January 29, 2023
pratima-ingole-article-on Danapur invaluable contribution to jungle satyagraha
Home » जंगल सत्याग्रहात दानापूरचे अमुल्य योगदान
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

जंगल सत्याग्रहात दानापूरचे अमुल्य योगदान

आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय पण ह्या स्वातंत्र्याच्यासाठी कोणी कोणी घरावर तुळशीपत्र ठेवले याची आपणास जाण तरी आहे का? ‘घर घर तिरंगा’ चा नारा देताना ज्यांनी ज्यांनी या तिरंग्याच्यासाठी खून की गंगा वाहू दिली त्यांना स्मरणांजली वाहणे आपले कर्तव्य नाही काय? आज त्याच भावनेतून मी हा लेख लिहित आहे.

प्रतिमा इंगोले, ९८५०११७९६९

१३ ऑगस्टचा दानापूर क्रांतिदिन तसा उपेक्षित आहे. त्याचे श्रेय दुसरेच लाटत आहेत. १९३०च्या आकोट तालुक्यात झालेल्या जंगल सत्याग्रहाचा खरा उगम इथे आहे. दानापूर हे त्याचे केन्द्र आहे. येथील श्यामराव कुकाजी ढाकरे उर्फ बापूसाहेब ढाकरे हे १९२० पासूनच देशप्रेमाने भारले गेले होते. त्याच प्रेरणेने त्यांनी या जंगल सत्याग्रहासाठी क्रांतीदलाची स्थापना केली. परिसरातील तरुणांना एकत्र संघटीत करून त्यांना देशप्रेमाची शिकवण दिली. या क्रांतीदलाचे अध्यक्ष स्व श्यामराव कुकाजी ढाकरे होते. त्यामुळे १९३० च्या आकोट तालुक्यातील जंगल सत्याग्रहाचा उगम दानापुरात आहे. मूळ गंगोत्री इथे आहे. मग तिचा प्रवाह इतरत्र पसरला आहे. आज अमृत महोत्सवानिमित्ताने खरा इतिहास समोर यायला हवा आहे. कारण मी माझे कर्तव्य केले असे म्हणत श्यामराव ढाकरे यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून नामांकन केले नाही वा स्वातंत्र्य सैनिकाचे मानधन स्वीकारले नाही. पण त्यांच्या या त्यागाचे परिसराला व शासनालाही विस्मरण झाले आहे. पण १९३०च्या जंगल सत्याग्रहात श्यामराव कुकाजी ढाकरे यांचा सिंहाचा वाटा आहे. या स्वातंत्र्यलढ्याच्या मूकसाक्षीदार एकचौक व दोन विहिरी आज अस्तित्वात आहेत. तेव्हा आता तरी त्यांना त्यांचे श्रेय देऊन त्यांचा यथायोग्य सन्मान करायला हवा. हे शासनाचे कर्तव्य आहे. सातपुड्याच्या कुशीत दानापूरला जन्मलेल्या श्यामराव कुकाजी ढाकरे उर्फ बापूसाहेब ढाकरे यांचे जीवन म्हणजे एक महायज्ञच होते. १९२०ला शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर या यज्ञाची सुरुवात झाली ते मरेपर्यंत! घरावर तुळशीपत्र ठेवले त्यामुळे त्यांची दोन मुलं दगावली. एकच एक मुलगी कशीबशी वाचली ती विमलाबाई ! माझी आई. तिनेही १९४२ च्या अकोल्याच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. अख्खे कुटुंब स्वातंत्र्याच्या वेदीवर वाहिल्यावरही शासन त्यांना देशभक्त मानायला तयार नाही हे दुर्दैव ! किमान आता ह्या अमृत महोत्सवानिमित्त तरी या त्यागाचा गौरव व्हावा. पण त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा. आजवर तसे घडले नाही, म्हणून दानापूरचा रणसंग्राम उपेक्षित राहिला. खरं तर इतिहास बदललाजात नसतो. वा पडदा टाकून झाकला जात नसतो. तो केव्हातरी उघड होत असतो. तसा हाही इतिहास विस्मरणात जाऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करायला हवे असतात. पण तसेही घडले नाही. कदाचित त्यांचा मुलगा जिवंत असता तर तसे घडले असते.

१३ ऑगस्ट १९३० च्या जंगल सत्याग्रह या स्वातंत्र्य लढ्याला ९२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण ह्या स्वातंत्र्य लढ्याची दखल ना परिसराने घेतली ना शासनाने ह्याच वेळी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जंगल सत्याग्रहाच्या स्मृति मात्र त्या परिसराने व शासनाने पडल्या आहेत. दानापूरच्या जवळच असलेल्या जंगलात हा सत्याग्रह जंगलाच्या जवळ म्हणून हिवरखेडला करण्यात आला. त्यावेळी इंग्रजांच्या बेछूट गोळीबारापासून वाचण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी जीवघेणा लढा दिला. तरीही काहींना जंगलात भूमिगत व्हावे लागले. भूमिगत असणाऱ्या सैनिकात लोकनेते स्व. बापूसाहेब ढाकरे होते. त्यांनी त्यावेळी घनदाट अशा कोकटूच्या जंगलात आश्रय घेतला. जवळपास ७०, ८० स्वातंत्र्य सैनिक भूमिगत झाले होते.या लढ्याच्या अध्यक्षस्थानी स्व. ढाकरे असल्यामुळे त्यांनी ह्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भोजनाची जबाबदारी स्वीकारली, तसे आदेश दिले. दानापूर तसे जवळच होते. त्याकाळी एकीला मूल झाले नाही म्हणून त्यांना दोन पत्नी होत्या. श्यामराव यांच्या दोन्ही पत्नी रात्रीचा स्वयंपाक करून पहाटे चोरून जंगलात पाठवू लागल्या. त्यांच्या घरातील चौकात स्वयंपाक करून रात्रीच्या अंधारात जिवावर उदार होऊन जंगलात पाठविला जात होता. त्याही जिवावर उदार होऊन चोरून त्या शिजवत होत्या. त्यामुळे ७० ते ८० स्वातंत्र्य सैनिकांना जीवदान दिले. त्यामुळे त्यांना नंतर १९३२ ला परत उठाव करता आला.

कोकट्रचे जंगल आज मेळघाट अभयारण्यात सर्वात अतीसंरक्षित भागात येते. तिथे कोणाला प्रवेश नाही. ते घनदाट तर आहेच, पण तिथे दिवसाही अंधार असतो. ह्या जंगलात हिंस्त्र प्राणीही आहेत. अशा ह्या किर्र दाट जंगलात हे स्वातंत्र्य स्वातंत्र्य सैनिक कसे राहिले असतील ? जिवावर उदार होऊन जंगली श्वापदांपासून त्यांनी कसा बचाव केला असेल ?आपण आता तिथे जाऊही शकत नाही. अशा ह्या जंगलात एकवेळ पाठवलेला स्वयंपाक खरंच त्यांना पुरला असेल? की त्यांना पाळी पाळीने जेवावे लागले असेल? तिथे माणसांचा थारा नाही आणि पाखरांचा वारा नाही अशा ठिकाणी त्यांनी कसे उपास सोसले असतील? तरीही ते देशासाठी जगले ? सर्व देवच जाणे ? अशा या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे आज आपण केवळ स्मरण करू शकतो ? पण ते तरी आपण खरंच करतो का ? केले तर मनापासून करतो का ? सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे म्हणून त्यांची किमान आठवण तरीआपण काढतो आहे ? पण पुढे काय ? स्वातंत्र्य लढ्याला यश आले. देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण ज्यांनी मी माझे कर्तव्य केले असे म्हणत नामांकन केले नाही वा स्वातंत्र्य सैनिकांचे मानधन स्वीकारले नाही. त्यांची किमान नोंद तरी शासनाने घेतली का ? तर नाही. ते सरकारचे कर्तव्य नव्हते ? आज जिथे जिथे देशभक्तांवर लिहिले आहे ते ते मी वाचले आहे तिथे कुठे ही ह्या खऱ्याखुऱ्या देशभक्तांचा उल्लेख नाही. कारण ते फक्त सरकारी यादी बघतात. जिल्हाधिकारी कार्यालयातील यादीच तेवढी प्रमाण मानतात. मग अशा जिवावर उदार झालेल्या, घरावर तुळशीपत्र ठेवलेल्या, स्वातंत्र्य लढ्यात कष्ट सोसलेल्या सैनिकांच्या त्यागाचे मोल काय ? तर काही ही नाही. हा तर पराकोटीचा कृतघ्नपणा झाला. शासनाने अशा सैनिकांना हुडकून किमान त्यांची नोंद तरी ठेवायची असती म्हणजे त्यांची देशभक्त नसल्याची मानहानी तरी टाळली असती ? पण असे घडले नाही म्हणून हेची फळ काय मम तपाला? असे म्हणत खंत व्यक्त करण्यापलिकडे काय करू शकत होते ? पण तेव्हा घडले नाही ते आता अमृत महोत्सवानिमित्त तरी घडावे ?

बरं ज्यांनी अहोरात्र कष्ट करून स्वयंपाक रांधला त्या मायमावल्यांच्या कष्टाचे मोल काय ? कारण रात्रीचा चोरून स्वयंपाक करायचा तोही इतक्या माणसांचा, तेव्हा त्याची तयारी आधीच म्हणजे दिवसाच करावी लागली असणार ? मग त्या राबण्याचे फलित काय ? तर काहीच नाही. की त्यांनी दोन वर्षे श्रम कारावासाची शिक्षा भोगली ? सगळा गोंधळ आहे हे नक्की ! शेवटी पडद्यामागे राहून कष्ट करणाऱ्यांच्या नशिबी कायम उपेक्षा येते हेच खरे ! पण आर्थिक योगदानाचा विचार तरी केला गेला का ? तर तेही नाही. तेव्हा या अमृत महोत्सवानिमित्त तरी असा विचार व्हावा. ह्या अहोरात्रीच्या कष्टाची कदर व्हावी. पण आपल्या पोळीवर तूप ओढणाऱ्यांना कुठे एवढा वेळ आहे ? वा समज आहे ? आमच्या लहानपणी आम्ही एक बडबडगीत म्हणत होतो.

एक पैशाचा घेतला साबूत्यात
निंगाला सुभाष बाबू
सुभाष बाबू न खंदला खड्डा
त्यात निंगाला गांधी बुढ़ा
गांधी बुढ्यानं कतरला पेरू(सूत)
त्यात निंगाला पंडित नेहरू
पंडित नेहरूनं फेकला कांदा
त्यात निंगाला श्यामराव बंदा
श्यामरावच्या हातात झेंडा
गोरा सायेब भेला
लालतोंडा पिऊन प्याला गेला दूर
असं आमचं दानापूर

“श्यामराव कुकाजी ढाकरे उर्फ बापूसाहेब ढाकरे आयुष्यभर देशासाठी तळमळत राहिले. मी त्यांच्यावर लिहिलेली ‘गढी’ कथा आज बारावीच्या अभ्यासक्रमात आहे. तसेच अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रमात निवडली आहे. पण त्यामुळे त्यांच्या त्यागाचे चीज होत नाही. किंवा स्व. कलावती ढाकरे आणि गयाबाई ढाकरे यांच्या कष्टाची भरपाई होत नाही. म्हणूनच आज विस्मरणात गेलेल्या इतिहासाला पुन्हा उजागर केले आहे. कारण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. जय हो अमृत महोत्सव आणि चिरायू होवो भारत देश !

Related posts

हर शख्स परेशानसा क्यों हैं ?

योगाभ्यास, आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या अन् कसोट्यांवर यशस्वी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ?

Leave a Comment