April 27, 2025
Agneepath recruitment rally to be held in Kolhapur
Home » ‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे कोल्हापूर येथे आयोजन
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे कोल्हापूर येथे आयोजन

  • 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत ‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे आयोजन
  • महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातील  युवकांसाठी रोजगार संधी
  • सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा या भर्ती मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश

नवी दिल्लीः कोल्हापूरच्या लष्करी भर्ती कार्यालयातर्फे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ परिसरात क्रीडा मैदानावर  22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत अग्निपथ योजनेअंतर्गत भर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातील  युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करणे आणि त्याद्वारे त्यांना मातृभूमीची सेवा करण्याची तसेच सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा या भर्ती मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
 
या मेळाव्यामध्ये अग्निवीर सामान्य सेवा (सर्व शाखा), अग्निवीर तांत्रिक कर्मचारी, अग्निवीर लिपिक/ भांडार व्यवस्थापक तांत्रिक विभाग/ वस्तुसूची व्यवस्थापन (सर्व शाखा), अग्निवीर कुशल कारागीर (दहावी उत्तीर्ण) (सर्व शाखा), अग्निवीर कुशल कारागीर (सर्व शाखा) (आठवी उत्तीर्ण) (हाऊसकीपर आणि मेस कीपर) या श्रेणीतील पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील तसेच गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या भागातील कायम रहिवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.

इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.कोल्हापुरातील लष्कर भर्ती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्ट 2022  रोजी सुरु झाली असून नोंदणीसाठी 03 सप्टेंबर 2022 पर्यंतची कालमर्यादा देण्यात आली आहे. 

प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार जिल्हा आणि तहसील पातळीवर संभाव्य उमेदवारांची छाननी करण्यात येईल. या मेळाव्यासाठी नोंदणी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे संपूर्ण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे. या उमेदवारांचे बायोमेट्रिक पद्धतीने सत्यापन केले जाईल आणि प्रत्यक्ष निवड चाचण्या होण्यापूर्वी त्यांना मेळाव्यासाठी दिलेले प्रवेशपत्र तपासण्यात येईल.

भर्तीसाठी पुढील तीन टप्प्यांमध्ये चाचण्या – शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा).

शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना 15 जानेवारी 2023 रोजी होणारी सामायिक लेखी परीक्षा (सीईई)द्यावी लागेल. अंतिम गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात भर्ती होण्याबाबतचे पत्र देण्यात येईल.

या भर्तीसाठी इंटरनेटवरून नोंदणी करताना उमेदवारांनी योग्य प्रक्रियेचे पालन होईल याची सुनिश्चिती करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. मेळाव्याच्या ठिकाणी येताना उमेदवारांनी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, पुरेशा प्रमाणात छायाचित्रे, प्रारुपात नमूद केल्यानुसार वैध प्रतिज्ञापत्र, रहिवासाचे प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र यांसारखी सर्व कागदपत्रे  सोबत आणावीत. “योग्य पद्धतीने भरलेले प्रतिज्ञापत्र सोबत असल्याशिवाय कोणत्याही उमेदवाराला मेळाव्याच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.” उमेदवारांनी केलेल्या मूलभूत वैद्यकीय पूर्व-परीक्षणाची प्रत स्वहितासाठी त्यांनी सोबत बाळगावी. मेळाव्यासाठी येण्यापूर्वी, कानातला  मळ काढणे यांसारख्या स्वच्छतेचे भान राखणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींमुळे युवकांचा मेळाव्यातील अधिक सुरळीत सहभाग शक्य होईल आणि लष्करी अधिकाऱ्यांना देखील मेळाव्यातील कार्ये अधिक उत्तम प्रकारे पार पाडता येतील. ही संपूर्ण भर्ती प्रक्रिया अत्यंत न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने होत असून इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. कोणत्याही उमेदवाराकडे अशा प्रकारे कोणी दलाल अथवा मध्यस्थ आला असेल तर ही घटना त्वरित लष्करी अधिकारी किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी.
 
यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी  www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावर चौकशी करावी अथवा 0231-2605491 या क्रमांकावर थेट संपर्क साधावा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!