नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे बहादूरगड हा किल्ला आहे. संभाजीराजे यांना संगमेश्वर येथे पकडून याच गडावर ठेवण्यात आले होते. काही शंभुभक्तांनी या गडाचे नामकरण धर्मवीरगड असे केले आहे.
अरुण बोऱ्हाडे
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीगंधात न्हाऊन निघालेल्या पेडगावच्या भुईकोट किल्ल्याला पाहण्याची संधी लाभली. बहादूरगड तथा धर्मवीरगड भीमा नदीच्या काठी वसलेला हा किल्ला देवगिरीच्या यादवांनी तेराव्या शतकात बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले यांच्याकडे या किल्ल्याची देखभाल होती. पुढे हा किल्ला दीर्घकाळ निजामशाही आणि त्यानंतर मोघलांकडे राहिला. सुमारे ११० एकर क्षेत्रात विस्तारलेल्या या किल्ल्यात आता पडक्या इमारतींचे जीर्ण अवशेष, काही जुनी मंदिरे आणि बहुतांशी तटबंदी शिल्लक आहे. राजमहालाचा परिसर काही अवशेषांसह जीर्णावस्थेत इतिहासाची साक्ष देत आहे. याठिकाणी एक प्रवेशद्वार तग धरून उभे आहे.
गावातून किल्ल्यात प्रवेश करतानाच डावीकडे मारुतीरायाची भव्य मुर्ती आपले लक्ष वेधून घेते. आतमध्ये उजवीकडे भैरवनाथ मंदिर आहे. या पुरातन मंदिराचा अलिकडच्या काळात जीर्णोद्धार केल्याचे दिसते. किल्ल्यामध्ये लक्ष्मीनारायण आणि इतरही मंदिरे आहेत. किल्ल्यात सर्वत्र बाभळी आणि जंगली झाडेझुडपे पाहायला मिळतात.
छत्रपती संभाजीराजांना कोकणातील संगमेश्वर येथून कैद करून याठिकाणी आणण्यात आले. राजांचा व त्यांचे साथीदार कवी कलश यांचा येथे औरंगजेबाने छळ केला. इथल्या मातीच्या कणाकणात, दगडधोंड्यात आणि भीमेच्या पाण्यात आजही शंभूराजांच्या शौर्याची, स्वाभिमानाची आणि औरंगजेबाच्या कौर्याची स्मृती ऐकू येते. त्या इतिहासाचे स्मरण होताच, हाताच्या मुठी त्वेषाने एकवटतात. काही शंभूभक्तांनी या किल्ल्याचे “धर्मवीरगड” असे नामकरण केले आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे हा किल्ला आहे.