April 26, 2024
Mango memories article by Mira Utpat Tashi
Home » आंबा आठवणीतला
मुक्त संवाद

आंबा आठवणीतला

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत. चातुर्मासातील कहाणी मध्ये गणपतीच्या दोंदावर चढून आंबा तोडल्याचा उल्लेख आढळतो. वेदांमध्ये आंब्याला अमृतफळ म्हटलं आहे.

मीरा उत्पात-ताशी

मोबाईल – 9403554167

पाहता पाहता वसंताची जादू ओसरली आणि आसमंत ग्रीष्माच्या चटक्यांनी अक्षरशः भाजून निघत आहे. ग्रीष्म हा माझा नावडता ऋतू. पण एका अत्यंत आवडत्या गोष्टीमुळे सुसह्य होतो तो म्हणजे आंबा. आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत. चातुर्मासातील कहाणी मध्ये गणपतीच्या दोंदावर चढून आंबा तोडल्याचा उल्लेख आढळतो. वेदांमध्ये आंब्याला अमृतफळ म्हटलं आहे.

मेघदूतात भरपूर आंब्याची झाडे असलेला आम्रकूट पर्वत व त्या पर्वतावर पिकलेल्या आम्रफळांनी पिवळ्या झालेल्या परिसराचे वर्णन
छन्नोपान्तः परिणतफलद्योतिभिः काननाम्र
असे कालिदासाने केलेलं आहे. दिवेआगारच्या सुवर्ण गणेशाच्या प्रतिमेवर हापूस आंबे कोरलेले होते. भारतीय पुरातन मंदिरातील शिल्पांमधून आंब्याची झाडं दिसतात. आंब्याची पानं शुभ कार्याची शोभा वाढवतात. शिवरात्रीला महादेवाला आंब्याचा मोहोर अर्पण करतात. असं आंब्यांनं पुराणकाळापासून आजतागायत भारतीय जनमानसावर राज्य केलं आहे. आणि फळांचा राजा म्हणत आपले नाव सार्थ करत आता जगभर पोहचला आहे.

दिवाळी सरली आणि डिसेंबरची बोचरी थंडी सुरू झाली की आंब्याच्या पानांच्या बेचक्यात पोपटी कळ्यांचे बुटके पुष्ट दांडे दिसायला लागतात. हळूहळू त्यातून लांब दांड्या बाहेर पडतात. आणि संपूर्ण झाड पोपटी फुलांनी बहरून येतं. आम्रमंजिऱ्याच्या मंदमधुर वासानं आसमंत घमघमूत जातो. हळूहळू कैऱ्यांचे हिरवे मणी त्यातून डोकावू लागतात. त्यातले काही गळून पडतात. तर काही नेटानं दांड्यांना चिकटूनच राहून कैरीचं रूप घेतात. या हळूहळू मंद वाऱ्यावर झोके घेतात. एखादा दुसरा वळीव झाल्यावर काही काही कैऱ्या लोंबकळण्याची जिद्द सोडून धरणीची भेट घेतात. मग त्याचं पन्हं, चटणी, लोणचं, मेथांबा, चैत्रगौरीची डाळ असे विविध पदार्थ केले जातात. हे आंबटगोड पदार्थ दोन महिने स्वयंपाक घरात अगदी तळ ठोकून असतात आणि तोंडाला चव आणतात. मग पुढचा टप्पा राजाच्या स्वागताचा!!

हा फळांचा राजा मला अतिशय आवडतो. देखणा, पिवळसर केशरी रंग, मोहक सुगंध आणि अद्वितीय स्वाद असलेला आंबा मोह घालतो. मनावर गारूड करतो. कुठल्याही बंधनाशिवाय मी त्याचा आस्वाद घेते. हा मोह अगदी लहानपणापासून आहे..आई सांगायची की मी पहिला शब्द ‘आंबा’ हाच उच्चारला होता. आमच्या घरी सोलापूरचे प्रतिष्ठीत व्यापारी राजाराम यरमवार यांच्या आई गयाबाई यरमवार वारीसाठी येत असत. अतिशय उदार, प्रेमळ, दानशूर वृत्तीच्या होत्या. त्या मला मांडीवर बसवून खेळवताना मी सारखं ‘आंबा आंबा’ हाच शब्द म्हणायला लागले. त्यांना फार कौतुक वाटले. त्यांनी एक माणूस मंडईत पाठवून शेकडा मापानं आंब्याचा ढीग आणला. त्यावेळी आंबे डझनावर नाही तर शेकड्यांवर मिळत असत. आणि छकडी च्या मापाने आंबे विकत घ्यायची पद्धत होती.

अक्षय तृतीया झाली की आंब्यांचे ढीग मंडई व्यापून टाकत. एका सकाळी नागेश काका ‘चल आज आपण मंडईतून आंबे आणूया’ असं म्हणे. त्याच्या या एका वाक्यावर मी उड्या मारत तयार होई. काका च्या हाताला लोंबकळत मंडईत जाई‌. मंडईत सगळीकडे हिरव्या पिवळ्या केशरी आंब्यांचे ढीग पाहून आता कुठला घ्यावा असा विचार करत असताना विक्रेते जवळ बोलावून त्यांच्या जवळच्या ढीगातला एक आंबा काढून चव पाहण्यासाठी हातावर पिळत. चारपाच ठिकाणी पाहिल्यावर काका मला विचारी कुठला घ्यायचा? माझी पसंती सांगितल्यावर छकडी च्या मापाने भाव ठरे. मग एका हातात तीन आणि दुसऱ्या हातात तीन असे आंबे घेऊन ‘एक’ असे म्हणत आंबे मोजले जात. शंभर आंब्याचा भाव ठरलेला असे पण छकडीच्या मापाने १०६ किंवा १०८ होत असत. आणि तरी अजून तो एक दोन वर टाकत असे. असा व्यवहार होता त्यावेळी. माणसं व्यवहार करीत. पण त्यात आपुलकी होती. कोरडेपणा नव्हता. आंब्यानं भरलेलं ठिकं घरी येई. ते स्वयंपाक घरातल्या एका मोठ्या कोनाडा असलेल्या कोपऱ्यात नीट मांडून ठेवले जात. काही पिकलेले तर काही गाभोळे, पाडाला आलेले असत. पिकलेल्या आंब्याचा पातेलं भरून रस आई करत असे.

आंब्याचा रस शेवटच्या पंक्तीपर्यंत चांगला रहावा म्हणून त्यात एक कोय राखून ठेवे. रस केला त्यादिवशी प्रत्येकाला एखादी दुसरी पोळी जास्तच लागे. शेराच्या पोळ्या तरी लागत असत. पोळ्या करून करून माईचा पिट्टा पडत असे.परत संध्याकाळी आम्ही मुलं येता-जाता कुठला आंबा पिकला आहे हे पहात ढीगातले पिकायला घातलेले आंबे खात असू. कसलंही मोजमाप नाही. किती आंबे खाल्ले याची गणती नाही. ‘अगं आंबा धू. त्याचा चिक काढून टाकून खा. नाहीतर उतेल.’ माई ओरडायची. आंब्याचा चिक धूवून, गोल गोल फिरवून मऊ करत रस सोडवून घेऊन देठाची खूण काढून टाकून हळूहळू दाबत आंब्याचा रस चोखायचा. आहाहा!!! मधुर गोड रसाने रसना आणि आत्मा तृप्त होई. ओघळलेल्या रसानी कोपर, हात, तोंड आणि फ्राॅक केशरी होवून जाई. हात धुतला तरी आंब्याचा गोड वास कितीतरी वेळ राही. महिना दीड महिना हाच कार्यक्रम सुरू असे.

आणलेल्या आंब्यात सतत भर पडत राही. आमच्या गावातल्या मोठ्या आत्या मारूती कडून ठिकंभर आंबे पाठवून देत. त्यांच्या कडे खर्डीच्या शेतातले भरपूर आंबे येत असत. या दिवसात त्यांच्याकडं गेलं की ओसरीवर आंब्याचा घमघमाट सुटलेला असे. लगतच्या खोलीतच आंब्याची अढी घातलेली असायची. आत्या, वहिनी आंबे खायला देत. या मोसमात अजून एका ठिकाणाहून आंबे आमच्या घरी येत ते म्हणजे अंधळगावावरून. अंधळगाव ला माझ्या वडिलांच्या आत्यांची शेती होती. त्यांच्या शेतात गोटी आंब्याचे झाड होते. आंबा आकारानं छोटा होता पण चवीला फार मधुर.. साखरेपेक्षाही गोड. आत्या दर वर्षी न चुकता स्वतः किंवा कोणाबरोबर तरी गोटीआंबे घरपोच करत. आंब्याच्या ठिक्याबरोबर खमंग गुळपापडीच्या लाडूचा डबाही असे. दोन्ही आत्या फार प्रेमळ. आमच्यावर त्यांचा अतिशय जीव होता. त्यामुळे त्या दोघी असेपर्यंत हे आंबे आम्ही दर उन्हाळ्यात खाल्ले.. अगदी न चुकता..

माझ्या वडिलांना हापूस आंब्याची फार आवड होती. त्यावेळी चिंकहिल पंढरपूर ला हापूस आंबे मिळत नसल्याने ते कुठून कुठून भरपूर प्रयत्नांनी हापूस आंबे आणतच असत. तो केशरी मधाळ आंबा खाण्याचा एक सोहळा असे. जेवण झाल्यावर कापून, काचेच्या बशीत सुबक फोडी करून, छान गप्पा मारत खाणं हा त्यांचा आवडता छंद होता.. अजून एक आंब्याची आठवण आहे ती कोल्हापूरची.. पुरूषोत्तम काका त्यावेळी कोल्हापूर ला होता चौऱ्याहत्तर साल असावं.. त्याच्याकडे मी आणि माझी बहिण मीना सुट्टीत आलो होतो. अगदी लहान होतो. त्यावेळी कोकणातून भरपूर आंब्याची आवक झाली होती.. वाहतुकीचा संप आणि महाराष्ट्र बेळगाव सीमाप्रश्नाचा गोंधळ या मुळे आंबे बाहेर गेलेच नाहीत. मग काय अतिशय स्वस्त दरांत आंबे मिळाले त्यावर्षी!! काकाने कपिलतीर्थ मंडईतून इतके आंबे आणले की खाऊन मन अगदी तृप्त झालं..‌.आजही आंब्याच्या मोसमात ही आठवण आवर्जून येते… असा मोहवणारा आठवणीतला आंबा..
दरवर्षी चढत्या भाजणीनं उन्हाळा वाढतोय..पण त्याची दाहकता कमी करतोय आंबा.. आठवणीतला आणि आत्ताचाही….

Related posts

संक्रात

 नद्यांमधील क्रूझ पर्यटनाला चालना देणार – केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी

डोह सुखाचा

Leave a Comment