January 3, 2026
Portrait of Marathi writer Bharti Sawant symbolizing women empowerment, perseverance, and literary achievement
Home » जिद्द, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःचे साहित्यिक विश्व निर्माण करणारी भारती
मुक्त संवाद

जिद्द, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःचे साहित्यिक विश्व निर्माण करणारी भारती

जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – १
३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज भारती सावंत यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

मानवी जीवनात जन्म व मृत्यू हा आपल्या हाती नसतो पण जन्म ते मृत्यू यातील काळ म्हणजेच कर्म व कर्तृत्व हे आपल्या हाती असते. कुणी कुणाच्या घरात जन्माला यायचे हे कोणाच्याच हातात नसते. ही गोष्ट आहे भारती सावंत या प्रसिध्द लेखिकेची. आज त्यांच्या स्वलिखित ४०० कथा, ४००० चारोळ्या, २००० लेख, ४००० कविता संग्रही आहेत. १७५ दिवाळी अंक आणि २० ई दिवाळी अंकात त्यांचे साहित्य छापून आले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विविध नियतकालिके, मासिके, पाक्षिके, साप्ताहिकांतून त्यांचे साहित्य नेहमी छापून येते. त्यामुळे महाराष्ट्रात साहित्यिक वर्तुळात त्यांचे नाव आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ दीडशे वृत्तपत्रांतून आजवर त्यांचे साहित्य छापून आले आहे. त्यांची शालेय अभ्यासक्रमाची ७ पुस्तके छापली गेली आहेत. अशा या सावित्रीच्या लेकीची ओळख तर व्हायलाच हवी ..!

‘ती’ मध्यमवर्गीय कष्टाळू आणि सर्वसामान्य घरात बुद्धीचे भांडार घेऊन जन्माला आली. मैत्रिणींच्या मार्गदर्शिका पुस्तकावर अभ्यास करून प्रतिकूल परिस्थितीत रात्रीचा दिवस करून जिद्दीने शिकली. तिच्या शाळेतील हुशारीची प्रशंसा होत होती. दहावीपर्यंतचे फुलपाखरी जीवन संपून तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कुटुंबात ती मोठी मुलगी आणि पाठीवर चार भावंडे. वडिलांवर चौघी मुलींच्या लग्नांची जबाबदारी. घरातून काटकसरीने जगायची शिकवण. खाऊन पिऊन सुखी असले तरी चंगळवाद शब्द माहीत नव्हता, परंतु हिरा मातीत मिसळला तरी आपले गुण लपवत नाही त्याप्रमाणे शालेय जीवनात सर्व स्पर्धा परीक्षांत ती बक्षिसे मिळवत अनेक कलांत पारंगत असलेली शिकवणीशिवाय ७५% टक्के मार्क मिळून दहावी पास झाली. परिस्थितीमुळे बारावीला आपली हुशारी दाखवू शकली नाही . बरोबरीचे मुले डॉक्टर, इंजिनिअर व्हायला परगावी शहरातील कॉलेजात गेले पण मुलगी असल्याने तिला गावातीलच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला.

लहानपणापासून जिद्द, महत्त्वाकांक्षी वृत्ती तसेच वाचनाची प्रचंड आवड. हातात पडलेले पुस्तक वाचूनच खाली ठेवण्याची सवय, वाचनाचा प्रचंड छंद असल्यामुळे कविता, निबंध आपोआपच सुचत असायचं. त्यामुळे निबंध लेखनाने तिच्या अनेक वह्या भरून गेल्या. लेखनाचा जणू तिला छंदच जडला. घरातील सर्व कामांना हातभार लावणे, दुपारी कॉलेज नि रात्रीचे जागरण करुन ती अभ्यास करत असे. त्यात कॉलेजच्या दुसऱ्या वर्षानंतर लग्न झाले. शिक्षण पूर्ण करून देण्याच्या अटीवर लग्न केले. शिकण्याची जिद्द असल्याने दोन्ही कुटुंबांकडून पदवीधर व्हायची संधी प्राप्त झाली. लहान वयात नवविवाहितपणाची जबाबदारी, पाहुणे रावळे त्यामुळे पुन्हा अभ्यासासाठी रात्रीचा दिवस करावा लागे.

पदवी परीक्षा ७० % मार्क मिळून पास झाली. पदवीनंतर ती मोठ्या शहरात आली ती उच्चशिक्षण घेण्याची आस घेवूनच ! पण पतीकडून शिक्षणासाठी नकारघंटा ऐकून नाराज झाली. दरम्यान झालेल्या दोन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी नि नोकरी करायला विरोध असल्याने स्व- प्रयत्नावर मिळवलेली नोकरी सोडावी लागली. त्यामुळे शिक्षण घेऊनही काही उपयोग होत नसल्याचा तिला पश्चात्ताप झाला.

गावी तिच्या बऱ्याच मैत्रिणी उच्चशिक्षण घेऊन नोकरीला असल्याचे तिला समजले. वर्गातून पहिला क्रमांक मिळविणारी ती मात्र ‘रांधा वाढा उष्टी काढा’ करत असल्याने निराशेच्या गर्तेत खोल ढकलली जात होती. त्याच दरम्यान शाळेच्या तिच्या आवडत्या बाई भेटल्या. हल्ली कुठे राहतेस ?काय करतेस ? अशी विचारपूस झाल्यावर त्यांना समजले की ती घरीच असते. त्या म्हणाल्या,” तुझी एवढी बुद्धी तू वाया घालवणार का ?” झंझावाताप्रमाणे बाईंचे ते शब्द तिच्या काळजात घुसले व ती विचार करू लागली. काय मिळवले जीवनात आपण ? आपली हुशारी, कर्तबगारी अशीच वाया जाणार? ती खडबडून जागी झाली. सुट्टी संपवून शहरात आल्यावर तिने संगणक, टायपिंगचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्या दरम्यान ‘ती’ ची मुलेही शाळेत जाऊ लागली. त्यांची प्रगती पाहून बऱ्याच लोकांनी तिच्याकडे शिकवणी वर्ग चालू करण्याबद्दल विचारणा केली. काहीतरी करायची उर्मी असल्याने तिने शिकवणी वर्ग सुरू केले. ते करत असताना बाहेरून एम.ए. केले तिथेही पहिली श्रेणी मिळवून बुद्धीची चुणूक तिने दाखवली.

प्राध्यापकांनी तिच्यातील अभ्यासूवृत्ती जाणून घेवून पी.एच.डी साठी प्रोत्साहन दिले पण त्यासाठीही घरातून परवानगी न मिळताच खोडा घातला गेला. त्यामुळे वैद्यकीय नाही परंतु साहित्यातली डॉक्टरेट पदवी मिळण्याचे स्वप्नही अधुरेच राहिले. सरकारी खात्यातील परीक्षा दिल्यापैकी ‘महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस’ च्या पूर्व परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना अनेक संकटे आली त्यामुळे तो प्रयत्न तिथेच थांबला. उर्जा दुय्यम मंडळाची लेखी परीक्षा पास होऊन मुलाखत दिली. घरातून नोकरी करण्यासाठी पाठिंबा नव्हता त्यामुळे मुलाखतीचा निकालही पाहिला गेला नाही. सतत काहीतरी करू देण्याची वृत्ती गप्प बसू देत नव्हती. तिला बालपणापासून वाचनाची आवड असल्यामुळे सातत्याने काहीतरी लिहायची उर्मी असे. त्यातून सुचलेले १०० निबंध तिने वहीत लिहून ठेवले होते. मुलांच्या परीक्षा जवळ आल्या की क्लासच्या विद्यार्थ्यांपुढेही ती तीच वही वाचायला ठेवत असे. एकदा एका मैत्रिणीने हे पाहिले आणि तिला बोलली, “तू वही पुढे ठेवण्याऐवजी त्याचे पुस्तकच का छापत नाही?’’ पुस्तक प्रकाशनाविषयी तिला काहीच माहिती नव्हती म्हणून ती मैत्रीणच निबंध वही घेवून एका प्रकाशकांकडे गेली. त्यांना निबंध आवडले नि त्याचे पुस्तक छापण्याची तयारीही त्यांनी दाखवली.

पी.एच.डी. न करताच ती लेखिका बनली. तिची शालेय पाठ्यक्रमाची सात पुस्तके प्रकाशित झाली. पुढे ज्ञानसिंधू, शॉपिझेन, अजिंक्य अशा कितीतरी प्रकाशनाकडून कथा, लेख , ललित, अभंग, लावणी, गीतलेखन, कविता, बालकविता, बालकथा अशा कितीतरी प्रकारातील संग्रह तिच्याकडून लिहिले जावून छापले गेले. काहीतरी केल्याचे समाधान आज तिच्या चेहर्‍यावर आहे. मुलेही उच्च शिक्षण घेऊन आपापल्या पायावर उभी आहेत. ती तिच्या संसारात रमली. आज विरोध करणारे पतीही तिच्या प्रगतीसाठी प्रशंसा करतात. मुले आईने घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून तिचा शब्द प्रमाण मानतात. आणखी काय हवे? जीवनाचे सारे सुख यातच तर दडले आहे. आता पुढील आयुष्य सुखासमाधानात जावे हीच अपेक्षा ठेवून तिच्या जीवनाची पुढील वाटचाल चालू आहे. आज जीवन व्यतित करत असताना संचिताचे साफल्य झाल्याचा आनंद तिला आहे.

कोरोनाकाळात लॉकडाऊन असल्यामुळे कुठेही बाहेर जावून भटकणे, चित्रपट पाहणे शक्य नव्हते त्या काळात वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तिच्या बुद्धीला अजून धार चढली होती. सातत्याने लिखाण, वाचन करत तिने अफाट साहित्यनिर्मिती केली. आजघडीला तिची ७५ पुस्तके प्रकाशित केली आहेत . तृप्तीची भावना आणि इच्छापूर्ती झाल्याचे समाधान तिला आहेच पण तिची जगण्याची दिशाही बदललीय. तिच्या अफाट लेखनाचा डंका संपूर्ण साहित्यविश्वात गाजत आहे. आज उत्तम लेखनासाठी तिला प्रचंड पुरस्कार, प्रमाणपत्रे, रोख बक्षीसे, कर्तृत्ववान नारी पुरस्कार मिळाले आहेत. ‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते’ या सुभाषिताचा प्रत्यय आज भारतीताईंकडे पाहून येतो.

इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही अशक्य नाही याचा प्रत्यय अशा काही महिलांच्या यशोगाथा पाहिल्या की सतत येत रहातो. भारतीताई जिद्द, कष्ट, सातत्य, इच्छाशक्तीच्या जोरावर आज अनेक कौटुंबिक अडथळे पार करत आपला संसार सांभाळून, आपली व इतरांची मुलं घडवत, आपले स्वतःचे साहित्यिक विश्व निर्माण करत आपले नाव महाराष्ट्रात दुमदुमत ठेवतात. अशा या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पर्यावरण संवर्धनाचे आदर्शवत उपक्रम

स्वतः बद्दलचे सत्य जाणण्यासाठीच सत्यवादाचे तप

वेगळी वाट चोखळणारी नवदुर्गा …वर्षा माळी

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading