November 21, 2024
Accomplishments with academics Dr Leela Patil article on Sant Tukaram Abhanga
Home » अभ्यासासी संग कार्यसिद्धी
मुक्त संवाद

अभ्यासासी संग कार्यसिद्धी

ओले मूळ भेदी खडकाचे अंग ।
अभ्यासासी संग कार्यसिद्धी ॥ १ ॥
नव्हे ऐसें काही नाही अवघड ।
नाहीं सईवाड तोंच वरि ॥ २ ॥
दोरे चिरा कापे पडिला काचणीं।
अभ्यासें सेवनीं विष पडे ॥ ३ ॥
तुका म्हणे कैंचा बैसण्यासी ठायी।
जठ्ठरी बाळा वाव एकाएकीं ॥४॥

चंचलता हा मनाचा गुणच आहे. ‘मन वढाय वढाय…’ ही उक्ती सर्व परिचित आहे. तसेच ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ याचा तर वरचेवर अनुभव घेणारे अनेकजण आणि तसे बोलून दाखविणारेही तितकेच. ‘मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।’ असा उपदेश करणारे आणि तसे वागण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांची संख्या तर कमी नाहीच. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीच. ‘मन माझे चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाही’ जेव्हा मनोजयाचे प्रयत्न विफल होतात तेव्हा अशी अवस्था होते. ‘मना सज्जना भक्तीपंथेचि जावे तरी श्रीहरी पाहिजे ते स्वभावे’ अशा पंक्तीमधून भावस्थैर्य, समाधानाची अनुभूती लाभावी म्हणून भक्तिमार्ग स्वीकारण्याची गरज संत तुकारामांसह अन्य संत मंडळींनी प्रतिपादन केली आहे. मनाची विविध रूपं, अवस्था, अनुभव, अनुभूती सांगणारे काव्य ही जणू अक्षरओळख झालेल्या इसवी सनापासून ते आजतागायत वाचायला मिळते.

‘मन’ याबद्दल विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे प्रयत्नाच्या बाबतीत मनाची अवस्था फार महत्त्वाची ठरते. मन ताब्यात आणण्यासाठी काही केले नाही तर विषयामागे सतत भरकटत जाण्याची शक्यता असते. त्याच्या अंगभूत शक्तीचा अपव्यय होईल. थोडा प्रयत्न केला तर मनावर ताबा मिळविता येईलच याची खात्री नाही. योग्य, हितकारक, उचित अशा विषयाकडे ते लागत नाही. पण तेवढ्याने निराश होण्याचे कारण नाही. चिकाटी तीही दीर्घकाळ ठेवून प्रयत्न केल्यास यश मिळते. कोणतेही लहान-मोठे काम योग्य प्रकारे करायला हवे. अजिबात शक्यच नाही असे जगात काही नसते, असा एक सिद्धांत ढोबळमानाने सांगता येतो. अर्थात प्रत्येक व्यक्तीची शक्ती वेगवेगळी असते. शक्ती घटक महत्त्वाचा असतो.

अभ्यासासी संग कार्यसिद्धी असे तुकाराम या अभंगात म्हणतात. त्यानुसार अध्यात्ममार्गात यम-नियम, प्राणायम, प्रत्याहार हे साधण्यासाठी आसनादी पूर्वाभ्यास करणे हा भाग महत्त्वाचा असतो. शिवाय हा भाग सर्वसामान्यपणे साधकाला जमणारा असतो. कठीण आहे, कठीणच आहे अशी ओरड करून प्रयत्न सोडणे योग्य नाही. धीरेपणाने, धीमेपणाने चिकाटीने अभ्यास चालू ठेवावा, असे तुकाराम या ठिकाणी सांगत आहेत. अवघड म्हणून प्रयत्नच सोडून देण्याची मानसिकता इष्ट नाही. मनापासून प्रयत्नाची गरज असते. लौकिक अर्थाने नव्हे पण व्यावहारिक अर्थाने संकटाला सामोरे जाण्याची ताकद असणे म्हणजे ते कडू विषज्वर पचविता येणे शक्य असते.

तुकारामांनी या अभंगात एक मार्मिक उदाहरण दिले आहे. हृदयस्पर्शी व मातृत्व महती सांगणारे सुद्धा वाटते. हा दृष्टांत म्हणजे आईच्या पोटात जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा पुढे नऊ महिने बाळ मावेल अशी जागा नसते. गर्भाशयातला तो अंकुर आणि इतर इंद्रियांना बाजूस सारून वाढत असतो. अन्य अवयवांना जणू ढकलून जागा करून घेतो.

दगडावर सुंभ सतत दाब पडत ठेवले तर दगडाचे दोन भाग होतात. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे…..’ अशाच उक्तीप्रमाणे ही प्रक्रिया घडते. माणूस थोडे थोड विष पचनी पाडीत पुन्हा जास्त प्रमाणात सेवन करूनही जिवंत राहतो. एखाद्या शिळेवर पाण्याची धार सतत पडत असली तर शिळेची तेथे झीज होते. तिला छिद्र पडते. ही उदाहरणे तर तशी परिचित आहेत. प्रयत्नाचे महत्त्व सांगताना तुकाराम त्याचा मनाशी संबंध जोडतात. प्रयत्न व मन याची जोड घालतात. परमार्थात चिकाटी आवश्यक आहे. भक्ती मार्ग हा सुद्धा प्रयत्नातून साध्य होतो. प्रयत्नाचा वेग वाढविण्यासाठी मन स्थिर हवे, असेही अप्रत्यक्षपणे तुकारामांना सुचवायचे आहे.

प्रयत्नाचे महत्त्व कोणीही अमान्य करीत नाही. दैनंदिन व्यवहारात तर प्रयत्नाशिवाय यशाची शक्यता जवळजवळ नसतेच. अध्यात्म, परमार्थात चिकाटी हवी. त्याचबरोबर मनाची एकाग्रता हवी. भक्ती हा सुद्धा तसा सहज सोपा नाही. पण प्रयत्नाची कास धरल्यास खरा भक्तीचा मार्ग सापडतो. भक्तीत उत्कट अनन्यता हवी.

डॉ. लीला पाटील, कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading