June 19, 2024
History of wrestling Jim in Vadnage by Sarjerao Navle
Home » वडणगेच्या तालमीं आणि पैलवानकी…
मुक्त संवाद

वडणगेच्या तालमीं आणि पैलवानकी…

वडणगे गावचा मूळ गावगाडा आठ गल्ल्या आणि तालमींच्या परिसरात वसला आहे. आता गाव तिप्पट विस्तारला पण गावच्या जुन्या आठ गल्ल्यांची आणि तालिमींची ओळख अजूनही ठळकपणे टिकून आहे. वडणगेत पारतंत्र्याच्या काळात स्थापन झालेल्या तालमींचा इतिहास शौर्यशाली तर आहेच, पण नव्या पिढीला वडणगेतील तालीम पंरपरेचा वारसा फारसा माहित नाही. वडणगेच्या तालिम पंरपरेची ओळख…

सर्जेराव नावले, वडणगे

कोल्हापूरचे राजे छत्रपती राजर्षि शाहू महाराजांनी मल्लविद्येला उदार राजाश्रय दिला होता. शाहू महाराजही स्वतः मल्लविद्येत पारंगत होते. सहाजिकच गावोगावी त्यांनी पैलवान तयार करण्याला प्रोत्साहन दिले. त्यातूनच मग तालमी बांधण्यास चालना मिळाली. त्याकाळात घरटी म्हशी, प्रत्येक घरात दूधदुभत्याची हयगय नसायची. त्याकाळी आजच्यासारखं धावपळीच जीवन नव्हतं, घरची असेल ती शेती करून त्याकाळातील तरूण पोरं पैलवानकीसाठी तालमीत घाम गाळायचीत, घरोघरी पैलवान होते. घरटी पैलवान ही वडणगेकरांची त्याकाळी शान होती. अशाच वातावरणात मग वडणगेतील त्याकाळातील जुन्याजाणत्या लोकांनी आपआपल्या गल्लीत तालमी बांधल्या. मठगल्लीत (सर्वप्रथम तालीम बांधली), त्यानंतर पार्वतीगल्ली, शिवाजी गल्ली, चावडीगल्ली, विठ्ठलगल्ली, आंबेगल्ली, दलित वसाहत, मठगल्ली आणि माळवाडी अशा आठ ठिकाणी तालमी बांधल्या.

१९४१ साली आठही गल्ल्यांमध्ये मागेपुढे तालमी बांधल्याची नोंद मिळते, १९४१ म्हणजे ब्रिटीशांच्या सत्तेविरूध्द देशात स्वातंत्रचळवळ ऐन जोमात होती. तो देशप्रेमाने भारावलेले कालखंड होता. अशाच काळात गावच्या तालमींची स्थापना होणे हे प्रत्येक वडणगेकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद आणि भूषणावह आहे. सर्वप्रथम मठगल्लीत तालिम सुरू झाल्याचे सांगण्यात येते. मठगल्लीची तालीम पूर्वी मठाच्या मागे चेचरांच्या परड्यात होती. कै. दत्तात्रय चेचर, तुकाराम चेचर-वस्ताद कै. गणपतराव माने-गवंडी, पांडूरंग कुभांर, गोविंद कुंभार, श्री.मोरे, दादाबो पोवार, कै, बापुसो पाटील-दुकानदार, म्हादू पोवार, शंकर पोवार, सखाराम धुमाळ, तुकाराम धुमाळ, सदाशिव चोपडे, सदाशिव खडके, बापुसो पाटील, आदी ज्ञात अज्ञात मंडळींनी मठगल्लीला तालिम स्थापन्यात पुढाकार घेतला. काही दिवस मठामागे तालिम सुरू करून नाथसंप्रदायातील कृष्णनाथ महाराजांचे नाव तालमीला दिले. दुसरया पिढीतील कै.रंगराव पोवार, शिवाजी कोतवाल,पांडूरंग पोवार,केरबा साळोखे, हिंदुराव धुमाळ आदी मंडळीनी या तालमीत व्यायाम आणि कुस्तीचे धडे घेतले.

पार्वती गल्लीत १९४१ साली तालमीची स्थापना करण्यात आली. कै.सखाराम बापू पाटील-चंद्रेकर, रघुनाथ पाटील (मास्तरांचे वडील), हरी पाटील (बी.एच.दादांचे वडील) , दत्तू देवणे, महादेव टिटवे, रंगराव पाटील( टी.आर.पाटील यांचे वडील) , बंडू धोंडी शेलार, बाबासाहेब पाटील, केरबा कचरे, महादेव कचरे, बळवंत माने आदी जाणत्या मंडळींनी पार्वती गल्लीत सर्वप्रथम तालिम बांधली. सुरूवातीला हरी पाटील यांच्या घरामागे परड्यात ही एका छोट्याशा खोलीत तालिम सुरू केली. तालमीला नाव काय द्यायचे? असा प्रश्‍न जेव्हा समोर आला, त्यावेळी देशात स्वातंत्र्यचळवळ जोमात होती. महात्मा गांधीजींनीं ब्रिटीशांच्या विरोधात विविध आंदोलनाला देशात सुरूवात केली होती. देशभर “जयहिंद”चा नारा घरोघरी सुरू होता. हाच देशभक्तीचा नारा पकडत मग पार्वतीगल्लीच्या बुर्जूग मंडळींनी तालमीला जयहिंद तालीम असे नाव दिले.

कालांतराने तालमीची पार्वती मंदिराशेजारी नव्याने १९५८ च्या दरम्यान इमारत बांधली (सध्या पार्वती गल्लीची जयहिंद तालिमीच्या स्थापनेचे इ.स.१९४१ असे दगडात कोरलेली अक्षरे तालमीच्या चौकटीच्यावर पाहायला मिळतात). याच तालमीत मग पार्वती गल्लीतील अनेक पैलवानांनी सराव केला आणि गावोगावची मैदाने मारली. याच तालमीत तयार झालेले माजी जि.प.सदस्य बी.एच.पाटील-दादा यांनी इंटर युनिर्व्हरसिटी रेसलींग या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दिल्लीचे पैलवान सतपाल यांच्याबरोबर १९८२-८३ साली कुस्ती झाली होती. ही कुस्ती बरोबरीत सोडविल्याचे सांगण्यात येते. पण पार्वती गल्लीच्या तालमीतील एक पैलवान बी.एच.दादांच्यानिमित्ताने राष्ट्रीयस्तरावर पोहचले होते. याच पिढीतील कै.हिंदूराव पाटील, कै. रंगराव माने, वसंत पाटील आदींनी पार्वती गल्लीच्या तालमीत कुस्तीचे धडे घेत गावोगावची मैदाने मारली होती. अलिकडच्या काळात निवास देवणे, भिमराव माने, अनिल माने आदींनी या तालमीत कुस्तीचे धडे गिरवले आहेत.

आंबेगल्लीत त्याकाळी शंकर उदाळे, कृष्णात चौगले, शंकर तोडकर, तुकाराम लोहार, चंदन पोवार ईश्‍वरा घाटगे, रंगराव टिंगे, नारायण पाटील, दिनकर व्हरगे. टिटवे, महादेव चौगले, दादा जाधव, पांडूरंग उदाळे, गणू लोहार, दिनकर तोडकर, दादू धनगर, बापू धनगर. साधू चौगले या जाणत्या मंडळींनी आंबेगल्लीला तालिम बांधली. तालमीला नाव काय द्यायचे असा प्रश्न उपस्थित झाला. याचदरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे १९४२ ला “आझाद हिंद सेनेची” स्थापना केली आणि १९४३ ला पूर्व भारतातून ब्रिट्रीशांविरोधात युध्दाची मोहिम उघडली. पूर्व भारतातून कोहिमा, नागालॅंड असे प्रदेश पादाक्रांत करत अनेक आघाड्यावर विजय मिळवला होता. सुभाषबाबूंच्या या मोहिमेला पूर्वेकडील जपान, थायलंड आदी देशांनी आझाद हिंद सेनेला पांठिबा दिला होता. देशभर महात्मा गांधीजींनंतर सुभाषचंद्र बोस यांची देशप्रेमाची लाट होती. घरोघरी सुभाषबाबूंची नारा होता. मग याच लाटेतून आंबेगल्लीतील या जाणत्या मंडळींनी मग तालमीला सुभाष तालिम असे नाव दिले. तालमीसाठी नारायण पाटील यांनी जागा दिली आणि त्याच जागेवर सुभाष तालिम १९४३ ला बांधली. दुसऱ्या पिढीतील गणपतराव उदाळे, विलास घाटगे, वाय. के. चौगले, बळीराम नावले, बाबुराव चौगले, नामदेव चौगले, बाळू भागोजी अष्टेकर, सखाराम धनगर, दिनकर मोरे, भाऊसाहेब चौगले, धोंडीराम खुर्दाळे, पांडूरंग पाटील, कृष्णात खुर्दांळे आदी मंडळींनी या तालमीत सराव करून गावोगावची मैदाने मारली. दरम्यान २०१२-१३ साली तत्कालीन उपसरपंच व विद्यमान सरपंच सचिन चौगले यांनी पुढाकार घेत जुन्या सुभाष तालमीचा जिर्णाध्दार करत तालमीची नवी इमारत बांधली आहे.

विठ्ठल गल्लीत कै. दत्तात्रय पाटील-घोळसकर, बळवंत जाधव, आण्णा बराले, कृष्णा बराले, रामा नाईक, बापुसो चौगले, सर्जेराव पाटील, तुकाराम जाधव, विष्णू जाधव, धोंडीराम जाधव, श्री.चव्हाण आदी मंडळींनी तालिम बांधण्यासाठी १९४२- ४३ च्या दरम्यान पुढाकार घेतला. गल्लीत विठ्ठल मंदीर असल्याने तालमीला विठ्ठल तालीम असे नाव दिले. याच तालमीत दुसऱ्या पिढीतील केशव नांगरे, गणपती बराले, नामदेव परीट, विलास परीट-आण्णा, प्रा.अशोक पाटील-घोळसकर, मारूती संकपाळ-बापू, भगवान बराले, सरदार कोंडिबा चौगले.( चांदगीराम) , सर्जेराव पांडुरंग जाधव, वाघ पाटील, जग्गूनाना चौगले, बी.आर.पाटील, कै.बी.वाय पाटील-सर (चावडी गल्ली) आदींनी विठ्ठल तालमीच कुस्तीचा सराव केला आहे.

चावडी गल्लीत श्री. वाळवेकर, श्रीपती पाटील, कृष्णात पाटील-बोणे, यशवंत पाटील, ईश्वरा सासने, गणपत सासने,ज्ञानू पाटील, भिमराव पाटील, गणपती पोवार, अर्जुन पोवार आदींच्या पुढाकारातून तालीम बांधण्यास पुढाकार घेतला. सुरूवातीला तालीम वाळवेकर यांच्या घरात सुरू केली. कालांतराने कै.हंबीरराव पाटील यांचा वाडा आहे. त्याच्या शेजारी पूर्वेकडील जागेत होती असे सांगण्यात येते. सध्या या तालमीची इमारत आदी अवशेष काहीच नाहीत. पण चावडी गल्लीत तालीम होती हे मात्र निश्चित सांगण्यात येते. गल्लीत सुरूवातीलाच हनुमान (मारूती) असल्याने तालमीला नावही हनुमान असे दिले होते असे सांगण्यात येते.

शिवाजी गल्लीत कै. बाळासाहेब रघूनाथ पाटील, पांडूरंग रघूनाथ पाटील (पी.आर), हिंदूराव जौंदाळ, राघू जौंदाळ, धोंडी पाटील, पांडूरंग जौंदाळ, ज्ञानू ईरूडकर, तुकाराम ईरूडकर, रामा तेलवेकर, दत्ता नरके, ज्ञानू नरके, आदींनी तालीम स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी शिवाजी या मंडळींनी जय शिवाजी तालीम असे नाव तालमीला दिले. दुसऱ्या पिढीतील कृष्णात जौंदाळ, पांडूरंग जौंदाळ, श्री, किरूळकर आदी मंडळींनी तालमीत व्यायामाचा वारसा पुढे चालवला. तिसऱ्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी किरण बावडेकर-निगवे दुमाला व कृष्णात जौंदाळ, अर्जुन चौगले-वस्ताद यांनी मोलाचे योगदान दिले. अगदी अलिकडे काही वर्षापूर्वी सचिन नरके, चंद्रकांत नरके, दत्ता बराले, बाजीराव नरके, सागर बराले, युवराज पाटील आदी तरूण पोरांनी या तालमीत व्यायाम आणि कुस्तीचे सराव केले आहेत.

दलित वस्ती (सध्याचे मिलिंद नगर) येथे तीन तालमी असल्याचे सांगण्यात येते. याच तालमीतून मग दादू महार हे पैलवान शाहू महाराजांच्या काळात हत्तीचे मुख्य महात होते. तर गणू महार हे शाहू महारांजाच्या साठमारी खेळात गणू साठमार नावाने प्रसिध्द झाले. पहिली तालीम आडके तालीम या तालीम आप्पासो माने, बाचणीकर वस्ताद, जयभीम तालमीत गणू माने- दुकानदार, शंकर माने- वस्ताद, बाळाराम माने, लक्ष्मी तालीमीत राघू शिंदे, श्री.जाधव-(शिरठोणकर जावई) यांनी तर पूर्वीचे समाज मंदीर शाहू चिमाजी माने, आप्पासो माने, चंदन नाईक पैलवानकीची सराव केला. तर दादू कृष्णाजी पंडित यांनी स्वतः वैयक्तीक तालीम बांधली होती. आज या तालमींचे अवशेष नाहीत पण दलित समाजातील पैलवानांनी आपल्या कामगिरीने नाव केले होते.

माळवाडीत वल्लीसो दर्गाच्या मागे तालीम बांधली. कै.दत्तू पाटील, मल्लू इंगळे, बापुसो पाटील, कै.हिंदूराव लोहार, सदाशिव लोहार, कृष्णा ठमके, बत्तासू रणदिवे आदी मंडळींनी त्याकाळी तालीम बांधण्यात पुढाकार घेतला.

ईरिगेशन ऑफिसच्या मागील खाणीतून दगड आणले…१९४१ ते १९४४ पर्यत गावच्या आठ गल्ल्यात तालमींच्या इमारती दिग्गज मंडळींनी श्रमदानातून बांधल्या प्रत्येक गल्लीतील घरटी माणूस यासाठी राबत होता. तालमींच्या इमारती बांधण्यासाठी निगवे रस्त्यावरील पंचगंगा पाणी पुरवठा आफिसच्या सध्या मागील बाजूला खण आहे. या खणीतून त्याकाळी वडर समाजाकडून दगड फोडून घेवून ते वडणगेतील तालमीच्या इमारतीसाठी वापरल्याचे जुन्या लोकांकडून सांगण्यात येते. आज या तालमींच्या इमारती प्रत्येक गल्लीत उभ्या आहेत. वडणगेच्या सदृष्ठसंपन्न पैलवानकीच्या वैभवात भर घालणारया या तालमी आज जरी मोडकळीस आल्या असल्या तरी त्या वडणगेच्या कुस्ती पंरपरेचा मोठा साक्षीदार म्हणून उभ्या आहेत. आजच्या नव्या पिढीला वडणगेतील तालीम परंपरेचा निश्चितच अभिमान वाटावा असा हा संपन्न वारसा आहे.

( साभार- वडणगेच्या प्रथा आणि परंपरा)

Related posts

धुळकुंडा …

समुपदेशन काळाची गरज…

चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406