले. त्यानंतर त्यांनी त्या किरणांचे सर्व गुणधर्म तपासण्यास सुरुवात केली. दरम्यान ख्रिसमस आला. मात्र यांचे गुणधर्म अभ्यासण्याचे कार्य सुरूच होते. शेवटी वैतागून पत्नी बर्थाच प्रयोगशाळेत गेली आणि नवऱ्याच्या प्रयोगाने, त्या शोधाने वेडावून गेली. तिने अंगठी घातलेला हात त्या किरणांच्या मार्गात धरला आणि तिच्याही हातातील हाडाचे छायाचित्र निघाले. २७ डिसेंबर १८९५चा तो दिवस होता.
त्यांने स्वत:च्या आणि पत्नीच्या हाताच्या हाडांच्या छायाचित्राच्या अनेक प्रती काढल्या. त्या अनेक नामवंत संशोधकांना पाठवल्या. हे नवे किरण शोधल्यानंतर त्यांने आपल्या पत्नीला सांगितले की ‘आता सर्व दु:खे दूर होतील’. आणि त्या संशोधकाचे म्हणणे अगदी खरे ठरले. हे क्ष-किरण शोधणारा संशोधक म्हणजे विल्यम राँटजेन. त्यांच्या या क्ष-किरणाच्या शोधावर सुरुवातीला अनेक संशोधक विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. मात्र काही संशोधकांनी असे किरण मिळवण्यात यश मिळवले. या शोधाची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. या किरणांचा उपयोग अस्थीव्यंगावरील उपचारासाठी करता येणे शक्य झाले.
अर्थात कॅथोड नलिकेतून असे वेगळे किरण निघत असल्याचे इतरही काही संशोधकांच्या लक्षात आले होते. क्रुकस यांच्या छायाचित्रण प्लेटस अज्ञात किरणांनी खराब झाल्याचे १८८० साली दिसून आले होते. १८८८ आणि १८९३ मध्ये लिनार्ड हे ही अशा अज्ञात किरणाचा शोध घेत होते. पुढे त्यांचे मार्गदर्शक हेन्रिच हर्टझ यांचे निधन झाल्याने त्यांनी या विषयावरील संशोधन थांबवले होते. पेनसिल्वानिया विद्यापीठातील संशोधक गुडपाश्चर यांच्याही लक्षात असे किरण आले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि अवघ्या तीन वर्षांत रॉन्टजेन यांना या शोधासाठी नोबेल मिळाल्यानंतर आपण किती मोठी चूक केली, हे त्यांच्या लक्षात आले.
युद्धामध्ये गोळी लागून जखमी झालेले सैनिक अपघातात हाडांना झालेल्या इजा आणि शरीरातील घुसलेल्या गोळ्या किंवा अन्य घन पदार्थांचे स्थान शोधण्यासाठी क्ष-किरणांचा वापर सुरू झाला. वैद्यक क्षेत्रातील या किरणांच्या वापरामुळे अमुलाग्र बदल झाले. अस्थिरोग आणि अपघातातील हाडांना झालेल्या इजा, सांध्यातून हाड निखळणे याचे नेमके निदान आणि उपचार करणे सुलभ झाले. त्यामुळे लोकांच्या वेदना कमी झाल्या. रॉन्टजेन यांना या शोधाचा मानव कल्याणासाठी होत असलेला उपयोग समाधान देणारा होता. या शोधाने अस्थिरोग तज्ज्ञांचे कार्य खूपच सोपे केले होते.
आज रॉन्टजेन आणि क्ष-किरणांची आठवण येण्याचे कारण म्हणजे आता अस्थिरोगावरील उपचारामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू करण्यात येणार आहे. मानवाच्या शरीराच्या रचनेची संपूर्ण माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेला पुरवण्यात आल्यानंतर रूग्णाचे क्ष-किरण प्रतिमा यंत्राकडे सोपवण्यात येईल. एआय तंत्रज्ञान मानवाच्या त्या भागाच्या रचनेमध्ये कोणता बिघाड झाला आहे, हे शोधून काढेल. अस्थिरूग्णाचे क्ष-किरण छायाचित्र डोळ्यासमोर धरून व्यंग शोधत आहेत, हे चित्र यापुढे दिसणार नाही. डॉक्टर निदान करणार नाहीत, ते राहतील उपचारापुरते. दैनंदिन जीवनात या तंत्रज्ञानाचे जसे अतिक्रमण वाढत जाईल तसे आपण त्याला बळी पडत जाऊ आणि हे तंत्रज्ञानच आपला घात करेल, असे या तंत्रज्ञानाचे जनक, नोबेल पुरस्कार प्राप्त संशोधक सांगत आहेत. त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
घोषणा आणि वल्गना…