नाशिक – चिंचखेड ता. दिंडोरी येथील कवी व व्याख्याते संदीप जगताप यांचा “कविता आणि बरच काही ” हा कवितांचा कार्यक्रम गुरुवारी ( दि. 26 जून) मुंबई येथील मंत्रालयात आयोजित केला आहे. मंत्रालय अधिकारी, कर्मचारी कल्याण मंच यांच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी चळवळीतील बुलंद आवाज, शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची प्रभावी मांडणी व प्रबोधनाचे खणखणीत विचार यामुळे संदीप जगताप यांच्या कविता महाराष्ट्रातल्या रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचल्या आहे. आयुष्य करायचं असेल हिरवागार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर.. या कवितेने तर सध्या महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण ढवळून काढले आहे. लग्न न होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची वास्तव स्थिती लिहून मुलींच्या डोळ्यात अंजन घालणारी ही कविता खूपच लोकप्रिय झाली. या कवितेने समाजमन बदलण्याचे काम सुरू केले. शेतीकडे बघण्याचा निकष दृष्टिकोन सकारात्मक होऊ लागला. या कवितेच्या परिणामामुळे अनेक मुली शेतकरी मुलाशी लग्न करायला तयार झाल्या व असे विवाह घडून आले. यामुळे संदीप जगताप यांच्याकडे लोक समाज सुधारक कवी म्हणून बघू लागले आहेत.
गेले अनेक वर्ष शेतकरी सर्वसामान्य माणसाची बाजू घेऊन संदीप जगताप यांच्या कवितेने व्यवस्थेवर नेहमीच आसूड ओढले. पुरस्कार मिळण्यापेक्षा वावरातल्या पिकाला भाव मिळाला पाहिजे. अशा भूमिकेतून त्यांनी लेखन केले यामुळे वयोवृद्ध पासून तरुण मुलांपर्यंत संदीप जगताप हा सगळ्यांचा आवडता कवी झाला आहे. महाराष्ट्रात त्यांचा मोठा रसिक वर्ग आहे आणि तो अगदी व्यवस्थेत काम करणाऱ्या मंत्रालयात देखील असल्यामुळे गुरुवारी संदीप जगताप यांचा स्वतंत्र कार्यक्रम मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी मंचने आयोजित केला आहे. यास वरिष्ठ अधिकारी व मंत्रालयातील कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.