सातारच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या माधुरीने स्वकर्तृत्त्वावर अन् अभिनयाच्या जोरावर आपले स्वतंत्र अस्तित्व मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. लंडन मिसळच्या निमित्ताने परदेशी वाऱ्याही तिने केल्या आहेत. ग्रामीण भागातील असलो म्हणून काय झाले आमची बोली आम्हाला प्रिय आहे. आमच्या बोली भाषेचा आम्हाला अभिमान आहे. हा अभिमान ढळू न देता स्वतःचे एक वेगळे वलय निर्माण करता आले पाहीजे हेच विचारत ठेवून कार्यरत असणारी माधुरी पवार आज विविध भाषांच्या चित्रपटातही झळकत आहे.
याबद्दल बोलताना माधुरी म्हणाली, “कांही महिन्यापूर्वी मला दक्षिण भारतातून त्यांच्या भाषेच्या चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर आली आणि मी लगेच हो पण म्हणाले शूटिंग होती बेंगलोरला म्हणजे कर्नाटकमध्ये. भाषा आली कानडी कधी न बोललेली न समजलेली, पण मला ते करायचं होतं. मग त्यात त्या गाण्यांच शूटिंग चालू झालं आणि बघता बघता ते पूर्ण पण झालं. नंतर त्याच एडिटिंग झालं.” स्वतःमध्ये गुण असतील तर भाषेची अडचण वाटत नाही. आपोआपच सर्व गोष्टी जुळून येतात. असचं माधुरीला येथे अनुभवाला आलं. अन् तिने ते सार्थ करूनही दाखवलं.
यातील यशाबद्दल बोलताना माधुरी म्हणाली, मला वाटत की मी यात सर्वात चांगला अभिनय केलाय. भाषा कळत नसतानाही तो अभिनय मी केलाय आणि काय सांगू त्यांना ही तसेच वाटले. ही माझ्यासाठी माझ्या अभिनयाची मला मिळालेली पोच पावती होती जी की त्यांनी माझ्यावर, माझ्या अभिनयामुळे केलल्या कौतुकाची थाप होती. खूप छान वाटलं. तेंव्हा कळलं की जो खरा कलाकार असतो त्याला कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या भाषेचा परिणाम होत नाही तो प्रत्येकाला न्याय देतो. माझा हा दक्षिणेतला पहिला चित्रपट भारतातील अनेक भाषेत रिलीज होत आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच माझ्या करिअरचा आलेख उंचावतो आहे.”
केएमपी श्रीनिवास निर्मित ज्योती आर्ट्स बॅनरवरील ब्रह्मराक्षस या चित्रपटाने आता महाराष्ट्राची माधुरी आंतरभारती झाली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.