थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. याचा परिणाम अंडी उत्पादनावर होत असल्याने थेट फटका व्यवसायास बसतो. थंडीत दिवसात कोंबड्यांचा सांभाळ कसा करायचा याबद्दल जाणून घ्या या लेखातून…
सौजन्य – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र
कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे कोंबड्यांचे अंडी उत्पादन कमी होणे, पाणी पिणे कमी होणे, प्रजनन क्षमता आणि अंडी उबवणक्षमता कमी होणे अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात कोंबड्यांच्या शेडचे, लिटरचे आणि आहाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होईल याकडे लक्ष द्यावे.
🐓 लिटरचे व्यवस्थापन 🐓
- शेडमध्ये चांगल्या प्रकारचे लिटर वापरल्यामुळे कोंबड्यांना ऊब मिळते, शेडमध्ये एकसारखे तापमान राखले जाते त्याचप्रमाणे लिटर पानी शोषून घेण्यासाठी देखील मदत करते. कोंबड्यांच्या विष्टेची रासायनिक प्रक्रियेची तीव्रता कमी करते त्यामुळे कोंबड्यांचा आणि विष्टेचा थेट संपर्क होत नाही.
- हिवाळ्यात शेडमध्ये ६ इंच जाडीच्या चांगल्या प्रकारच्या लिटरचे अाच्छादन करावे. लिटरसाठी भाताचे तूस, काड याचा वापर करावा.
- लिटर दर आठवड्याला खाली वर करावे अाणि त्यामध्ये अावश्यकतेनुसार चुना मिसळावा.
🐓 कोंबड्यांचे शेड 🐓
- शेडची दिशा पूर्व-पश्चिम असावी त्यामुळे हिवाळ्यात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शेडमध्ये येण्यास मदत होते.
- शेडच्या ज्या भागातून थंड हवा शेडमध्ये येते अशा ठिकाणी गोनपाट लावावेत. सकाळी शेडमध्ये सूर्यकिरणे येण्यासाठी गोणपाट पुन्हा गुंडाळून ठेवावेत.
- कोंबड्यांच्या विष्ठेमुळे शेडमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनिया वायू तयार होत असतो. शेडमध्ये जर हवा खेळती नसेल तर अमोनिया वायूमुळे कोंबड्यांमध्ये श्वसनाविषयी समस्या निर्माण होतात. त्यासाठी शेडमध्ये सरकनाऱ्या खिडक्यांचा वापर करावा कारण त्या दिवसा सोप्या पद्धतीने उघडता येतात आणि रात्रीच्या वेळी पटकन बंद करता येतात.
- शेडमधील प्रदूषित हवा बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट पंख्याची व्यवस्था करावी.
🐓 कोंबड्यांचा आहार 🐓
- शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरक्रिया चालू ठेवून हाडे, मांस, पंख आणि अंड्याच्या निर्मितीसाठी कोंबड्यांना उत्तम दर्जाचे खाद्य देणे आकश्यक आहे.
- कमी तापमानात कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात आणि या वेळी त्यांची ऑक्सिजनची मागणीदेखील जास्त असते. ज्या वेळी तापमान खूपच कमी असेल त्या वेळी कोंबड्यांना जास्त प्रमाणात खाद्य द्यावे. कारण शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची आवश्यकता असते.
- चयापचायच्या क्रियेत प्रत्येक कोंबड्यांमध्ये प्रत्येक दिवसाला जसे तापमान बदलेल तशी ऊर्जा वापरण्यात (कॅलरी) भिन्नता दिसून येते. ज्या वेळी कोंबड्यां खूप खाद्य खातात त्या वेळी घेतल्या जानाऱ्या ऊर्जेबरोबर न लागणारे बाकीचे पोषक द्रव्ये पण मोठ्या प्रमाणावर खातात त्यामुळे असे अन्न द्रव्य वाया जाते.
- वाया जाणाऱ्या अन्नद्रव्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कोंबड्या खाद्यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा असणाऱ्या स्रोतांचा प्रामुख्याने स्निग्ध पदार्थाचा वापर करावा किंवा खाद्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण समान ठेवून बाकीच्या पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी करावे.
- शेडमध्ये फीडर्सची संख्या वाढवावी. दिवसभर कोंबड्यांना खाद्य उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.
🐓 पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन 🐓
- हिवाळ्यामध्ये कोंबड्या खूप कमी पाणी पितात, त्यामुळे शरीरामध्ये पाण्याचे योग्य प्रमाण ठेवण्यासाठी त्यांना ताज्या व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पाणी खूप थंड असेल तर त्यामध्ये गरम पाणी मिसळून द्यावे. त्यामुळे पाण्याचे तापमान पिण्यायोग्य होते.
- कोंबड्यांना अनेक प्रतिबंधात्मक लसी, औषधे, जीवनसत्त्वे ही पाण्यामधूनच दिली जातात. त्यामुळे लस, औषधे, जीवनसत्त्वे देण्यापूर्वी काही तास अगोदर पाणी देऊ नये. औषधे देताना ती कमी पाण्यातच द्यावीत.