September 9, 2024
Tukaram thoughts from phodile bhandar again before the public
Home » फोडिले भांडारमधून तुकारामांचे विचार पुन्हा नव्याने जनतेसमोर
मुक्त संवाद

फोडिले भांडारमधून तुकारामांचे विचार पुन्हा नव्याने जनतेसमोर

जो वारी करतो तो वारकरी तर वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. वारी करणाऱ्यांचां संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय व संप्रदायाचे आराध्य दैवत हे विठ्ठल होय. विठ्ठलाच्या भक्तीमुळे संसारिक जीवनातील सगळ्या दुःखांचा विसर व्हावा. जीवनमार्ग उन्नत व्हावा मोक्ष मिळावा हे साधे तत्त्वज्ञान या संप्रदायाचे आहे.

रवि राजमाने
7709999860
ravirajmane51@gmail.com

तुकारामांचे विचार पुन्हा नव्याने जनतेसमोर जाणे गरजेचे

डॉ. दिलीप धोंडगे यांचे संत तुकाराम आणि इतर संत साहित्यविषयक चिंतन हा डॉ. नंदकुमार मोरे यांनी संपादन केलेला ग्रंथ अतिशय मौलिक आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत तुकोबारायाचे अभंग त्यांचे विचार त्यांची समतेची, बंधुत्वाची शिकवण खूप महत्त्वाची वाटते. आजच्या सामाजिक व राजकीय जीवनात जातीभेदाची दरी इतकी खोल झालेली दिसते की, खरंच महाराष्ट्र संतांच्या विचारावर चालतो की धर्मद्येष्ट्या व जातीद्येष्ट्या लोकांच्या घातक वक्तव्यावर चालतो. हा प्रश्न पडावा एवढी भयंकर स्थिती आज महाराष्ट्रात आहे. समतेची संदेश देणारी अठरापगड जातींना सामावून घेणारी वारी, कुठेतरी मनुवादी विचारसरणीचे लोक त्या वारीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत असं वाटतं. वारीन महाराष्ट्राला पुरोगामीत्व शिकवलं. अंधश्रद्धेला दूर सारल. विठ्ठला वरची निखळ श्रद्धा सर्वश्रेष्ठ. या वारीत लाखो लोक वेडे होऊन विठ्ठल भक्तीत तल्लीन होतात. तुकोबारायांच्या समतेच्या संदेश घेवुन जातात. पंढरपूर ही अशी कळ आहे. ती दाबल्यानंतर महाराष्ट्रभर तिचा प्रकाश पडतो. असे साने गुरुजी म्हणत. समाज परिवर्तनात संतांचे विचार व कीर्तनकारांचे विचार अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. तुकाराम महाराजांचे विचार तर अतिशय बंडखोर अंधश्रद्धेच्या विरोधातले, कर्मकांडांच्या विरोधी, पाखंडांच्या विरोधी होते. पण आज कालचे कीर्तनकार तुकारामाचे हे अभंग लोकांच्या पुढे आणत नाहीत. मूळ वारकरी विचारापासून लोक दूर होत आहेत हे फार घातक आहे. कीर्तन ही परिवर्तन घडवणारी माध्यम असावीत परंतु कीर्तनकार चुकीच्या दिशेने जात आहेत. यासाठी संतांचे अभंग त्यांचे विचार विशेषत: तुकाराम महाराजांचे विचार व अभंग पुन्हा नव्याने जनतेसमोर जाणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीत लोकांना जागृत करण्यासाठी हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा ठरतो.

संत तुकाराम स्वतंत्र अभ्यासाचा चिंतनशील विषय

या संपादित ग्रंथात संत तुकाराम महाराज व सर्व वारकरी संप्रदायातील संत या सर्वावर समग्रतेने व अभ्यासपूर्ण चिंतन झालेले आहे. संत तुकाराम महाराज हा स्वतंत्र अभ्यासाचा व चिंतनशील विषय आहे. संत साहित्यावर अजूनही कित्येक वर्ष लोक अभ्यास करत राहतील हे मात्र खरं. तुकोबाच्या अभंगाच्या शैलीमीमांसेचे स्पष्ट प्रतिमान या सदानंद मोरे यांच्या लेखाने या ग्रंथाची सुरुवात होते. संत तुकाराम महाराज हे सर्वश्रेष्ठ मराठी कवी आहेत. हे ब्रिटिश प्रशासक विल्यम विल्सन याच्या मताने तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सर अलेक्झांडर ग्रँट यांनी तुकोबा यांना महाराष्ट्राचे राष्ट्रीय कवी ( नॅशनल पोएट ) म्हटले आहे. डॉ. दिलीप धोंडगे यांनी तुकोबांच्या अभंगाचा शैलीवैज्ञानिक अभ्यास केला. त्याच सार म्हणजेच हा ग्रंथ होय. संत तुकारामाचे साहित्य हे अनेक कसोट्यावर उतरले आहे. त्याचा खरेपणा अनेक टीकाकारांना सुद्धा मान्य करावा लागला.

सामूहिकता हे वारकरी संस्कृतीचे एक लक्षण

शैलीमिमावसेचे व्यापक परिदर्शन घडवणारा ग्रंथ, या एकनाथ पगार यांच्या लेखात ते लिहितात की तुकोबाच्या काव्य कर्तृत्वाबद्दल सतत चर्चा होत आल्या आहेत. संत साहित्याची सामाजिकता, ऐतिहासिकता, अध्यात्मिकता, काव्यात्मकता, वैश्विकता या सबंधी विचार मंथन होत आलेले आहे. संस्कृती अभ्यास झालेले आहेत. अनेकांनी तुकोबाच्या अभंग रचनेची चिकित्सा केलेली आहे. तुकोबाच्या अभंगाची शैलीमीमावसा या ग्रंथात शैलीविचार, वारकरी शैली रूप व नादयमता, वाक्यस्तरीय, काव्यात्मकता, प्रतिमा, कथनमीमांसा, अवतरण क्षमता ,भावार्थ विचार अशी प्रकरणे मांडली गेलेली आहेत. संत वाङ्मय हाच मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा मुख्य प्रवाह होता. तुकोबाची अभंग रचना ही शिवकालीन आहे. मध्ययुगीन कालखंडात संत वाङ्मयाचे वारकरी संप्रदायाचे सांस्कृतिक व अध्यात्मिक प्रभाव मोठे आहेत. तुकोबांची परंपरा वारकरी संप्रदायाची आहे.

“ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.” अशी ही सातत्यपूर्ण परंपरा आहे. सामूहिकता हे वारकरी संस्कृतीचे एक लक्षण आहे. वारी, भजन, कीर्तन नामस्मरण, पूजन तत्त्वज्ञान, पारायण, नामसप्ताह यांचे अनुसरण हे सामूहिकतेचे निदर्शक आहे. तुकोबांचे अभंग हे लघुत्तम कथा आहेत. तुकोबांनी कथन, संवाद वर्णन, घटना, घटनाक्रम, काल अवकाश यांचा मौलिक विचार तुकोबांनी मांडलेला आहे. लोकप्रवाहात तुकोबा लौकिक होऊन गेले. तुका म्हणे या कवचाखाली लोक आपापल्या उत्क्तीना, सुभाषितांना , सुविचारांचे, लोकमंत्रांचे अर्थपरवेश बहाल करतात.

तुकाराम प्रत्येकाला आपले वाटतात

तुकोबाचे अभंग भावार्थ विचार आणि शैलीमीमासा या सतीश बडवे यांच्या लेखात जागतिक दर्जाच्या साहित्यिका पेक्षा “अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी l” हे सांगणारे तुकाराम सर्वश्रेष्ठ होते. तुकारामाचे साहित्यिक महत्त्व सांगताना समीक्षकांना, प्रतिभाषाली कवी, विचारवंतांना, विद्रोही समाज सुधारक, अभ्यासकांना संस्कृती पुरुष तर सामान्य माणसांना तो असामान्य माणूस वाटतो. तुकाराम प्रत्येकाला आपले वाटतात. “उजळावया आलो वाटा, खऱ्या खोट्याचा निवाडा l” हे धाडसाने व आपलेपणाने सांगणारे तुकाराम सर्वांना आपले वाटतात. तुकाराम सुधारणावादी विचारांचे संत होते. तुकारामाने आयुष्यभर प्रबोधन केलं. कर्मकांडातून समाजाला मुक्त करण्याचं काम केलं. धार्मिक कर्मकांड, समाजातल्या अंधश्रद्धा, यावर तुकारामाने आसूड ओढले आहेत. आपलं मन प्रसन्न ठेवा, म्हणणारे संत तुकाराम मनोवैज्ञानिक होते. मनामध्ये सकारात्मकता असावी हे तुकोबाराय सांगतात. तुकोबाचे लेखन श्रद्धायुक्त अंत:करणाने केलेले आहे. लेखकांच्या मते काळ पुढे सरकत जाईल समाज व्यवस्था बदलेल माणसं त्यांचे विचार बदलतील पण तुकोबाचे अभंग त्याच्यापुढे पुन्हा नवे आव्हान उभे करतील. तुकोबांच्या शब्दकळेचा सौंदर्यशोध या अविनाश सप्रे यांच्या लेखात तुकोबांनी सांगितलेले शब्दांचे महत्त्व
“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू l
तुका म्हणे पहा शब्दची होऊन शब्दाची गौरव पूजा करु l
शब्दची आमच्या जीवाचे जीवन l शब्द वाहे धन जनलोका l
तुका म्हणे पहा l शब्द ची हा देव शब्द ची गौरव पूजा करू l l”
या अभंगातून शब्दांचे महत्त्व ते सांगतात. शब्दावरचा तुकारामाचा प्रचंड आत्मविश्वास ते आपल्या अलौकिक प्रतिभेने, शब्दात प्राण फुंकतात. आपल्या प्रतिभेने सारा भोवताल शब्दांमध्ये परावर्तित करतात. तुकोबाची कविता वैश्विक आहे. भावनाशील विचारशील आहे. तुकोबाच्या कवितेत लवचिकता, नादमयता, तालबद्धता आहे म्हणून तुकोबाचे अभंग वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे.

वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण

तुकोबाच्या अभंगवाणीत ईश्वर भक्ती आत्मशोध सत्यान्वेषता आहे. दांभिकता व अंधश्रद्धेवर प्रहार आहे. तसेच परखड हितोपदेशही आहे.”बुडती हे जन l न देखे डोळा l” असा कळवळाआहे. म्हणूनच तुकोबारायाचे अभंग श्रेष्ठ ठरतात. तुकाराम महाराजांच्या अभंगशैलीची वस्तुनिष्ठ चिकित्सा या प्रवीण बांदेकर यांचा लेख तुकोबाच्या अभंगाकडे आधुनिक जाणीवने पाहणाऱ्या अभ्यासांपैकी डॉ. दिलीप धोंडगे एक आहेत हे सांगतो. आधुनिक अभ्यास शाखेच्या उपयोजनाद्वारे तुकोबांच्या अभंगाचा अभ्यास मराठीमध्ये प्रथमच झालेला दिसून येतो. बांदेकर यांच्या दृष्टिकोनातून वारकरी संप्रदायाच्या साहित्यामध्ये बाराव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत होऊन गेलेल्या साधारणतः सहाशे वर्षातील विविध जाती जमातीच्या संत कवींच्या साहित्याचा समावेश करता येतो. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर ते संत एकनाथ, संत नामदेव संत तुकाराम, संत चोखोबा ते संत निळोबा पर्यंत या संत कवींचा विचार करावा लागतो. या संत कवींच्या वारकरी साहित्याबरोबर या संप्रदायाची ओळख या साहित्याला प्रभावित करणारे साहित्य वाटसरू वारकरी आहेत. वारकरी हा प्रमुख घटक आहे. जो वारी करतो तो वारकरी, तर वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. वारी करणाऱ्यांचां संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय व संप्रदायाचे आराध्य दैवत हे विठ्ठल होय. विठ्ठलाच्या भक्तीमुळे संसारिक जीवनातील सगळ्या दुःखांचा विसर व्हावा. जीवनमार्ग उन्नत व्हावा मोक्ष मिळावा हे साधे तत्त्वज्ञान या संप्रदायाचे आहे. श्री क्षेत्र पंढरपूरला विठ्ठल,पुंडलिक, रखुमाई यांचे विशेष महत्त्व आहे. वारीमध्ये पायी चालत असताना संतांचे अभंग, भजने गात असल्याने आपण संतांच्या सहवासात असल्याची एक प्रकारे संतांच्या वचनांच्या गायनामुळे विठ्ठलाच्याही निकट गेल्याची भावना वारकऱ्यांच्या मनात असते. अठरापगड जातीमधून आलेल्या व वय, लिंगभाव, सामाजिक शैक्षणिक, आर्थिक स्तर, प्रदेश, बोलीभाषा इत्यादी भेदभाव विसरत वारीमध्ये सहभागी होणाऱ्या, वारकऱ्यांच्या व्यक्तिगत आचरणापेक्षा सामूहिक आचरणाला वारीमध्ये अधिक महत्त्व असते. भागवत धर्माचा प्रचार करणाऱ्या तुकाराम, नामदेव यासारख्या संतांच्या अभंगाचे गायन, निरूपण, आख्यान त्यांचे श्रवण याद्वारे नामस्मरण यामध्ये वारकरी संप्रदायाचे मर्म दडलेले आहे.

तुकारामांच्या कवितेतील प्रतिमा विचारांची चर्चा

तुकारामकृत अभंगाच्या शैलीशास्त्रीय मीमांसेचे ओचित्य या लेखात नितीन रिंढे लिहतात की 1990 मध्ये प्रकाशित झालेलं ‘पुन्हा तुकाराम’ हे पुस्तक मराठी वाङ्मयीन संस्कृती समीक्षेच्या संदर्भात क्रांतिकारी ठरणार आहे. तुकारामांना मराठी वाङ्मयीन संस्कृतीच्या केंद्रस्थानी ठेवल गेल आहे. या पुस्तकातून मराठी समाजाची सांस्कृतिक समीक्षा करण्याचा उपक्रम झालेला आहे. एकोणिसाव्या शतकात सुरू झालेल्या आधुनिकतेच्या प्रवाहापासून राजकीय विचार साहित्य,कला इत्यादी सर्वांमधून तुकारामांचे दर्शन घडतं. तुकारामांच्या कवितेतील प्रतिमा विचारांची चर्चा तुकाराम समजून घेण्याची नवी दृष्टी देणारी आहे. तुकारामांच्या भौतिक जीवनातल्या अनेक वस्तू पदार्थ यांच कवितेतील प्राणी, पक्षी यांचा उपयोग तुकाराम आपल्या कवितेत अर्थ निर्मितीसाठी कसा करतात हे वेगवेगळ्या प्रकारे पाहण्यासारखे आहे. तुकारामांनी आपल्या अभंगात वापरले अनेक शब्दार्थ विचारातल्या प्रचलित असलेल्या सगळ्या संकल्पना आहेत.

चोखोबा वारकरी संप्रदायाचे अविभाज्य घट

वारकरी शैली या प्रमोद मुनघाटे यांच्या लेखात ते लिहितात की तुकोबाच्या अभंगाची शैली मीमांसा हा डॉ. दिलीप धोंगडे यांचा ग्रंथ मराठीतील तुकाराम साहित्यात केवळ भर घालणारा नाही, तर साहित्य संशोधकाला नवा पैलू देणार आहे. या विषयाच्या निमित्ताने संत ज्ञानदेव व तुकाराम यांचे साहित्य वारकरी संप्रदायाच्या व महाराष्ट्राचे लोकमानस हा धोंडगे यांनी तपशीलवार मांडला आहे. या लेखात वारकरी संप्रदायाचा आचारधर्म, महाराष्ट्रातील अठरापगड जातीच्या बहुजन समाजाच्या दारिद्र्याशी आणि शोषणाशी तसेच मराठी प्रदेशातल्या मागासलेल्या समाजाच्या दारिद्र्याशी आणि शोषणाशी तसेच मराठी प्रदेशातल्या मागासलेल्या अर्थव्यवस्थेची संबंधित आहे. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता अशी आहे की साध्या गरीब माणसालाही साध्य होईल. वारकरी होण्यासाठी ध्यान कीर्तन भजन किंवा केवळ वारकरी असा आचारधर्म आहे. संवाद व ज्ञानमार्गापेक्षा ते खूप सोपा आहे. स्वच्छ कपडे, दररोज आंघोळ, कपाळी टिळा, गळ्यात तुळशी माळ एखाद्या गंगा यात्रे ऐवजी पंढरपूरची वारी खूप महत्त्वाची. ही अखंड कष्टकरी ग्रामीण वर्गाशी संबंधित आहे. वारकरी संप्रयातील विविध वर्ण व जाती धर्मातील संत कवींनी आपल्या व्यवसायाचे रूप घेऊन अभंग रचना केली आहे. संपूर्ण मराठी संत काव्यात चोखोबाच्या अभंगांना वेगळे महत्त्व आहे. चोखोबा धर्म व्यवस्थेतील नीती मूल्यांच्या विसंगतीवरचं हल्ला करतात. ते विचारतात आत्मा आणि देह वेगवेगळे आहेत का? आत्मा हाच अंतिम आहे तर मग विटाळ या देहासंबंधीच्या गोष्टीला महत्त्व का? चोखोबांना अखेरपर्यंत अन्याय सहन करावा. लागला तरीही चोखोबा वारकरी संप्रदायाचे अविभाज्य घटक आहेत. एका फुलातून एक फुल उमलावे तशाप्रकारे एका संताच्या मागे मागाहून येणाऱ्या कवींनीं विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. वारकरी शैलीच्या तत्त्वज्ञानाचा विचार करता ज्ञानेश्वरीत चातुर्यवर्णाचा पुरस्कार आहे तर चोखोबांनी आपल्या अभंगात अस्पृश्यतेची व्यथा मांडली आहे.

संत तुकाराम स्वतःच्या भाषेविषयी सजग

संत साहित्याच्या अभ्यासासाठी दिशादर्शक ग्रंथ या लेखात डॉ. नंदकुमार मोरे म्हणतात, तुकोबाचे अभंग ही मराठी साहित्यातील अद्वितीय काव्यनिर्मिती आहे. महाराष्ट्रातील विद्वजनापासून ते सर्वसामान्य अशिक्षित माणसांना तुकाराम आपले वाटतात. आपल्या अभंगांनी तुकारामाने जनमानसात आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे व त्याबरोबरच त्यांनी मराठी भाषा व संस्कृतीलाही समृद्ध केलेले आहे. अनुभव व अविष्कार या दोन्ही पातळीवर सच्चेपणा हे तुकारामांचे वैशिष्ट्य आहे. तुकारामाच्या अभंगाने महाराष्ट्राच्या भाषिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनावर खोल परिणाम केलेला आहे. तुकारामांची कविता समाजाला समता शिकवून लोक जागृतीचे महत्त्वाचे कार्य करते. बंधुत्वाचा व न्यायाचा व्यापक अर्थ देते. तुकाराम स्वतःच्या भाषेविषयी सजग होते. त्यांचे भाषाभान खूप महत्त्वाचे होते. म्हणून तर ते “आम्हा घरी धन l शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न्ये करू l l” असे आत्मविश्वास पूर्ण व आदरपूर्वक सांगतात. भाषा हे सार्वजनिक म्हणून सर्वांचेच अभिव्यक्तीचे माध्यम आहे. भाषेतील शब्द प्रतिमेपरिचित असतात. कवितेची भाषा ही स्वतः बोलते. कविता ही भाषिक कलाकृती आहे. तुकारामांची प्रतिमासृष्टी प्रतिमा वापरण्याची पद्धत, क्रम मनोवेधक आहे. तुकारामांच्या प्रतिमा मधून प्रकट होणारी संवेदनशीलता वाचकाला नवे समाज भान देते. तुकारामांनी आपल्या अभंगवाणीत विविध प्रकारच्या कथा गुंफलेल्या आहेत. तुकारामांच्या अभंगांमध्ये येणारी कथा ही काव्यांतर्गत कथा आहे. त्याचा अभंग हा रचनाप्रकार कथाकथनाला पूरक असा आहे. लोकभाषा प्रतिमा आणि वारकरी संप्रदायातील परिभाषिक संज्ञांचा वापर तुकारामाने या संप्रदायाचे ज्ञान अविष्कृत करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्णपणे केलेला आहे.

तुकारामाचा पिंड हा लोकप्रबोधनाकाराचा

अशोक कामत यांच्या तुकोबांचे मंत्राक्षरसामर्थ्य मध्ये संत साहित्यात तुकाराम गाथेच्या अध्ययनाची एक सबळ परंपरा आहे. या ठिकाणी कबीराच्या एका दोह्याचे वर्णन करतात “भाव अनुठो चाहिये भाषा कैसीहू होय l” तुकोबाच्या भाषेतील असाध्य ते साध्य करिता सायास l मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण l अशा वचनांच्या आधारे तुकोबांची अलौकिक अनुभवाभीव्यक्ती स्पष्ट करीत. त्यांची ही वाणी वापरून मराठी समाजाने आपली भाषा श्रीमंत केली आहे.
ग्रंथाच्या अखेरच्या टप्प्यात तुका म्हणे
“वाचेच्या चापल्ले बहू झालो कुशळ l
नाही बीज मुळ हाता आले l म्हनोनि पंढरीराया दुखी होते मन l l
अंतरीचे कोण जाणे माझे l पुज्य झालो अंगा आला अभिमान l l “
पुढील कारण खोळंबले l तुका म्हणे खून न कळे ती निरुती l सापडलो हाती अहंकाराचे l l
या अभंगांने सुरुवात होते. तुकारामाच्या अभंगाचे तात्विक विवेचन या लेखात समीर चव्हाण म्हणतात, तुकारामांच्या अभंगाने सामाजिक, भाषिक आणि दर्शनीक अशा अनेक अंगाने मराठी जीवन समृद्ध केले आहे. भाषेसह विविध परिप्रेक्ष्यातून केलेले निरूपण या लेखात गोविंद गाजरेकर म्हणतात, त्यांच्या मते काळाच्या कसोटीवर टिकून राहणे ही साहित्याच्या महानतेची एक कसोटी आहे. असे साहित्य आशयापासून अभिव्यक्तीपर्यंत कालातीततेची बीजे घेऊन अवतरलेले असते. संत तुकोबारायांची गाथा या कसोटीवर उतरते. मध्ययुगीन कालखंडापासून आजच्या जागतिककरणाच्या प्रभाव काळापर्यंत अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. तरीही मध्ययुगातील संत साहित्याचे मूल्य कमी झालेले नाही. संशोधक व अभ्यासकांना हे साहित्य पुन्ह:पुन्हा आस्थेच्या कसोटीवर चर्चेला घ्यावयासे वाटते. यातच या साहित्याची महानता अधोरेखित होते. या साहित्यातून आठशे वर्षापासून वारकरी संप्रदायात मराठी समाज मनावर जे संस्कार केले ते आज हे टिकून आहेत. जपले जात आहेत. सामाजिक संमतेसाठी मानवतेच्या जपणुकीसाठी ते आधारभूत ठरत आहेत. काळ बदलला भौतिक प्रगती झाली तरी मानवी मूल्यांची संदर्भ चौकट बदलत नाही. आधुनिक काळाने समाजासमोर उभी केलेली आव्हाने पेलण्यासाठी संतांच्या साहित्यातील मूल्यात्मकता आधारभूत ठरू शकते. तुकारामाचे अभंगातील भावार्थचे सूत्र प्रभावी आणि प्रकट आहे. तुकारामाचा पिंड हा लोकप्रबोधनाकाराचा आहे. उदाहरणार्थ
“यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा l
नाही निर्मळ जीवन, काय करील साबण l
द्रव्य मिळवले कोटी सवे न ये लंगोटी l l
झाला प्रेत रूप शरीराचा भाव l लक्ष ठेव स्मशानीचा l l
शुद्ध बीजापोटी l फळे रसाळ गोमटी l l
सत्य असत्याशी मन केले ग्वाही l मानियले नाही बहुमता l l
जया अंगी मोठेपण l तया यातना कठीण l l”
या अभंगातून तुकारामानी लोकप्रबोधन केलेले आहे.

“बैसोनी थिल्लरी l बेडूक सागरा धिक्कारी l l या अभंगात संत तुकाराम वेगवेगळे दृष्टांत देतात. ओढ्याकाठाचा बेडूक सागराचा धिक्कार करतो. कावळा स्वतःला राजहंसापेक्षा वेगळा मानतो. गाढव हत्तीहून स्वतःला चांगले मानते. हा अभंग उपमानवाक्य आहे. या अभंगाचे अर्थ जाणून घ्यावयाचे असतील तर दृष्टांताचे अर्थ समजून घ्यावे लागतील.”पतीव्रते जैसे भ्रतार प्रमाण l आम्हा नारायण तेशा परी l l सर्व भावे लोभ्या आवडे धन l l आम्हा नारायण तेशा परी l या दोन ओळीत ते पतीव्रता व लोभी यांचे दृष्टांत देतात.

पंढरीचा विठ्ठल कष्टकरी कृषी जणांचा देव

संत तुकारामाच्या अभंगस्वरूपाच्या अर्थवाटांचा उलगडा या लेखात समीक्षक रणधीर शिंदे यांनी डॉ. दिलीप धोंडगे यांच्या तुका म्हणे भाग एक व भाग दोन यावर भाष्य केले आहे. धोंगडे यांचा प्राचीन व आधुनिक साहित्याचा व्यासंग थक्क करणारा आहे. ते प्राचीन साहित्य अभ्यासाकडे वळले ते आधुनिक दृष्टीने. त्यांनी संत साहित्याचा शिस्तशीर असा शैलीशास्त्रीय अभ्यास केला. संत साहित्य हे परमेश्वराची उत्कटभक्ती आर्तजणांच्या कळवळ्यातून स्फुरण पावते. तुकोबारायाच्या अभंगाचा कमी शब्दात अभंगार्थ उलगडून दाखवणे ही कठीण गोष्ट धोंडगे यांनी सहज साध्य केलेली आहे. तुकाराम महाराजांचे चरित्र व वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान लक्षात घेऊन तुकोबारायांच्या अभंगाचे त्यांनी वाचन केले आहे. त्यामुळे तुकारामाच्या अभंगातून प्रकटणाऱ्या भक्ती जाणिवेचे स्वरूप भक्तीसंप्रेशितांचे पैलू उलघडून दाखवले आहेत. पंढरीचा विठ्ठल सर्वांना आपला वाटतो. तो कष्टकरी कृषी जणांचा देव आहे. रणधीर शिंदे लिहितात की महर्षी शिंदे यांच्यावर वारकरी संप्रदायाचा व तुकारामांच्या अभंगसृष्टीचा विलक्षण प्रभाव होता. समाज सुधारणेच्या कार्यपद्धतीचे शिंदे दोन प्रकार मानत होते सुवर्णकार पद्धत व मेघवृष्टी. सुवर्णकार आपल्या कलाकुसरीने मोती, हिरे, सोने यांचे उत्तम नग बनवतो. तर मेघवृष्टीने अमर्याद क्षेत्रावर वर्षाव केल्याने उत्तम पीक येते. अशा प्रकारे तुकारामाच्या अभंगाचा उपदेश हा मेघवृष्टी स्वरूपाचा आहे. तुकारामाचे अभंग हे भाषिक सांस्कृतिक समृद्धतेचे द्योतक आहेत. महात्मा गांधीजींनी तुकारामाच्या 16 अभंगाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘मूकनायक’ या नियतकालिकासाठी तुकारामांचा “काय करू आता धरूनिया भीड” हा अभंग निवडतात. यामुळे तुकारामाच्या अभंगाचे सांस्कृतिक महत्त्व विशद होते.

‘तुका म्हणे’ च्या निमित्ताने उल्हास पाटील लिहितात की डॉ. दिलीप धोंगडे यांचे निरूपण स्वतंत्र आहे. ते इतरांपेक्षा वेगळा व स्वतंत्र विचार करतात. कोणत्याही समाज समूहाच्या दुःखाची कारणे समाज व्यवस्थेत दडलेली असतात. एका समूहाच दुःख दूर करायचं म्हणजे दुसऱ्या समूहाचे हितसंबंध यांचा रोष पत्करण होय. संतांची काही जुन्या संकल्पना झिडकारल्या काहींनी नवे अर्थ दिले. त्यासाठी संघर्ष केला. प्रस्थापितांचा छळ सोसला. प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारले. चुकीची मूल्य नाकारून नवी मूल्य प्रस्थापित केली. संत एकनाथ वगळता उर्वरित सारे संत शूद्रातीशुद्र जातीतून आलेले होते. मनुस्मृतीप्रमाणे वर्णव्यवस्थेचे चटके या सर्वांनी कमी जास्त प्रमाणात अनुभवले. तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात आपली मत मांडली. अतिशय स्पष्ट व परखड शब्दात उपदेश केला. लोकांना कळकळीने आवाहन केलं. प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिलं. प्रस्थापितांचे शत्रुत्व ओढूवून घेतलं. त्रास, अपमान, अवहेलना, छळ, शारीरिक मारहाणही सहन केली.
“बुडता हे जन न देखवे डोळा l येतो कळवळा म्हनोनिया l l तुकाराम यापुढे लिहितात भीत नाही आता आपुल्या मरणा l l दुःखी होता जना न देखवे ll या निर्धाराने ते बोलत राहिले. तुकाराम हे अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले, प्रयत्न वादावर भर देणारे, खरे साधुसंत कसे ओळखावे ढोंगी साधुसंत कसे ओळखावे हे सांगणारे संत होते. त्याबरोबर मानवी ऐक्याचा संदेश देणारे सर्व भेदाभेद नाकारणारे अभंग त्यांनी लिहिलेत. त्यांची भाषा सरळ सोट मरमावर प्रहार करणारी रांगडी भाषा आहे. ग्रामीण बोलीभाषेत वापरले जाणारे शब्द ते विनोद बिनदिक्कत पणे वापरतात. ज्या काळात जातीव्यवस्था अतिशय बळकट होती. वर्णव्यवस्था बळकट होती एखाद्याच्या सावलीने ही विटाळ होतो अशा शब्दात व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेणारे तुकाराम, मनुस्मृति नाकारणारे, वर्णव्यवस्था नाकारणारे उच्च निचता नाकारणारे….म्हणजेच देव झाले अवघे जन माझे l गुणदोष हरपले किंवा वर्ण अभिमान विसरली जाती एका एका लोटांगणी जाती रे l l हे अभंग क्रांतिकारी आहेत. उल्हास पाटील यांच्या लेखाने संत तुकारामांच्या विचारला नवा उजाळा मिळाला आहे..

फोडिले भांडार धन्याचा हा मालक मी तो हमाल भारवाही, तुका म्हणे चाली झाली चहू दीशी उतरला कशी खरा माल l विचारांच्या या प्रबळतेमुळेच तुकारामांना ही वाट सापडली. तुकोबा हे धर्म सुधारक होते. तुकोबांनी पारंपारिक धर्माचे परीक्षण करून पारंपारिक आचरणाने अधोगती होते. यज्ञयागादी तपतीर्थटनाचां माणसाच्या उन्नतीस काही उपयोग होत नाही. ही बाब त्यांनी स्पष्ट केली. या ऐवजी काम, क्रोध, मस्तर, अभिमान यांचे दमन करून पांडुरंगाचे भजन करावे हा संदेश दिला.

तुकोबारायांची प्रतिमासृष्टी व वारकरी संप्रदायाच्या साहित्याचे सखोल चिंतन यावर अभ्यासकांनी केलेली चर्चा एक करण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केलेला आहे. या ग्रंथात संत साहित्याचा पूर्वाअभ्यास समोर ठेवून स्वतंत्रपणे स्वतःची अभ्यास दृष्टी विकसित केलेली आहे. संत साहित्याच्या दोन बाजू एक आशयाचा विचार करणारी व दुसरी आकृतीबंधाचा विचार करणारी या दोन्ही बाजूंचे समतोल डॉ. धोंडगे यांनी अंगिकारला आहे.

“सकळीकांच्या पाया माझी विनवणी l
मस्तक चरणी ठेवीतसे l l
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन l
बरे पारखून बांधा गाठी l l
फोडिले भांडार धन्याचा हा माल l
मी तव हामाल भारवाही l l

पुस्तकाचे नाव : फोडीले भांडार
संपादन : डॉ. नंदकुमार मोरे
प्रकाशक : भाषाविकास संशोधन संस्था कोल्हापूर
किंमत – ४०० रुपये
मुखपृष्ठ – भास्कर हांडे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना

संताची समाधी संजीवन असते, कारण…

ज्ञानाच्या घराचा सेवा हा उंबरठा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading