September 13, 2024
Suvarnasandhya Preservers of the revolutionary movement
Home » परिवर्तनवादी चळवळीचा वसा जपणाऱ्या सुवर्णसंध्या
मुक्त संवाद

परिवर्तनवादी चळवळीचा वसा जपणाऱ्या सुवर्णसंध्या

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ-जगताप यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.
मो. 9823627244

आयुष्यातील समस्यांवर मात करत, प्रश्नांना सामोरे जात सकारात्मक जीवन कसे जगावे.? हे डॉ. सुवर्णसंध्या ताईंकडे पाहून शिकतां येते. लग्नानंतर आलेले आजारपण, पती डॉ. चंद्रशेखर व त्यांच्या आईंनी दिलेले पाठबळ सुवर्णसंध्या ताईंना जगण्याची नवी उमेद देऊन गेले. डॉक्टरी पेशा सोडून ताई शेती, पर्यावरण, निसर्ग व पुस्तकात रमू लागल्या. बारामती जवळील शिरवली या खेड्यात त्या वास्तव्यास आहेत. त्या आज लेखिका, कवी, पर्यावरण अभ्यासक, व्याख्याता, अंधश्रध्दा निर्मूलन अशा विविध क्षेत्रात त्या सक्रिय आहेत.

बालपणापासूनच ताईंवर त्यांच्या वडीलांनी वाचन संस्कार केला त्यामुळे आज त्या त्यांचे विचार निर्भीडपणे मांडू शकतात. ‘आई वडील, पुस्तके व आयुष्यात भेटलेली मोठी माणसं मला घडवत गेली.’ हे ताई अभिमानाने सांगतात. त्यांच्या आयुष्यातील मोठ्या माणसांची नावे जरी पाहिली तरी त्या आज करत असलेले काम व त्या मांडत असलेले विचार याची आपल्याला कल्पना येऊ शकते. नववीत असताना ताईंनी व. पु. काळे यांना पुस्तक आवडल्याचे पत्र लिहिले. त्याचे त्यांना उत्तर आले त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला व लेखकांना पत्र लिहायचा त्यांना छंदच जडला.

विजय तेंडुलकर, सुनिता देशपांडे, अमृता प्रीतम अशा लेखकांचा प्रभाव ताईंवर पडला. १२ वीत असताना ज्येष्ठ विचारवंत व इतिहासतज्ञ डॉ. आ. ह. साळुंखे यांचे पहिले पुस्तक आस्तिक शिरोमणी चार्वाक वाचले आणि या पुस्तकाने वाचनाचा, विचारांचा दृष्टीकोन बदलला. डॉ. साळुंखे सरांची सर्व पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. डॉ. नरेंद्र दाभोळकरांना ऐकले आणि ताई अंनिसच्या कार्यकर्त्या बनल्या. कामास सुरुवात केली तेव्हा ग्रामीण व शहरी भागातही स्त्रियांवर अंधश्रध्देचा किती पगडा आहे हे लक्षात आले.

वाचन, लेखन, विविध विषयांवरील व्याख्याने यासोबतच ताई निसर्ग जागर प्रतिष्ठान संस्थेमार्फत निसर्ग व पर्यावरण जागृती, पर्यावरण शिक्षण कार्यक्रम, वृक्षसंवर्धन व महत्व, वृक्षारोपण, देवराई प्रकल्प अशा विविधांगी उपक्रमांत ताई सक्रिय असतात. ताईंनी २०१५ पासून मराठवाड्यातील काही शेतकरी कुटुंब दत्तक घेतली आहेत. सन २०१९ मधे सातारा जिल्ह्यातील महापुरात मोरेवाडी गावाला समाजातून भरीव मदत करून त्या गावाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरु आहेत. पूरग्रस्त परिस्थितीत आजूबाजूच्या गावात मेडिकल कॅम्प उभारून मदत पोहोचवली.

मराठी साहित्य व पुरोगामी वैचारिक साहित्याचा अभ्यास व लेखन ताईंचे सातत्याने सुरु असते. तसेच शेतकरी प्रश्नांचा अभ्यास व त्यावरील लेखन व जनजागृती, वंचितांची आर्थिक दुर्बलता, सामाजिक व्यवस्था व सरकारी धोरणांचा अभ्यास, निसर्ग, पर्यावरण, पक्षी यावरील लेखन, व्याख्याने, कार्यशाळांचे आयोजन, शहरी लोकांचा शेतीविषयक दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न ताईंचा सतत सुरू असतो.

फक्त प्रबोधन करून ताई थांबत नाहीत तर त्या ते सर्वच बाबतीत अंमलात आणतात. ताईंनी घराभोवती चिमण्यांची संख्या वाढावी म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी घरटी बनवून प्रयत्न केले, त्याला यश मिळून त्यांच्या घरी १५० च्यावर चिमण्या व ६३ प्रकारचे विविध पक्षी वास्तव्यास आहेत. स्थानिक वृक्ष व जैवविविधतेचे संवर्धन महत्व व त्याचे गांभीर्य वाढवण्यासाठी ताई विशेष प्रयत्नशील आहेत.

वाचन व लेखन हा त्यांचा छंद असल्याने त्यांची स्वतःची वैयक्तिक लायब्ररी आहे. स्त्री प्रश्न, अंधश्रद्धा, पर्यावरण, शेती, पुरोगामी विचार, परिवर्तनवादी चळवळ इत्यादी विषयांवर त्यांचे लेखन व कविता आहेत. ताईंनी स्वतःचे आजारपणाचा बाऊ न करता त्याचा स्वीकार करून त्या आवडीच्या कामात व्यस्त राहातात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या सर्व मित्र परिवार, नातेवाईक व हितसंबंधीयांना डॉ. आ. ह. साळुंखे यांची पुस्तके भेटीदाखल देतात. त्यांचा परिवर्तनवादी विचार व सत्य इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.

आजाराला मित्र बनवून कार्यरत कसे राहावे, हे ताईंकडून शिकण्यासारखे आहे. अशा या कर्तृत्ववान जिजाऊ-सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

संघर्षावर सतत मात करत वाटचाल करणारी जयश्री मुंजाळ

पर्यटनातून स्थापत्य शास्त्राचे शिक्षण

हा तर ग्रामीण कथेचा सन्मान

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading