आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता, आज दि. १३ ऑगस्ट रोजी होत आहे त्यानिमित्ताने…
डॉ. सुकृत खांडेकर
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ, नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, कलाकार, शिक्षक, संव्यासची संपादक, लोकप्रतिनिधी अशा विविध रूपातील त्यांनी आपल्या जीवनात भूमिका वठवल्या व त्या यशस्वी करून दाखवल्या. अत्रे यांनी प्रत्येक भूमिकेतून वावरताना त्या व्यक्तिमत्त्वाला आणि विषयाला शंभर टक्के न्याय दिला. विविध रूपातील त्यांची कितीही ओळख करून दिली तरी शब्द कमी पडतील ही अतिशयोक्ती नव्हे तर वास्तव आहे. पत्रकार म्हणून मला नेहमीच मराठामधून सरकारला आपल्या लेखणीने गदागदा हलविणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शब्द सामर्थ्यांचे आकर्षण वाटले.
आचार्य अत्रे यांचे अग्रलेख, त्यांची भाषणे, त्यांचे लेख व मृत्यू लेख कितीही वेळा वाचले तरी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात. मी असा झालो, अत्रे विचार, अत्रेय वाणी, अत्रे टोला, अत्रे प्रहार, हास्य कट्टा, हास्य तुषार, जय हिंद जय महाराष्ट्र, वाघनखे, अत्रे वंदन, अत्रेवेद, मी अत्रे बोलतोय, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा, कऱ्हेचे पाणी अशा अनेक पुस्तकांतून अत्रे साहेबांनी केलेले लिखाण अजरामर आहे. त्यांचे अग्रलेख, लेख वाचताना पत्रकार किंवा वाचक म्हणून वेगळे समाधान व आनंद मिळतोच पण आजही त्यांची पुस्तके व त्यांचे लेखन मला नेहमीच प्रेरणादायी आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे व मराठा ही दोन बलाढ्य शक्तिस्थळे होती हे कुणालाही नाकारता येणार नाहीत. आचार्य अत्रे यांचे संपादकीय कर्तृत्व अफाट होते. नवयुग चित्रपट कंपनीतर्फे अत्रे चित्र निर्मिती ते करीत असत. या कंपनीचे स्वत:चे साप्ताहिक असावे असे त्यांनी ठरवले व त्याचे नाव नवयुग हेच निश्चित केले. नवयुगचा पहिला अंक २१ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाला. हे साप्ताहिक पुण्यातून सुरू झाले. स्वत: अत्रे त्याचे संपादक होते. अत्रे उवाच हे सदर त्यांनी पहिल्या अंकापासून सुरू केले. नवयुगमधून साहित्य, विनोद आणि टीका यांना महत्त्व दिले. खरे तर अत्रे तेव्हा काँग्रेस पक्षात होते. पण या साप्ताहिकाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला वाहून घेतले आणि नवयुगचे काँग्रेसवादी किंवा काँग्रेसधार्जिणे धोरण बदलले.
आचार्य अत्रे यांची लेखणी तलवारीपेक्षा धारधार होती. कोणाची व कशाचीही पर्वा न करता ते शब्दांतून घाव घालीत असत. विरोधकांना व सरकारला धडकी भरविण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते. त्यांच्या लेखणीचा आवेश तर जबरदस्त होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मराठी माणसाचा आवाज कमी पडत होता, हे त्यांच्या लक्षात आले. मोठी व अन्य भाषिक वृत्तपत्रे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या विरोधात बातम्या देत होती. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या परिषदेतच अत्रे यांनी वर्तमानपत्र सुरू करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यावर अत्रे म्हणाले, आपण मला मदत करणार असाल, तर मी नवे दैनिक सुरू करतो. टाळ्यांच्या कडकडाटांत त्यांचे स्वागत झाले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी नवीन दैनिक सुरू करण्यासाठी एक पेटी फिरविण्यात आली, तेव्हा त्यात त्या काळी २२ रुपये १२ आणे जमा झाले. पण अत्रे डगमगले नाहीत. अवघ्या दीड महिन्यांत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील मराठी आवाज म्हणून मराठा हे वृत्तपत्र सुरू झाले. कॉम्रेट श्रीपाद अमृत डांगे यांनी व्यक्तिश: नवे दैनिक सुरू करण्यासाठी ३ हजार रुपये दिले. अत्र्यांनी सोळा-सतरा वर्षे नवयुग साप्ताहिक चालवले. १९४७ मध्ये त्यांनी जयहिंद हे सायं दैनिक सुरू केले. पण ते जेमतेम वर्षभर चालले. अत्रेंना दैनिक सुरू करण्याचा व चालविण्याचा अनुभव नव्हता.
आर्थिक पाठबळ नव्हते. कार्यालयाला जागा, छापखाना, कागद, यंत्रसामग्री, संपादक वर्ग, भांडवल अशी पुरेशी तयारी नसताही मराठा सुरू झाला. १२ नोव्हेंबर १९५६ रोजी मराठाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. खपाचा आकडा सुरुवातीलाच पंचवीस हजारांवर गेला. या वृत्तपत्राचे नाव मराठा ठेवावे, असे सेनापती बापट यांनी सुचवले होते. मराठाच्या मुखपृष्ठावर शिरोभागी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे ब्रिदवाक्य होते. अग्रलेखाच्या वरती, भले तरी देऊन कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा, ही संत तुकारामांची उक्ती होती. मराठी जनतेचा आवाज हे अग्रलेखाचे सूत्र होते.
मराठाचा दणकेबाज व घणाघाती प्रचार नसता तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न इतक्या लवकर साकार झाले असते का, अशी काहींना शंका वाटावी, अशी प्रभावी कामगिरी मराठाची होती. अत्रे यांच्या लेखणीने विरोधकांवर असे प्रखर हल्ले केले गेले की, ते जखमी झालेच पाहिजेत. लोकांमध्ये त्यांच्याविषयी संताप प्रकट झाला पाहिजे. स. का. पाटील हे मुंबई काँग्रेसचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जात असत. जोपर्यंत आकाशात सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी त्यांनी भविष्यवाणी वर्तवली होती, त्याच स. का. पाटलांवर अत्रे यांनी नासका पाटील असा घणाघाती अग्रलेख लिहून त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील कार्यकर्त्यांवर निर्घृण गोळीबार केला, आंदोलकांच्या रक्ताचे सडे मुंबईच्या रस्त्यावर पडले होते.
अत्र्यांनी मोरारजींवर मर्डरजी असा अग्रलेख लिहून संताप प्रकट केला. मधू लिमये यांच्यावर अधू मेंदूचा मधू, शंकरराव देवांवर शंखदेव, असे अग्रलेख लिहिले. फलटणला यशवंतराव चव्हाण, नाईक-निंबाळकर आणि गणपतराव तपासे यांची बैठक झाली. हे तिघेही संयुक्त महाराष्ट्र विरोधक म्हणून प्रसिद्ध होते. महाराष्ट्रापेक्षा पं. नेहरू मोठे आहेत, असे वक्तव्य त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी केले होते. अत्रेंनी या तिघांना झोडून काढणाऱ्या अग्रलेखाचे शीर्षक दिले होते – फलटणचे तीन हरामखोर… मामांच्या मौजा, या मथळ्याखाली अत्रेंनी मराठात झणझणीत अग्रलेख लिहिला होता. अग्रलेखात अत्रे लिहितात-राज्यसभेवर मामा वरेरकर यांची राष्ट्रपतींनी आणखी सहा वर्षांसाठी नेमणूक केली.
गेली सहा वर्षे ते राज्यसभेवर खासदार आहेतच. या काळात मामांनी राज्यसभेत काय केले हे आम्हास ठाऊक नाही. मामा हे सरकार नियुक्त सदस्य असल्याने सरकारच्या बाजूने हात वर करण्यापलीकडे ते तरी दुसरे काय करू शकणार? ते खासदार होते, तेव्हा महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू होता. पण संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने त्यांनी एखादे अक्षर उच्चारले असेल तर शपथ… सहा वर्षांच्या राज्यसभेतील काळात मामांनी महाराष्ट्राला काडीची मदत केली नाही. उलट पायात पाय घालण्याची संधी कधी सोडली नाही.
८० वर्षांच्या मामांनी राज्यसभेत जाऊन काही काम करावे अशी कोणाची अपेक्षा नाही, निदान महाराष्ट्राच्या विरोधात तरी तेथे उपद्व्याप करू नयेत.
१९७० च्या दशकात मुंबईतील बेस्ट बसेसवर शिवाजी विडीच्या जाहिराती झळकत होत्या. तेव्हा अत्रेंनी शिवाजी विडी हा अग्रलेख लिहून सरकारला, महापालिकेला व बेस्ट प्रशासनाला झोडपून काढले होते. त्यात म्हटले होते, साबळे-वाघिरे हे दोघेही मराठी आई-बापाच्या पोटी जन्माला आले असावेत. पण त्यांना शिवाजी महाराजांविषयी काडीमात्र प्रेम नाही. बसच्या दुसऱ्या मजल्यावरून एखादा प्रवासी ओकला किंवा पान थुंकला तर त्याचे ओघळ आपल्या बापाच्या तोंडावर सांडले असल्याच्या यातना त्या दोघांनाही होत नाहीत, याचे आम्हाला नवल वाटते.
शिवाजी महाराजांचे पुतळे ठिकठिकाणी उभारणाऱ्या जनतेचे शिवप्रेम, कुठे उकीरडे फुंकायला गेले आहे काय ? शिवाजी विडी ओढली नाही तर त्यांच्या तोंडाला महारोग होणार आहे का ? शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या साबळे-वाघिऱ्यांना जर ताळ्यावर आणायचे असेल, तर मराठी जनतेने शिवाजी विडीवर बहिष्कार घातला पाहिजे. शिवाजी विडीची जाहिरात मुंबई शहरात दिसणारच नाही, असा निर्धार जनतेने व महापालिकेने केला तरच साबळे-वाघिरे यांचे डोळे उघडतील.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर मराठ्यातून सतत तोफा डागणाऱ्या अत्रेंनी त्यांच्या मृत्यूनंतर पंडितजींच्या विशाल कर्तृत्वाला मानवंदना देणारे सलग तेरा दिवस तेरा अग्रलेख लिहिले. सूर्यास्त म्हणून त्यांचे शीर्षक होते.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राविषयी यशवंतरावांनी जी दिल्ली धार्जिणी भूमिका घेतली त्यावरून अत्रे यांनी त्यांना मराठातील अग्रलेखातून भरपूर झोडपले. संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधी असलेल्या यशवंतरावांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. पण त्याच यशवंतरावांना पंतप्रधान पंडित नेहरू यांनी दिल्लीला देशाचे संरक्षणमंत्री म्हणून बोलावले, तेव्हा अत्रेंनी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे अभिमानाने लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यशवंतराव चव्हाण हे संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत निरोप देण्यात आला, तेव्हा अत्रेंनी आपल्या भाषणात त्यांना जयवंत हो, यशवंत हो, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.
अत्रे म्हणाले, यशवंतरावांच्या अंगात काही अलौकिक गुण नसते, तर या पदाला पोहोचलेच नसते. संस्कृतमध्ये एक वचन आहे, आकाशातील तारे हे काही मातीतून निर्माण होत नाहीत. त्याचप्रमाणे स्वत:च्या अंगी काही तरी गुण असल्याखेरीज मोठेपणा मिळत नाही. शत्रू बलाढ्य आहे, कपटी आहे, दुष्ट आहे, अशा शत्रूंशी यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून सामना करायचा आहे. हे काम बिकट आहे, पण ते काम ते यशस्वी केल्याशिवाय राहणार नाहीत. ते आपली कामगिरी यशस्वी करून जेव्हा महाराष्ट्रात परत येतील, तेव्हा तीन कोटी महाराष्ट्रीय जनता त्यांना आपल्या डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात पोलिसांनी निरापराध जनतेवर गोळीबार केला, तेव्हा मनस्वी उद्वेगाने पोलिसांचा निषेध करताना आचार्य अत्रे यांनी जहाल शापवाणी उच्चारली की, ज्या पोलिसांनी निरापराध जनतेवर गोळीबार केला, त्यांच्या अंगाला रक्तपिती होवो, त्यांची बोटे महारोगाने झडोत. तेव्हा शांतम पापम करीत काही प्रतिष्ठांनी त्यांना म्हटले, काय हे अत्रे, कशाला अशी घाणेरडी भाषा बोलता? तेव्हा त्याला उत्तर देताना अत्रे म्हणाले, ही भाषा माझी नाही, ज्यांचे नवरे, ज्यांची मुलेबाळे तडफडून मेली, त्यांच्या आयांचे व बहिणींचे शिव्याशाप आहेत.
आचार्य अत्रे यांना प्रा. बापूसाहेब माटे यांनी जनता पक्षाचा धिप्पाड कैवारी, असे एकदा म्हटले होते. अत्रे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र टाइम्सचे तत्कालीन संपादक गोविंद तळवलकर यांनी १४ जून १९६९ च्या अंकात कडा कोसळला अशा शीर्षकाखाली मृत्यूलेख लिहिला होता. राजकारणात पदार्पण करून त्यांनी आपल्या लेखणीने, कर्तृत्वाने महाराष्ट्र दणाणून पडला. अत्र्यांनी राजकारणात किती जणांवर प्रहार केले हे विसरून जाईल, पण त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना, रेखाटलेल्या व्यक्तिरेखा, मृत्यूलेख, प्रवास वर्णने यांचा मात्र विसर पडणार नाही. राजकारण, दौरे, व्याख्याने, चळवळी, या सर्वांचा व्याप संभाळून त्यांनी लेखन व वाचनात कधी खंड पडू दिला नाही, अत्रेंनी एकच क्षेत्र गाजवले नाही, तर एकाच वेळी अनेक क्षेत्रे गाजवली. त्यांचे जीवन लोकविलक्षण होते व लोकविलक्षण कल्पना तितक्याच विलक्षण पद्धतीने मांडण्यात त्यांचा हातखंडा होता…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.