अपरिमित राजकीय आणि आर्थिक सत्तेच्या युती विरोधात लेखकांनी उभे रहावे
- चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार यांचे आवाहन
- रंगकर्मी अतुल पेठे, कादंबरीकार संग्राम गायकवाड, कवी सफरअली यांचा गौरव
- कोकण बरोबर महाराष्ट्राच्या विविध भागातून रसिकांची उपस्थिती
कणकवली – आज अपरिमित राजकीय आणि अपरिमित आर्थिक अशा दोन सत्तांची अत्यंत विषारी युती झालेली समाजात दिसते. या युतीने सगळी सामाजिक नैतिकता धाब्यावर बसवली आहे. मूल्य व्यवस्थाच हलवून टाकली आहे. लेखक, कवी म्हणून आपली लढाई या अपरिमित सत्तेविरुद्ध, विषमतेच्या दरी विरुद्ध आहे. हा काळच इतका भ्रमित करणारा आहे की आपल्या हेही लक्षात येत नाही आपण कुणाविरुद्ध लढायचे आहे. अशा काळात एकमेकांच्या अभिव्यक्तीला पैस देणे हेच भारतीयत्व आहे.हे लेखकाने लक्षात ठेवायला हवे. असे स्पष्ट प्रतिपादन चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी आणि अनुवादक प्रफुल्ल शिलेदार यांनी केले.
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने मालवण येथील सेवांगणच्या सभागृहात कवी शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली चौथे समाज साहित्य विचार संमेलन आयोजित करण्यात आले. कोकण बरोबरच पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे, गोवा या भागातील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या संमेलनात बोलताना शिलेदार यांनी भारतीय बहुलता, बहुभाषिकता टिकवून ठेवणे ही सुद्धा लेखकाची जबाबदारी आहे असेही आग्रहाने सांगितले.
संत साहित्याचे अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या संमेलनात रंगकर्मी अतुल पेठे यांना इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार, कादंबरीकार संग्राम गायकवाड यांना कथाकार – नाटककार जयंत पवार पुरस्कार आणि कवी सफरअली इसफ यांना प्रकाश रामचंद्र रसाळ भूमी काव्य पुरस्कार कवी शिलेदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अजय कांडर, अध्यक्ष मधुकर मातोंडकर, प्रमुख कार्यवाह सुरेश बिले, इतर पदाधिकारी मनीषा पाटील, नीलम यादव, संजीवनी पाटील, प्रमिता तांबे, मेघना सावंत, योगिता राजकर, मनीषा शिरटावले, विजय सावंत, संतोष जोईल त्याच बरोबर ज्येष्ठ लेखक राजन गवस,ज्येष्ठ लेखिका संध्या नरे पवार, कादंबरीकार प्रवीण बांदेकर, प्राचार्य गोविंद काजरेकर, कवयित्री संध्या तांबे, रंगकर्मी वामन पंडित,ॲड. विलास परब आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ॲड. परुळेकर म्हणाले समाज साहित्य प्रतिष्ठान ही संस्था अतिशय गंभीरपणे आणि साहित्यातील मूलभूत प्रश्न समजून घेऊ काम करते आहे. म्हणून नाथ पै सेवांगण समाज साहित्य प्रतिष्ठानला जोडून घेत काम करू लागले. आज काळ कठीण असताना आपल्यातील छोटे छोटे मतभेद बाजूला ठेवून एकमेकाला समजून घेत काम करायला पाहिजे. जिथे संवाद होतो आहे तो वाढवत न्यायला पाहिजे. नाहीतर पुढे पुढे काळ फार कठीण होत जाईल.
अतुल पेठे म्हणाले, इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर आणि कथाकार नाटककार जयंत पवार यांच्या स्मरणार्थ समाज साहित्य प्रतिष्ठान चळवळ काम करते यातच या चळवळीची भूमिका स्पष्ट होते. गुरुवर्य केळुसकर यांना मी समजून घेत गेलो तेव्हा असं लक्षात आले की के केळुसकर उपेक्षित राहिले. पण एका अर्थाने ते बरेच झाले कारण उपेक्षित राहणारा माणूसच खरा असतो. आपल्याकडे चांगलं काम उशिरा पोहोचतं पण त्याची दखल कधी ना कधी समाजाला घ्यावीच लागते. समाज साहित्य प्रतिष्ठान याच पद्धतीने काम करत असून समाज साहित्य प्रतिष्ठानचा भविष्यकाळ अधिक उत्तम आहे. मी नाटक करतो म्हणजे काय करतो समाजाला समजून घेतो. मात्र तुम्ही जिवंत असतानाच नाटक पहा. आपलं मानसिक आरोग्य सुधारायचं असेल तर
नाटक पहाणे आवश्यक आहे.
संग्राम गायकवाड म्हणाले, जयंत पवार हे समकालीन वास्तवाला एक विशिष्ट मूल्य दृष्टी घेऊन भिडणारे, वास्तवाचा छडा लावण्याच्या गरजेपोटी साहित्यरूपाच्या वेगवेगळ्या शक्यता धुंडाळणारे आणि स्वतःच्या लेखनातून वास्तवावरती काही एक परिणाम घडविण्याची इच्छा बाळगणारे मोठे लेखक होते.त्यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मला मिळतो याचा आनंद आहे. व्यक्तिगत जीवनातील मूल्यनिष्ठा आणि वाड:मयीन निष्ठा या दोन्हींचे चोखपणे अनुसरण करत लेखक असणे ही काही सोपी गोष्ट नाही. गेल्या काही वर्षापासून हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा जो अतिशय वेदना देणारा अनुभव आपण सगळेजण घेतो आहोत त्यामुळे आलेल्या अस्वस्थतेवरचा उतारा म्हणून मी मनसमझावन ही कादंबरी लिहिली.
यावेळी अजय कांडर यांनी संमेलना मागील भूमिका स्पष्ट केली. प्रस्तावना मधुकर मातोंडकर यांनी केली तर सूत्रसंचालन प्रमिता तांबे यांनी केले.आभार संजीवनी पाटील यांनी मानले.
50 कवींच्या सहभागाने बहरले कविसंमेलन
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवयित्री मनीषा शिरटावले यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री नीलम यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कविसंमेलन संपन्न झाले. मनीषा पाटील, डॉ.योगिता राजकर यांनी सूत्रसंचालन केलेल्या आणि 50 कवींच्या सहभागाने झालेले हे कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. यावेळी कविसंमेलनातील प्रत्येक कवीचा सुरेश बिले, विजय सावंत, डॉ.योगिता राजकर आणि शुभांगी वाघ यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह,ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.