July 21, 2024
Why should rain gauges be installed in every village
Home » प्रत्येक गावात पर्जन्यमापक का बसवायला हवा ?
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रत्येक गावात पर्जन्यमापक का बसवायला हवा ?

आजही देशातील ६३ टक्के लोकांचे (९० कोटी लोकसंख्या) जीवन आणि अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे आणि शेती पाण्यावर आणि पाणी पावसावर अवलंबून !! पाणी नियोजनात सर्वांत पहिला टप्पा येतो पाऊस मोजण्याचा. काय यंत्रणा आहे आपल्या राज्यात पाऊस मोजण्याची ?

अधिकृतपणे तालुक्याला तीन (एका मंडलामध्ये एक) म्हणजेच ५० गावांसाठी शासनाचा एक पर्जन्यमापक !! त्यावरचे रीडिंग पन्नास गावांसाठी ग्राह्य धरणार. प्रत्यक्षात एकाच गावात असमान पाऊस पडतो. हिवरे बाजारसारख्या पाणी नियोजन करण्यात अग्रेसर असणाऱ्या गावात तीन ठिकाणी पर्जन्यमापक आहेत. त्या गावात तीन ठिकाणच्या पावसामध्ये फरक असतो. प्रत्येक गावात किमान एक तरी पर्जन्यमापक असला पाहिजे. याचा फायदा असा की…

 • गावात वेळोवेळी पाऊस किती झाला आहे हे मोजण्यासाठी.
 • गावात अतिवृष्टी झाली तरी वा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला तर त्याची अधिकृत नोंद होण्यासाठी. कारण अनेक शासकीय उपाययोजनांचा आधार अशी आकडेवारी असते.
 • पेरणी करण्या इतका पाऊस झाला की नाही हे कळण्यासाठी. अन्यथा, पेरलेले वाळून जाते, दुबार पेरणी करावी लागते.
 • गाव, शिवारातील पाण्याची आवक मोजण्यासाठी.
 • गाव हद्दीतून किती पाणी वाहून जाते, त्यातले किती अडवू शकतो, किती मुरवू शकतो याची शास्त्रीय आकडेवारी कळण्यासाठी. ही आकडेवारी पाण्याचा हिशेब लावण्यासाठी आवश्यक.
 • गावात पूर्ण पावसाळ्यात किती पाऊस पडला आहे त्यावर आधारित वर्षभराचे नियोजन करण्यासाठी. उदा. कडवंची, खरपुडी (जि. जालना) यांसारखी उपक्रमशील गावं पावसाळा संपला नियोजन करतात. सरासरी इतका पाऊस झाला तर तीन पिके घ्यायची, सरासरीपेक्षा पंचवीस-तीस टक्के पाऊस कमी झाला की दोनच पिके घ्यायची आणि सरासरीच्या पन्नास टक्के वा त्यापेक्षा कमी झाला की फक्त चारा पिकाची लागवड करायची.
 • काही वेळा पीकविम्याचे पैसे मिळणार की नाही ते पावसाचे आकडे ठरवते. गावात भरपूर पाऊस होऊन नुकसान झाले आणि जिथे शासनाचा अधिकृत पर्जन्यमापक आहे तिथे अजिबात झाला नाही किंवा कमी झाला तर तुमच्या गावातल्या जास्त पावसाची नोंद कशी ग्राह्य धरणार?
 • अनेक गावांत लघुपाटबंधारे किंवा मध्यम तलाव आहेत ते किती पावसाने भरतात, किती पावसाने पूर येतो याची नोंद ठेवता येते. याचा उपयोग संकट काळात नियोजनासाठी, नुकसान कमी करण्यासाठी होऊ शकतो. तसेच कमी पावसाच्या वर्षातही पाणी नियोजनासाठी करता येतो.
 • मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हे पर्जन्यमापक असतात. पण तिथे त्यांची संख्या खूप वाढवायला हवी, कारण एकाच भागात (डोंगरावर) कमी वेळात खूप पाऊस पडून डोंगर ढासळू शकतो. मनुष्यहानी झाल्यावरच त्याच्या बातम्या होतात.
 • ओढ्याचा पूर, पुरामुळे पुरामुळे बाजूच्या शेताचे नुकसान पूर्वसूचनेमुळे काही प्रमाणात टाळू शकते.
 • जिरायती गावे, कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये याची खूप आवश्यकता आहे. एकूण पावसाचे दिवस, दोन पावसांतील अंतर, पावसाची तीव्रता, दिवसवार, आठवडावार आणि महिनावार पावसाचे मोजमाप हे काही वर्षे केले, की या नोंदीचा संदर्भ घेऊन गावच्या पावसाचा पॅटर्न काही प्रमाणात का होईना निश्चित करता येतो. त्यावर आधारित वार्षिक नियोजन अधिक अचूकतेकडे जाईल.
 • पावसाच्या तीव्रतेवर जमिनीतील हवेतील आर्द्रता बदलते, त्यामुळे पिकावर पडणारे बुरशीजन्य रोग किंवा कीड, अशा इतर समस्यांची चाहूल आणि जाणीव पावसाची आकडेवारी समजली की लवकर होते. त्यावर आधारित खते, कीटकनाशके आणि इतर उपाययोजना करण्यास पुरेसा अवधी मिळतो.

सतीश खाडे, पुणेDiscover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

50 पर्यटन स्थळांचा ‘पर्यटनाचे संपूर्ण पॅकेज’ म्हणून विकास करणार

श्रद्धा असावी, पण ती डोळस हवी

Navratri Biodiversity Theme : जैवविविधतेची मोरपंखी छटा…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading