November 21, 2024
accept proper way of knowledge article by rajendra ghorpade
Home » योग्य तेच स्वीकारा…
विश्वाचे आर्त

योग्य तेच स्वीकारा…

चुकीचे पाऊल पडले तर वेळीच सुधारायला हवे. मांत्रिक, तांत्रिक काही सोपे मार्ग सांगतात. पण ते मार्ग अयोग्य आहेत. चुकीचे आहेत. अशा गोष्टी ह्या अंधश्रद्धेच्या आहेत. खरा मार्ग कोणता आहे. याचा विचार करायला हवा. खरे संत माणसामध्ये दडलेले चैतन्य स्वीकारतात.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।। 126 ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा

ओवीचा अर्थ – या देहादि प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे. तत्त्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेंच ग्रहण करतात.

चांगल्या गोष्टी निवडण्याची सवय हवी. यामुळे सकारात्मक विचारसरणी होते. मनाला नकाराची सवय लागली तर विचारसरणीही नकारात्मक होते. हे नको, ते नको. असे करता करता काहीच करायला नको. असा मत प्रवाह होतो. नेहमी नाकारत राहीले तर इतरही तुम्हाला नाकारतात हे लक्षात घ्यायला हवे. यासाठीच विचार सकारात्मक असायला हवेत. यामुळे मन आशावादी राहाते. उत्साही राहाते.

नकारात्मक विचाराने मन खिन्न, दुःखी होते. निराशवादी बनते. यातूनच मग आत्महत्या घडतात. नव्या पिढीमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबिक वाद, नैराश्‍य, कर्जबाजारीपणा, अपयश ही यामागची कारणे सांगितली जातात. पण आत्महत्या हा जीवनाचा शेवटचा पर्याय नाही. संघर्षमय जीवनाची अखेर आत्महत्येत असू नये. धीर सुटता कामा नये. वाळुचे कणही रगडता तेल गळे तसे सतत संघर्ष करत राहीले तर निश्‍चितच त्यात यश मिळते. यासाठी सतत सकारात्मक विचार करत राहायला हवे.

आज हे साध्य झाले नाही. पण उद्या ते मी हस्तगत करेण अशी आशा बाळगायला हवी. पण यासाठी निवडलेला मार्ग हा सत्याचा असेल. हे ही विसरता कामा नये. उद्दिष्ठ साध्य होत नाही म्हणून अनैतिक मार्ग स्वीकारणे योग्य नाही. अयोग्य मार्ग कधीही योग्य होऊ शकत नाही. त्याची सवय लागते. आज भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे असे म्हटले जात आहे. पण तो मार्ग शेवटी अयोग्यच आहे. एकदा का त्यात सापडला तर सर्व जीवन निरर्थक होते. यासाठीच मार्ग निवडतानाच योग्य ती काळजी घ्यायला हवी.

चुकीचे पाऊल पडले तर वेळीच सुधारायला हवे. मांत्रिक, तांत्रिक काही सोपे मार्ग सांगतात. पण ते मार्ग अयोग्य आहेत. चुकीचे आहेत. अशा गोष्टी ह्या अंधश्रद्धेच्या आहेत. खरा मार्ग कोणता आहे. याचा विचार करायला हवा. खरे संत माणसामध्ये दडलेले चैतन्य स्वीकारतात. त्यालाच परमेश्‍वर मानतात. त्याचाच ध्यास करतात. काशी, मथुरेची वारी करुनही जे हस्तगत होत नाही ते एका जागी शांत बसून ध्यान करण्याने मिळते. प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करण्याऐवजी मनाने केलेला नमस्कार देवाजवळ लगेच पोहोचतो. यासाठी मनामध्ये तो भाव असायला हवा.

देहाच्या या प्रपंचात आत्मा आला आहे. तो गुप्त रुपाने आहे त्याची ओळख करून घेणे गरजेचे आहे. त्याचा अनुभव यायला हवी. त्याची अनुभुती घ्यायला हवी. ज्ञानाने तो ओळखला जाईल तेव्हाच आपण आत्मज्ञानाकडे प्रवृत्त होऊ. त्याचे नित्य स्मरण, त्याची नित्यता असणे म्हणजे आपण ब्रह्मसंपन्न होणे आहे. खरे संत हेच ओळखतात. हे सत्य ते स्वीकारतात आणि त्याचेच नित्य स्मरण ठेऊन जीवन जगतात. त्याच्या अनुभुतीत राहतात. त्या आत्मज्ञानाने मग इतरांनाही आत्मज्ञानी करतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading